व्यावसायिक चातुर्यातून ४० टन कलिंगडाची थेट विक्री, १७ गावांत पद्धतशीर नियोजन

कोरोना संकटामुळे शेतमाल विक्री व्यवस्था अडचणीत आली असता मच्छींद्र व विजय या पाटील बंधूंनी (मौजे रेल, जि. जळगाव) हिंमतीने, शिताफीने त्यावर मार्ग काढला. दोन एकरांत पिकवलेल्या दर्जेदार कलिंगडाची परिसरात १७ ते १८ गावांमधून ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारे थेट विक्री केली. शेताजवळ स्टॉल मांडून ते ग्राहकही मिळवले. व्यावसायिक चातुर्य व अतीव कष्टाचे चीज झाले. तब्बल ४० टन व त्यापुढील मालाची विक्री झाली. पिकवण्याबरोबर मार्केटिंग व विक्रीही आपण यशस्वी करू शकतो हा आत्मविश्‍वास त्यातून उंचावला.
शेतातच झाडाखाली स्टाॅल मांडून कलिंगडाची विक्री केली.
शेतातच झाडाखाली स्टाॅल मांडून कलिंगडाची विक्री केली.

कोरोना संकटामुळे शेतमाल विक्री व्यवस्था अडचणीत आली असता मच्छींद्र व विजय या पाटील बंधूंनी (मौजे रेल, जि. जळगाव) हिंमतीने, शिताफीने त्यावर मार्ग काढला. दोन एकरांत पिकवलेल्या दर्जेदार कलिंगडाची परिसरात १७ ते १८ गावांमधून ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारे थेट विक्री केली. शेताजवळ स्टॉल मांडून ते ग्राहकही मिळवले. व्यावसायिक चातुर्य व अतीव कष्टाचे चीज झाले. तब्बल ४० टन व त्यापुढील मालाची विक्री झाली. पिकवण्याबरोबर मार्केटिंग व विक्रीही आपण यशस्वी करू शकतो हा आत्मविश्‍वास त्यातून उंचावला. जळगाव जिल्हा केळी, कापूस, भरताची वांगी आदी पिकांसाठी प्रसिद्ध आहे. अलीकडे कलिंगड, खरबूज घेण्याकडेही येथील शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. उन्हाळ्यात रसना तृप्त करणाऱ्या व थंडावा देणाऱ्या या फळांना जोरदार मागणी असते. त्याचा फायदा घेण्याचा शेतकऱ्यांचा हेतू असतो. मात्र कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर विक्री व्यवस्थेत अनेक अडथळे उभे राहिल्याने राज्यातील कलिंगड उत्पादकांवर अक्षरशः संकट कोसळले. जळगाव जिल्ह्यात धरणगाव तालुक्यातील मौजे रेल गावचे मच्छींद्र व विजय हे पाटील बंधूही त्यास अपवाद नव्हते. मात्र संयम व धीर यांची पराकाष्ठा करीत त्यांनी विक्री व्यवस्थेत दाखवलेली हुशारी शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. कलिंगडाचा प्रयोग पाटील बंधूंची सुमारे ५० एकर शेती आहे. मच्छींद्र जवळच्या गावातील महाविद्यालयात ११ व १२ वीला हिंदी विषय शिकवतात. विजय पूर्णवेळ शेती करतात. कापूस, कांदा, गहू, हरभरा ही त्यांची मुख्य पिके आहेत. यंदा प्रथमच त्यांनी दोन एकरांत कलिंगड घेण्याचा प्रयोग करण्याचे ठरवले. जळगाव जिल्ह्यातील लोणी येथील प्रयोगशील शेतकरी व आप्तेष्ट नरेंद्र पाटील त्यांचे मोलाचे मार्गदर्शक दिले. मागील डिसेंबरच्या २९ तारखेस रोपवाटिका तयार केली. साधारण १९ जानेवारीच्या दरम्यान पुर्नलागवड केली. शिकाऊ वृत्ती व उत्कृष्ट व्यवस्थापनाच्या जोरावर उत्तम पीक घेतले खरे. पण काढणी आणि विक्री याच हंगामात नेमके कोरोनाचे संकट उभे ठाकले. या काळात व्यापाऱ्यांनी किलोला दोन, तीन ते चार रूपये दर देऊ केला. मात्र या दराने उत्पन्न तर सोडाच पण खर्च देखील भरून येण्याची शक्यता नव्हती. हिमतीने काढला मार्ग आपत्तीत खचून न जाता पाटील बंधूंनी हिंम्मत एकवटली. दूरदृष्टी, संधी ओळखण्याचे कसब, त्वरित निर्णय घेण्याची तयारी, त्यासाठी करावे लागणारे परिश्रम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यावसायिक चतुराई व व्यावहारिक दृष्टिकोन हे गुण वापरले. व्यापाऱ्यांना मातीमोल दराने दर्जेदार माल देण्यापेक्षा आपल्या मालाची विक्री आपणच करायची आणि ‘हम किसिसे कम नही’ हे सिद्ध करायचे ठरवले. विक्रीचे पद्धतशीर नियोजन विक्री व्यवस्थेचा अभ्यास व त्यानुसार पद्धतशीर नियोजन केले. आपल्या ८ ते १० किलोमीटर परिसरात सुमारे २० गावे आहेत. या भागात कलिंगड उत्पादन तसे फारसे होत नाही. त्यामुळे प्रत्येक गावात जाऊन थेट विक्रीची संधी आहे हे ओळखले. शिवाय शेत देखील रस्त्याला लागून असल्याने झाडाखाली स्टॉल मांडला तर ये-जा करणाऱ्या प्रवाशांना देखील विक्री करणे शक्य होणार होते. अशी साधली विक्री

  • मच्छींद्र यांनी दररोज दोन गावात केले विक्रीचे नियोजन
  • आदल्या संध्याकाळी फळांची काढणी व्हायची.
  • सकाळी सातला ट्रॉलीत माल भरून ट्रॅक्टर पहिल्या गावी रवाना व्हायचा.
  • सोबत दोन गडी असायचे.
  • ट्रॉलीत सुमारे १८ क्विंटल ते दोन टनांपर्यंत माल बसतो.
  • गावी पोचल्यानंतर मुख्य चौकांमधून गडी कलिंगड घ्या कलिंगड असे प्रमोशन गडी करायचे.
  • आरोग्य सुरक्षिततेची काळजी घेतली जायची. (मास्क, सॅनिटायझर आदी)
  • दुपारी १२ वाजेपर्यंत एक गाव झाल्यानंतर पाटील शेतावर परतायचे.
  • दुपारी तीनला पुन्हा ट्रॉली भरून दुसऱ्या गावी रवाना व्हायची. रात्री सात- आठ वाजेपर्यंत विक्री चालायची.
  • -शेत हे रस्त्यालगत असल्याने तेथील स्टॉलची विक्री बंधू विजय यांनी सांभाळली.
  • आश्‍वासक उत्पन्न पाटील यांनी अशा प्रकारे परिसरातील १७ ते १८ गावांमधून ९ ते १० दिवसांत सुमारे ४० टन मालाची थेट विक्री केली. प्रति किलो सुमारे १० रूपये दर ठेवला होता. चवीला अत्यंत गोड अशा दर्जेदार कलिंगडाला ग्राहकांची चांगली पसंती मिळाली. काही माल आप्तेष्ट, मित्रमंडळी यांना मोफतही दिला. कलिंगडाचे सरासरी वजन तीन ते साडेचार किलो तर कमाल वजन ८ किलोपर्यंत होते. एखाद्यावेळी फळाची किंमत ४५ रूपये झाली तर वरचे पैसे न घेता ४० रूपयांतही विक्री साधली. या विक्री व्‍यवस्थेत गावकऱ्यांनी ही चांगले सहकार्य दिले. व्यापाऱ्यांना माल दिला असता तर जिथे दीड लाख रूपये देखील मिळाले नसते तिथे सुमारे तीन लाख ९७ हजार म्हणजे सुमारे चार लाख रूपयांचे उत्पन्न मेहनतीतून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मिळवले. विशेष म्हणजे आपला माल आपण स्वतः विकू शकतो हा आत्मविश्‍वास आला. वाहतुकीसाठी परवाना पाटील म्हणाले की कोरोना संकटात वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून तहसीलदारांकडे परवाना अर्ज केला होता. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी गावांगावातून कलिंगडाची थेट विक्री करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी आपण सहकार्य करावे असा आशय त्यात होता. त्यातून वाहतुकीचे काम सुकर झाल्याचे पाटील यांनी सांगितले. प्रतिक्रिया आमचा भाग जिरायती आहे. गावात आम्ही प्रथमच पॉली मल्चिंगवर कलिंगडाचा प्रयोग यंदा केला. आमचे वडील मगन पाटील अत्यंत मेहनती शेतकरी आहेत. वडिलांसह पाच भावांनी त्यातूनच कमी क्षेत्रातून आपले क्षेत्र वाढवले आहे. गिरणा नदीवरून सहा किलोमीटरवरून पाइपलाइन केली आहे. आम्ही केलेल्या प्रयत्नांमुळे वडील समाधानी झाल्याचा आनंद आम्हाला झाला आहे. मच्छींद्र पाटील ७९७२३४६५२९  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com