उत्कृष्ट दर्जाच्या गांडूळखताला मिळवली लोकप्रियता, स्वतःच्या शेतीलाही झाला फायदा

विजय चौगुले उत्कृष्ठ दर्जाचे गांडूळखत तयार करतात.
विजय चौगुले उत्कृष्ठ दर्जाचे गांडूळखत तयार करतात.

सांगली जिल्ह्यातील खटाव येथील विजय चौगुले यांनी आपल्या शेतीचे आरोग्य सांभाळण्यासाठी गांडूळ खताचा वापर सुरू केला. त्याचवेळी खताला परिसरात असलेली मोठी मागणीही ओळखली. आज वर्षाला ४० ते ५० टन उत्पादन घेत व दर्जा उत्तम ठेवत आपल्या खताचा ब्रॅंड त्यांनी लोकप्रिय केला आहे. सोबत व्हर्मीवॉश, गांडूळ कल्चर, पंचगव्यावर आधारीत उत्पादनांनाही मार्केट मिळवत अर्थकारण उंचावले आहे. सांगली जिल्ह्यात पलूस तालुक्यात वसगडे गावापासून काही अंतरावर खटाव गाव लागते. कृष्णा नदीच्या पाण्याने संपन्न झालेला हा परिसर उसाचा पट्टा म्हणून परिचित आहे. याच गावातील विजय चौगुले हा युवा शेतकरी आपली साडेपाच एकर शेती कसतो आहे. बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर विजय यांनी शेतीचाच अनुभव घेण्यास सुरवात केली. सुरवातीला भाजीपाल्याची पिके घेतली. बदलता निसर्ग, दरातील चढ-उतार यामुळे शेती खर्चिक झाली. परिसरातील साखर कारखान्याने सुरू केलेल्या उच्च ऊस उत्पादनाच्या मोहिमेत मग ते सहभागी झाले. अपयशाची शोधली कारणे प्रयोगशील शेतकऱ्यांकडे भेटी तसेच शिफारशीप्रमाणे लागवड व खतांचे वेळापत्रक पाळून ऊसशेती सुरू केली. खतांवर भरमसाठ खर्च व्हायचा. दीड वर्षानी ऊस गेल्यावर एकरी ६४ टक्केच उत्पादन मिळाले. आर्थिक पदरमोड करूनही मनासारखे उत्पादन न मिळाल्याने विजय निराश झाले. मग अयशस्वितेची करणे शोधली. जमिनीचे माती परीक्षण केले. त्याचा सामू ९.५० इतका उच्च असल्याचे आढळले. त्या वेळी तज्ज्ञांनी फेरपालट व गांडूळ खताचा वापर करण्याचा सल्ला दिला. विकत घेऊन गांडूळखताचा वापर सुरू केला. परंतु आपणच खत तयार केले तर ते खात्रीशीर असेल व त्याचा दर्जा टिकवता येईल या हेतूने स्वतःचे गांडूळ खत निर्मिती युनिट उभारले. असे केले बदल सुरवातीला मोकळ्या जमिनीवर बेड तयार करून खत तयार करण्यास सुरवात केली. त्यात गांडूळे सोडली. परंतु खाली मोकळी माती असल्याने ती गांडूळे जमिनीतच जाऊ लागली. मग मोठ्या शेडमध्ये दगड, वीट, मुरूम एकत्र करून जमीन तयार केली. त्यावर बेड उभारले. याच काळात कुजलेल्या शेणखताचाही योग्य परिणाम दिसत नव्हता. आज मोकळ्या तीन गुंठे क्षेत्रात गांडूळखताचे उत्पादन साध्य होऊ लागले आहे. व्यवसायात केले रूपांतर

  • शेतीत गांडूळ खताचा वापर सुरू केल्यावर हळूहळू सकारात्मक परिणाम दिसू लागले. बाळभरणी व मोठी भरणी या वेळी वापर होऊ लागला. हळूहळू परिसरातील शेतकरीदेखील आपल्याला खत बनवून द्या अशी मागणी करू लागले. विजय यांनी ही संधी ओळखली व व्यवसायात त्याचे रूपांतर करायचे ठरवले.
  • आज २० ते २५ किलोमीटर परिघातील भाजीपाला, फूल उत्पादक, निर्यातक्षम द्राक्ष बागायतदार त्यांचे नियमित ग्राहक झाले आहेत.
  • मागणी वाढू लागली तशी व्यवसायाची उद्योजकता आधारखाली नोंदणी केली.
  • निर्मितीत दर्जा सांभाळला. त्यामुळे मागणी टिकून राहिली.
  • विजय यांना पत्नी माधवी यांचीही मोलाची मदत मिळू लागली. त्यामुळे भार हलका झाला.
  • गांडूळखत निर्मिती व्यवसाय दृष्टिक्षेपात

  • वर्षभरात सुमारे पाच बॅचेसमध्ये उत्पादन. प्रति बॅच १० टन यानुसार वर्षभरात ४० ते ५० टन उत्पादन.
  • वर्षाला सुमारे ६० ते ७० टनांची मागणी व विक्री. उर्वरित मागणी मित्रांच्या गांडूळखत युनिटद्वारे पूर्ण केली जाते.
  • लागणारा कच्चा माल म्हणजे शेणखत शेतकऱ्यांकडून विकत घेण्यात येते.
  • गांडूळखताची विक्री प्रतिटन ८ हजार रुपये दराने होते. शेणखत, बॅगिंग, व्यवस्थापन आदी खर्च वजा जाता प्रति टन गांडूळखता पाठीमागे दोन हजार रुपये उत्पन्न मिळते.
  • भू- संजीवनी असा ब्रॅंड तयार केला आहे. एक किलो, पाच किलो व ४० किलो पोत्यातून होते विक्री.
  • अतिरिक्त उत्पन्न या व्यतिरिक्त गांडूळ कल्चरचीही तीनशे रुपये प्रति किलो दराने महिन्याला २० किलोपर्यंत विक्री होते. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठही गरजेनुसार १०० किलोपर्यंतची ऑर्डर विजय यांना देते. व्हर्मीव्हॉशही लिटरला ५० रुपये दराने विकण्यात येते. गांडूळखत वापरण्याचे तंत्र विजय सांगतात, की गांडूळखताचा योग्य परिणाम दिसण्यासाठी उसाच्या बाळभरणीच्या वेळी सरीत एक ते दीड टन या प्रमाणात वापरून ते मातीआड करावे. मोठ्या भरणीच्या वेळी रासायनिक खतांचा वापर केल्यानंतर चांगली चाळणी करून घ्यावी. त्यानंतर पाच ते सहा दिवसनी गांडूळखत वापरावे व मातीआड करावे. रासायनिक व गांडूळ खत एकत्र टाकू नये असेही विजय सुचवतात. सामू कमी केला, उत्पादन वाढवले विजय यांनी गांडूळखताचा वापर आपल्या शेतीतही फायदेशीर ठरवला आहे. रासायनिक खतांवरील सुमारे ३० ते ४० टक्के खर्च त्यांनी कमी केला आहे. येत्या काळात तो अजून कमी होईल. एकरी जिथे ६० हजार रुपये खर्च व्हायचा तिथे तो तीस हजारांवर आणला आहे. उसाच्या उत्पादनात सुमारे सात ते आठ टनांनी वाढ होऊन ते एकरी ६५ टनांपर्यंत पोचले आहे. काळी राने, रासायनिक खतांचा झालेला अमर्याद वापर व मातीचा सामू या कारणांमुळे उत्पादनावर मर्यादा येतात. पूर्वी ९.५० इतका असणारा जमिनीचा सामू आता ८. ५० वर येऊन ठेपला आहे. माती परीक्षण सातत्याने केल्याने आपल्या जमिनीची स्थिती कळून सुधारण्यास वाव मिळतो असे विजय सांगतात. चौगुले यांच्या शेतीची वैशिष्ट्ये

  • साधारण एक ते सव्वा महिन्याच्या काळातील शेणाचा वापर गांडूळखतासाठी होतो.
  • खत चाळण्यासाठी यंत्राचा वापर होतो. त्यासाठी टाकाऊ वस्तूंमधून वाळू चाळणारे यंत्र आणून त्यात सुधारणा केली आहे.
  • सन १९९५ पासून उसाचे पाचट न जाळता त्याचा खत म्हणून वापर होतो.
  • दोन देशी गायींचे पालन. सध्या पंचगव्यापासून शांपू व अन्य उत्पादनांची निर्मिती. त्यातून उत्पन्न मिळवण्याचे प्रयत्न.
  • ॲग्रोवनचे नियमित वाचक विजय पाच सहा वर्षांपासून ॲग्रोवनचे नियमित वाचक आहेत. त्यातील मातीची सुपिकता तसेच नवे तंत्रज्ञान या विषयांचे वाचन त्यांना उपयोगी ठरते. प्रताप चिपळूणकर यांच्या लेखनाचे भाग त्यांनी संग्रहित करून ठेवले आहेत. संपर्क - विजय चौगुले - ९११२००१०१२  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com