कंपोस्ट खते बनवण्याच्या पद्धती

सामान्यपणे खड्ड्यामध्ये कंपोस्ट खत तयार केले जात असले तरी अधिक वेगवान पद्धतीही उपलब्ध आहेत.
सामान्यपणे खड्ड्यामध्ये कंपोस्ट खत तयार केले जात असले तरी अधिक वेगवान पद्धतीही उपलब्ध आहेत.

बदलते हवामान आणि जमिनीचा कमी झालेला कस हे दोन्ही घटक पीक उत्पादनावर परिणाम करण्यासाठी कारणीभूत आहेत. संकरित जाती आणि पुरेसे पाणी उपलब्ध असल्यामुळे शेतकरी एकापेक्षा जास्त हंगामांमध्ये सलग पिके घेत आहेत. खते आणि पाण्याच्या अतिवापराने हजारो एकर जमिनी क्षारपड झाल्या आहेत. जमिनीचा कस टिकविण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा जमिनीत वापर करणे गरजेचे आहे. त्यासाठी कंपोस्ट खत उपयुक्त ठरते. ते बनवण्याच्या विविध पद्धतीविषयी माहिती घेऊ.   शेतातील काडीकचरा, जनावरांचे मलमूत्र, पिकाचे अवशेष, तसेच बांधावरील पानगळ इत्यादींचे जिवाणूंच्या सहयोगाने कुजवून तयार केलेले खत म्हणजे ‘कंपोस्ट खत’ होय. या खतामध्ये अनेक प्रकारचे वनस्पती व प्राणिजन्य पदार्थ असतात. हे खत तयार करण्यासाठी इंदोर पद्धत, बंगलोर पद्धत, सुपर कंपोस्ट खत, नॅडेप पद्धत इत्यादी पद्धतींचा वापर होतो. कंपोस्ट खतातील घटक  १) सेंद्रिय पदार्थ ः

  • सकस कंपोस्ट बनविण्यासाठी सेंद्रिय कचऱ्याची प्रत चांगली लागते.
  • यामध्ये कर्ब व नत्राचे प्रमाण ३०:१ असावे. यातील जिवाणूंना वाढीसाठी ३० भाग कर्ब व १ भाग नत्राची आवश्‍यकता असते.
  • कर्ब : नत्र प्रमाण असलेले पदार्थ ः

  • कापलेले गवत (२० : १)
  • कागद (१७ : १)
  • लाकडाचा भुसा (४५ : १)
  • भुईमूग (काड) (१० : १)
  • गुरांचे शेण (१.२ : १)
  • पालापाचोळा (६० : १)
  • कर्ब किंवा नत्राचे प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास, नत्र अमोनियाच्या रूपात नष्ट होते. जमिनीतील मुरमाचे बारीक कण अन्नद्रव्यांचा पुरवठा करतात. सेंद्रिय पदार्थाचे विघटन लवकर होण्यासाठी, त्याचे बारीक तुकडे करून कंपोस्ट खतासाठी वापरावेत.
  • २) जिवाणू ः अनेक प्रकारचे जिवाणू सेंद्रिय पदार्थ कुजविण्यासाठी कार्यरत असतात. त्यात बुरशी, जिवाणू, अँक्टिनोमायसेट, प्रोटोझोआ इत्यादींचा समावेश होतो. ३) पाणी ः

  • कंपोस्टच्या खड्ड्यामध्ये ५० ते ५५ टक्के ओलावा गरजेचा असतो.
  • ओलावा कायम राहण्यासाठी सतत पाणी शिंपडावे.
  • ४) प्राणवायू 

  • जिवाणूंच्या कार्यासाठी प्राणवायू गरजेचा असतो, त्यामुळे सेंद्रीय पदार्थांचे विघटन चांगले होते.
  • सेंद्रिय पदार्थाचे विघटन दोन प्रकारचे जिवाणू करतात, १) प्राणवायूवर जगणारे जिवाणू २) प्राणवायू शिवाय जगणारे जिवाणू
  • प्राणवायू घेऊन जगणारे जिवाणू सेंद्रिय पदार्थाचे लवकर विघटन करतात. परंतु, त्यांना पुरेसा प्राणवायू न मिळाल्यास, प्राणवायू शिवाय जगणाऱ्या जिवाणूंची संख्या वाढते. आणि या जिवाणूंच्या प्रक्रियेमुळे कंपोस्ट खताला वास येतो.
  • कंपोस्ट खताला वास येऊ नये, म्हणून कंपोस्ट खड्ड्यात प्राणवायूचा पुरवठा होण्यासाठी योग्य व्यवस्था करावी लागते. (ठरावीक कालावधीनंतर थर खाली वर करावेत.)
  • ५) पूरक पदार्थ (माती, जिप्सम, गवत) मातीत चुना आणि डोलोमाईट (२ टक्के) असल्यास नत्राचा ४० टक्क्यापर्यंत नाश होतो, त्यामुळे जमिनीत चुना किंवा डोलोमाईट टाकू नये. कंपोस्ट खत निर्मितीवेळी होणारे बदल ः १) तापमानातील बदल ः कंपोस्ट खड्ड्यातील तापमानाचे निरीक्षण केल्यास कमी तापमान, जास्त तापमान, खूप जास्त आणि कमी तापमान हे बदल आढळून येतात. लहान खड्ड्यात (२.५ उंच व १.५ मी. लांबी आवश्यकतेनुसार) कंपोस्ट तयार केल्यास त्याचे तापमान ५५ ते ६० अंश सेल्सिअसपर्यंत आणि त्यापेक्षा मोठ्या खड्ड्याचे तापमान ६० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते. २) सामू मधील बदल ः या प्रक्रियेत तयार होणाऱ्या आम्ल किंवा विम्ल यामुळे सामू बदलत जातो आणि शेवटी ६ ते ८ च्या दरम्यान स्थिर होतो. ३) जिवाणूंचे बदल ः

  • ४० ते ६० अंश सेल्सिअस तापमानामध्ये थर्मोफिलीक जिवाणू व बुरशी कार्यक्षम असतात.
  • २० ते ४० अंश सेल्सिअस तापमानात मेझोफिलिक जिवाणू कार्यक्षम असतात.
  • कंपोस्ट खतातील नत्राचे वितरण ः नैसर्गिक व्यवस्थेप्रमाणे कंपोस्ट दिल्यानंतर पिकांना केवळ १७ टक्के नत्र मिळते. मात्र, व्यवस्थापन योग्य केल्यास ५० टक्क्यांपर्यंत नत्र पिकांना मिळू शकते. १) कंपोस्ट तयार करण्याच्या पारंपरिक पद्धती ः

  • खताचे पावसापासून संरक्षण होईल अशी जागा निवडावी.
  • पिकांचे अवशेष, पालापाचोळा, जनावरांचे खत आणि टाकाऊ पदार्थ जमा करून, त्यांचा १५ सें.मी. चा थर सर्वांत खाली पसरावा.
  • शेणखताचा ८ सें.मी. जाडीचा दुसरा थर पहिल्या थरावर पसरावा.
  • चांगल्या मातीचा ३ सें.मी.जाडीचा दुसऱ्या थरावर पसरावा.
  • जोपर्यंत ढिगाची उंची १.५ मी. होत नाही, तोवर वरील क्रमवारीनुसार थरांची रचना करणे.
  • तयार ढिगाला सर्व बाजूंनी भिजेल एवढेच पाणी नियमित द्यावे.
  • तीन व पाच आठवड्यांनंतर ढिगाचे थर फावड्याच्या साह्याने खालीवर करावेत.
  • तीन ते पाच महिन्यांत तयार झालेले खत शेतीसाठी वापरावे.
  • २) चौदा दिवसांत कंपोस्ट तयार करण्याची पद्धत ः

  • वाळलेल्या किंवा हिरव्या वनस्पतीच्या फांद्या, पालापाचोळा इ. बारीक करून घ्यावे.
  • ताज्या शेणासोबत वरील पदार्थ चांगले एकत्रित करून घ्यावे.
  • एकत्रित केलेल्या पदार्थांचे ढीग १ मी x१ मी x१ मी. उंचीचे करावेत. ढिगाची उंची १ मी पेक्षा जास्त करू नये.
  • तयार केलेल्या ढिगाला केळीच्या पान किंवा फाटलेले पोते किंवा ताडपत्रीने झाकावे.
  • चार दिवसांनंतर ढिगाचा आतील भाग गरम होईल. जो भाग गरम झाला नसेल, त्यामध्ये खत मिसळावे.
  • ढीग खालीवर करताना आतील भाग बाहेर व बाहेरचा भाग आत जाईल, याची काळजी घ्यावी.
  • त्यानंतर प्रत्येक दोन दिवसांनंतर ढीग खाली वर करावा.
  • १४ ते १८ दिवसांत वापरायोग्य खत तयार होते.
  • ३) तीन कप्प्यांत कंपोस्ट तयार करण्याची पद्धत ः

  • शेतावर बांबूच्या कामट्या किंवा इतर साहाय्याने तीन कप्प्यांची आयताकृती तयार करा. आयताकृतीचा आकार५ x १.५ x १.५ मीटर असायला पाहिजे.
  • पहिल्या कप्प्यात पालापाचोळा, गवत, झाडांचे तुकडे भरावेत. थोडी माती किंवा प्राण्यांचे खत मिसळून पहिला कप्पा पूर्ण भरावा.
  • एका महिन्यानंतर पहिल्या कप्प्यातील कंपोस्ट फावड्याच्या साहाय्याने दुसऱ्या कप्प्यात भरावे. थर खालीवर करून एकजीव करावेत.
  • दुसऱ्या कप्प्यावर माती टाकून ती सतत ओलसर व मोकळी राहील याची काळजी घ्यावी.
  • रिकामा झालेला पहिला कप्पा लगेच पूर्वीप्रमाणे भरून घ्यावा. जेणे करून कंपोस्ट तयार करण्याची क्रिया सतत चालू राहील.
  • परत एक महिन्यानंतर दुसऱ्या कप्प्यातील कंपोस्ट काढून तिसऱ्या कप्प्यात भरा. त्याला पूर्णपणे हवा लागू दिल्यानंतर मातीने झाकून टाकावे.
  • एका महिन्याने त्यातील कंपोस्ट शेतीसाठी वापरता येते. ४) सेमी संकन कंपोस्ट पद्धती ः
  • खत निर्मितीसाठी योग्य जागा निवडून स्वच्छ करावी. आणि त्या ठिकाणी अर्धा मीटर खोल खड्डा तयार करा.
  • कंपोस्ट साहित्य लहान तुकड्यात तोडून घ्या आणि त्याला ५ः१ या प्रमाणात खतासोबत मिसळावे.
  • वरील साहित्य खड्ड्यात भरा.
  • जमिनीपासून ढीग १ ते २ मी उंच होईपर्यंत भरावा. तयार ढिगाला हाताने किंवा फावड्याच्या साहाय्याने चौकोनी आकार द्यावा.
  • माती आणि भुशाच्या मिश्रणाने ढीग लिंपून घ्यावा. त्यावरती मातीचा थर टाकून लाकडाच्या साह्याने लहान छिद्रे पाडावीत.
  • खत तयार होण्यासाठी १ ते २ महिन्यांचा कालावधी लागतो.
  • संपर्क ः डॉ. प्रशांत नाईकवाडी, ८८८८८१०४८६ (वरिष्ठ व आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण निरीक्षक, नोका, पुणे व बायो ॲग्रिसर्ट इटली, युरोप.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com