पिंपळगावकरांनी भाजीपाला शेतीतून साधली उन्नती

आमच्या गावात पारंपरिक भाजीपाला शेती होतीच. परंतु नव्या पिढीने ढोबळी मिरची, फुलशेतीतही चांगले उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. ठिबक, मल्चिंग, सौर पॅनेल, शेततळे अशी आधुनिकता आणली आहे. धाडसाने केलेले प्रयोग यशस्वी होत आहेत. गावाला भाजीपाला व फुलशेतीतून काही लाख रुपयांचे उत्पन्न मिळू लागले आहे. शेतीत वेगवेगळे प्रयोग करताना सर्व जण विचार विनिमय करतो. त्यामुळे जोखीम कमी होऊन सर्वांना आत्मविश्‍वास येतो व यश हाती येते. -उद्धव घोळवे, प्रगतीशील शेतकरी, पिंपळगाव
भाजीपाला तसेच फूलशेतीतून पिंपळगावातील शेतकऱ्यांनी अर्थकारण उंचावले आहे.
भाजीपाला तसेच फूलशेतीतून पिंपळगावातील शेतकऱ्यांनी अर्थकारण उंचावले आहे.

 बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य मार्गापासून आतमध्ये तीन किलोमीटर अंतरावर असलेले पिंपळगाव भाजीपाला पिकांतील प्रसिद्ध गाव आहे. मागील अनेक वर्षांपासून गावातील शेतकरी भाजीपाला पिकांच्या शेतीत टिकून असून, या पिकांत त्यांनी हुकूमत तयार केली आहे. अलीकडील काळात गावातील नव्या पिढीने आधुनिक तंत्राचा वापर करून भाजीपाला पिकांतून अर्थकारण वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. विविध बाजारपेठा मिळवल्या आहेत. जोडीला फुलशेतीही सुरू केली आहे.     सामाजिक एकोप्याचे व आध्यात्मिक गाव 

बीड जिल्ह्यात केज तालुक्यातील पिंपळगाव हे साडेतीनशे ते चारशे उंबरठ्याचे गाव आहे. आध्यात्मिक आणि धार्मिक वृत्तीच्या असलेल्या गावात सामाजिक एकोपा तर आहेच, शिवाय एकमेकांना साह्य करण्याची वृत्ती ही गावाची जमेची बाजू आहे. भैरवनाथ हे ग्रामदैवत असलेल्या गावात भैरवनाथाचे वर्षभरात चार विविध उत्सव तर होतातच. शिवाय हनुमान जयंती सप्ताह, रामकृष्ण महाराज हरिनाम जप सप्ताह, महादेव मंदिराचा सप्ताह, माने बाबांचा सप्ताह आणि दिंडी असे वर्षभर भरगच्च धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रम गावात सतत सुरू असतात.  गावाला आर्थिक बळकटी  गावातील साधारण लहान - मोठ्या मिळून सुमारे ७० ते ८० शेतकऱ्यांच्या मळ्यांत फ्लॉवर, कोबी, वांगे, टोमॅटो, ढोबळी मिरची, लांब मिरची, पालक अशी पिके बहरात असतात. पूर्वी सिंचनाचे मोठे साधन नसले तरी विहिरींच्या पाण्यावर भाजीपाला शेती केली जाई. गावातील नव्या पिढीनेही आधुनिकतेची कास धरीत गावाचा हा पारंपरिक व्यवसाय पुढे नेत आर्थिक उन्नती साधली आहे. गावातून दररोज किमान विविध भाजीपाला पिकांचे काही टनांपर्यंत उत्पादन होते. भाजीपाला शेतीत नेहमी गुंतून राहावे लागत असल्याने विनाकारण गप्पा वा अनावश्‍यक वेळ दवडण्याची संधीच तयार होत नाही. साहजिकच ग्रामस्थांचे मानसिक समाधान टिकून राहून शांतीही नांदते. अलीकडे भाजीपाला शेतीला फुलशेतीची जोड मिळाली आहे. यातून गावाच्या तिजोरीत काही लाख रुपयांची भर पडण्याची संधी उपलब्ध झाली आहे.  सर्व बाजारपेठांमध्ये शेतीमालाचा डंका  लातूर, बीड, परभणी, अंबाजोगाई या बाजारपेठांसह नवी दिल्ली, नवी मुंबई, राजस्थानच्या श्रीहरी कोटा, पश्‍चिम बंगाल आदी ठिकाणच्या बाजारपेठांतही पिंपळगावच्या शेतीमालाने आपला डंका वाजविला आहे.  चांगल्या प्रतीचा भाजीपाला उत्पादित होत असल्याने शेतकऱ्यांना तो बाजारात जाऊन विकण्याची गरज भासत नाही. उलट व्यापारीच पिंपळगावच्या बांधावर येऊन माल घेऊन जातात.  दुष्काळापुढे शेतकरी हरले नाहीत  गावाच्या शिवेलाच दक्षिणेकडे सांगवीला साठवण तलाव झाला आहे. पूर्वीच्या विहिरींना अलीकडे विंधन विहिरींची जोड भेटली आहे. कोणी शासकीय योजनेतून तर कोणी स्वखर्चाने शेततलाव बनविले आहेत. मागील वर्षी तीव्र दुष्काळामुळे मार्च महिन्यापासून जलस्रोत कोरडे पडले. त्यामुळे बहरात आलेले झेंडू, टरबूज (कलिंगड), मिरची, फ्लॉवर, कोबीचे मळे सुकू लागले. मात्र शेतकऱ्यांनी हार मानली नाही. टँकरद्वारे पाणी पुरवून त्यांनी शेती बहरात आणली. अगदी सरत्या उन्हाळ्यातही पिंपळगावच्या शिवारातील टरबूज आणि टोमॅटो दिल्ली आणि श्रीहरिकोटा या बाजारांत निर्यात झाले.  प्रयोगाचा छंद गप्प बसू देत नाही  गावातील उद्धव घोळवे, सुभाष गायकवाड, सहदेव घोळवे, ज्ञानोबा गायकवाड, केशव घोळवे आदी मंडळी म्हणजे भाजीपाला पिकांत तरबेज झालेले आहेत. मेहनत, बाजारपेठांचा अभ्यास, कुशल व्यवस्थापन याद्वारे या पिकांमधून उत्पादन चांगले घेत चांगली उलाढाल करण्यात ते वाकबगार झाले आहेत. या शेतकऱ्यांपैकी उद्धव घोळवे हे गावाच्या जवळच असलेल्या सारणीत माध्यमिक शिक्षक म्हणून नोकरी करतात. चांगले वेतन मिळत असले तरी त्यांना शेतीचा छंद त्यांना गप्प बसू देत नाही. दररोज सकाळ- संध्याकाळच्या वेळेत ते शेतीत व्यस्त असतात.  ढोबळी मिरचीची शेती  पूर्वी ढोबळी मिरचीची शेती प्रामुख्याने पश्‍चिम महाराष्ट्रात व तीही पॉलिहाउस, शेडनेटमध्ये होई. परंतु  खुल्या शेतीत हे पीक यशस्वी करण्याचा प्रयत्न चार वर्षांपूर्वी उद्धव घोळवे यांनी केला. आता गावातील अनेक शेतकरी त्या वाटेवरून जात आहेत. सध्या साधारण १२ ते १५ एकरांवर य मिरचीची शेती असावी.  पाणी- वीजटंचाईवर शोधले पर्याय  परिसरात साठवण तलाव असला तरी पर्जन्यमानामुळे तलाव भरेलच अशी शाश्वती नाही. त्यातच तलाव भरला तरी पाणी घेण्यावर मर्यादा आहेत. काहींनी दूरवरून पाइपलाइनद्वारे पाणी आणले आहे. तरीही शेतकऱ्यांनी शेततळ्यांच्या माध्यमातून मार्ग शोधला आहे. त्यात पारंपरिक पाट पद्धतीने पाणी देऊन पाण्याची नासाडी टाळण्यासाठी ठिबक सिंचन पद्धत शेतकऱ्यांनी अवलंबिली आहे. वीजपुरवठा तसा बेभरवशाचा असल्याने काही शेतकऱ्यांनी सौर पॅनेलचा पर्यायही अवलंबिला आहे.    संपर्क- उद्धव घोळवे- ९४२०८७४४५५, ९८३४५४०६२०   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com