सणांच्या हंगामात भाव खाणारी गाडे यांची झेंडूची शेती

कांजळे (ता. भोर, जि. पुणे) येथील विलास गाडे यांनी पंधरा वर्षांच्या सातत्यपूर्ण परिश्रमातून झेंडू फुलांची शेती यशस्वी केली आहे. दसरा, दिवाळी व मार्गशीर्ष अशा सलग येणाऱ्या हंगामांसाठी त्यांच्या फुलांना पुणे बाजार समितीत चांगली मागणी असते. बहुपीक पद्धती व थोड्या थोड्या क्षेत्रावरच लागवड यामुळे जोखीम कमी करून शेतीत आर्थिक स्थैर्य मिळवणे त्यांना शक्य झाले आहे.
विलास गाडे यांचे झेंडूचे पीक
विलास गाडे यांचे झेंडूचे पीक

कांजळे (ता. भोर, जि. पुणे) येथील विलास गाडे यांनी पंधरा वर्षांच्या सातत्यपूर्ण परिश्रमातून झेंडू फुलांची शेती यशस्वी केली आहे. दसरा, दिवाळी व मार्गशीर्ष अशा सलग येणाऱ्या हंगामांसाठी त्यांच्या फुलांना पुणे बाजार समितीत चांगली मागणी असते. बहुपीक पद्धती व थोड्या थोड्या क्षेत्रावरच लागवड यामुळे जोखीम कमी करून शेतीत आर्थिक स्थैर्य मिळवणे त्यांना शक्य झाले आहे. दिवाळीचा हंगाम नुकताच आटोपला आहे. गणपती उत्सव, दसरा व त्यानंतर दिवाळीपर्यंत फुलांना मागणी राहत असल्याने या संपूर्ण कालावधीत अनेक फूल उत्पादक आपल्या शेतीत लागवडीचे नियोजन करीत असतात. पुणे जिल्ह्यात कांजळे (ता. भोर) येथील विलास गाडे हे त्यापैकीच एक शेतकरी आहेत. यंदा उत्तम नियोजनातून त्यांनी ३० गुंठ्यांतील झेंडूतून सुमारे तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले. सलग १५ वर्षांपासून ते हे पीक घेत आहेत. मालाचा उठाव झाला नाही अशी वेळ एकदाही त्यांच्यावर आली नाही. प्रत्येक हंगामात झेंडूला प्रति किलो सरासरी ५० रुपये दर मिळत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. असे आहे लागवडीचे नियोजन गाडे सांगतात, की आमची पारंपरिक अडीच एकर शेती आहे. बहुपीक पद्धतीतून आम्ही आर्थिक स्थैर्य निर्माण केले आहे. या पद्धतीत एका पिकात झालेले नुकसान दुसऱ्या पिकातून भरून काढता येते.त्या दृष्टीने थोड्या थोड्या क्षेत्रात विविध पिके घेतो. प्रामुख्याने दसरा आणि दिवाळीसाठी नियोजन करून दरवर्षी ३० गुंठे क्षेत्र व त्याची बाजारपेठेशी सांगड घातली तर नुकसान होण्याचा धोका कमी होतो.साधारण ऑक्टोबरमध्ये दसऱ्याच्या दोन दिवस आधी फुले तोडणीला येतील या अंदाजाने ऑगस्टमध्ये लागवड असते. मशागतीवेळी शेणखताचा वापर केला जातो. प्रत्येकी दोन तोड्यानंतर प्रवाही पद्धतीने पाणी आणि खते दिली जातात. एका आठवड्यात दोन वेळा तोडणी होते. अशाप्रकारे काढणीला प्रारंभ झाल्यानंतरच्या पुढील तीन महिने १२ ते १५ तोडण्या होतात. विक्रीचे नियोजन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची फुलांची बाजारपेठ नजीक असल्याचा फायदा होत असल्याचे गाडे सांगतात. ते म्हणतात, की दसरा- दिवाळीसाठी येथे राज्याच्या विविध भागांसह बहुतांश वेळा कर्नाटक राज्यातून देखील झेंडूची आवक होते. या वेळी एकेका तासाला आवकेवर दर कमी जास्त होत असतात. आवक कमी होऊ लागली की मध्यस्थ आम्हाला फोनद्वारे संपर्क करून फुले आणण्यासंबंधी सांगतात. त्याचा फायदा होतो. या वर्षी दसऱ्यावेळी ४०० किलो फुलांची विक्री झाली. काही मालाला किलोला २०० रुपये दर मिळाला. लक्ष्मीपूजनाला १२ क्विंटल विक्री, तर ९० रुपये दर मिळाला. पाडव्याला २६० किलो फुलांची विक्री २० रुपये दराने झाली. काही व्यापाऱ्यांनी शेतावरच २०० रुपये प्रति किलो दराने ५०० किलोपर्यंत खरेदी केली. ५०० किलो फुलांची परिसरातील कंपन्यांना हातविक्री केली. आता दिवाळीनंतर मार्गशीर्ष महिन्यात मागणी वाढल्यानंतर एक टनापर्यंत विक्रीचे नियोजन आहे. या काळात किलोला सरासरी ५० रुपये दर मिळतो असा अनुभव आहे. सुमारे ३० गुंठ्यांत एकूण खर्च सुमारे २४ हजार रुपयांपर्यंत होतो. साधारण एकूण १२ तोड्यांमधून सुमारे आठ टनांपर्यंत उत्पादन मिळते. काढणीसाठी कुटुंबीयांची साथ गाडे म्हणाले, की फूल काढणीसाठी माझ्यासह आई, पत्नी, मुलगा आणि गरज पडली तर एखादा कामगार घेतो. त्यामुळे मजुरीवर फार खर्च होत नाही. उत्पन्नात वाढ होते. ऐन नवरात्रीत पाऊस झाल्याने पहिल्याच तोड्याची फुले भिजल्याने वजन वाढले. त्यामुळे झाडे पडू नयेत यासाठी फुले काढून टाकावी लागली. पुढील तोडणीला मात्र चांगली फुले मिळाली. शेवगा, ॲस्टर लागवड फुलशेतीतील परागीभवनाचा फायदा शेवग्याला होतो असे वाचनात आले होते. त्यामुळे यंदा २० गुंठ्यांवर शेवग्याची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे बहुपीक पद्धतीमध्ये आणखी एका पिकाची वाढ झाली आहे. यंदा प्रथमच २० गुंठ्यांत ॲस्टर लागवडीचे नियोजनही प्रथमच केले आहे. झेंडू व्यतिरिक्त वांगी व टोमॅटो प्रत्येकी १० गुंठे, तर भाताची दीड एकरात लागवड आहे. रब्बी हंगामात भुईमूग आणि कोथिंबीरीचे पीक घेतले जाते. आठवडी बाजारातच या मालाची विक्री होते. त्यामुळे दर चांगले मिळतात. संपर्क- विकास गाडे- ७०६६६५३१२८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com