Agriculture story in marathi usefull fodder plants for livestock | Agrowon

जनावरांसाठी चारा म्हणून विविध वनस्पतींचा वापर

तुषार भोसले, सूरज जाधव, आकाश चीचघरे 
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

झाडांचा हिरवा पाला तुलनात्मकदृष्ट्या एकदल चारा पिकापेक्षा (गवत) चांगला व द्विदल चारा पिकांइतकाच जनावरांस वैरण म्हणून उपयोगी आहे. झाडांची हिरवी पाने, फुले, फळे, शेंगा व बियांचा जनावरांच्या आहारामध्ये उपयोग केला जातो, परंतु ते चविष्ट असतातच असे नाही. त्यासाठी त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे.

झाडांचा हिरवा पाला तुलनात्मकदृष्ट्या एकदल चारा पिकापेक्षा (गवत) चांगला व द्विदल चारा पिकांइतकाच जनावरांस वैरण म्हणून उपयोगी आहे. झाडांची हिरवी पाने, फुले, फळे, शेंगा व बियांचा जनावरांच्या आहारामध्ये उपयोग केला जातो, परंतु ते चविष्ट असतातच असे नाही. त्यासाठी त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे.

काही झाडाची पाने, शेळी व मेंढी यांच्यासाठी चारा म्हणून उपयुक्त आहेत, तर काही झाडांच्या जाती गायी व म्हशींचा चारा म्हणून उपयुक्त ठरतात. कोवळ्या पानांमध्ये पचनीय प्रथिने अधिक प्रमाणात असतात व काष्टमय पदार्थ कमी असतात. वनस्पतींच्या पानांमध्ये ‘कॅल्शियमचे’ प्रमाण जास्त असते व ‘फॉस्फरस’चे प्रमाण कमी असते. 

तुती : (Morus indica)
तुतीचा हिरवा पाला उत्तम प्रतीचा रुचकर व स्वादिष्ट आहे. विशेषतः शेळ्या - मेंढ्यांच्या शरीराच्या वाढीसाठी पोषक आहे. गाभण जनावरांस हा पाला देऊ नये. तुतीच्या झाडापासून दर दोन महिन्याच्या अंतराने वर्षभर हिरवा पाला मिळू शकतो. कोंबड्यांच्या खाद्यामध्येसुद्धा (६ टक्के) समावेश करता येतो. या पानांमध्ये पचनीय प्रथिनांचे प्रमाण ७.८ टक्के तर एकूण पचनीय अन्न घटकांचे प्रमाण ४८.४ टक्के असते. 

अंजन : (Hardwizka binata) 
अंजनाचा पाला जनावरांसाठी उत्तम वैरण आहे. दर दोन महिन्यांच्या अंतराने झाडावरून काढून घेता येतो व वर्षभर उपलब्ध होतो. पाल्याची काढणी करण्यास उशीर झाल्यास त्याची पाचकता कमी होते. कोवळ्या पानांमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पक्व (हिरवी पाने) झालेल्या पानांचा जनावरांसाठी चारा म्हणून उपयोग करावा. अंजनाच्या पानांतील एकूण पाचक अन्न घटकांचे प्रमाण ४७ टक्के असले तरी पूर्ण आहार म्हणून त्यांचा वापर करू नये. 

पिंपळ : (Ficus religiosa)
पिंपळ हे झाड सर्वत्र आढळणारे व वर्षभर हिरवेगार असणारे झाड आहे. या झाडास कमी चवीची व कमी पोषणमूल्ये असलेली पाने असतात. पिंपळाच्या पानांचा शेळी व मेंढी यांच्यासाठी चारा म्हणून उपयोग होतो. या झाडाच्या पानांमध्ये पचनीय काष्टमय पदार्थ ५.४७ टक्के आणि ३९.२२ टक्के एकूण पचनीय पदार्थ आढळतात.

कडूलिंब : (Azadiracta indica)
वर्षभर हिरवे राहणारे व रोग न पडणारे हे झाड आहे. कडूलिंबाची पाने गायी साधारणपणे ३ ते ४ किलोपर्यंत खातात. कडूलिंबाच्या पाल्यामध्ये ‘टॅनीन’ हे विषारी घटक नाही, परंतु ‘लिनामारीन’ या घटकामुळे पाल्याला कडवट चव येते. लिंबाच्या पाल्यामध्ये रोग व कीड प्रतिबंधक गुणधर्म आहेत, त्यामुळे जनावरांना तोंडाचे विकार सहसा होत नाहीत. लिंबोळीच्या पेंडीचाही वापर जनावरांच्या खाद्यामध्ये करता येतो. यामध्ये पिष्टमय पदार्थ १५ टक्के, पौष्टिकमूल्ये ६.१९ टक्के तर पचनीय पदार्थ ५२.४१ टक्के असतात.

बोर : (Zyzyphus jujuba)
बोर हे सर्वत्र आढळणारे झुडुप असून शेळी व मेंढी यांना चारा म्हणून उपयोग होतो. हिरवी पाने शेळ्या व वाळलेली पाने मेंढ्या आवडीने खातात. बोरीची पाने पिंपळाच्या पानापेक्षा तुलनेने जास्त चविष्ट असतात. बोरीच्या पानांमध्ये पचनीय प्रथिने १८.६ टक्के व कॅल्शियम क्षारांचे १.५ ते २.५९ टक्के इतके प्रमाण आहे. बोरीच्या पानाची पचनीयता ३६ टक्के एवढी आहे. 

बांबू : (Dendrocalamins strictus)
बांबूच्या पानांचा जनावरांना चारा म्हणून मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. एक हेक्टर बांबूच्या पिकापासून ९० ते १४० टन हिरवा पाला मिळू शकतो. बांबूच्या हिरव्या पानांमध्ये प्रथिने व एकूण पचनीय पदार्थ यांचे प्रमाण अनुक्रमे ९.३७ टक्के आणि ४८.९१ टक्के इतके असते. 

बिउल (Grewia optiva)
साधारणपणे ही झाडे डोंगराळ भागात आढळतात. याचे उत्पादन १० ते २० किलो हिरवी पाने प्रति वर्ष प्रति झाड आहे. यामध्ये २० ते २३ टक्के पचनिय प्रथिने आढळतात. यांच्या पानाची एकूण पचनिय क्षमता ७५ टक्के इतकी आहे. या झाडांच्या पानांमध्ये ‘टॅनिन आम्ल’ नसते. त्यामुळे जनावरांना विषबाधा होण्याचा धोका नाही. याचा जनावरांना पूरक चारा म्हणून उपयोग होतो.

कचनार (Bauhinia variegota)
या झाडाच्या फुलांचा, कोंबाचा व पानांचा उपयोग शेळी, मेंढी व गायींसाठी केला जातो. यामध्ये पचनिय प्रथिने ४.९८ टक्के व एकूण पचनिय अन्न घटकांचे प्रमाण ४७.५५ टक्के आहे. यामध्ये ‘टॅनिन आम्ल’ १.५ टक्के आढळते. प्रत्येक झाडापासून सरासरी १५ ते २० किलो हिरवा पाला प्रति वर्षी मिळू शकतो.

शमी ( Prosopis cineraria)
दुष्काळी परिस्थितीत, वाळवंटात कमी पावसावर टिकाव धरुन वाढणारे, द्विदल वर्गातील झाड असून प्रतिकूल हवामानातही त्याचा जीवनक्रम चालूच असतो. परंतु, त्याची वाढ सावकाश होते. शमीच्या पानातील पचनिय प्रथिने ४.४९ टक्के व एकूण पचनिय अन्नघटकांचे प्रमाण ४१ टक्के आहे. विशेषत: शेळ्या, मेंढ्या व उंट हा पाला आवडीने खातात.

जनावरांच्या आहारात वापरण्याची पद्धत 
बहुसंख्य झाडांचा पाला, बिया व फळामध्ये विषारी, घटक उग्र वास कमी - अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे त्यांचा जनावरांच्या आहारामध्ये वापर करण्यापूर्वी विशिष्ट प्रक्रिया करणे गरजेचे आहे. तसेच एकाच प्रकारचा झाडपाला जनावरांच्या आहारामध्ये दीर्घकाळ वापर केल्यास त्याचा जनावराच्या प्रकृतीवर अथवा उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. म्हणून शेंगा, बीया व फळे वापरण्यापूर्वी त्यातील विषारी घटक व वासाचे प्रमाण कमी करण्यासाठी आहारातील उपयुक्तता व अन्नघटकाची पाचकता वाढविण्यासाठी पुढील प्रमाणे प्रक्रिया करणे आवश्यक आहे. 

  • झाडांची पाने कोमट पाण्यामध्ये भिजवून सूर्यप्रकाशात वाळवावी व नंतर जनावरांना खाऊ घालावीत.
  • ४ टक्के सोडिअम हायड्रॉक्साईड किंवा २ टक्के बोरीक आम्ल किंवा १ टक्के हायड्रोक्लोरीक आम्लाचे द्रावण झाडांच्या पाल्यावर शिंपडावे व सूर्यप्रकाशात वाळवून खाऊ घालावे.
  • हिरव्या झाडपाल्यापासून पाचक मूरघास बनविता येतो.
  • रवंथ करणाऱ्या जनावरांच्या आहारामध्ये अशा पाल्याचे प्रमाण १० ते ३० टक्के पर्यंत वाढविले तरी त्याचा जनावरांच्या शरीरावर किंवा उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होत नाही.

तुषार भोसले, ८००७६५६३२४
(पशू संवर्धन व दुग्ध शास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)


इतर चारा पिके
चाऱ्यासाठी ज्वारीचा नवा वाण ‘सीएसव्ही...चारा पीक म्हणून ज्वारी अत्यंत उपयुक्त आहे....
धान्य, चाऱ्यासाठी बाजरीबाजरी हे पीक पाण्याच्या ताणाला सहनशील आणि...
सकस चाऱ्यासाठी पेरा बाजरी,मकाजनावरांच्या पोषणामध्ये हिरवा चारा महत्वाचा आहे....
उन्हाळी चारा मका पिकातील लष्करी अळीचे...बऱ्याच भागांमध्ये चाऱ्यासाठी उन्हाळ्यात मका...
उत्तम प्रतिच्या हिरव्या चाऱ्यासाठी चवळी...चवळी पिकापासून उत्तम प्रतिचा हिरवा चारा मिळवता...
चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्यासाठी युरिया...उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईमुळे हिरवा चारा मिळत नाही...
चाऱ्यासाठी पर्यायी स्रोत - शेवगाशेवग्याच्या शेंगांचा समावेश मानवी आहारामध्ये...
हिरव्या चाऱ्याच्या पूर्ततेसाठी मुरघास...हिरव्या चाऱ्याच्या व्यवस्थापनावर उपाययोजना म्हणून...
जनावरांसाठी चारा म्हणून विविध...झाडांचा हिरवा पाला तुलनात्मकदृष्ट्या एकदल चारा...
हिवाळी हंगामात पौष्टिक चाऱ्यासाठी करा...बरसीम (शास्त्रीय नावः ट्रायफोलियम...
सकस चाऱ्या‍साठी बीएचएन - १० संकरित...महाग खुराकातील काही भाग स्वस्त चाऱ्या‍मधून देणे...
सकस चाऱ्यासाठी लसूण घासलसूण घास हे द्विदलवर्गीय पीक असून ६० ते ९० सें.मी...
नियोजन चारा पिकांचे...सकस चाराउत्पादन केल्यास जास्तीत जास्त पोषणमूल्ये...
कोकणातही मक्यावर स्पोडोप्टेरा...अमेरिकन लष्करी अळी (शा. नाव -स्पोडोप्टेरा...
वर्षभर हिरव्या चाऱ्यासाठी ः मुरघासपावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर हिरव्या चाऱ्याचे...
पौष्टिक चाऱ्यासाठी लसूणघासलसूणघास चाऱ्यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिने,...
लागवड ओट चारापिकाची...संभाव्य चाराटंचाई लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
जनावरांसाठी उपयुक्त प्रथिनयुक्त द्विदल...प्रथिने पुरवठा करणाऱ्या चारा पिकांमध्ये विशेषतः...
चाराटंचाईमध्ये हायड्रोपोनिक्स चाऱ्याची...अत्यल्प पर्जन्यमानामुळे चारा उत्पादनात लक्षणीय घट...