नागपूर ः रंगीत कापसाच्या उत्पादनाचे स्वप्न संशोधन संस्थांकडून रंगविण्यात आले असले, तरी सं
अॅग्रो विशेष
बहुउद्देशीय टोकण यंत्राने वाचवले शेतकऱ्यांचे कष्ट
नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील सौरभ कदम व प्रसाद देशमुख यांनी एकत्र येत कृषी अवजारे यंत्रनिर्मिती सुरू केली आहे. सुमारे सात वर्षांपासूनचे अथक प्रयत्न, तांत्रिक कौशल्य व कल्पनाशक्ती यांचा वापर करून त्यांनी आधुनिक बहुउद्देशीय टोकण यंत्र विकसित केले आहे. कांद्यासह अन्य पिकांत त्याचा वापर यशस्वी ठरत असून शेतकऱ्यांकडून त्यास चांगला प्रतिसाद लाभत आहे
नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील सौरभ कदम व प्रसाद देशमुख यांनी एकत्र येत कृषी अवजारे यंत्रनिर्मिती सुरू केली आहे. सुमारे सात वर्षांपासूनचे अथक प्रयत्न, तांत्रिक कौशल्य व कल्पनाशक्ती यांचा वापर करून त्यांनी आधुनिक बहुउद्देशीय टोकण यंत्र विकसित केले आहे. कांद्यासह अन्य पिकांत त्याचा वापर यशस्वी ठरत असून शेतकऱ्यांकडून त्यास चांगला प्रतिसाद लाभत आहे
नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात देवळाली प्रवरा येथील सौरभ राजेंद्र कदम व प्रसाद अप्पासाहेब देशमुख हे दोन मित्र आहेत. सौरभ हे एमटेक (सिव्हिल) असून प्रसाद यांचे पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. दोघांना वडिलोपार्जित प्रत्येकी सुमारे तीस एकर जमीन आहे. उसासह कांदा, आले, हरभरा, सोयाबीन, मका व अन्य पिके ते घेतात.
गटाची स्थापना
देवळाली प्रवरासह परिसरातील गावातील तरुण व होतकरू २५ तरुणांनी एकत्र येऊन दहा वर्षांपूर्वी
आत्मा अंतर्गत शेतकरी राजा कृषी शेतकरी गटाची स्थापना केली. त्यात सौरभ व प्रसाद यांचाही समावेश होता. शेतीतील अवजारे, त्यातून वेळ, श्रम व मजूरीबळ कसे कमी करता येतील याबाबत गटात चर्चा व्हायची. या भागात ऊस, कांदा आदींची मोठ्या प्रमाणात लागवड होते. पारंपारिक पद्धतीने बियाणे वापरून रोप तयार करणे, त्यासाठी बियाणे व समप्रमाणात हाताने बियाणे टाकणाऱ्या कुशल मजुरांची गरज असे. मात्र असे मजूर मिळत नव्हते. साधारण सात वर्षांपूर्वी गटाच्या बैठकीत याविषयावर चर्चा झाली. त्यातून सौरभ व प्रसाद यांनी कांदा रोपनिर्मितीचे मनुष्यचलित टोकण यंत्र तयार करण्याचा निर्णय घेतला.
कल्पनेला कृतीचे बळ
प्रसाद यांना प्रत्यक्ष शेतीचा मोठा अनुभव होता. तर सौरभ यांच्याकडे तांत्रिक शिक्षणाचे बळ होते.
दोन्ही गोष्टींचा संगम झाला. शेतकऱ्यांची नेमकी गरज लक्षात आली. त्यातून मग ‘ट्रायल ॲण्ड इरर’ पद्धतीने यंत्र तयार होण्यास व त्याच्या चाचण्या घेण्यास सुरवात झाली. अनेक अडथळे आले. किमान लाख रूपयांपर्यंत भांडवलही खर्च झाले. अखेर सात वर्षांच्या यश-अपयशानंतर बहुउद्देशीय टोकण यंत्र विकसित करण्यात दोघा मित्रांना यश आले. पुढचा टप्पा म्हणजे आपल्या गावीच ‘एसपी फर्म’ त्यांनी स्थापन केली. तेथेच वर्कशॉप उभारले आहे. साधारण १० ते १२ कामगार काम करतात.
असे आहे बहुउद्देशीय टोकण यंत्र
- मानवचलित टोकण यंत्राची लांबी एक मीटर व उंची चार फूट.
- यंत्राच्या वरच्या बाजूस बियाणे टाकण्यासाठीच्या पेटीची रुंदी व उंची पाऊण फूट. लांबी दीड फूट.
- त्यात असलेले रोटर (सीड मिटरींग मॅकेनिझम ) सात
- यंत्राला हाताने ओढण्यासाठी असलेली दांडी सहा फूट लांबीची
- त्याला सात फण असून. फणांतील अंतर सुमारे पाच इंचाचे. मात्र ते कमीजास्त करणेही शक्य.
- यंत्राची उंची तीन फूट
- अलीकडेच यंत्रात तांत्रिक सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार ‘लेझर सीएनसी कटिंग, ‘सीएनसी बेंडींग’ व ‘सीओटू वेल्डिंग यांचा वापर
- बियाणे टाकण्यासाठीचे छिद्र पूर्वी अर्धा इंच होते. मात्र छोट्या बियाण्यापासून मोठे बियाणे टाकता यावे यासाठी आता ते एक इंच.
- मनुष्यचलित यंत्र सुरवातीला ओढायला ताण पडायचा. आता बेअरिंग बसविल्याने ओढणीला सहज सोपे झाले आहे.
- बैलचलित, ट्रॅक्टरचलित व पॉवर विडरचलित अशा माध्यमातूनही यंत्र वापरणे सोपे
- गरजेनुसार सात, नऊ, दहा, एकरा व तेरापर्यंत फण
- पूर्वी पेरणी झालेले बियाणे राहाळणीसाठी (माती आड करण्यासाठी) पास नव्हती. आता ती बसवण्यात आली आहे.
आगामी नियोजन
येत्या काळात लसूण लागवडीसाठीही सोप्या पद्धतीचे यंत्र विकसित करण्याचे नियोजन आहे. दिल्ली येथील पेटंट कार्यालयात’ अर्ज दाखल केला आहे.
बियाणे, मजुरीत बचत
यंत्राचा वापर पूर्वी केवळ कांदा रोपे तयार करण्यासाठी व्हायचा. मात्र सौरभ सांगतात की पुनर्लागवड व थेट रोवणी पद्धतीतही त्याचा वापर करणे शक्य आहे त्याही पुढे जाऊन मेथी, लसूणघास, कोथिंबीर, गाजर, बीटरूट, सोयाबीन, हरभरा, मका आदी पिकांतही त्याचा वापर करता येतो. यात कांदा रोपवाटिकेसाठी एका गुंठयात अर्धा किलोपर्यंत बियाणे लागते. थेट पेरणीसाठीही एकरी दीड दोन किलोपर्यंतच बियाणे लागते. पूर्वी एकरी हाच वापर तीन किलोपर्यंत असायचा.
शिवाय रोपांत सारखेपणा मिळत नव्हता. दोन ओळीतील अंतर कमी जास्त होत होते. या सर्व त्रुटी आता दूर होऊन बियाणे, मजुरी, कष्ट, वेळ या सर्व बाबींमध्ये बचत झाली आहे.
गादीवाफा निर्मितीही सोपी
यंत्राच्या वापरातून पन्नास टक्के बियाणे कमी लागते. कमी दिवसांत रोप तयार होते. सौरभ म्हणाले की पुढे वाफा व मागे पेरणी करणारे प्रचलित यंत्र आहे. मात्र आम्ही यंत्रात पुढे रुंद गादीवाफा (बेड) व मागे पेरणी अशा पद्धतीची सुविधा तयार केली आहे. दिवसभरात मनुष्यचलित यंत्रातून सुमारे दोन एकरांपर्यंत तर ट्रॅक्टर व बैलचलित यंत्रातून आठ एकरांपर्यंत पेरणी करता येते.
फवारणी यंत्रात सुविधा
राहुरी तालुक्यातील बहुतांश भागात डाळिंब, मोसंबीच्या बागा आहेत. त्यामुळे ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्राद्वारे फवारणी केली जाते. फवारणीचा पाइप हाताने गुंडाळावा लागतो. ते मोठे कष्टाचे काम असते. ते सुकर करण्यासाठी यंत्रात बदल केले आहेत. त्याच्या मागील बाजूस गिअर बॉक्स बसवला आहे. त्यामुळे स्वयंचलित पद्धतीने पाइप गुंडाळला जातो. त्यामुळे पाइपचे होणारे नुकसान व कष्टही कमी झाले आहेत.
शेतकऱ्यांकडून प्रतिसाद
सौरभ म्हणाले की आत्तापर्यंत सुमारे ८०० पर्यंत यंत्रांची विक्री झाली आहे. नगर, पुणे, सोलापूर, नाशिकसह कर्नाटकातही काही यंत्रे विकली आहेत. मानवचलित ते ट्रॅक्टरचलित पद्धतीत त्यांच्या किमती १६ हजारांपासून ते ५५ हजार रुपयांपर्यंत आहेत.
प्रशिक्षणातून कौशल्यवृध्दी
केंद्र सरकारच्या ‘स्टार्टअप इंडिया’ योजनेतून नवे संशोधन करण्याला शेतकरी व संशोधकांना अनुदान दिले जाते. त्यामार्फत काशीपूर (उत्तराखंड) येथील आयआयएम संस्थेतील ‘इनक्युबेशन सेंटर’
मध्ये अनुभव घेण्यासाठी दोघा मित्रांची प्रशिक्षणासाठी सहा महिन्यांपूर्वी निवड झाली. त्यात त्यांनी तीन महिन्यांचे ऑनलाइन प्रशिक्षण घेतले. येत्या जानेवारीत केंद्रीय कृषी मंत्रालयात मुलाखती घेऊन पुन्हा तीन महिन्यांसाठी काशीपूर येथे प्रशिक्षणाची सुविधा मिळण्याची शक्यता आहे.
संपर्क- सौरभ कदम- ९३७३५६३५०५, ९७३०१२३००५
फोटो गॅलरी
- 1 of 671
- ››