जास्त अन्न शिजविण्यासाठी शेफलर सौरचूल उपयुक्त

शेफलर सौरचूलीची कार्यपद्धती
शेफलर सौरचूलीची कार्यपद्धती

शेफलर सौर चूल पेटी सौरचूल आणि पॅराबोलिक सौरचुलीच्या तुलनेने मोठ्या आकाराची असून, मोठ्या प्रमाणात अन्न शिजविण्यासाठी उपयुक्त आहे. शेफलर सौरचुलीमध्ये ४५०-६०० अंश सेल्सिअस तापमान मिळते, त्यामुळे यामध्ये भाजण्याचे तसेच तळण्याचे सर्व पदार्थ तयार करता येतात. 

सौरचूलपेटी व केंद्रीय/ पॅराबोलिक सौरचुलीपेक्षा जास्त तापमानाची आवश्यकता असल्यास काचेचे (आरसा) परावर्तक असलेल्या शेफलर सौरचुलीचा वापर करण्यात येतो. ही शेफलर सौरचूल या दोन्ही सौरचुलींच्या तुलनेने मोठ्या आकाराची असून, यामध्ये ७ चौरस मीटर आकाराची तबकडी वापरण्यात येते. सूर्याची किरणे पॅराबोला आकाराच्या तबकडीच्या साहाय्याने केंद्रित करून या सौरचुलीद्वारे अन्न शिजवता येते. शेफलर सौरचुलीच्या बशीसारख्या तबकडीवर उत्तम प्रकारच्या काचेचे तुकडे लावतात. तबकडीच्या क्षेत्रफळावरील सूर्यकिरणे संकलित करून एका केंद्रकात त्या किरणांचे परावर्तन होते. याला प्राथमिक परावर्तन असे म्हणतात. ही परावर्तित किरणे स्वयंपाकघरातील सपाट काचेवर पडतात व पुनःपरावर्तित होऊन काळ्या बाह्य बाजू असलेल्या धातूच्या पत्र्यावर पडतात. यास द्वितीय परावर्तन असे म्हणतात. 

सौरचुलीमध्ये अन्न शिजविण्यासाठी आवश्यक बाबी

  • सौरकिरणांची तीव्रता साधारणतः प्रति चौरस मीटर ५ ते ७ किलोवॉट असावी. दिवसातील पाच ते सात तासांचा कालावधी स्वच्छ सूर्यप्रकाशाचा असावा. 
  • वाऱ्याचा वेग १० कि.मी. प्रति तासपेक्षा कमी असावा व सर्वसाधारण तापमान ३० अंश सेल्सिअस इतके असावे. 
  • वातावरण ढगाळ नसावे. या सर्व बाबींची पूर्तता झाल्यास, अन्न शिजण्यास कमी कालावधी लागतो. 
  • सौरचुलीमध्ये अन्न शिजवण्याचा सर्वोत्तम काळ दुपारी ११ ते १२ पर्यंत असतो.
  • उन्हाळयात सूर्यकिरणांची तीव्रता जास्त असल्याने व बाहेरील तापमान जास्त असल्याने अन्न शिजवण्यास कमी कालावधी लागतो.
  • सौरचुलीमध्ये वापरण्यात येणाऱ्या भांड्यांना बाहेरील बाजूस काळा रंग असणे आवश्यक आहे, त्यामुळे जास्तीत जास्त सूर्यकिरणे आकर्षित होऊन आतील तापमान वाढते व अन्न शिजण्यास मदत होते. 
  • सौरचूल वापरताना...

  • सौरचूल काळजीपूर्वक हाताळावी.
  • भांड्यांना व सौरचुलीच्या अंतर्भागास दिलेला काळा रंग निघणार नाही याची काळजी घ्यावी.
  • सौरचुलीचा अंतर्भाग व भांडी ओल्या कापडाने स्वच्छ करावीत.
  • सौरचुलीची काच व परावर्तक आरसा नेहमी स्वच्छ करावा, त्यावर धूळ बसणार नाही याची काळजी घ्यावी.
  • अन्न शिजवण्याचा कालावधी कमी करण्यासाठी परावर्तकाचा कोन योग्य अंशात ठेवून जास्तीत जास्त सूर्यप्रकाश काचेवर पडेल असे बांधावे. 
  • अन्न शिजत असताना सौरचूल उघडू नये, अन्यथा उष्णता निघून जाते व अन्न कच्चे राहण्याचा संभव असतो. 
  • सौरचुलीमधील भांडी बराचकाळपर्यंत गरम असतात. म्हणून ती हाताळण्यासाठी उष्णतारोधक हातमोजे किंवा कापड वापरावे, जेणेकरून हात भाजणार नाहीत. 
  • स्वयंपाक सुरू करण्याआधी सौरचूल उन्हात ठेवावी, त्यामुळे अन्न शिजण्यास लागणारा वेळ कमी होईल.
  • शेफलर सौरचुलीची वैशिष्ट्ये

  • या प्रकारच्या सौरचुलीमुळे सूर्यकिरणे परावर्तनाद्वारे स्वयंपाकघरात पोहोचत असल्याने स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीस उन्हाचा त्रास होत नाही व घरातच स्वयंपाक करता येतो.
  • या सौरचुलीमध्ये सूर्याचा मार्ग काढण्यासाठी यंत्रणाही उपलब्ध आहे. सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे मार्गक्रमण करीत असतो, त्यामुळे अधिक उष्णता संकलन करण्यासाठी परावर्तित सूर्यकिरणे सतत स्वयंपाकघरातील बैठकीवर ठेवलेल्या भांड्यावर पडतील अशारीतीने शेफलर सौरचुलीची तबकडी वेळोवेळी फिरवावी लागते. यासाठी सतत उन्हात उभे राहावे लागते. हे टाळण्यासाठी सूर्याचा मार्ग काढण्याची यंत्रणा या शेफलर सौरचुलीमध्ये उपलब्ध आहे. या यंत्रणेमध्ये पडणाऱ्या सूर्यकिरणांचा मार्ग घेऊन, सोबत जोडलेल्या फोटो व्होल्टाईक सौर पॅनेलमध्ये निर्माण होणाऱ्या विजेच्या साहाय्याने मोटारीद्वारे संपूर्ण तबकडी फिरेल अशी व्यवस्था केलेली असते. यामध्ये चेन व अत्यंत लहान मोटारीद्वारे तबकडी त्या कोनात फिरवता येते व सूर्यकिरणांचे परावर्तन भांड्यावर सतत होईल याची काळजी घेतली जाते. या यंत्रणेमध्ये तबकडी दररोज सकाळी पूर्व दिशेला व्यवस्थित फिरवून ठेवावी, नंतर ती तबकडी स्वयंचलित पद्धतीने सूर्यास्तापर्यंत सूर्यकिरणांचा माग घेत फिरते व जास्त उष्णता संकलित करते.
  • या सौरचुलीमध्ये ४५०-६०० अंश सेल्सिअस तापमान मिळते, त्यामुळे यामध्ये भाजण्याचे तसेच तळण्याचे सर्व पदार्थ तयार करता येतात. या सौरचुलीवर स्वयंपाक करताना सूर्यकिरणे शरीरावर किंवा डोळ्यांवर पडणार नाहीत याबाबत खबरदारी घ्यावी. या सौरचुलीचा वापर करून ३० ते ४० माणसांचा स्वयंपाक एक ते दीड तासात बनवता येतो. या सौरचुलीचा वापर खाणावळ, वसतिगृह, उपाहारगृह या ठिकाणी अत्यंत उपयुक्त आहे. 
  •   हेमंत श्रीरामे, ९४२२५४५९१५   मयूरेश पाटील, ९०२१६८२३९५ (विद्युत आणि अपारंपरिक ऊर्जास्रोत विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com