अनेक वर्षांपासून जपली आले उत्पादकता अन् गुणवत्ता

आले पिकातील दरांत दरवर्षी चढउतार होते. मात्र शेंद्रे (जि.. सातारा) येथील विनोद पाटीलयांचे पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ या पिकात सातत्य आहे. ऊस, सोयाबीन, हिरवळीची खते, जमिनीला विश्रांती याद्वारे फेरपालट व मिरचीचे आंतरपीक या वैशिष्ट्यांमधून त्यांनी एकरी उत्पादकता व गुणवत्ता जपली आहे.
विनोद पाटील यांनी आले पिकात उल्लेखनीय व्यवस्थापनाचा आदर्श उभारला आहे.
विनोद पाटील यांनी आले पिकात उल्लेखनीय व्यवस्थापनाचा आदर्श उभारला आहे.

आले पिकातील दरांत दरवर्षी चढउतार होते. मात्र शेंद्रे (जि.. सातारा) येथील विनोद पाटील यांचे पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ या पिकात सातत्य आहे. ऊस, सोयाबीन, हिरवळीची खते, जमिनीला विश्रांती याद्वारे फेरपालट व मिरचीचे आंतरपीक या वैशिष्ट्यांमधून त्यांनी एकरी उत्पादकता व गुणवत्ता जपली आहे.   सातारा जिल्ह्यात ऊस, हळद या नगदी पिकांबरोबर आले पिकाचेही मोठे क्षेत्र आहे. राज्यभर सातारी आले प्रसिद्ध आहे. पाच- सहा वर्षांपूर्वी आल्याचे दर तेजीत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी चांगल्या उत्पन्नाची भरारी मारली. प्रत्येकवर्षी क्षेत्र वाढत गेले. उत्पन्न जास्त मिळतेय असे वाटून शेतकऱ्यांनी भांडवलही अधिक गुंतवले. मात्र अलीकडील वर्षांत दरात कमालीचे चढउतार होत आहेत. सध्या प्रति गाडीस (५०० किलो) पाच हजारांपर्यंत दर घसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. लॉकडाउनच्या दोन वर्षांच्या काळात बाजारपेठ विस्कटली आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेंद्रे (ता. जि. सातारा) येथील विनोद बजरंग पाटील यांनी अत्यंत नियोजनपूर्वक आल्याची शेती टिकवून योग्य अर्थार्जन साधले आहे. वाणिज्य शाखेचे पदवीधर विनोद यांनी नोकरीपेक्षा शेतीचीच आवड जपली. त्यांची पाच एकर शेती आहे. ऊस, ज्वारी, गहू, सोयाबीन यांच्यासह किमान एक एकरांत आल्याचे पीक ते सुमारे पंधरा वर्षांहून अधिक काळ घेत आहेत. पद्धतशीर पीक नियोजन

  • विनोद यांना आले पिकातील अनुभव सुमारे २००१ पासून. प्रयोगशील शेतकऱ्यांकडे भेटी, वाचन व अभ्यास याद्वारे व्यवस्थापनात सुधारणा केल्या.
  • रासायनिक खतांचा वापर व त्यावरील खर्चात बचत करण्याला प्राधान्य दिले.
  • दरांत दरवर्षी चढ-उतार होत असल्याने तोटा टाळण्यासाठी बाजारपेठेतील मागणी पाहून आंतरपिकांची जोड. मिरची हे आंतरपीक दरवर्षी.
  • आले पिकाला पाणी जास्त चालत नसल्याने पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करतात.
  • त्यासाठी सबसरफेस ठिबक सिंचनाचा पाच वर्षांपासून वापर.
  • साखर कारखाना नजीक आहे. तेथून प्रेसमड आणून दरवर्षी एकरी १५ ते २० टन याप्रमाणे वापर.
  • त्यातील ७० टक्के डोस नांगरटीनंतर व उर्वरित डोस बेड तयार केल्यानंतर.
  • कोंबडी खताचाही गरजेनुसार वापर.
  • दर दोन ते तीन वर्षांनी बियाणे बदलावर भर. ज्या शेतकऱ्यांकडील बियाणे घेणार त्यांच्या प्लॅाटला ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन निरिक्षण.
  • निरोगी सुदृढ बियाण्याची निवड. लागवडीपूर्वी दीड महिना (मार्च) बियाणे खरेदी करून योग्य साठवण.
  • १५ मे ते १५ जून दरम्यान लागवड. तापमान पाहून तारखांचे नियोजन. ३४ सें.च्या आत तापमान असताना व चार फुटी बेडवर १० बाय १० इंच अंतरावर २५ ते ३० हजार कंदांची लागवड. कंदाचे वजन साधारणपणे ४० ते ५० ग्रॅम. एकरी सुमारे एक टन बेण्याचा वापर.
  • चांगली उगवण, कंदकूज व कंदमाशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रासायनिक बेणेप्रक्रिया.
  • यात १०० लिटर पाण्यात कार्बेनडाझीम व क्लोरपायरिफॉस प्रत्येकी १०० मिलि असा वापर.
  • जैविक प्रक्रियेत ट्रायकोडर्मा, स्युडोमोनास एकरी तीन ते चार लिटर ठिबकद्वारे.
  • पावसाळ्यात. त्यानंतर दीड महिन्याच्या अंतराने दोन डोसेस.
  • दोन वेळा भर लावली जाते.
  • विद्राव्य खतांचा गरजेनुसार वापर.
  • फेरपालटीचे तंत्र विनोद फेरपालट करण्याला सर्वोच्च महत्त्व देतात. एका क्षेत्रात पाच वर्षांनी आले घेतले जाते. यासाठी वापरले जाणारे तंत्र म्हणजे आले काढणीनंतर त्या जमिनीत ऊस घेतात. त्यानंतर खोडवा घेतात. त्यानंतर सोयाबीनचे पीक घेतात. त्यानंतर ज्वारी, त्यानंतर उन्हाळ्यात जमिनीला विश्रांती किंवा सोयाबीन, मग ऑक्टोबरच्या दरम्यान तागासारखे हिरवळीचे पीक, ते फेब्रुवारीच्या दरम्यान जमिनीत गाडणे, जमिनीला विश्रांती व मग मेमध्ये आले अशी पद्धती असते. मिरचीचे आंतरपीक विविध समस्यांमुळे आले उत्पादनात अडचणी येऊ शकतात. अशावेळी मिरचीसारखे आंतरपीक साथ देते. आल्याची लागवड मेमध्ये, तर मिरची १५ ऑगस्टच्या दरम्यान लावली जाते. ती मार्चपर्यंत चालते. तिचे एकरी २० ते ३० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. किलोला १० ते १५ रुपये दर मिळाला तरी ३० हजार ते ४५ हजार रुपये उत्पन्न मिळते. त्यातून आल्याचा उत्पादन खर्च कमी केला जातो. अलीकडील वर्षांत १५ रुपयांपुढेच दर राहिल्याचे विनोद सांगतात. जानेवारीनंतर मिरचीचे उत्पादन कमी मिळू लागते. अशावेळी बेडवर जानेवारीत ७० दिवस कालावधीचे कलिंगड किंवा काकडीही घेतल्याचा प्रयोग केला आहे. म्हणजे आले, मिरची व अन्य उन्हाळी पीक अशी तिहेरी पद्धत फायदेशीर ठरली आहे. आले उत्पादन

  • पूर्वी एकरी दहा ते १५ टन, अलीकडील वर्षात एकरी २० ते २५ टन.
  • (हवामान, खोडवा ठेवण्याच्या कालावधीवर अवलंबून)
  • एकरी खर्च लागवडीपासून ते काढणीपर्यंत दीड लाख रुपयांपर्यंत.
  • गेल्या वर्षी २५ ते ३० रुपये प्रति किलोप्रमाणे स्थानिक व्यापाऱ्यांना विक्री.
  • दर- प्रति गाडी (५०० किलोची)-
  • सन २०१३- ६० हजार रू. (प्रति किलो १२० रु.)
  • २०१५- ३८ हजार रु.
  • २०१९- ४० हजार रु.
  • २०२०- १४, ५०० रु.
  • यंदा- ५००० रु. (प्रति किलो १० रु.)
  • प्रतिक्रिया  दरांत चढ-उतार कायमच सुरू असतात. ते आपल्या हाती नाहीत. पण एखाद्या पिकातील सातत्य व दर्जेदार उत्पादन मात्र आपल्या हाती असते. -विनोद पाटील, ९८६०३५६१९०  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com