दर्जेदार रेशीम कोष उत्पादनात पाटील यांनी मिळवली ओळख

जळगाव जिल्ह्यात देवपिंप्री येथील विकास पाटील यांनी कुटुंबाच्या एकीतून रेशीम शेती यशस्वी केली आहे. वर्षाला दोन शेड्‍समध्ये बारा बॅचेस व प्रति बॅच २५० अंडीपुंजांचे उत्पादन ते घेतात. दर्जेदार रेशीम कोषांना २५० ते कमाल ५३५ रुपये दर मिळवत या व्यवसायातून आर्थिक स्थैर्य मिळविले आहे.
रेशीम कीटकांना तुतीचे खाद्य देताना विकास पाटील व स्नुषा साधना.
रेशीम कीटकांना तुतीचे खाद्य देताना विकास पाटील व स्नुषा साधना.

जळगाव जिल्ह्यात देवपिंप्री येथील विकास पाटील यांनी जिद्द, कष्ट व कुटुंबाच्या एकीतून रेशीम शेती यशस्वी केली आहे. वर्षाला दोन शेड्‍समध्ये बारा बॅचेस व प्रति बॅच २५० अंडीपुंजांचे उत्पादन ते घेतात. दर्जेदार रेशीम कोषांना २५० ते कमाल ५३५ रुपये दर मिळवत या व्यवसायातून त्यांनी मजबूत आर्थिक स्थैर्य मिळविले आहे. जळगाव जिल्ह्यात देवपिंप्रीचे (ता. जामनेर) शिवार कापूस पिकासाठी प्रसिद्ध आहे. सिंचनाचे स्रोत तयार झाल्याने केळीचे क्षेत्रही वाढले आहे. शिवारात विकास रामकृष्ण पाटील यांची पाच एकर शेती आहे. पूर्वी ते केळी, कापूस घ्यायचे. दुग्ध व्यवसायासाठी म्हशींचे संगोपनही केले. कापसाचे भरघोस उत्पादन ते अजूनही घेतात. परंतु व्यावसायिक पिकांमधील जोखीम, बाजारांतील समस्या लक्षात घेता पर्यायी पूरक उद्योगाच्या ते शोधात होते. तालुक्यातील सुनसगाव येथील मधुकर नारायण पाटील यांची रेशीम शेती पाहण्यात आली. त्याचे अर्थकारण फायदेशीर वाटले. निधी, जोखीम, बाजारपेठ, नफा, आवश्यक श्रम याबाबत सांगोपांग चर्चा झाली. अखेर या पूरक व्यवसायात उतरण्याचा निर्णय झाला.   रेशीम शेतीतील बाबी

  • शेत गावानजीक घरापासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे शेतातच लोखंडी रॉड, पत्रे व सिमेंटचा वापर करून मजबूत संगोपनगृह (शेड) उभारले. ५० बाय ३० फूट आकार, मध्यभागी १४ फूट उंची व डाव्या-उजव्या बाजूला ११ फूट जागा असे त्याचे स्वरूप आहे. ‘मनरेगा’कडून त्यास २ लाख ९२ हजार रुपयांचे अनुदान मिळाले. एकूण गुंतवणूक सुमारे साडेतीन लाख रुपयांची आहे.
  • तीनशे अंडीपुंजांची बॅच अशी शेडची क्षमता आहे. मात्र पाटील २५० अंडीपुंजांची बॅच घेतात.
  • उन्हाळ्यात तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. ते नियंत्रित करण्यासाठी शेडच्या छताखाली मजबूत सुती कापड लावले आहे. छतावर मिनी तुषार सिंचन संच आहेत. पाच मजली रॅक्स आहेत. रॅकचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी प्लॅस्टिकऐवजी कागदी पेपरचा उपयोग केला जातो.
  • रेशीम शेतीत मिळणारा नफा लक्षात घेता दुसऱ्या वर्षी अजून पहिल्यासारखेच म्हणजे त्या आकारमानाचे अजून एक संगोपनगृह उभारले. त्यासही अनुदानासाठी प्रयत्न सुरू आहेत.
  • कीटकाच्या बाल्यावस्थाही (चॉकी) घरीच तयार केल्या जातात. त्यासाठीची कुशलताही अनुभवातून प्राप्त केली आहे. त्यामुळे बाहेरून आणण्याचा खर्च वाचतो. सध्या रेशीम शेतीत चार वर्षांचा अनुभव तयार झाला आहे.
  • पाटील यांनी केळीची शेती चार वर्षांपूर्वीच थांबवली. आता संपूर्ण पाच एकरांत ते व्ही वन जातीच्या तुतीची लागवड करतात. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन एक रुपया प्रति स्टंप अशी विक्रीही
  • करतात. घरानजीक पाच एकर शेती भाडेतत्त्वावरही घेतली आहे. तेथे कापूस लागवड होते.
  • एकरी आठ क्विंटल उत्पादन ते घेतात.
  • उत्पादन व उत्पन्नात सरस  जिल्ह्यातील रेशीम शेतीत जामनेर तालुका आघाडीवर आहे. त्यामध्ये पाटील यांनी आघाडीचे व मोठे रेशीम कोष उत्पादक म्हणून नाव मिळवले आहे. कोष उत्पादकताही त्यांनी चांगली मिळवली आहे. प्रति २५० अंडीपुंजांमागे २०० किलो किंवा प्रति १०० अंडीपुंजांमागे ९० ते ९५ किलो उत्पादनही त्यांनी घेतले आहे. अंडीपुंज रेशीम विभागातर्फे अनुदानावर मिळतात. विक्री व्यवस्था रेशीम कोषांची विक्री जालना बाजारपेठेत केली जाते. पाटील यांचा सुमारे पाच ते सहा शेतकऱ्यांचा गट आहे. त्यामुळे सुमारे १० क्विंटलपर्यंत एकत्र कोष विक्रीसाठी पाठवणे सोपे होते. त्यासाठी दर महिन्याला चार हजार रुपये भाडे वाहतुकीसाठी लागते. ग्रेडनुसार दर मिळतात. पाटील सांगतात, की प्रति किलो किमान २५० रुपये दर मिळतात. उच्च गुणवत्तेमुळे कमाल दर ५३५ रुपयांपर्यंतही मिळाले आहेत. अलीकडेच दोन क्विंटल ३० किलो माल जालना येथे पाठवला. त्यास ४५५ रुपये दर मिळाला. या बाजारपेठेत पाटील यांनी आपली ओळखही तयार केली आहे. उत्पादन खर्च प्रति बॅच किमान १० हजार ते १५ हजार रुपये असतो.   संपूर्ण कुटुंबाचा राबता वर्षभरात दोन्ही शेड्‍समधून एकूण १२ पर्यंत बॅचेस घेण्याचा पाटील यांचा प्रयत्न असतो. साहजिकच मनुष्यबळ खूप लागते. मात्र विकास यांच्यासह पत्नी, मुलगा, स्नुषा हे सर्व जण राबतात. प्रसंगी आईदेखील हातभार लावते. त्यामुळे मजुरांवरील अवलंबित्व कमी केले आहे.त्यावरील खर्च वाचविला आहे. तुतीची शेती, खाद्य देणे, आरोग्य व्यवस्थापन, शेड स्वच्छता, निर्जंतुकीकरण आदी सर्व बाबतींत मेहनत, सांघिकी वृत्ती, नियोजन यांची आवश्यकता असते. त्यात सुसूत्रता ठेवल्यानेच पाटील कुटुंबीय रेशीम शेतीत यशस्वी ठरले आहेत.   शिकण्याची वृत्ती विकास यांचे वय पंचावन्नपेक्षा अधिक आहे. पन्नाशीनंतर त्यांनी पारंपरिक पिके त्यागून रेशीम शेतीची कास धरली. शिकण्याची, ज्ञान घेण्याची वृत्ती जोपासली. आजही उत्साहाने ते शेतीत कार्यरत असतात. नातेवाईक व परिचितांमध्ये रेशीम शेतीचा प्रचार करतात. त्यांच्या प्रेरणेतून जामनेर भागात दोन-तीन जणांनी रेशीम शेती सुरू केली आहे. मोबाईलवर बोलत असतानाच कीटकांना तुतीची पाने घालणे, संगोपनगृहातील कामे आवरणे सुरू असते. संपर्क- विकास पाटील, ९४२३५२८२०७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com