कुटुंबाची एकी, सुधारित तंत्र, शिंदे यांच्या बारमाही भाजीपाल्याचे सुत्र

उल्लेखनीय उत्पादनाबाबत सन्मान शिंदे यांनी बंगळूर येथील भारतीय उद्यानविद्या संशोधन संस्था (आयआयएचआर) ने संशोधित केलेल्या टोमॅटोच्या अर्का रक्षक वाणाचे एकरी ७०० क्रेट (एकरी सुमारे साडे १७ टन) उत्पादन घेतले. त्याबद्दल संस्थेतील शास्त्रज्ञांनी त्यांचा सन्मान केला. टोमॅटोचे हंगामानुसार एकरी एकहजार ते दोनहजार क्रेटपर्यंत उत्पादन मिळते. काकडीचे एकरी १० टन तर फ्लाॅवर, कारल्याचे ८ ते १० टन उत्पादन मिळते.
ग्रेडिंग करूनच शेतमालाची विक्री होते.
ग्रेडिंग करूनच शेतमालाची विक्री होते.

नांदेड जिल्ह्यातील वसंतवाडी येथील शिंदे परिवाराला संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे शेती करणे सुकर झाले आहे. पुरेसे मनुष्यबळ व प्रत्येकाने जबाबदारी वाटून घेऊन काम केल्याने बारमाही व विविध भाजीपाला पिकांची शेती सुकर झाली आहे. विशिष्ट कालावधीत बाजारातील मागणीचा अंदाज घेऊन सुधारित तंत्राने भाजीपाला पिकांचे उत्तम नियोजन करण्याची हातोटी त्यांनी मिळवली आहे.    नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातील वसंतवाडी येथे आनंदराव शिंदे यांचे संयुक्त कुटुंब आहे. थोरले सुनील, मधले भीमराव, बालाजी, धाकटे केशव असा चार भावांचा एकत्र परिवार आहे. वसंतवाडी शिवारात त्यांची आठ एकर वडिलोपार्जित आणि चार एकर खरेदी केलेली अशी एकूण १२ एकर जमीन चार वेगवेगळ्या ठिकाणी आहे. मध्यम ते भारी, काही ठिकाणी चुनखडीयुक्त तसेच दगडगोटे असलेली अशी ही जमीन आहे. सिंचनासाठी दोन बोअर्स आहेत. एका शेतातून अन्य शेतात पाइपलाइनद्वारे पाणी नेण्याची सोय केली आहे. खरिपात तीन ते चार एकरांवर सोयाबीन, त्यानंतर ऊस लागवड होते.  कुटुंबाच्या अन्नधान्यांच्या गरजा भागविण्यापुरते ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांचे उत्पादन घेण्यात येते.  नवे तंत्रज्ञान अवगत करण्याची आवड  बारावीपर्यंतच्या शिक्षणानंतर सुनील शेतीकडे वळले. सुरवातीच्या काळात त्यांनी दुग्धव्यवसाय केला. दरम्यान गावातील एका शिक्षकांमुळे त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली. त्यातून नवीन शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळत गेली. कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांचा संपर्क वाढला. विविध प्रशिक्षणातून आधुनिक तसेच किफायतशीर तंत्राची माहिती मिळाली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील वनस्पती विकृतीशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ डॉ. कल्याण आपेट, पोखर्णी येथील कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॅा. देविकांत देशमुख, प्रा. माणिक कल्याणकर हे सुनील यांच्या शेतावर प्रत्यक्ष येऊन मार्गदर्शन करीत असतात. त्यातून ज्ञान वाढून प्रयोगशीलता वाढीस लागली आहे.  ॲग्रोवन- ज्ञानाचा स्रोत  सुनील ॲग्रोवनचे वाचक आहेत. त्याच्या दिवाळी अंकाचे तर ते दरवर्षी आवर्जून वाचन करतात. तांत्रिक माहितीपर लेख तसेच शेतकऱ्यांच्या यशकथांमुळे नवीन प्रयोगांसाठी त्यांना प्रेरणा मिळते.  संपूर्ण कुटुंब राबते शेतात  शिंदे कुटुंबातील सर्व सदस्यांचा मशागत, लागवडीपासून ते काढणी, विक्री कामांमध्ये सहभाग असतो. प्रत्येकाने आपली जबाबदारी वाटून घेतली आहे. आनंदराव भाजीपाला पिकांची प्रतवारी करण्यापासून ते बाजारपेठेत विक्रीपर्यंतची जबाबदारी सांभाळतात. सुनील, भीमराव व बालाजी यांच्याकडे वर्षभराचे पीक नियोजन, सिंचन, लागवड, जमा-खर्चाच्या नोंदी ठेवणे अशी कामे वाटून घेतात. केशव जनावरांचा सांभाळ, चारा-वैरण आदी जबाबदारी पाहतात.  बारमाही भाजीपाला-ठळक बाबी 

  • दोन एकर क्षेत्र आलटून पालटून भाजीपाला पिकांसाठी बारमाही राखीव 
  • बाजारपेठेतील तेजी मंदी, मागणी, पुरवठा यांचा अंदाज घेऊन पिकांची निवड 
  • टोमॅटो, काकडी, फ्लॅावर, कारले आदी पिकांवर विशेष भर 
  • चवळी, मका, झेंडू यांचा सापळा पिके म्हणून वापर 
  • आर्थिक नुकसान पातळी ओळखून शिफारसीत रासायनिक कीडकनाशकांची फवारणी 
  • या नियोजनामुळे मित्रकीटक व मधमाश्यांची संख्या वाढली. त्यामुळे परागीकरणाला मदत 
  • रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी स्टिकी ट्रॅप तर टोमॅटोतील कीड नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्याचा वापर. यात चार्जिंग फवारणी पंपाच्या बॅटरीवर चालणारा दिवा व त्याखाली रॅाकेल मिश्रित पाणी ठेवले जाते. टोमॅटोवरील टूटा अळीच्या नियंत्रणासाठी ल्यूर असलेला स्टिकी ट्रॅप 
  • सुमारे १२ जनावरे. त्या आधारे गांडूळखत, दशपर्णी अर्कनिर्मिती. फिश ॲमिनो ॲसिडचाही वापर. पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी टणटणी वनस्पतीच्या पानापासून तयार केलेल्या कीटकनाशकाचा वापर 
  • गादीवाफा, मल्चिंग पेपर यांचा वापर टोमॅटो व त्यानंतरच्या काकडी पिकासाठी 
  • त्यानंतर जमिनीची फेरपालट 
  • सर्व शेतमालाची विक्री प्रतवारी करूनच होते. त्यानंतर माल नांदेड, भोकर, मुदखेड, उमरी आदी बाजारपेठेत नेण्यात येतो. 
  • जमा-खर्च उत्पन्नाच्या नोंदी. त्यामुळे सुधारणा करता येतात. 
  • आपापसातील विश्वास, जिव्हाळा, प्रेम, आदर यामुळे कुटुंबाची एकी टिकून 
  • रोपवाटिकेसाठी शेडनेटगृह उभारणीचे काम सुरू 
  • येत्या काळात रस्त्यालगतच्या शेतात रसवंतीगृह सुरू करणार 
  • जैविक घटकाचा उपयोग 
  • रोपे तयार करताना ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया 
  • वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वनस्पती विकृतीशास्त्र विभागामध्ये प्रायोगिक स्वरूपात निर्मिती करण्यात येत असलेल्या उपयुक्त जैविक घटकांचा वापर 
  • लागवडीनंतर सुमारे दीड महिन्यांनी एकरी चार किलो ड्रेचिंग तर ५० दिवसांच्या कालावधीत गरजेनुसार फवारण्या 
  • जमिनीत चुनखडीचे प्रमाण अधिक. शेणखत आणि गांडूळ खताद्वारे जमिनीची सुपीकता वाढविण्याचे प्रयत्न. उन्हाळ्यात मोकळ्या शेतात जनावरे बांधल्यामुळे शेण, मूत्र शेतात पडते. त्याचाही सुपीकतेला फायदा 
  • संपर्क- सुनील शिंदे-८२०८००३०४५   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com