agriculture story in marathi, vaghad dam, integrated farming,nasik | Agrowon

वाघाड पाणीवापर संस्थांनी शेतीतून उभारले अर्थविश्व

मुकुंद पिंगळे 
सोमवार, 22 एप्रिल 2019

पूर्वी २० एकरांपैकी अडीच एकर शेतीच विहिरीच्या पाण्यावर व्हायची. रोजगार हमी योजनेच्या कामावर जावे लागे. पाणीवापर संस्थेच्या माध्यमातून ही परिस्थिती बदलली. शेतीला पाण्याची हमी मिळाली. जमीन बागायती झाली. पीक उत्पादन वाढले. बाजारात पत निर्माण झाली. घरदार, वाहने, मुलांना चांगल्या शिक्षण सुविधा देणे शक्य झाले. 
-रामनाथ वाबळे, लाभधारक शेतकरी 

नाशिक जिल्ह्यात वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर संस्थेच्या माध्यमातून आदर्शवत जलक्रांती घडली. समन्यायी जल वितरण व व्यवस्थापनाचे देशातील आदर्श मॉडेल संस्थेने उभारले. त्यातून एकेकाळी २५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखालील परिसर १० हजार हेक्टरपर्यंत पोचला. फळे, भाजीपाला, फूलशेती यांच्याबरोबरच अन्य उद्योगांचा विकास झाला. निर्यात झाली. शेतकऱ्यांची आर्थिक व सामाजिक पत वाढली. प्रकल्प कार्यक्षेत्रात या सर्वांतून मिळून सुमारे एक हजार कोटी रुपयांचे बाजारमूल्य तयार होण्याची क्षमता तयार झाली. 

परिवर्तनासाठी तीन प्रकारच्या पाण्याची आवश्यकता असते. एक शेतशिवार फुलवण्यासाठी, दुसरे कर्तबगारीसाठी अंगात पाणी आणि तिसरे समाजाचे दुःख पाहून आपल्या डोळ्यांत येणारे पाणी. नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध वाघाड प्रकल्पाच्या प्रेरणादायी कार्यातून या तीनही प्रकारच्या पाण्यातून परिवर्तन घडले आहे. 

चळवळीतून पाणीवापर संस्थेचा जन्म 
तो काळ होता १९८७ सालचा. वाघाड प्रकल्पावर एक कालवा ओझर मिगपर्यंत अस्तित्वात होता. पारंपरिक पद्धतीने आवर्तन घेणारे मोजके शेतकरी परिसरात होते. परिणामी, २५ हेक्टरपर्यंतच क्षेत्र ओलिताखाली होते. परिसरातील लोक रोजंदारीने खडी फोडण्याच्या किंवा अन्य कामांना जायचे. जलसिंचनातून भागात परिवर्तन घडू शकते, ही बाब दूरदृष्टी लाभलेल्या बापू उपाध्ये व कै. भरत कावळे यांनी ओळखली. त्यांनी जलसाक्षरतेचा वसा हाती घेत कामे सुरू केली. अनंत अडचणी आल्या. पण, चळवळ थांबली नाही. हळूहळू वाघाड प्रकल्पावरील शेवटपर्यंतच्या शेतकऱ्यांना पाण्याचे महत्त्व समजू लागले. तेही चळवळीत सहभागी झाले. यातूनच पाणीवापर संस्थेचा जन्म झाला. 

पाणीवापर संस्थांची वाटचाल 
समाज परिवर्तन केंद्राच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी पाणीवापर संस्थांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात झालेले काम देशासाठी दिशादर्शक आहे. सुरुवातीला वाघाड प्रकल्पावर तीन पाणीवापर संस्था स्थापन झाल्या. सन २००३ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प हस्तांतरित करण्यात आला. त्याच्या अवलोकनातून जलसुधार प्रकल्प व २००४ मध्ये एकूण २४ पाणीवापर संस्था अस्तित्वात आल्या. पुढे २००५ मध्ये संपूर्ण प्रकल्पाचे सिंचन व्यवस्थापन हस्तांतरित झाले. हेडपासून ते टेलपर्यंत सर्व शेतशिवार ओलिताखाली आले. 

जलक्रांती घडली 
पारंपरिक पिकांपासून शेतकरी व्यावसायिक पिकांकडे वळला. मोठ्या प्रमाणावर द्राक्ष, भाजीपाला व फूलशेती होऊ लागली. पाणीवापराचे महत्त्व समजल्याने ३० टक्के बचत होऊ लागली. शेतकऱ्यांची पाणीपट्टी वसुली १०० टक्के होऊ लागली. एके काळी केवळ २५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली असलेला भाग तब्बल १० हजार हेक्टर लाभक्षेत्रावर गेला. 

सक्षम सिंचन व्यवस्था 
राज्य सरकारने पाणीवापर संस्थेच्या माध्यमातून पाणीवाटपाचे धोरण स्वीकारले. सन २००५ मध्ये या संबंधीचा कायदा करून फेब्रुवारी २००६ मध्ये अंमलबजावणी सुरू झाली. वाघाड प्रकल्पकार्याची २००४ व २००७ मध्ये राष्ट्रीय उत्पादकता पुरस्काराने दखल घेण्यात आली. जलव्यवस्थापनाचा आदर्श देशासमोर उभा राहिला. प्रत्येक शेतकऱ्याला शाश्वत सिंचनव्यवस्था निर्माण झाल्याने तो सक्षम झाला. पाणीवापर संघांच्या संस्थांद्वारे सिंचन व्यवस्थापन क्षेत्रातील हा पहिला प्रकल्प ठरला. संस्थांनीही बिनविरोध निवडणुका करून आदर्श निर्माण केला. महाराष्ट्र जलसुधार-प्रकल्पांतर्गत वाघाड उजवा व डावा दोन्ही कॅनाल पुनर्स्थापनांतर्गत कामे झाली. 

दृष्टिक्षेपात वाघाड प्रकल्प : 

 • धरण साठवण क्षमता- २५५० दलघफूट 
 • सरासरी पर्जन्यमान : ७५० मिमी 
 • लाभक्षेत्रातील गावे : ३० 
 • एकूण सिंचित क्षेत्र : प्रवाही व उपसा सिंचनाद्वारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष १० हजार हेक्टर 
 • कालवा लांबी : उजवा कालवा – ४५ किमी, डावा कालवा – १५ किमी 
 • अवलंबून शेतकरी कुटुंबे : १८,९२६ 

‘वाघाड’ संस्थेच्या कामकाजाची वैशिष्ट्ये : 

 • आज २४ पाणीवापर संस्थांची मिळून वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर ही शिखर संस्था कार्यरत 
 • दिंडोरी व निफाड या दोन तालुक्यांतील ३० गावांसाठी कार्यरत 
 • संस्थेचे मुख्य कार्यालय मोहाडी (ता. दिंडोरी). 
 • मार्गदर्शन आढावा, धोरण, वसुली आदींबाबत सातत्याने चर्चा व समन्वयाने कामकाज 
 • यातील ठळक बाबी अशा... 
 • सिंचन क्षेत्रात लक्षणीय वाढ 
 • पुच्छ(Tail) ते शीर्ष (Head) अशा प्रकारे सिंचनासाठी न्याय्य पाणीवाटप 
 • प्रकल्प आठमाही असताना नियोजनातून बारमाही सिंचन व्यवस्था 
 • तासावर सिंचन, तासावर पाणीपट्टी 
 • पाण्याची हमी असल्याने पीक रचनेत बदल 
 • पिकांचे स्वातंत्र्य देण्यात आले 
 • शासन भरणा वेळेत, त्यामुळे संस्थेला वेळेत पाणी उपलब्ध 
 • कामकाजात महिलांचाही समावेश 
 • संस्थेची कार्यपद्धती : 
  प्रत्येक हंगामापूर्वी संस्थेचे सभासद, शासकीय प्रतिनिधी यांची बैठक 
 • धरणातील प्रत्येक वर्षी पाणी उपलब्धता पाहून सिंचन आवर्तनाचा कालावधी निश्चित 
 • प्रकल्पस्तरीय संघ व संस्था पाणी मागणी व पुरवठा घनमापन पद्धतीने 
 • आवर्तन सुटण्यापूर्वी सर्व पाणीवापर संस्थांच्या एकत्रित पाणीवाटपाचे नियोजन 
 • आवर्तन सुटल्यानंतर प्रथमतः टेल भागाकडून पाणी वितरण 
 • शासन व संस्थाकडून दर तीन तासाला पाण्याचे संयुक्त मोजमाप 
 • हंगामात वापरलेल्या एकूण पाण्याचा हिशेब करून आकारणी व वसुली प्रक्रिया 
 • उन्हाळी हंगामात पाणीवापर संस्थांकडून बांधावरच आगाऊ वसुली 
 • लाभार्थीना पाणीवाटप प्रति तासानुसार- 
 • संस्थांकडून वेळीच वसुली. शासनाचा पाणीपट्टी भरणाही वेळेत 
 • वसुलीप्रक्रिया १०० टक्के 
 • उचल पाणी परवानगी 
 • ज्या गावातून कॅनॉल गेला आहे, ज्या ठिकाणी प्रवाही पद्धतीने पाणी उपलब्ध होत नाही, अशा शेतकऱ्यांसाठी उचल पाण्यासाठी संस्था 
 • घनमापन पद्धतीने एकूण कॅनॉलच्या १० टक्के पाणी कोटा विभागून. त्यामुळे पाणीचोरीला मोठा आळा बसला. 

शेतकऱ्यांचा सहभाग 
संस्थेमध्ये शेतकऱ्यांना, त्यातही महिलांना विशेष स्थान आहे. हक्काच्या पाण्याचे व्यवस्थापन, वितरण, सिंचन विषयक पायाभूत सुविधांचे परीक्षण करण्याची जबाबदारी विविध क्षेत्रांनुसार संस्थांकडे दिली आहे. पाण्याचा काटेकोरपणे वापर करण्यासाठी सूक्ष्मसिंचनावर भर दिला आहे. 

प्रकल्प कार्यक्षेत्रातील शेतीचा कायापालट 
ओलिताखालचे क्षेत्र वाढल्यानंतर भाजीपाला, फळपिकांच्या क्षेत्रवाढीसह उत्पादन वाढीसही चालना मिळाली. सन २००९ साली संस्थेने वाघाड फार्मर प्रोड्यूसर कंपनीची स्थापना केली. कृषी विभाग ‘आत्मा’ यांच्या वतीने ओझर येथे शेतमाल प्रक्रिया केंद्र, तर मोहाडी येथे प्रक्रिया उद्योग केंद्राची स्थापना झाली. 
शेतकऱ्यांसाठी पाणी, पीक व्यवस्थापनाबाबत चर्चासत्रे, प्रात्यक्षिके घेतली जातात. औरंगाबाद येथील वाल्मी संस्थेतही शिखर संस्थेचे प्रतिनिधी प्रशिक्षण घेतात. 

लाभक्षेत्राखालील पिके व प्रकल्प 
फळबाग- द्राक्षे, पेरू, डाळिंब, चिकू, लिंबू, आंबा 
फूलशेती- झेंडू, गुलाब, जरबेरा 
भाजीपाला- टोमॅटो, वांगी, सिमला मिरची, कोबी, फ्लॉवर, कारले, गिलके, भोपळा, काकडी, तोंडली, दोडका 
पालेभाज्या- मेथी, कोथिंबीर, शेपू, पालक, कांदापात, पुदिना, शतावरी 

एकरी उत्पादन (प्रतिएकरी) 

 • द्राक्षे - १२ टन 
 • टोमॅटो - १८ ते २० टन 
 • ढोबळी मिरची - २० टन 
 • काकडी - २० ते २५ टन 
 • गुलाब- पॉलिहाउस- ८०, ००० फुले (प्रतिवर्षी एकरी) 
 • पॉलिहाउस-४८५, शेततळी-८३०, शेडनेट-४७०, वायनरी-८, शीतगृहे-१६, अन्नप्रक्रिया उद्योग- २, कांदा पावडर निर्मिती -२, पोल्ट्री फार्म- ७, बेदाणा प्रकल्प- २५, सिल्क इंडस्ट्री -१ 
 • यासह सुतळी, अमोनिया, मोरचूद, पोलाद प्रक्रिया आदी लघुउद्योग 

असे घडले बदल 

 • लाभक्षेत्रातील शेवटच्या भागात सोनेवाडी, शेजवळवाडी येथे पूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर मागवावे लागायचे. आज या वाड्यावस्त्या टॅंकरमुक्त झाल्या आहेत. परिसरातील अनेक कुटुंबांची रोजंदारीच्या 
 • कामातून सुटका झाली. शहरातील स्थलांतर थांबले. प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख झाली. जीवनमान उंचावले. हवामान, दर, आवक यांच्या अनुषंगाने द्राक्ष, गुलाब, ऊस, भाजीपाला पिके एकरी एक लाख रुपयांपासून ते तीन-चार लाख रुपयांपर्यंत उत्पन्न देऊ लागली आहेत. 
 • प्रकल्प कार्यक्षेत्रात एक हजार कोटी किंवा त्याहून अधिक रुपयांचे बाजारमूल्य शेती व अनुषांगिक 
 • उद्योगातून तयार झाले. गावा-गावांत छोटे उद्योग उभे राहिले. सुशिक्षित तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण झाला. परिसरातील प्रमुख गावांत मोठ्या बाजारपेठा उभ्या राहिल्या. आर्थिक व्यवहार वाढल्याने परिसरात नामांकित राष्ट्रीयीकृत व कॉर्पोरेट बँका आल्या. हॉटेल इंडस्ट्री विस्तारली. निर्यातीतून परकी चलन मिळू लागले. राज्यासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांतील दीड ते दोन लाख मजुरांना रोजगार उपलब्ध झाला. 

मान्यवरांच्या भेटी 
जागतिक बँकेचे ब्राझील येथील प्रतिनिधी जॉन ब्रिस्को, तसेच अन्य अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाणीवापर संस्थांशी संवाद साधला आहे. 

आदर्श समन्वय 

 • ‘वाघाड’ जलव्यवस्थापनात जलसंपदा विभाग व शिखर संस्थेचा समन्वय वाखाणण्यासारखा आहे. 
 • जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश मोरे, कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धन, वाघाड प्रकल्प उपविभागीय अधिकारी अशोक महाजन, वाघाड प्रकल्प शाखा अभियंता एस. एस. पाटील या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन संस्थेला लाभते. विविध पुरस्कारांनी संस्थेचा सन्मान झाला आहे.  

 
वाघाड पाणीवापर संस्था म्हणजे सिंचन प्रणालीतील आदर्श प्रकल्प आहे. त्यातूनच शेतकऱ्यांच्या जीवनात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थैर्यता आली. एकविचार, एकपक्ष 
यामुळेच हा उपक्रम यशस्वी झाला. 
- शहाजीराव सोमवंशी 
संस्थापक, माजी अध्यक्ष, वाघाड पाणीवापर संस्था 

समाज परिवर्तन केंद्राचे अध्यक्ष कै. बापू उपाध्ये व कै. भरत कावळे यांच्या प्रेरणेतून व सक्रिय प्रयत्नांतून पाणीवापर संस्था निर्माण झाल्या. शासनाने संस्थांना हक्क देऊन प्रत्येक हंगामात पाणी देण्याची खात्री दिल्याने परिसरात खडकाळ जमिनीचे रूपांतर नंदनवनात झाले. 
संपर्क- र्क्ष्मीकांत वाघावकर 
सरचिटणीस-समाज परिवर्तन केंद्र 
सदस्य, ‘वाघाड’ संस्था 

संपर्क- ८२०८४४७२९०७

 


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
भांडवली शेतीचा विळखा बघता बघता हरितक्रांतीला पन्नास वर्षे झाली. तसे,...
पशुखाद्य : नियोजन अन् नियंत्रणमहाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध...
मराठवाड्यात साडेदहा हजार एकरांवर तुतीऔरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर...
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सहा दिवस...मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या...
विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीपंढरपूर, जि. सोलापूर ः श्री विठ्ठल मंदिराच्या...
धानासाठी क्विंटलला पाचशे रुपये अनुदानमुंबई: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा...
‘पीजीआर’ला मान्यतेचा मार्ग मोकळापुणे ः देशभरात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बिगर...
इथेनॉलसाठी मान्यता; पण प्रकल्पांसाठी...पुणे  : थेट साखरेपासून इथेनॉल तयार करण्यास...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून पपईत मिळवली ओळखनंदुरबार जिल्ह्यात धमडाई येथील सुभाष व प्रनील या...
उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः बंगाल उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे...
परिश्रमपूर्वक व्यवस्थापनातून...पुणे जिल्ह्यातील रिहे येथील सुनील शिंदे...
किरकोळ व्यापाऱ्यांकरिता कांदासाठा...मुंबई ः देशात कांद्याचे उत्पादन घटल्याने...
सर्वाधिक दर मोजक्याच कांद्यालानगर ः वाढलेल्या कांदादराचा गेल्या महिनाभरापासून...
पशुखाद्य दर गगणाला भिडलेसांगली ः दुष्काळ व अतिवृष्टीचा फटका पशुखाद्य...
शेवंतीचे तीन वाण लवकरच पुणेः शेतकऱ्यांना शेवंतीच्या पांरपरिक वाणांना...
उत्तर प्रदेशात ‘एसएपी’त बदल नाहीनवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारने सलग दुसऱ्या...
उसाचे ३८ गुंठ्यांत तब्बल १४७ टन उत्पादनकोल्हापूर जिल्ह्यातील कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील...
कमी कालावधीचा दोडका देतोय चांगला नफागेल्या दोन, तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पुणे...
तापमानात चढ-उतारपुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात असलेले कमी...
जीवघेणा बाजारदेशात बोगस, भेसळयुक्त, अनधिकृत कीडनाशकांचा वापर...