पदार्थाची प्रत, रंग टिकविण्यासाठी उपयुक्त सोलर ड्रायर

इनडायरेक्‍ट सोलर ड्रायर
इनडायरेक्‍ट सोलर ड्रायर

सौर वाळवणी संयंत्राच्या इनडायरेक्ट सोलर ड्रायर आणि टनेल टाइप सोलर ड्रायर प्रकारामध्ये पदार्थांची प्रत, रंग इत्यादी टिकवून वाळविण्यासाठीचे पदार्थ कमीत कमी वेळात सुकवता येतात. त्यामुळे हे सोलर ड्रायरचे प्रकार प्रक्रिया उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.  सौर ऊर्जेचा वापर करून औषधी वनस्पतीपासून निर्मित पदार्थ, मसाल्याचे पदार्थ, फळांपासून बनविण्यात येणारे पदार्थ. उदा. आंबापोळी, भुकटी इत्यादींची निर्मिती त्या पदार्थांचे गुणधर्म व त्यास आवश्यक योग्य ते तापमान ठरवून करणे शक्य आहे. सौर वाळवणी संयंत्राच्या इनडायरेक्ट सोलर ड्रायर या प्रकामध्ये साधारणतः औषधी वनस्पती, मसाल्याची पिके (कांदा, लसूण, लवंग, काळी मिरी, आले, कढीपत्ता) मेथी व कोथिंबीर पावडर, मिरची पावडर इत्यादी पदार्थ सुकवले जातात. या प्रकारच्या सौर ड्रायरची मुख्य भाग खालीलप्रमाणे आहे. १. सौर संकलक २. सुकवणी ट्रे ३. हवाबंद काचेचे आवरण

  • या संयंत्रामध्ये सौर संकलक हा अत्यंत महत्त्वाचा व मुख्य भाग आहे. या ड्रायरमध्ये पदार्थ सुकविण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करून पदार्थापासून दूर इतरत्र हवा गरम करण्यात येते.
  • या ड्रायरमध्ये डायरेक्ट सौर किरणे पदार्थांवर न शोषली जाता गरम हवेद्वारे पदार्थांची वाळवणी केली जाते. त्यामुळे वाळवण पदार्थाचा रंग व सुगंध टिकून राहण्यास मदत होते.
  • सौर संकलकामध्ये तांब्याच्या किंवा अॅल्युमिनियमच्या पातळ पत्र्यावर खास प्रकारच्याम काळ्या रंगाचे आच्छादन असते. त्याला सिलेक्टिव्ह कोटिंग असे म्हणतात.
  • हे सिलेक्टिव्ह कोटींग उष्णताशोषक असून ते सूर्यप्रकाश शोषून त्याचे रूपांतर उष्णतेमध्ये करते व सिलेक्टिव्ह कोटींग हे एका हवाबंद पेटीमध्ये बंदिस्त असते.
  • पेटीला खालच्या व बाजूच्या कडांवर ग्लासवूलचा उष्णतारोधक थर दिलेला असतो. संकलकाच्या वरील बाजूस ४ मि. मी. जाडीच्या टफन्ड काचेचे आवरण दिलेले असते. या पारदर्शक काचेतून सूर्यकिरणे आतमध्ये, सिलेक्टिव्ह कोटींगवर शोषली जातात व आतील तापमान वाढून हवा गरम होते. ही गरम हवा वजनाने हलकी झाल्यामुळे नैसर्गिक गुणधर्माने वरच्या बाजूस सरकते. या संकलाकाला जोडूनच एका पेटीमध्ये पदार्थ सुकविण्यासाठी चार किंवा त्यापेक्षा जास्त सच्छिद्र ट्रे असतात. या ट्रेमध्ये वाळवणीसाठी पदार्थ ठेवून त्याची गुणवत्ता (सुगंध व रंग) टिकवणे शक्य होते.
  • सौर संकलकातील गरम हवा संकलकाला जोडूनच असलेल्या पेटीतील सच्छिद्र ट्रे मधून पास होते व ड्रायरच्यावरील बाजूस असलेल्या चिमणीद्वारे बाहेर पडते. त्यामुळे पदार्थाची आर्द्रता कमी होऊन पदार्थ लवकर सुकतात.
  • या सौर ड्रायरमध्ये सौर संकलक सर्वसाधारणपणे दक्षिणेकडे तोंड करून भुतलाशी १५ अंश इतका कोन करून उभा करावा. संकलकाच्या पेटीची तसेच, स्टँडची दर २-३ वर्षांमध्ये गंजरोधक रंग लावून काळजी घेणे आवश्यक आहे.
  • या प्रकारच्या ड्रायरमध्ये औषधी वनस्पती, सुगंधी वनस्पती तसेच, फळभाजी पावडर इत्यादींचा रंग व सुगंध टिकवण्यास मदत होते.
  • संपर्क ः हेमंत श्रीरामे, ९४२२५४५९१५ मयूरेश पाटील, ९०२१६८२३९५ (विद्युत आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com