मागणी नसलेल्या माशांपासून मूल्यवर्धित उत्पादने

प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती करुन मागणी नसलेल्या माशांपासून चांगला फायदा मिळवता येतो.
प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती करुन मागणी नसलेल्या माशांपासून चांगला फायदा मिळवता येतो.

माशांच्या अनेक जाती अशा आहेत, की त्यांना मासळी बाजारात फारशी मागणी नसते. परंतु पोषणमूल्ये किंवा अन्य बाबतीत नेहमी खाण्‍यात येणाऱ्या माशांची तुलना त्यांच्याशी केली जाऊ शकते. अशा माशांपासून मूल्यवर्धित उत्पादने तयार करून चांगला फायदा मिळतो.   मागणी नसलेल्या माशांचा उपयोग खाण्यास तयार अशा मूल्यवर्धित उत्पादनांत रूपांतर करणे गरजेचे असते. अशा तयार पदार्थांना देशात तसेच परदेशांत भरपूर प्रमाणात मागणी आहे. १. फिश कटलेटस् केंद्रीय मत्स्योद्योग संस्थेने विकसित केलेल्‍या माशांच्‍या अनेक उत्‍पादनांतील एक म्हणजे फिश कटलेटस्. हे उत्‍पादन तयार करण्‍यासाठी लागणारे मुख्य साधन म्‍हणजे शिजवलेले मासे किंवा ‘फिश खिमा’. हा खिमा माशापासून यंत्राने काढलेल्या मांसापासून बनविलेला असतो. बनवि‍ण्याची पद्धत मीट बोन सेपरेटर यंत्राच्या साह्याने माशांचे हाडे व काटे काढून तुकडे म्हणजे मिन्स करावेत. त्याआधी माशाचे डोके वेगळे करून पोटातील घाण काढून ते १ टक्का मीठ आणि ५ टक्के मक्याच्या स्टार्चने स्वच्छ धुवावेत. (आवश्‍यक असल्‍यास, लसूण, आले यांसारख्या मसाल्यांचा वापर करावा.) यापासून २ ते ३ सेंमी व्यासाचे छोटे गोळे तयार करावेत. गोळे १ टक्का मीठ असलेल्या पाण्यात ५ ते १० मिनिटे शिजवावेत. शिजवलेले गोळे थंड करून त्यावर नंतर बॅटरिंग व ब्रेडिंग करावे. उष्णतेने विशिष्ट आकार दिलेल्या (थर्मोफॉर्म्ड) ट्रेमध्ये हे बॉल्स पॅक करावेत. त्याआधी गरज असल्यास गरम खाद्यतेलामध्ये गोळे लगेच अति-उष्णतापमानाला तळून घ्यावेत (फ्लॅश-फ्राइंग). यानंतर फ्रीजमध्ये -१८ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत थंड करावेत. २. माशांचे लोणचे माशांच्या वजनाच्या ३ टक्के मीठ घालून व्यवस्थित मिसळून दोन तास तसेच ठेवावे. किंचित खारावलेले सुके मासेही वापरता येतात. कमीत कमी तेलात मासे तळावे. हा मासा वेगळा ठेवावा. उरलेल्या तेलात प्रमाण मोहरी, हिरव्या मिरच्या, लसूण, आले परतून नंतर मिरची पावडर, मिरपूड व हळद पावडर घालून काही मिनिटे मंद आचेवर ठेवून चांगले मिसळावे. या मिश्रणामध्ये तळलेले मासे (फ्राइड फिश) मिसळावेत. थंड झाल्यावर व्हिनेगर, वेलदोडा, लवंग, दालचिनी पावडर, साखर व उरलेले मीठ घालून पुन्हा चांगले मिसळावे. सर्व घटक पदार्थ बुडतील इतके पाणी (उकळून थंड केलेले) घालावे. काचेच्या स्वच्छ, निर्जंतुक बरणीत ठेवून ॲसिडरोधी झाकण लावावे. बरणीतील लोणच्यावर तेलाचा थर सतत राहील याकडे लक्ष ठेवावे. हे लोणचे पॅक करण्यासाठी १२ मायक्रॉन जाडीच्या पॉलिस्टरचे पाउच किंवा १.१८ मायक्रॉन एलडीएचडी (कमी अथवा जास्त घनतेच्या) को-एक्सट्रूडेड फिल्मने लॅमिनेट करून वापरता येतात. ३. कोळंबीचे लोणचे कोळंबीच्या वजनाच्या ३ टक्के इतके मीठ घालून कडक उन्हात १ ते २ तास वाळवावे. कमीत कमी तेलात कोळंबी तळून वेगळी ठेवावी. उरलेल्या तेलात हिरव्या मिरच्या, लसूण, आले तपकिरी रंगावर परतून मिरची पावडर तसेच हळद पावडर घालून मंद आचेवर ठेवून मिसळावे. थंड झाल्यावर व्हिनेगर, साखर आणि उरलेले मीठ घालावे. गरज असल्यास, १ टक्का ॲसेटिक ॲसिड मिसळावे. स्वच्छ बरणीत भरून बरणीतील लोणच्यावर तेलाचा थर सतत राहील याकडे लक्ष असू द्यावे. हे लोणचे पॅक करण्यासाठी १२ मायक्रॉन जाडीच्या पॉलिस्टरचे पाउच म्हणजे पिशव्या, १.१८ मायक्रॉनच्या एलडीएचडी (कमी अथवा जास्त घनतेच्या) को-एक्सट्रूडेड फिल्मने लॅमिनेट करून वापरता येतात. ४. सूप पावडर वेगवेगळ्या पदार्थांपासून सूप पावडर तयार करण्‍यासाठी विविध भाज्या, मांस, अंडी, चीकन इत्यादींच्‍या सूप-पावडरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. कारण सूपमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे व चरबी भरपूर प्रमाणात असते. बाजारात फारशी किंमत नसणाऱ्या माशांचा वापर चांगली सूप पावडर बनविण्‍यासाठी करता येतो. बनवि‍ण्याची पद्धत

  • १५० मि.लि. पाण्यामध्ये प्रक्रिया केलेले फिश-मीट वेअरिंग ब्लेंडरचा वापर करून मिसळून घ्यावे.
  • कांदा तपकिरी रंग येईपर्यंत तळून त्यामध्ये धणे पावडर व मिरपूड मिसळावी. मिश्रण गॅसवररून उतरवून त्यामध्ये बारीक केलेल माशांचे मांस मिसळून चांगली जाड पेस्ट तयार होईपर्यंत पुन्हा ब्लेंड करावे (यंत्रातून फिरवा).
  • तयार झालेली पेस्ट ॲल्युमिनियमच्या ट्रेमध्ये ओतून सुमारे ७० अंश सेल्सिअस तापमानाला ड्रायरमध्ये वाळवावी.
  • वाळविलेल्या मिश्रणाची पावडर बनवून त्यामध्ये स्कीम दुधाची पावडर मिसळून एकसारखी भुकटी तयार करावी.
  • ही सूप पावडर हवारोधक, पॉलिथिनचे अस्तर असलेल्या, ॲल्युमिनियम फॉइलच्या पिशव्यांमध्ये किंवा डब्यात भरावी. (ही पावडर पॅकबंद अवस्थेत सुमारे वर्षभर टिकते).
  • ५ ग्रॅम पावडर १०० मि.लि. पाण्यात टाकून ५ मिनिटे उकळल्यानंतर छान सूप तयार होते.
  • ५. फिश वेफर्स मूळ घटकाधार कार्बोहायड्रेट्स आणि मीठ, तसेच मसाल्‍यांसह किंवा मसाल्‍यांशिवाय बनविलेल्‍या सुके, तळून खाण्‍यासाठी व सर्व्‍ह करण्‍यासाठी तयार वेफर्स देशातील बहुतेक भागांत अत्‍यंत लोकप्रिय आहेत. माशांपासून बनवलेल्या वेफर्समध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात. बनवि‍ण्याची पद्धत

  • प्रक्रिया केलेले फिश-मीट १ लिटर पाण्यात १० मिनिटे नीट मिसळून एकजीव करावे. यासाठी यांत्रिक ग्राइंडरचा वापर करावा. यामध्ये मक्याचे पीठ, टॅपिओका स्टार्च, साधे मीठ व उरलेले पाणी घालून एक तास मिसळावे राहा. हे मिश्रण ॲल्युमिनियम ट्रेमध्ये १-२ मि.मी. जाडीच्या पातळ थरात पसरुन ३ ते ५ मिनिटे वाफेवर शिजवावे.
  • वातावरणीय तपमानापर्यंत थंड करून हव्या त्या आकारात कापून उन्हात वाळवावे. यांत्रिक ड्रायरमध्ये ४५ ते ५० अंश सेल्सिअस तपमानाला आर्द्रता १० टक्क्यांपेक्षा कमी ठेवून वाळवल्यास उत्तम.
  • वाळवलेले वेफर्स काचेच्या बाटल्यांमध्ये किंवा पॉलिथिन पिशव्यांत भरून कोरड्या व थंड जागी ठेवावेत. योग्‍य प्रकारे संग्रह केल्‍यास वेफर्स सुमारे २ वर्षांपर्यंत टिकतात. यामध्ये परवानगी असलेले खाद्यरंग वापरता येतात. प्रक्रिया केलेल्या फिश-मीटमध्ये इतर पदार्थ मिसळतानाच गरज वाटल्‍यास हे रंग घालावे.
  • संपर्क ः आर. ए. सिद्दिकी, ९६३७६७६६८८ (अन्न सूक्ष्मजीवशास्त्र आणि सुरक्षितता विभाग, एम.आय.पी. अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, औंढा (नागनाथ), जि. हिंगोली) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com