वाशीम बाजारपेठेत डंका मापारी यांच्या दर्जेदार भेंडीचा, दोन हंगामात भेंडीचे सुयोग्य नियोजन 

भेंडीची तोडणी करताना मापारी कुटुंबीय.
भेंडीची तोडणी करताना मापारी कुटुंबीय.

वाशीम जिल्ह्यातील सोमठाणा येथील विश्वनाथ मापारी दहा वर्षांपासून भेंडीची शेती करतात. वर्षांतील दोन हंगामात ही भेंडी पिकवून त्यापासून चांगले उत्पन्न ते घेतात. त्यात कमी कालावधीची विविध पालेभाज्यांची आंतरपिके घेत भेंडीचा उत्पादन खर्च ते कमी करतात. वाशीम येथील व्यापाऱ्यांना दररोज मापारी यांच्या भेंडीची प्रतीक्षा असते. यावरून त्यांच्या भेंडीची गुणवत्ता आणि लोकप्रियता लक्षात येते.    वाशीम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील सोमठाणा हे सुमारे एक हजार लोकवस्तीचे गाव आहे. गावाचे अर्थकारण जवळपास शेतीवर अवलंबून आहे. हंगामी स्वरूपाची सिंचनाची व्यवस्था असलेले शेतकरी भाजीपाला पिके घेतात. मालेगाव, वाशीम या बाजारपेठा त्यांना हक्काच्या आहेत.  वर्षभर भेंडीशेतीचे नियोजन 

  • मापारी कुटुंबाची १२ एकर शेती आहे. सोयाबीन, हरभरा ही हंगामी पिके त्यांच्याकडे असतातच. 
  • मात्र, भेंडी हे त्यांचे महत्त्वाचे नगदी पीक आहे. याच पिकाने त्यांचे अर्थकारण मजबूत करण्यास मदत केली आहे. असे राहते भेंडीचे नियोजन 
  • दरवर्षी सुमारे पाच एकरांत भेंडी 
  • एप्रिलमध्ये लागवड- ऑगस्टदरम्यान काढणी 
  • दुसरी लागवड- नोव्हेंबर- डिसेंबर- काढणी मार्च दरम्यान 
  • या दोन्ही हंगामांचा कालावधी कमी झाल्यासच तिसरा हंगाम घेण्याचा प्रयत्न 
  • एका हंगामात चांगले दर न मिळाल्यास दुसऱ्या हंगामातून भरून निघण्याची संधी 
  • अशा रितीने वर्षभर भेंडी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध 
  • विश्‍वनाथ, पत्नी, बंधू व त्यांची पत्नी असे चौघेही शेतात राबतात. 
  • साहजिकच दररोज भेंडी तोडणे आणि एकाने माल बाजारात विक्रीसाठी नेणे हे दैनंदिन कामाचे स्वरूप निश्चित झाले आहे. 
  • सहा माणसे तोडणीस असल्यास दररोज एक क्विंटल भेंडी बाजारात नेणे शक्य. 
  • भेंडी तोडताना त्याचे सूक्ष्म काटे बोटांना टोचतात. यासाठी हातमोज्यांचा वापर केला जातो. 
  • उत्पादन 

  • एप्रिल लागवडीच्या भेंडीचे एकरी सुमारे पाच टनांपर्यंत तर नोव्हेंबर लागवडीच्या भेंडीचे अडीच ते तीन टनांपर्यंत 
  • दर- प्रतिकिलो- किमान २० रुपये, कमाल ७० रुपये. 
  • सरासरी दर- २५ ते ४० रु. 
  • आंतरपिके भरून काढतात उत्पादन खर्च  भेंडीत पहिल्या ४५ दिवसांपर्यंत कोथिंबीर, चूका, शेपू, मेथी अशा कमी कालावधीच्या पालेभाज्यांचे आंतरपीक घेतले जाते. भेंडी वरंब्यावर असते. एका एकरांत साधारण पाच किलो शेपू, पाच किलो कोथिंबीर तसेच मधल्या भागात मुळा, बीट असे प्रकारही असतात. ही पिके भेंडीचा ५० टक्के खर्च कमी करतात. काही वेळा कोथिंबिरीला किलोला २०० रुपये कमाल दरही घेतला आहे. भेंडी सुरू होण्यापूर्वीच त्याद्वारे उत्पन्न हाती येते.  भेंडीत कष्टही फार  भेंडीची दररोज पहाटे तोडणी करावी लागते. गावापासून वाशीम बाजारपेठ १५ किलोमीटरवर आहे. वाहतुकीसाठी दुसऱ्यांवर अवलंबून बसण्यापेक्षा स्वतःचीच पिकअप व्हॅन विश्‍वनाथ यांनी घेतली आहे. तोडणीनंतर माल लोड करणे, स्वतः गाडी चालवून तो वाहून नेणे, बाजारपेठेत अनलोड करणे असे दररोजचे कष्ट असतात.  मापारी यांच्या भेंडीची प्रतीक्षा  गुणवत्तापूर्ण व ताजी भेंडी असल्याने व्यापाऱ्यांमध्ये मापारी यांच्या भेंडची ओळख तयार झाली आहे.  आपल्या भेंडीची व्यापारी किमान अर्धा तास वाट पाहात बसलेले असतात. आपल्या भेंडीला अन्य भेंडीपेक्षा किलोमागे पाच ते दहा रुपये दर जास्त मिळतो, असे विश्‍वनाथ यांनी सांगितले.  सर्वाधिक दर केव्हा?  वर्षात मे, जून, जुलै या महिन्यांमध्ये भेंडीला चांगले दर मिळत असल्याचा विश्‍वनाथ यांचा अनुभव आहे. हिवाळ्यामुळे जानेवारी, फेब्रुवारीतही माल अधिक निघत नसल्यानेही या काळात भेंडीचा दर वधारलेला राहतो. भेंडीला वर्षभरात कधीच फार पडलेले दर मिळत नाहीत असे ते म्हणाले.  विशेष नियोजनातील बाबी 

  • दरवर्षी चार ते पाच ट्रॉली शेणखताचा दरवर्षी वापर. घरची जनावरे असल्याने ही गरज पूर्ण होते. 
  • या खताच्या जोरावरच गुणवत्ता मिळते. 
  • भेंडीला सुरवातीला रासायनिक खते दिली तर केवळ शाकीय वाढ होते. त्यामुळे या काळात 
  • रासायनिक खत देणे टाळत असल्याचे विश्‍वनाथ सांगतात. 
  • भुरी, मावा, तुडतुडे अशा रोग-किडींचा प्रादुर्भाव जाणवतो. प्रतिबंधासाठी कडुनिंबावर आधारित कीडनाशकाचा वापर होतो. 
  • या पिकाला चांगल्याप्रकारे पाणी आवश्‍यक आहे. प्रत्येकी २० दिवसांनी पाणी द्यावे लागते. 
  • तुषार, ठिबक सिंचनाचा वापर होतो. 
  • भेंडीचे वाण सातत्याने बदलण्याचा प्रयत्न असतो. बाजारात आलेले नवे वाण काही गुंठ्यात 
  • लावून टेस्ट केले जाते. ते योग्य वाटल्यासच अधिक क्षेत्रावर लागवड होते. 
  • दहा वर्षांपासून भेंडी लागवडीचे सूत्र जुळले असल्याने एकाच शेतात लागोपाठ कधीच लागवड केली नाही. दरवेळी फेरपालट केली जाते. 
  • भेंडीचे पीक घेतलेल्या शेतात खरिपात सोयाबीन पेरली जाते. 
  • एकूण १२ एकरांपैकी तीन ते पाच एकर शेत असे फेरपालट पद्धतीने भेंडीसाठी वापरले जाते. 
  • उर्वरित शेतात खरिपात सोयाबीन, रब्बीत गहू, हरभऱ्याची लागवड होते. 
  • सोयाबीन एकरी ८ ते १० क्विंटल, गहू २० क्विंटल तर हरभरा एकरी ८ ते १० क्विंटल उत्पादित होतो. 
  • शेडनेटचे नियोजन  भाजीपाला शेतीचा मोठा अनुभव गाठीशी आल्याने आता संरक्षित शेतीचा विचार सुरू आहे. गावाजवळ असलेल्या शेतापैकी अर्ध्या एकरात शेडनेट उभारून भाजीपाला पिके घेण्याचे नियोजन आहे.   

    संपर्क- विश्वनाथ मापारी- ८६९८६०३०१२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com