कोंबड्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी प्रमाणात असेल, तसेच समतोल आहार, शुद्ध हवेची कमतरता,
ग्रामविकास
ग्रामविकासाचा आदर्श झालेले वडगाव पांडे
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातील वडगाव (पांडे) गटग्रामपंचायतीमध्ये समावेशीत वडगाव, दिघी, सायखेडा, हिवरा पोळ अशा चार गावांनी विकासात भरारी घेतली आहे. कधीकाळी आर्थिक मागासलेपणाचा बसलेला शिक्का आता पुसला गेला आहे. जलसंधारण, शैक्षणिक, आरोग्य असा चौफेर विकास या गावांनी साधला आहे.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातील वडगाव (पांडे) गटग्रामपंचायतीमध्ये समावेशीत वडगाव, दिघी, सायखेडा, हिवरा पोळ अशा चार गावांनी विकासात भरारी घेतली आहे. कधीकाळी आर्थिक मागासलेपणाचा बसलेला शिक्का आता पुसला गेला आहे. जलसंधारण, शैक्षणिक, आरोग्य असा चौफेर विकास या गावांनी साधला आहे.
वर्धा जिल्ह्यात आर्वी तालुक्यातील काही गावे सेवासुविधा, अर्थकारण, विकास या अनुषंगाने पिछाडलेली होती. ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागे. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील वडगाव (पांडे) गटग्रामपंचायतीअंतर्गत वडगाव, दिघी, सायखेडा, हिवरा पोळ अशा चार गावांचा समावेश आहे. या चारही गावांनी प्रगतीची दिशा पकडली आहे. सुरवातीला तीन गावांसाठी प्रत्येकी चार लाख त्यानंतर दुसऱ्या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये प्रत्येकी सहा लाख याप्रमाणे दहा लाख रुपयांचा निधी मिळाला. गाव विकास आराखडा तयार करून ग्रामपंचायत स्तरावर ज्या योजनेसाठी शासनाकडून निधी मिळणे शक्य नाही अशा कामांसाठी या निधीचा विनीयोग केला जातो.
विकासकामांना गती
वडगावात (पांडे) स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. परिणामी २००८-०९ आणि २०१२ मध्ये निर्मल ग्राम पुरस्काराने गावाचा गौरव करण्यात आला. वडगाव हे १५४० लोकसंख्येचे गाव आहे. दिघी, सायखेडा या गावात १०; तर वडगाव येथे पाच नाडेप डेपो उभारले आहेत. राज्य शासनाच्या सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापन योजनेतून त्यासाठी नऊ लाख ९४ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला. नाडेप तंत्रामुळे
उत्तम प्रतीचे खत मिळते. त्याचा शेतकऱ्यांद्वारे उपयोग केला जातो.
गावात वाढल्या सोयीसुविधा
व्यायामशाळा, वाचनालय, ८६ घरकुलांची बांधणी पंतप्रधान आवास योजनेतून झाली; तसेच १३ घरकुले रमाई आवास योजनेतून मंजूर झाली असून, त्यांचे बांधकाम झाले आहे. चार गावांसाठी दोन वाचनालये
तर व्यायामशाळा सुरू करण्यात आली आहे. दीड लाख रुपयांचे साहित्य त्यासाठी वर्धा जिल्हा क्रिडा विभागाकडून मिळाले आहे. जिल्हा परिषद शाळेच्या जुन्या इमारतीची दुरुस्ती करून त्यातील अर्ध्या भागात वाचनालय; तर अन्य भागात व्यायामशाळा उभारण्यात आली आहे.
शाळा झाल्या स्मार्ट
वडगाव, दिघी, सायखेडा येथे पहिली ते चौथीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. या तीनही शाळा स्मार्ट इंटरऍक्टिव्ह बोर्डाच्या अखत्यारीत आणण्यात आल्या आहेत. ‘डिजिटल’ क्लासरूमच्या पुढील शिक्षणपद्धती असल्याचे सांगण्यात आले. याद्वारे गावातील शिक्षणाचा दर्जाही सुधारण्यास मदत झाली आहे. तीनही गावातील अंगणवाड्यांची अवस्था बिकट होती. या ठिकाणी वीज पुरवठा नव्हता. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना येथे शिकणाऱ्या चिमुकल्यांना करावा लागे. त्याची दखल घेत तीनही ठिकाणी वीजेची सोय उपलब्ध करुन देण्यात आली. त्याचे बिल ग्रामपंचायतीमार्फत नियमित भरले जाते.
महिलांचे जपणार आरोग्य
सॅनीटरी नॅपकीन व्हेंडीग मशीन वडगाव व सायखेडा येथील अंगणवाड्यांमधून उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. सॅनीटरी नॅपकीन डिस्ट्रॉयर यंत्रही उपलब्ध केले आहे. या माध्यमातून महिलांचे आरोग्य जपण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. त्यासाठी जागृती करण्यात आली आहे.
वाचनालयात ॲग्रोवन
ग्रामविकास आणि शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञान प्रसारासाठी गावातील वाचनालयात ॲग्रोवनला मानाचे स्थान देण्यात आल्याचे ग्रामसचिव प्रवीण खोंडे यांनी सांगितले. या माध्यमातून शेतीमध्ये होणारे परिवर्तन व त्यातील चांगल्या गोष्टींचा अवलंब गावांमध्ये करण्यात येत आहे.
बचत गटाची अवजारे बॅंक
‘व्हीएसटीएफ’च्या माध्यमातून गावातील महिला शेतकरी समूहाला फिरता निधी म्हणून दीड लाख रुपये देण्यात आले. त्यातून समूहाने ट्रॅक्टर खरेदी केला आहे. त्यासाठी कृषी विभागाचे अनुदान मिळाले आहे.
तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी प्रोत्साहन दिले. अवजारे बॅंकेसाठी दिघी येथील महिलांसाठी दहा लाख रुपयांची योजना तयार करण्यात आली.
पेरणी यंत्र, रोटाव्हेटर, नांगर अशी यंत्रे बॅंकेत आहेत. गेल्या हंगामात अवजारे भाड्यापोटी
दिघी येथील समता ग्राम संघाला ७० हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळाला होता. वडगाव येथे सावित्रीबाई महिला समूहाला शेवया यंत्रासाठी २६ हजार रुपयांचा फिरता निधी उपलब्ध करुन देण्यात आला.मे २०१९ मध्ये या माध्यमातून त्यांनी व्यवसाय सुरु केला.
रस्त्याने जोडले गाव
तीन गावांमध्ये प्रत्येकी १३ सिमेंट बाक बसविली आहेत. सायखेडा गावातील ग्रामस्थांना सात किलोमीटरवरील रोहणा येथे रेशन घेण्यासाठी जावे लागे. ही अडचण सोडवण्यात आली. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून वडगाव ते धनोडी, वडगाव ते दिघी या रस्त्यांची कामे मंजूर होती. ‘व्हीएसटीएफ’ प्रकल्पातून त्याला गती मिळावी यासाठी पाठपुरावा करण्यात आला. ही कामे आता अंतीम टप्प्यात आहेत.
गावातील विहिरींवर संरक्षक जाळी
गावात चार विहिरी आहेत. त्यातील तीन विहिरींवर लोखंडी संरक्षक जाळी बसविण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. या विहिरींमध्ये पूर्वी अनेकदा गावातील जनावरे पडून जखमी झाली होती.
जलसंधारणातून जलक्रांती
गटग्रामपंचायतीअंतर्गत गावांत जलयुक्त शिवारांची कामे करण्यात आली. यात ३९४ हेक्टरवर बांधबंदिस्तीची कामे झाली. नाला खोलीकरण झाले. या कामांमुळे शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीसाठी पुढाकार घेतला. सुमारे ५७ लाख रुपये खर्चून सायखेडा शिवारात कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम झाले. हे काम नुकतेच झाल्याने यंदाच्या पावसाळ्यात त्यात पाणी साठून त्याचे दृश्य परिणाम नजरेत येतील, असे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक नितेश मोकल यांनी सांगितले. गावातील सेंद्रिय गटातील सदस्यांना सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन देण्याबरोबरच मातीपरीक्षण निशुल्क करून देण्यात आले आहे.
सांडपाण्यासाठी शोषखड्डे
दिघी आणि सायखेडा गावात ९७ शोषखड्डे तयार करण्यात आले. त्यामुळे रस्त्यांवर येणारे पाणी आता खड्ड्यांमध्ये सोडले जाते. डासांचा प्रादुर्भाव यामुळे रोखता आला आहे. त्यासोबतच सायखेडा येथे ७० हजार रुपयांतून हातपंप घेत पाणीसमस्या सोडविण्याचे प्रयत्न झाले.
संपर्क- प्रवीण खोंड ८७८८१८७२३१
ग्रामसचिव, वडगाव, ता. आर्वी, जि. वर्धा
नितेश मोकल- ९८७०९२६६९७
प्रवीणा अमित डाखोरे- ९६८९५३३४०२
(सरपंच)