एसआरटी’ तंत्रामुळे भाताची एकरी पाच क्विंटल वाढ

पुणे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरू लागले आहे. मावळ (जि..पुणे) तालुक्यातील पुसाणे येथील विकास वाजे मागील पाच वर्षांपासून ‘एसआरटी’ (सगुणा राइस टेक्निक) तंत्रज्ञानाद्वारे यशस्वी भातशेती करीत आहेत.
विकास वाजे यांनी योग्य अंतरावर केलेली भात रोपांची लागवड.
विकास वाजे यांनी योग्य अंतरावर केलेली भात रोपांची लागवड.

पुणे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरू लागले आहे. मावळ (जि..पुणे) तालुक्यातील पुसाणे येथील विकास वाजे मागील पाच वर्षांपासून ‘एसआरटी’ (सगुणा राइस टेक्निक) तंत्रज्ञानाद्वारे यशस्वी भातशेती करीत आहेत. कौशल्यपूर्ण व्यवस्थापनातून मजुरी, वेळ व श्रम यात बचत करीत एकरी १७ ते १८ क्विंटल उत्पादन त्यांनी २२ ते २५ क्विंटलपर्यंत पोहोचवले आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका हा भाताचे आगार समजला जातो. येथील शेतकरी सुवासिक इंद्रायणी भाताचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतात. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे भातशेतीत मजुरांची टंचाई मोठ्या प्रमाणावर भासत आहे. चिखलणी, लावणी आदी कामेही खर्चिक व कष्टप्रद झाली आहेत. त्यामुळे कमी खर्चिक, कमी मजूरबळ व व कमी कष्टाचे तंत्र वापरण्याकडे त्यांचा ओढा आहे. रायगड जिल्ह्यातील मालेगाव- नेरळ (ता. कर्जत) येथील कृषिरत्न चंद्रशेखर भडसावळे यांनी भातशेतीत एसआरटी (सगुणा राइस टेक्निक) तंत्रज्ञान विकसित केले आहे. मावळ तालुक्यातील पुसाणे येथील विकास वाजे यांनी यू-ट्यूब चॅनेलवर त्याची माहिती पाहिली. कृषी पर्यवेक्षक नवीनचंद्र बोऱ्हाडे यांनी देखील त्यांना याबाबत मार्गदर्शन केले. त्यातून मग सुरू झाली वाजे यांची सुधारित तंत्राने भातशेती. एसआरटी पद्धतीचा वापर या पद्धतीत एकदा गादीवाफे बनविले की काही वर्षे काळजी नसते. भात पीक काढणीनंतर देखील त्याच वाफ्यावर अन्य पिके घेता येतात. वाजे गेली पाच वर्षांपासून या तंत्राने शेती करीत आहेत. यंदाचे हे त्यांचे सहावे वर्ष आहे. यांत्रिक साचा ‘एसआरटी’ तंत्रज्ञानाने लागवडीसाठी सर्वात महत्त्वाचे साहित्य म्हणजे यांत्रिक लोखंडी साचा होय. तो १०० सेंटिमीटर लांबी व ७५ सेंटिमीटरचा रुंदी असलेला आयताकृती आकाराचा असतो. खालील बाजूस प्रत्येकी २५ सेंटिमीटरवर एक अशा खालील बाजूस एका रेषेत चार अशा पाच भागांत मिळून २० लोखंडी निमुळत्या खुंट्या बसविलेल्या असतात. त्यांची उंची १३ सेंटिमीटर आहे. दोन व्यक्तींनी धरण्यासाठी ४५ सेंटिमीटर उंचीचा दांडा दोन्ही बाजूंनी असतो. हा साचा गादीवाफ्यावर ठेवायचा. एक इंच खोलीइतका त्यावर दाब द्यायचा. त्याद्वारे पडलेल्या छोट्या खड्ड्यात दाणे टाकायचे असतात. साचा बनविण्यासाठी दोन हजार ते अडीच हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. लागवडीतील महत्त्वाच्या बाबी

  • वाजे यांनी तंत्रज्ञान वापरायच्या वेळेसच शेणखत दिले होते. त्यानंतर पाच वर्षे ते शून्य मशागत पद्धतीचा वापर करीत आहेत.
  • बीबीएफ यंत्राच्या साह्याने १३६ सेंटिमीटरचे गादीवाफे बनवून घेतले आहेत. वाफ्याच्या माथ्यावरील अंतर १०० सेंटिमीटर ठेवतात.
  • यांत्रिक साच्याद्वारे गादीवाफ्यावर पाडलेल्या खोल खड्ड्यात भाताचे चार ते पाच दाणे व त्यासोबत १५- १५-१५ खत टाकून टोकणणी करतात.
  • त्यानंतर चोवीस तासांच्या आतमध्ये ऑक्सोफ्लोरफेन तणनाशकाची फवारणी करतात. त्यामुळे तण उगवणीचे प्रमाण खूप कमी होते.
  • टोकणणीनंतर पंचवीस दिवसांनी हलकी बेणणी करतात. युरिया- डीएपी ब्रिकेटच्या गोळ्या चार चुडांमध्ये खोचण्यात येतात. एकरी सुमारे ७० ब्रिकेट्‍स लागतात.
  • पारंपरिक लागवडीत शेतात हवा खेळती राहण्यास, अडचणी येतात. त्यामुळे रोग व किडींचे प्रमाण अधिक असते. एसआरटी पद्धतीत रोपांना वाढायला पुरेशी जागा असते. हवा खेळती राहते.
  • त्यामुळे रोग- किडींचे प्रमाण कमी राहते. त्यामुळे कीडनाशकांवरील दोन ते तीन हजार रुपयांच्या खर्चात बचत झाली आहे.
  • भात कापणी झाल्यानंतर चार ते पाच दिवसानंतर ग्लायफोसेट तणनाशकाची फवारणी करण्यात येते.
  • गादीवाफे न मोडता त्यावर गहू, कांदा, उन्हाळी भुईमूग आदी पिके घेतात. रब्बी हंगामातही
  • शून्य मशागत केल्याने त्या खर्चात बचत होत आहे.
  • जमिनीत गांडुळांची संख्या भरपूर झाली आहे. जमीन हाताला भुसभुशीत लागते.
  • सर्व पीक अवशेषांचा वापर पाला म्हणून पुन्हा शेतात करण्यात येतो.
  • खर्चात बचत पारंपरिक पद्धतीत नांगरट, चिखलणी, लावणी, फवारणी असा मोठा खर्च करावा लागतो. वाजे यांनी शून्य मशागतीतून नांगरणीवरील खर्चही वाचवला आहे. आई विमल, वडील श्‍यामकांत, पत्नी वैशाली असे कुटुंबातील सर्व सदस्य वाजे यांच्यासोबत राबतात. त्यातून मजूरबळ व त्यावरील खर्च मोठ्या प्रमाणात वाचविला आहे. बियाण्यांमध्येही बचत होत आहे. एकरी आठ ते दहा किलो बियाणे लागते. एकूण उत्पादनखर्च २० हजार ते २५ हजार रुपये होतो. उत्पादनात वाढ एसआरटी पद्धतीत वाजे यांना फुटव्यांची संख्याही ४५, ५५ ते साठपर्यंत मिळाली आहे. पूर्वी एकरी १७ ते १८ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळायचे. त्यात पाच ते सात क्विंटल वाढ होऊन ते २२ ते २५ क्विंटलपर्यंत पोहोचले आहे. उत्पन्न तांदूळ तयार करून त्याची थेट विक्री नेहमीच्या ग्राहकांना ४५ ते ५० रुपये प्रति किलो दराने केली जाते. झालेले अन्य फायदे

  • भात लागवडीसाठी रोपे तयार करणे, रोपे खणणे, पुर्नलागवडीची आवश्यकता नाही.
  • जमिनीचा पोत सुधारून सेंद्रिय कर्बात वाढ
  • ५० मजुरांचे काम १० ते १५ जणांमध्ये होते. मजुरीत बचत.
  • संपर्क- विकास वाजे, ९८२२६४६००९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com