चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्यासाठी युरिया प्रक्रिया फायदेशीर

युरिया प्रक्रियेमुळे कमी खर्चात जनावरांना पौष्टिक, सकस आहार उपलब्ध करून देता येतो
युरिया प्रक्रियेमुळे कमी खर्चात जनावरांना पौष्टिक, सकस आहार उपलब्ध करून देता येतो

उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईमुळे हिरवा चारा मिळत नाही. अशा वेळी जनावरांना वाळलेल्या चाऱ्यावर अवलंबून राहावे लागते. पशुपालक जनावरांच्या आहारात दुय्यम घटकांचा (उदा. गव्हाचा पेंढा, भात पेंढा) जास्त वापर करतात. त्यामुळे आहाराची पौष्टिकता वाढवण्यासाठी युरिया प्रक्रिया महत्त्वाची ठरते.   निकृष्ट चाऱ्यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण कमी आणि तंतुमय पदार्थ जास्त असतात. तसेच प्रथिने अत्यल्प असतात. त्यामुळे ती पचण्यास कठीण जातात. रवंथ करणारी जनावरे प्रथिने नसलेल्या नत्राचे प्रथिनात रुपांतर करू शकतात. ओलसरपणा आणि संप्रेरक युरियेज यांच्या उपस्थितीमध्ये युरियाचे विघटन होऊन अमोनिया आणि कार्बनडाय ऑक्साईड तयार होते. नंतर हा अमोनिया लिग्नीन – हेमिसेलुलोज - सेलुलोज यांच्या बंधनावर (बॉन्ड) प्रक्रिया करून सेलुलोज – हेमिसेलुलोज तयार करतो. त्यामुळे चाऱ्याची पचनक्षमता वाढते. तसेच युरिया प्रक्रिया केलेल्या चाऱ्याची चव बदलते, नत्राचे प्रमाण वाढते. त्यामुळे जनावरे चारा आवडीने खातात. युरियामध्ये नत्रा(नायट्रोजन)चे प्रमाण ४६ टक्के इतके असते. म्हणून युरिया हा नत्राचा अतिशय सहज व नियमितपणे उपलब्ध होणारा स्रोत आहे. युरिया प्रक्रियेचे फायदे

  • वाळलेल्या चाऱ्यामध्ये पचनास कठीण असलेले घटक, जसे की तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात आणि प्रथिनांचे प्रमाणही खूप कमी असते. युरिया प्रक्रिया केलेल्या चाऱ्या‍मध्ये प्रथिनांचे प्रमाण १-१.५ टक्क्यापासून ३-४ टक्क्यापर्यंत वाढते आणि पचनीय क्षमता २०-३० टक्क्यांनी वाढते.
  • चाऱ्याच्या पोषक घटकांमध्ये वाढ होते, त्यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनातदेखील वाढ होते.
  • जनावराची शारीरिक वाढ, प्रजनन क्षमता ही सुरळीत राखली जाते.
  • अगदी कमी खर्चात व कमी वेळात जनावरांना पौष्टिक, सकस आहार उपलब्ध करून देता येतो.
  • युरिया प्रक्रिया करण्याची पद्धत

  • गव्हाचा पेंढा, तांदळाचा पेंढा, उसाचे पाचट इ. चा आपण युरिया प्रक्रियेसाठी वापर करू शकतो.
  • सर्वप्रथम चाऱ्याची कुट्टी करून घ्यावी.
  • युरिया प्रक्रीयेसाठी कोरडी आणि सावलीतील जागा निवडावी. नंतर जमिनीवर पोते अंथरूण घ्यावीत, जेणेकरून खालच्या चाऱ्याला माती लागणार नाही.
  • साधारणतः १०० किलो चाऱ्याकरिता ४ किलो युरिया वापरावा.
  • प्रति १०० किलो चाऱ्याच्या प्रक्रियेसाठी ४ किलो युरिया ४० लिटर पाण्यामध्ये एकजीव मिसळून घ्यावा. त्यानंतर तयार झालेल्या द्रावणात एक किलो मिठ मिसळून एकजीव करावे.
  • जमिनीवर टाकलेल्या पोत्यांवर चारा एकसारखा पसरून घ्यावा. साधारणतः ६ इंच इतका चाऱ्याचा थर करावा. नंतर पसरलेल्या चाऱ्यावर झारीच्या साह्याने तयार केलेले मिश्रण शिंपडावे आणि चारा हलवून एकजीव करून घ्यावा. अशा प्रकारे एकावर एक थर देऊन त्यात युरिया मिश्रण मिसळून घ्यावे.
  • प्रत्येक थरात युरिया मिश्रण मिळून घेतल्यावर चाऱ्यावर दाब देऊन चाऱ्यातील जास्तीची हवा काढून घ्यावी.
  • संपूर्ण चाऱ्यावर मिश्रण टाकून झाल्यावर त्यावर ताडपत्री किंवा प्लॅस्टिक कागदाने चारा हवाबंद करून झाकून टाकावा.
  • चाऱ्यामध्ये बाहेरील हवा किवा पाणी जाणार नाही याची दक्षता घावी.
  • २१ दिवस हा चारा हवाबंद ठेवावा, कारण यावर व्यवस्थित युरिया प्रक्रिया होते. २१ दिवसानंतरच हा चारा उघडावा.
  • युरिया प्रक्रियायुक्त चारा जनावरांना खायला देताना घ्यावयाची काळजी

  • जनावरांना चारा खायला देण्यापूर्वी २-३ तास अगोदर चारा मोकळ्या हवेत ठेवावा. जेणेकरून त्यामधील अमोनिया गॅस हवेमध्ये उडून जाईल. राहिलेला चारा त्यानंतर पहिल्यासारखा हवाबंद करून ठेवावा.
  • सुरवातीला जनावरांच्या आहारात चारा थोड्या थोड्या प्रमाणात समाविष्ट करून हळूहळू मात्रा वाढवत न्यावी. १० दिवसानंतर प्रक्रियायुक्त चारा ३-५ किलोपर्यंत जनावरांना देऊ शकतो.
  • ६ महिन्यापेक्षा कमी वयाच्या वासरांमध्ये आणि रवंथ न करणाऱ्या जनावरांना हा चारा देऊ नये.
  • युरियाचा वापर फक्त रवंथ करणाऱ्या जनावरांच्या आहारात करावा. ६ महिन्यापेक्षा कमी वयाच्या वासरांमध्ये आणि रवंथ न करणाऱ्या जनावरांच्या (उदा. घोडा, कुत्रा, डुक्कर) आहारात युरियाचा वापर करू नये.
  • युरियामुळे होणारी विषबाधा आहारात युरियाचा प्रमाणाबाहेर वापर झाला तर युरियाची विषबाधा होण्याची शक्यता असते. यामुळे जनावर दगावण्याचीदेखील शक्यता असते. जर जनावरांमध्ये अमोनियाचे प्रमाण १ मिलीग्रॅम प्रति १०० मिली रक्तापेक्षा जास्त झाले तर विषबाधा होते. तसेच गायी-म्हशीमध्ये ११६ ग्रॅम आणि मेंढीमध्ये १० ग्रॅमपेक्षा जास्त युरिया खाण्यात आला तर वेगाने जास्तीचा अमोनिया तयार होतो जो विषबाधेसाठी कारणीभूत ठरतो. लक्षणे : लाळ गळणे, पोटफुगी, पोटदुखी, हंबरणे, श्र्वासातून अमोनियाचा वास येणे, खुरे आपटणे, ओरडणे, इ. तसेच २-३ तासात मृत्यूदेखील होऊ शकतो. उपाय : युरियाची विषबाधा झाल्यास २० ते ४० लिटर पाणी जनावरांना द्यावे, त्यामुळे पोटातील युरियाची प्रक्रिया बंद पडते. पशुतज्ज्ञांकडून योग्य ते उपचार करून घ्यावेत.   संपर्क ः डॉ. श्रद्धा राऊत, ९२७०७०६००३ डॉ. शरद दुर्गे, ७०३८०३१३०० (पशुपोषण आहारशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महविद्यालय, उदगीर, जि. लातूर) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com