‘शेतकरी प्रथम’ प्रकल्पातून उत्पादन, उत्पन्नवाढीला चालना 

प्रकल्पात तूर व बाजरी उत्पादन तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके यशस्वीरीत्या घेतली. डाळिंबासाठी मार्गदर्शन मिळाल्याने उत्पादनात वाढ झाली. शेततळ्यात मत्स्यपालन केल्याने उत्पन्नात भर पडली. -मारुती गिते, चिंचविहिरे संपर्क- ९२७३०७७४८४
 चिंचविहीरे- मारुती गीते यांनी प्रकल्पांतर्गत घेतलेले बाजरीचे उत्पादन
चिंचविहीरे- मारुती गीते यांनी प्रकल्पांतर्गत घेतलेले बाजरीचे उत्पादन

राहुरी (जि. नगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कणगर व चिंचविहीरे या गावांत ‘शेतकरी प्रथम’ हा देशपातळीवरील प्रकल्प राबवला जात आहे. एकात्मिक शेती पध्दतीने तृणधान्य, कडधान्य, डाळिंब उत्पादन तंत्रज्ञान, पूरक, प्रक्रिया व्यवसायांबाबत मार्गदर्शनाबरोबर प्रात्यक्षिक करण्यात येत आहेत. त्यातून पीक उत्पादनात वाढ होण्याबरोबरच उत्पन्नात वाढ करणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे.  नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे देशभरातील राज्यांत ५२ केंद्रांमध्ये ‘शेतकरी प्रथम’ (फार्मर फर्स्ट) हा प्रकल्प राबवला जात आहे. महाराष्ट्रात राहुरी (जि. नगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे त्या अंतर्गत एकमेव केंद्र आहे. शेतकरी केंद्रबिंदू ठेवून शेतीतील उपक्रम, उपलब्ध साधनसामग्री, विज्ञान- तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकरी सक्षम करण्यासाठीची प्रात्यक्षिके त्या अंतर्गत राबविण्यात येत आहेत. कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथ, विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख व माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाद्वारे साडेसातशे शेतकरी सक्षम झाले आहेत.  प्रकल्पाची कार्यपध्दती 

  • राहुरी तालुक्यातील कणगर येथील २०० तर चिंचविहीरे येथील ७५० गावांतील शेतकरी यात सहभागी. 
  • या भागात वार्षिक सरासरी ५०० मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस. 
  • गावनिवडीत ग्रामीण मूल्यांकन. यात ग्रामस्थांसोबत चर्चा, रेखांकित नकाशा, सोई-सुविधा, महत्त्वाची स्थळे, राहणीमान, जमीनधारणा, शिक्षण, पीक पध्दती, पशुघटक आदी बाबींचे सर्वेक्षण. 
  • त्या आधारे विद्यापीठाकडून एकात्मिक शेती पध्दती मॉडेलचा अवलंब. 
  • तंत्रज्ञान प्रसार 
  • ज्वारी 
  • सन २०१७-१८ मध्ये दोनशे एकरांवर रब्बी ज्वारी तंत्रज्ञान वापर. यात मूलस्थानी जल व्यवस्थापन, जमिनीच्या प्रकारानुसार वाणांचा वापर, आंतरमशागत, अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पीक संरक्षण या पंत्रसूत्रीचा वापर. 
  • विद्यापीठाने विकसित केलेल्या फुले वसुधा, फुले सुचित्रा, फुले अनुराधा व फुले रेवती या वाणांचा वापर. 
  • मिळालेले उत्पादन 
  • प्रतिहेक्टरी १८.३० क्विंटल धान्य, ४५.९ क्विंटल कडबा. 
  • त्याआधी हेच हेक्टरी उत्पादन १० ते ११ क्विंटलपर्यंत मिळायचे. 
  • अन्य तंत्रज्ञान 

  • बाजरीच्या लोहाचे अधिक प्रमाण असणारे धनशक्ती तसेच आदिशक्ती वाणांची प्रात्यक्षिके सुमारे ५० एकरांवर. 
  • ५० एकरांवर तुरीच्या बीडीएन-७११ वाणाचे प्रात्यक्षिक. त्यातून सरासरी प्रतिहेक्टर २० क्विंटल उत्पादन. 
  • मागीलवर्षी हरभराच्या दिग्विजय वाणाची ६७ एकरांत क्षेत्रावर प्रात्यक्षिके. हेक्टरी २१.५० क्विंटल उत्पादन. पूर्वीपेक्षा दीडपटीने वाढ. 
  • भगवा डाळिंबात ५० शेतकऱ्यांकडून जीवाणूखतांचा वापर. 
  • त्यातून उत्तम प्रतीचे उत्पादन. सरासरी एकरी ७.८ टन उत्पादन. पूर्वीचे उत्पादन ५ टन. 
  • शेततळ्यातील मत्स्यपालन  चिंचविहिरे आणि कणगर गावांत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानअंतर्गत सुमारे १२५ शेततळी आहेत. गेल्यावर्षी चाळीस शेतकऱ्यांनी शेततळ्यात रोहू आणि सायप्रनस या माशांची ६००० मत्स्यबीजे सोडली. अकरा महिन्यांच्या कालावधीनंतर माशांची वाढ पुरेशी झाली आहे. प्रत्येक शेततळ्यात किमान पाचशे किलो मासे विक्रीतून सुमारे ४० ते ५० हजार रुपयांचे तर दोन्ही गावांत मिळून काही लाख रुपये उत्पन्न मिळेल.  परसबागेतील कुक्कुटपालन  दोन्ही गावांत भूमिहिन मजूर, महिला व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी परसबागेतील कुक्कुटपालन उपक्रम राबविण्यात आला. त्यांना ५० ग्रामप्रिया जातीची पिल्ले देण्यात आली. हे पक्षी वर्षभरात १८० अंडी उत्पादित करतात. त्यातून प्रतिकुटुंबाला चांगल्या उत्पन्नाची हमी तयार झाली.  ठळक बाबी 

  • तीनशे शेतकऱ्यांकडील माती तर १०० शेतकऱ्यांकडील पाणी तपासणी. त्यांना मृद आरोग्य पत्रिका देण्यात आल्या. 
  • ज्ञान आणि कौशल्य आधारित बहुतांश प्रशिक्षण कार्यक्रम गावातच आयोजित. 
  • दोन्ही गावांतील २०० शेतकऱ्यांना हिवरे बाजार, राळेगण सिध्दी, कृषी विज्ञान केंद्र, बारामती, नाशिक येथील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी, विविध कृषी प्रदर्शन अशा भेटी. 
  • हैदराबाद येथील कार्यशाळेत ४ शेतकऱ्यांकडून अनुभव कथन 
  • यांत्रिकीकरणामध्ये वैभव विळा, सायकल कोळपे, सारा यंत्र आदींचा वापर वाढवला. 
  • ३४० शेतकऱ्यांना विविध अवजारे दिली. 
  • फुले जयवंत व फुले गुणवंत या चारा पिकांची १५० हेक्टर क्षेत्रावर प्रात्यक्षिके 
  • दोन्ही गावांतील दोन महिला बचत गटांना मिनी डाळ मिल. 
  • शेतकऱ्यांचा व्हॉटस ॲप ग्रुप. याद्वारे शास्त्रज्ञ- शेतकरी सुसंवाद वाढला. 
  • शेतकरी म्हणतात....  गावातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. डाळिंब, शेळीपालन, दुग्धव्यवसाय वाढीसाठी फायदा झाला.  भास्कर वरघुडे, कणगर  संपर्क- ९०११६३७०६४  परसबागेतील कुक्कुटपालनाविषयी तांत्रिक माहिती मिळाली. ग्रामप्रिया कोंबड्याचे व्यवस्थापन,  लसीकरण, खाद्य याबाबत मार्गदर्शन झाले. या व्यवसायातून शाश्वत उत्पन्न घेण्याची दिशा मिळाली.  -श्रीमती गुलाब नजमा पठाण, चिंचविहिरे  ‘प्रथम शेतकरी’ उपक्रमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.  -डॉ. पंडीत खर्डे, प्रमुख समन्वयक, शेतकरी प्रथम प्रकल्प  संपर्क- ८२७५०३३८२२   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com