agriculture story in marathi, Vitthal Khandeparkar from Pirla Village, Goa State ihas set a model of progressive, experimental, organic farming & value added based farming model. | Page 2 ||| Agrowon

सुपारी, बहुवीध पिकांची व्यावसायिक मूल्यवर्धित शेती

मंदार मुंडले
मंगळवार, 23 जून 2020

निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेल्या गोव्याच्या भूमीत पिरला हे छोटेसे दुर्गम गाव आहे. येथील विठ्ठल खांडेपारकर यांनी प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी म्हणून नाव कमावले आहे. सुपारी, त्यात विविध मसालेवर्गीय आंतरपिके, नारळ, ऊस, केळी, हळद अशी बहुविविधता, दहा वर्षांपासून सेंद्रिय शेतीचे प्रयोग, देशी जनावरे, शेतमालाचे मूल्यवर्धन, थेट विक्री आदी विविध वैशिष्ट्यांनी नटलेले त्यांचे शिवार आहे. माती व मानवी आरोग्याची जपणूक करणारे, शाश्‍वत व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर शेतीचे ते आदर्श मॉडेलच आहे

निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेल्या गोव्याच्या भूमीत पिरला हे छोटेसे दुर्गम गाव आहे. येथील विठ्ठल खांडेपारकर यांनी प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी म्हणून नाव कमावले आहे. सुपारी, त्यात विविध मसालेवर्गीय आंतरपिके, नारळ, ऊस, केळी, हळद अशी बहुविविधता, दहा वर्षांपासून सेंद्रिय शेतीचे प्रयोग, देशी जनावरे, शेतमालाचे मूल्यवर्धन, थेट विक्री आदी विविध वैशिष्ट्यांनी नटलेले त्यांचे शिवार आहे. माती व मानवी आरोग्याची जपणूक करणारे, शाश्‍वत व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर शेतीचे ते आदर्श मॉडेलच आहे.

आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र अशी गोव्याची ओळख आहे. त्या अनुषंगाने राज्यात शहरीकरण व आधुनिकीकरण झाले. मात्र काळाच्या ओघात अस्सल गोव्याच्या भूमीतील शेती संस्कृती लोप पावली नाही. उलट अनेक शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची भर घालून ती प्रयत्नपूर्वक जोपासली. दऱ्याखोऱ्यांत वसलेली, निसर्गात रममाण झालेली चिमुकली गावे, नागमोडी रस्ते, नारळ, सुपारीच्या उंच विस्तीर्ण बागा अजूनही आपल्या पाऊलखुणा ठेऊन आहेत. दक्षिण गोवा जिल्ह्यातील पिरला (ता. केपे) यापैकीच दुर्गम गाव. इथले विठ्ठल रामचंद्र खांडेपारकर यांनी गोव्यातील आदर्श व मानाच्या शेतकऱ्यांमध्ये आपले स्थान मिळवले आहे.

वयाच्या पंचाहत्तरीचा युवक
वयाची पंचाहत्तरी गाठलेले खांडेपारकर आजही युवकाला लाजवेल या गतीने आणि उत्साहाने शेतीतील प्रयोगांत व्यस्त असतात. बागेला भेट देणाऱ्या प्रत्येकाला हसतमुख, प्रसन्न चेहऱ्याने ज्ञान, अनुभवाची देवाणघेवाण करतात.
आपल्या शेतीचा विकास सांगताना ते भूतकाळात डोकावतात. शेतीत वेगळं काही करण्याच्या उद्देशानं एकत्रित कुटुंबातील आम्ही नोकरदार भावंडे एकत्र आलो. सन १९६६ चा हा काळ. त्यावेळी गुळाला प्रति किलो असलेला चार रुपये दर म्हणजे खूप श्रीमंती वाटायची. पुढे १२ जण जोडले गेले. त्यातून सध्याची ४० एकरांची जमीन १९६८ मध्ये १५ वर्षांसाठी लीजवर घेतली. गूळ निर्मिती सुरू केली. पण पुढे किलोला पंचवीस पैसे, बारा आणे, सव्वा रूपया अशी दरांत घसरण सुरू झाली. साखर कारखान्यालाही ऊस देत होतो. पण नफ्यात काहीच नव्हता. जमीन परत देऊन टाकावी असं एकीकडे वाटू लागलं. दुसरीकडे अर्ध्यातून माघार घ्यायची नाही, नेटानं पुढेच जायचं असाही ठाम विचार झाला. दरम्यान सुपारीचे दर किलोला १० रुपयांवरून ३०, ४० रुपयांपर्यंत वाढत होते. मग बागांवरच लक्ष केंद्रित करायचं ठरलं. एकदा झाड लावलं की पुढे उत्पन्न घेत राहायचे.

झपाटून केलेले प्रयोग
खांडेपारकर मूळचे फोंड्याचे. कृषी विभागात ग्रामसेवक म्हणून ३५ वर्षे नोकरी केली. त्यातील
व्यस्ततेत प्रयोगशील वृत्तीला पूर्ण न्याय देणे शक्य नव्हते. केपे येथे विस्तार अधिकारी म्हणून २००२ ला सेवानिवृत्त झाल्यानंतर मात्र झपाटल्यागत प्रयोगांना सुरूवात केली. ते ॲग्रोवनचे वाचक आहेत. त्यातून ज्ञान घेऊ लागले. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी देत त्यांचे अनुकरण सुरू केले.

सुपारीची प्रयोगशील शेती
खांडेपारकर यांची सुपारीची जुनी बाग आहे. पण सुधारीत तंत्राने विकसित केलेली स्वतंत्र बाग म्हणजे प्रयोगशाळा आणि शिकण्याचे व्यासपीठच आहे. ते सांगतात की कर्नाटक राज्यातील सिरसी भागात दोन- तीन एकरवाले काजू उत्पादक सधन आहेत. सुधारीत तंत्राद्वारे एकरी दीडहजार ते दोनहजार किलो सुपारी ते घेतात. आमच्याकडे हीच सुपारी ५०० ते ८०० किलोपर्यंतच व्हायची. मग तिथले तज्ज्ञ आणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाग विकसित केली. आता सुपारीचे पावणेदोन हजार किलो प्रति एकर उत्पादन घेण्यापर्यंत मजल मारली आहे. महत्त्वाचे म्हणजे सुपारीत विविध मसाल्याची आंतरपिके, त्या व्यतिरिक्त विविध फळपिके, भाजीपाला घेत बहुविध पीक पद्धती आकारास आणली. मुख्य पिकाचा उत्पादन खर्च कमी केला. दहा वर्षांपासून सेंद्रिय शेतीचे प्रयोग सुरू केले. त्यातून मातीची सुपीकता जपणारे, आरोग्यदायी अन्ननिर्मितीचे शाश्‍वत, आर्थिक दृष्ट्या फायदेशीर शेतीचे मॉडेल साकारले.

खांडेपारकर यांची शेती दृष्टिक्षेपात

 • एकूण शेती- ४० एकर.
 • दहा वर्षांपासून १०० टक्के सेंद्रिय शेती. (प्रमाणीकरण प्रक्रियेच्या अवस्थेत)
 • सुपारी- ३५०० झाडे- वाण- गोवा लोकल व सिरसी (कर्नाटक)
 • आंतरपिके- काळी मिरी, जायफळ, दालचिनी, वेलची, कॉफी (कावेरी), हळद (सेलम)
 • नारळ- ३०० झाडे- वाण- बाणावली
 • आंबा- थोडीफार झाडे- माणकूर, मुसराद, पायरी.
 • काजू- १०० ते १५० झाडे
 • यंदाच्या वर्षापासून मधमाशीपालन. दोन पेट्या. थोडीफार मधनिर्मिती.
 • सुमारे १५ कायमस्वरूपी मजूर

पुरस्कार

-गोवा सरकारचा कृषिभूषण (२०१६)
-आदर्श हॉर्टीकल्चरीस्ट (२००७)
-आंब्यापासून जॅमनिर्मितीसाठी प्रथम पुरस्कार (२०१४)

 
उत्पादन, उत्पन्न

सुपारी व आंतरपीक

 • सुपारी- ९ बाय ९ फूट अंतर- एकरी ५५० झाडे.
 • पूर्वीचे उत्पादन- प्रति झाड दीड किलो. सुधारीत तंत्राद्वारे तीन किलोपर्यंत.
 • पाचशे झाडे गृहित धरली तरी एकरी १५०० किलो उत्पादन
 • २५० रुपये प्रति किलो दराने एकरी पावणेचार लाख रुपये उत्पन्न

आंतरपीक मिरी

 • सुपारीच्या प्रत्येक झाडावर एक वेल मिरी- प्रति झाड दीड- दोन ते अडीच किलो उत्पादन.
 • मिरीचा दर किलोला २५० ते ३०० रुपये.
 • प्रति झाड उत्पन्न- ३७५ ते ५०० रुपये.
 • पाचशे झाडांपासून उत्पन्न- १, ८७, ५०० ते अडीच लाख रुपये.

आंतरपीक केळी

 • वेलची केळी- आकाराने लहान मात्र गोड.
 • मागणी चांगली. दर किलोला ५० रुपये मिळतो.
 • एकरी ६०० ते ७०० झाडे. घड सरासरी २० किलो वजनाचा.

जायफळ

 • २५ फुटांवर जायफळाचे झाड.   लागवडीनंतर उत्पादन सुरू होण्यास १० वर्षे लागतात.
 • एकरी ५० झाडे बसतात.
 • उत्पादन ५ ते ६ किलो प्रति झाड. दर- ५०० रुपये प्रति किलो
 • सुपारीच्या जुन्या बागेत काही प्रमाणात वेलची. प्रति झाडाला २५० ग्रॅम येते. किलोला दोनहजार रुपये दर आहे.

अन्य पिके

 • नारळ- प्रति झाड- २५० नारळ (एवढे उत्पादन मिळण्यासाठी १२ वर्षे लागतात.)
 • हळद- नारळाच्या दोन झाडांत नऊ मीटर अंतराच्या मधल्या जागेत.
 • नारळाचा उत्पादन खर्च हळदीतून जातो. हळदीची पावडर बनवून आणून १०० रुपये प्रति किलो दराने विक्री. ग्राहकांकडून जागेवर खरेदी.
 • मिरची, भेंडी आदींची काही क्षेत्रात लागवड
 • सुपारीच्या जुन्या बागेत काही प्रमाणात वेलची. प्रति झाडाला २५० ग्रॅम येते. किलोला दोनहजार रुपये दर

विक्री व्यवस्था
गोवा बागायतदार संघाचा येथील शेतकऱ्यांना मोठा आधार आहे. सुपारी, मिरी, नारळाची विक्री संघाला होते. नारळाची जागेवरूनही खरेदी होते. संघापर्यंत माल घेऊन गेल्यास प्रवासखर्च दिला जातो. भाजीपाल्याची सांगे गावात विक्री होते. गोवा फलोत्पादन विभागाचेही खरेदी व संकलन केंद्र आहे. तेथेही माल देण्यात येतो. बॅंकखात्यात पैसे जमा होतात. यंदा भेंडी प्रथमच घेतली. चांगले उत्पादन सुरू आहे.

शेतमालाचे मूल्यवर्धन

 • उसाचे एकरी ४५ ते ५० टन उत्पादन. निम्मा कारखान्याला. निम्म्या उसापासून गूळ काढून घेण्यात येतो. सेंद्रिय असल्याने काकवी व गुळाला बुकिंगद्वारे घरबसल्या मागणी
 • काकवी ७५० मिली बाटली २०० रुपये तर गूळ किलोला १०० रुपये दराने हातोहात खपतो.
 • एक एकरमध्ये तांदूळ. शंभर रुपये प्रति किलो दराने ग्राहक जागेवरून घेऊन जातात. तो शिल्लक राहात नाही.
 • पुढील वर्षी गूळनिर्मिती युनिट व तांदळासाठी छोटी मिल घेण्याचा विचार
 • कुशावती नदीच्या नावाने ब्रॅण्ड तयार करून विक्री

आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संधी
खांडेपारकर यांच्या निसर्गरम्य शेतीच्या सौंदर्यात भर पडते ती शेताजवळून बारा महिने वाहणाऱ्या कुशावती नदीची. त्यावरील लाकडी ओंडक्याचा पूल ओलांडून शेतापलीकडे गोवा सरकारचे प्राचीन वास्तू केंद्र आहे. येथे दगडांवर कोरलेली प्राचीन चित्रे (रॉक कार्व्हिंग्ज) म्हणजे कलेचा उत्कृष्ट आविष्कार आहे. देश परदेशातून एकहजारांपर्यंत पर्यटक त्यासाठी येतात. खांडेपारकरांनी ही व्यावसायिक संधी ओळखली. 
हे पर्यटक त्यांची सेंद्रिय शेती, गोसंगोपन पाहतात. प्रसन्न होतात. देशी दूध, लस्सी, उसाच्या रसाने तृप्त होतात. विविध मसाले, हळद, तांदळाची जागेवर खरेदी होते. त्यातून उत्पन्नात भर पडते.

देशी गोपालन
पूर्वी संकरित गायी होत्या. आता ८ ते १० देशी गायींचे संगोपन होते. गीर, सिंधी, साहिवाल, खिलार आदींचा समावेश आहे. साहिवाल व गीरचा वळू आहे. मुक्त संचार पध्दतीचा गोठा आहे. दररोज सुमारे २० ते २५ लीटर दूध उपलब्ध होते. घरापुरते वापरून उर्वरित तूप तयार केले जाते. दोनहजार ते अडीचहजार रुपये प्रति किलो दराने विक्री होते. मागणीनुसार ८० रुपये प्रति लीटर दराने दुधाची विक्री होते.
 
सेंद्रिय शेतीतील प्रयोग

भूमिगत पाईपलाईनद्वारे शेणस्लरी

 • दररोज सुमारे २०० ते २५० किलो शेण उपलब्ध.
 • गोबरगॅस युनिट. त्याआधारे घरी व मजुरांनाही घरचा स्वयंपाक करणे शक्य.
 • एकहजार लीटरच्या टाकीत शेणस्लरीचे संकलन. तेथे पंप बसवला आहे. त्याद्वारे शेणस्लरी उचलली जाते.
 • सुपारीसाठी बागेत भूमिगत पाइपलाइन व्यवस्था. प्रत्येकी १२ मीटरवर त्याचे ‘ओपनिंग’ ठेवले आहे.
 • या कामासाठी दोन मजूर तैनात.
 • प्रति झाड १० ते १५ लीटर वापर
 • प्रत्येक महिन्याला स्लरीचा एक फेरा (राऊंड) प्रत्येक झाडाला. पावसाळ्याचे महिने वगळता वर्षाला आठ ते नऊ राऊंड प्रत्येक झाडाला मिळतात.

जैविक मल्चिंग

 • जमिनीवर पडणाऱ्या प्रत्येक पाल्याचे मल्चिंग (उसाच्या पाचटासह) करून त्यावर स्लरी टाकण्यात येते.
 • त्या त्या पिकाचे त्या त्या झाडाला मिळते.
 • वेस्ट डी कंपोजर हा सेंद्रिय घटक गोबरगॅसच्या स्लरीत प्रति टाकी एक डबी या प्रमाणात मिसळण्यात येतो.

पुढील तत्त्वांना देतात प्राधान्य

 • उच्च गुणवत्तेच्या बियाणांची निवड
 • दोन झाडांमध्ये योग्य अंतर
 • ओलावा टिकवून राहील एवढेच पाणी व्यवस्थापन
 • ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मल्चिंग
 • पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी चरी खोदल्या. (अति पावसाचा प्रदेश असल्याने)

प्रभावी सेंद्रिय बुरशीनाशकाची निर्मिती
गावपरिसरात सेंद्रिय शेतीला चालना देण्यात खांडेपारकर यांचे योगदान महत्वाचे ठरले आहे. अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेत रासायनिक निविष्ठांचा वापर कमी करीत सेंद्रिय शेतीचे धडे गिरवण्यास सुरुवात केली आहे. सुपारीच्या मुळांवर येणारा रोग ही या भागातील गंभीर समस्या आहे. ट्रायकोडर्मासह अनेक उपाय खांडेपारकर यांनी केले. पण तो नियंत्रणात आला नाही. मग ज्ञान, अनुभव व कौशल्य पणास लावून त्यांनी सेंद्रिय बुरशीनाशक तयार केले. ते असे.

 • हिरवी मिरची, लसूण, आले, व कडुनिंबाचा पाला. (प्रत्येकी दोन किलो )
 • त्यांचा मिक्सरमधून लगदा. १० लीटर गोमूत्रात शिजवला. वस्त्रगाळ करून कॅनमध्ये भरला.
 • प्रति शंभर लीटर पाण्याला एक लीटर प्रतिबंधक म्हणून वापर. रोग निवारणात्मक म्हणून
 • ८० लीटर पाण्याला दोन लीटर वापर.
 • रोगाचे पूर्ण नियंत्रण झाले.
 • आता मसालेवर्गीय, भाजीपाला पिकांत त्याचा वापर. चांगले परिणाम

भातासाठी जीवामृत

 • स्थानिक देशी भाताची रोपनिर्मिती. नर्सरी १२ दिवसांची.
 • पुर्नलागवड क्षेत्रात खालील पध्दतीचा वापर
 • २० लिटर गोमूत्र, २० किलो गायीचे शेण प्रति २०० लीटर पाणी. प्रत्येकी एक किलो गूळ व चणा डाळ पीठ.
 • तुळशीची रोपे आपोआप रुजून येतात तिथली माती काढून त्याचा वापर
 • या घटकांच्या आधारे जीवामृत निर्मिती. पाच दिवस ढवळून मिश्रणाचा वापर.
 • रोप लावल्यानंतर १५ दिवसांनी पहिला व एक महिन्याने दुसरा डोस

आरोग्यवर्धक अन्नाची घरापासून सुरुवात
खांडेपारकर सांगतात की सेंद्रिय अन्न खाण्याची सुरुवात घरापासून केली. कुटुंबातील सर्वांचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे. त्यादृष्टीने देशी दूध, सेंद्रिय तांदूळ, भाजीपाला यांचा वापर होतो. मोठा मुलगा व सून आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. ते पणजीत प्रॅक्टीस करतात. दुसरा मुलगा आयआयटी पदवीप्राप्त असून धारवाड येथे प्राध्यापक आहे. जीवन उत्तम हवे तर त्यासाठी अन्नही सकस हवे. सेंद्रिय शेतीतून हे शक्य आहे हे त्यांना पटले आहे.
 
प्रतिकूलतेशी सामना

 • मजूरटंचाई. त्यामुळे कामे वेळेवर होत नाहीत.
 • खांडेपारकर म्हणतात आम्ही सेंद्रिय केळी, मिरी पिकवतो. पण सेंद्रिय म्हणून त्याला अपेक्षित वेगळा दर मिळत नाही. सेंद्रिय उत्पादनांचे मार्केटिंगही व्हायला हवे.
 • दरांत कायम चढउतार. किलोला ७१० रुपये दर असलेली मिरी २९० रूपयांपर्यंतही खाली येते.
 • वानरांचा मोठा त्रास. नारळ, फणसाची हानी करतात. मिरचीची रोपे, ऊस मोडून घेऊन जातात. देखरेखीला एक व्यक्ती ठेवल्याने परिस्थिती नियंत्रणात.
 • गवे रेड्यांमुळेही अफाट नुकसान.
 • पीकविमा संरक्षण नाही. गारपीट, वादळवाऱ्याची मोठी समस्या.

अगररूटचा प्रयोग
अगररूट वनस्पतीची १०० झाडे सिरसीहून आणली आहेत. सध्या पाच वर्षांची आहेत. दहा वर्षांनंतर विशिष्ट प्रक्रिया करून झाडांपासून सुगंधी द्रव्य काढले जाते. त्याला बाजारपेठेत चांगला दर असतो. ज्यांच्याकडून रोपे आणली ते खरेदी करणार आहेत. गोव्यात हा पहिलाच प्रयोग असावा असे खांडेपारकर म्हणतात.

संपर्क- विठ्ठल खांडेपारकर- ८६९८६८८१०४
 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
आदर्श कामांच्या उभारणीतून ठसा उमटवलेले...द्राक्ष, डाळिंब,कांद्यासाठी जगभर प्रसिद्ध नाशिक...
कुडावळेमध्ये `शत प्रतिशत भात लागवड'...गाव आणि शेतीचा शाश्वत विकास करायचा असेल तर...
यांत्रिक पद्धतीने भात लागवड ठरतेय...चांदखेड (ता. मावळ जि. पुणे) परिसरातील वाढत्या...
युवा शेतकऱ्याची वीस एकर व्यावसायिक करार...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गडमठ (ता.वैभववाडी) येथील...
एकनाथ खडसेंच्या शेतीत सीडलेस जांभूळ,...राजकीय वर्तुळात चर्चेत असलेला चेहरा म्हणजे एकनाथ...
काजूगर निर्मितीचा स्वयंचलित अत्याधुनिक...रत्नागिरी जिल्ह्यात गव्हाणे येथे रत्नागिरी कृषी...
संयमवृत्तीनेच होते नफावृध्दी व...जनावरे मग ती दुभती असोत की नको असलेली, योग्य...
दूग्ध, रेशीम व्यवसायातून अर्थकारण केले...परभणी शहरानजीक शेती असलेल्या ढगे कुटुंबाने शेतीला...
शेतकरी नियोजन- कापूसमाझ्या शेतातील कपाशीचे पीक सध्या जवळपास ३५ ते ४२...
पीक नियोजनातून बसवले कुटुंबाचे आर्थिक...बाभूळसर (ता. शिरूर) येथील रामचंद्र नागवडे व...
महिला बचतगटाचा ‘जय भोलेनाथ’ ब्रॅण्डभेंडा बुद्रूक (ता. नेवासा,जि.नगर) येथील वीस...
हिरवे हिरवेगार गालिचे, हरित तृणांच्या...हिरवे हिरवेगार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे......
यांत्रिकी पद्धतीने मूरघास निर्मिती...सध्या दुग्धव्यवसायात मूरघास ही अत्यंत महत्त्वाची...
कृषीसंपन्नता, आरोग्य, पर्यावरण हेच...कोटमगावाने (ता. जि. नाशिक) कृषीसंपन्न, आरोग्य व...
द्राक्ष, पेरूतून प्रगतीकडे कृषी...कृषी पदविका घेतल्यानंतर त्याचा योग्य वापर करीत...
कोकणात प्रयत्नावादातून दिली...कोकणात दुग्धव्यवसाय म्हणावा तसा विकसित झालेला...
खरीप पिकांतील तण नियंत्रण व्यवस्थापनजगात सर्वांत जास्त वापर तणनाशकांचा (४३.६ टक्के)...
अतीव संघर्ष, धैर्यातून साधली उल्लेखनीय...उस्मानाबाद जिल्ह्यातील अणदूर येथील वैशाली घुगे...
चिकाटी, आर्थिक नियोजनातून पोल्ट्री...वांजोळी (जि. नगर) येथील ३८ वर्षे वयाच्या अमोल...
जलसंधारण,शिक्षण अन् कृषी विकासाचा रचला...सुदृढ, आत्मनिर्भर समाज घडविणे या उद्देशातून जळका...