कंपोस्ट खते बनविण्याच्या पद्धती

नाडेप कंपोस्ट खत तयार करण्यासाठी हवा खेळती राहील,अशा प्रकारची टाकी बांधून घ्यावी.
नाडेप कंपोस्ट खत तयार करण्यासाठी हवा खेळती राहील,अशा प्रकारची टाकी बांधून घ्यावी.

जमिनीचा कस टिकविण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा जमिनीत वापर करणे गरजेचे आहे. त्यासाठी कंपोस्ट खत उपयुक्त ठरते. पारंपरिक पद्धतीपेक्षा थोड्या अधिक वेगवान पद्धतींविषयी माहिती घेऊ.   टोपली कंपोस्ट पद्धती ः या पद्धतीमध्ये घरातील तसेच शेतातील टाकाऊ पदार्थ आणि द्विदल धान्याचा पालापाचोळा टोपलीत कुजू देतात. ही टोपली अर्धवट अवस्थेत बागेत गाडून ठेवल्यानंतर, त्यापासून सेंद्रिय खत मिळते. साहित्य ः बांबूच्या कामट्या (२ ते ३ सेंमी. रुंद, बांबू (३० सेंमी. लांब खुंट्या, घरातील तसेच शेतातील केरकचरा, द्विदल धान्याचा पालापाचोळा, शेणखत इत्यादी. जागेची आखणी ः बागेची जागा साफ करताना त्यातून निघणारे गवत व तण कंपोस्टसाठी जमा करावे. जमीन ३० से.मी. पर्यंत खोदून त्यातील माती खालीवर करावी. नंतर गादी वाफे तयार करून घ्यावेत. वाफ्याच्या मध्यभागी १५ सेंमी खोल व ३० सेंमी परिघाचे छिद्र करा. छिद्रातील अंतर १ मी. ठेवावे. बास्केट तयार करणे ः बांबूच्या सात (विषम संख्या ५, ७, ९) खुंट्या गोल आकारात रोवा. त्याला बांबूच्या कामट्याने गुंफून किंवा विणून घ्यावे (१ सेमी अंतरावर). सेंद्रिय टाकाऊ पदार्थाची भरण ः सुरवातीला टोपलीच्या खालच्या थरामध्ये घरातील तसेच शेतातील कुजणारा केरकचरा आणि शेणखत टाकावे. त्यावर न कुजलेले पदार्थ जसे द्विदल धान्याची पाने, गवत इत्यादी ठेवावे, तसेच इतर सेंद्रिय पदार्थांनी टोपली भरून घ्यावी. लवकर कुजण्यासाठी टोपलीत गांडूळदेखील सोडता येतात. लागवड, काळजी आणि नियोजन (व्यवस्थापन) ः बी किंवा स्थलांतरित रोपांची टोपलीच्या १५ ते २० से .मी अंतरावर लागवड करावी. असे केल्यामुळे टोपलीतील उष्णतेने रोपे मरत नाहीत. लहान रोपांना नियमित पाणी द्यावे. तसेच कधीतरी टोपलीतदेखील पाणी टाकावे. कुजलेले पदार्थ मातीत मिसळणे ः रोपांची काढणी झाल्यानंतर टोपलीतील कुजलेले खत बाहेर काढून ते जमिनीत मिसळावे. नवीन रोपे लावायची असल्यास, परत त्याच टोपलीत वरीलप्रमाणे कंपोस्ट साहित्य भरावे आणि तयार खत दुसऱ्या झाडाला वापरावे. फायदे ः

  • इतर कंपोस्ट पद्धतीमध्ये खत तयार होण्यास ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागतो. परंतु, या पद्धतीमध्ये खत काही दिवसांत तयार होते आणि ते लगेच वापरता येते.
  • टोपलीमुळे कंपोस्ट साहित्य आहे त्या जागीच राहतात. त्यामुळे पोषक अन्नद्रव्ये वाहून जात नाहीत.
  • जनावरे किंवा कोंबड्या कम्पोस्ट साहित्य पसरवत नाही.
  • घरातील टाकाऊ पदार्थ गोळा करून वापरात आणता येतात, त्यामुळे घर व बागेचा परिसर स्वच्छ राहतो.
  • टोपली ही पोषक अन्नद्रव्य साठवून ठेवण्याचे साधन आहे. त्यामध्ये ओलावा उत्तमरीत्या टिकून राहतो.
  • या पद्धतीद्वारे जास्त पोषक भाजीपाला, फळे कमी खर्चात उत्पादित करता येतात.
  • नँडेप कंपोस्ट ः N.D.P. (नारायण देवराव पांढरीपांडे) साहित्य ः

  • १५०० किलो काडी कचरा, पाला पाचोळा, धसकटे, सालपटे इ.
  • ८ ते १० टोपली शेणखत, १२० टोपली माती.
  • १५०० ते २००० लिटर पाणी
  • गाईचे किंवा इतर जनावरांचे मूत्र.
  • टाकी बांधण्याची पद्धत ः

  • जिथे पाणी साचणार नाही अशी उंच ठिकाणची जागा निवडावी.
  • १५ फूट लांब, ५ फूट रुंद आयताकृती ३.५ फूट उंची.
  • खोदलेली जागा दगड मातीने भरावी आणि त्याचा मागील भाग टणक करावा.
  • प्रथम दोन थर विटांमध्ये बांधावा. प्रत्येक भितींची रूदी ९ इंच ठेवावी.
  • टाकीमध्ये हवा खेळती राहण्यासाठी, टाकी बांधताना चारी बाजूच्या भिंतींना प्रत्येक दोन विटांच्या थरानंतर तिसऱ्या थराची बांधणी करताना विटांमध्ये टिचभर (७ इंच) रिकामी जागा सोडून बांधणी करावी. म्हणजे टाकीच्या चारी बाजूस ७ इंच अंतराचे छिद्रे तयार होती आणि त्याद्वारे टाकीमध्ये मोकळी हवा खेळू शकेल.
  • सर्व बांधकाम मातीमध्ये करावे, मात्र अखेरचे दोन थर सिमेंटमध्ये बांधावेत.
  • १) पहिली भराई ः

  • प्रथम शेण व पाणी यांचे मिश्नण करून टाकीच्या आतील भिंती, तळ लिंपून घ्यावेत.
  • काडी, कचरा, पालापाचोळा, धसकटे, मुळे इत्यादी वनस्पतीजन्य पदार्थांचा पहिला थर १५ सेंमीचा करावा.
  • २) दुसरा थर ः १२५ ली पाणी +४ किलो शेण यांचे मिश्रण पहिल्या थरावर शिंपडावे. ३) तिसरा थर ः साफ वाळलेली व गाळलेली माती, वनस्पतीजन्य पदार्थाच्या ५० टक्के म्हणजे ५० ते ६० किलो याप्रमाणे शेणाचे व पाण्याचे मिश्रणाने ओल्या केलेल्या वनस्पतीजन्य पदार्थावर पसरवावी. त्यानंतर थोडे पाणी शिंपडावे.

  • वरीलप्रमाणे तीन थर देण्याच्या पध्दतीचा अवलंब करून टाकीच्या वर ४५ सेमी उंच भरावेत.
  • ११ ते १२ थरांमध्ये टाकी भरली जाते. त्यावरती ४०० ते ५०० किलो मातीचा ७.५ सेमी जाड थर टाकून, शेण व पाणी याच्या मिश्रणाने व्यवस्थित लिपून घ्यावे.
  • दुसरी भराई ः

  • १५ ते २० दिवसांनंतर टाकीमध्ये टाकलेली सामग्री आकुंचन पावून ८ ते ९ इंच खाली दबलेली दिसते.
  • तेव्हा पुन्हा पहिल्या भराईप्रमाणेच काडीकचरा पदार्थ, शेण व पाणी मिश्रण तसेच गाळलेल्या मातीच्या थराने पुन्हा थर रचून टाकीच्या वर ४५ सेमी उंचीपर्यत भरून घावी.
  • त्यानंतर ३ इंच मातीचा थर देऊन, शेण व पाणी यांच्या मिश्रणाने लिपून घ्यावे.
  • चांगले खत तयार होण्यासाठी ९० ते १२० दिवस लागतात.
  • दक्षता ः

  • गरजेनुसार पाणी शिंपडावे, यामुळे आर्द्रता कायम राहते.
  • गवत उगवल्यास हाताने उपटून टाकावे.
  • आर्द्रता कायम राहण्यासाठी गवत किंवा चटईने टाके झाकून टाकावे.
  • टाकीतून खत काढल्यानंतर ते मोकळ्या जागेत ठेऊ नये.
  • खत वापराआधी काही दिवस साठवून ठेवायचे असल्यास, ढिग लावून त्यावरती गवताचे आच्छादन टाकावे. अधूनमधून पाणी शिंपडात राहावे, ज्यामुळे त्याची आर्द्रता कायम राहील.
  • इंदौर पद्धत ः

  • या पद्धतीला ‘ढीग पद्धत’ असेही म्हणतात.
  • या पद्धतीमध्ये ६ फूट रुंद व ५ ते ६ फूट उंच आणि शेतातील उरलेले पिकांचे अवशेष, काडीकचरा, शेण, तण इत्यादी सेंद्रिय पदार्थांचा त्यावर थर ठेवला जातो.
  • या पद्धतीमध्ये कुजण्याची प्रक्रिया उघड्यावर (ऑक्‍सिजनयुक्त) लवकर होण्यासाठी, एका महिन्याच्या अंतराने ढीग खालीवर करून कुजणारे पदार्थ एकजीव केले जातात.
  • तसेच ओलावा टिकविण्यासाठी पाणी शिंपडले जाते.
  • याशिवाय ढिगावर प्लॅस्टिकचे आच्छादन टाकल्यामुळे तापमानात वाढ होते आणि कुजण्याची क्रिया जलद होण्यास मदत होते.
  • ३ ते ४ महिन्यांत चांगले कंपोस्टखत तयार होते.
  • या खतामध्ये ०.८ ते १.५ टक्के नत्र, ०.५ ते १ टक्के स्फुरद व १ ते १.८ टक्के पालाश मिळून इतर अन्नघटक असतात.
  • बंगलोर पद्धत ः

  • या पद्धतीला ‘खड्डा पद्धत’ असेही म्हणतात. यामध्ये सर्वांत खाली काडीकचरा व इतर सेंद्रिय पदार्थांचा १५ ते २० सेंमी जाडीचा थर देऊन, पाणी शिंपडून ओला केला जातो.
  • जमिनीच्या सुमारे दीड ते दोन फूट उंचीपर्यंत खड्डा भरून, त्यास शेणमाती मिश्रण करून लिंपले जाते.
  • सेंद्रिय पदार्थांची कुजवण्याची क्रिया लवकर होण्यासाठी अधूनमधून पाणी शिंपडले जाते.
  • सुरवातीला ऑक्‍सिजनविरहित वातावरणात कुजण्याची क्रिया होते, त्यामुळे कुजण्याचा वेग मंदावतो. त्यामुळे खत तयार होण्यास वेळ लागतो.
  • या पद्धतीमध्ये अन्नद्रव्ये वाया जाण्याचे प्रमाण कमी असते.
  • फायदे ः

  • ही पद्धत कमी खर्चिक असून, आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडण्यासारखी आहे.
  • यामध्ये टाकाऊ सेंद्रिय पदार्थांचा पुनर्वापर होतो.
  • कंपोस्टखतामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढते आणि जमिनीची धूप कमी होते.
  • जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकवली जाते आणि सूक्ष्म जीवांची संख्या वाढते.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com