एकोप्यातून दूर केले जलसंकट शेतीही केली समृध्द 

आमच्या पूर्वजांनी गावात अनेक वर्षांपूर्वी जलसंकट दूर करण्यासाठी जे काम केले, तेच आम्ही पुढे नेले. सर्व ग्रामस्थांचा सहभाग त्यात असतो. - अंशुमन पाटील, शेतकरी, ब्राह्मणपुरी, ता.शहादा
हरभरा पिकासाठी ठिबकची व्यवस्था.
हरभरा पिकासाठी ठिबकची व्यवस्था.

नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता.शहादा) येथील शेतकऱ्यांनी अनेक वर्षे संयुक्त प्रयत्न करून शेतीसमोरचे पाण्याचे संकट दूर सारले. केळीच्या शेतीची कास येथील शेतकऱ्यांनी धरली असून, केळीची निर्यातही या भागातून केली जाते. केळीसह कापूस हरभरा उत्पादनात ब्राह्मणपुरी अग्रेसर झाले असून, 100 टक्के सूक्ष्मसिंचनाचा वापर सर्व पिकांसाठी केला जाऊ लागला आहे . 

नंदुरबार तसा दुर्गम, आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. नंदुरबारपासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर ब्राह्मणपुरी (ता.शहादा) आहे. गावात सुमारे तीन हजार एकर शेती आहे. कापूस पीकही दिसते. टोलेजंग इमारती नजरेस पडतात. गावात केळीची चांगली शेती आहे. काळी कसदार शेती आहे. तसे सधन दिसणारे हे गाव १९९८-९९ मध्ये पाणीसंकटाला तोंड देत होते. केळीची शेती उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर होती. पाणीच संपुष्टाक आले तर पिके कशी जगवायची हा मुद्दा होता.  ग्रामस्थांनी एकीने प्रश्न सोडवला  ग्रामस्थांनी मग एकत्र येऊन सुसरी नदीवर भूमीगत बंधारा बांधला. सुमारे चार किलोमीटर नदीची ट्रॅक्‍टरचलित यंत्रांद्वारे नांगरणी केली. पुढील वर्षीही दुष्काळ पडला. नदीला पाणी आले नाही. पाऊस जेमतेमच होता. सन २००६ मध्ये अतिवृष्टी झाली. तेव्हा नदी नांगरणी व भूमीगत बंधाऱ्यांच्या केलेल्या कामांचा लाभ दिसला. सुसरी नदीत पाणी मोठ्या प्रमाणात जिरले. तेव्हापासून या गावात अधूनमधून नदी नांगरणी सुरूच राहिली. या गावातील शेतकऱ्यांची शेती रायखेड, खेड, जवखेडा, सुलतानपूर, सुलवाडा या गावांमध्येही आहे. तेथेही सिंचनासाठी कसे पाणी मिळेल या दृष्टीने लोकसहभागातून कामांचा धडाका सुरू ठेवला.  सामुहिकपणे जलसंधारणाची कामे  सन १९९९ पासून ते २०१५ पर्यंत अधूनमधून नदी नांगरणीचे काम झाले. त्यासाठी गावातील २५ शेतकरी एकत्र येतात. ट्रॅक्‍टर, नांगर आणतात. स्वतः इंधनाचा खर्च करतात. दिवसभरात चार किलोमीटरपर्यंत नदी नांगरणीचे काम पूर्ण केले जाते. उन्हाळ्यात हे काम करण्यात येते. गोपाळ मंगेश पाटील यांनी २०१५ मध्ये सुसरी नदीवर वाळूचा बंधारा बांधला. सन २०१६ मध्ये या कामांना व्यापक स्वरुप देत, एकाच दिवसांत ग्रामस्थांकडून १२ लाख रुपये संकलित करण्यात आले. जे शेतकरी ‘लीज’वर शेती करतात, त्यांनीही आर्थिक मदत दिली. या निधीचा उपयोग करून सुसरी नदीत केचपेट व वाळूचे बंधारे बांधले. यंदा राखडी नाल्यावर सहा लाख रुपये संकलित करून पाच सिमेंट नालाबांध तयार केले. गावातील अभियंता अनिल नरोत्तम पाटील यांनी त्यासाठी मदत केली. या कामांसाठी अधिकचा निधी लागला असता. परंतु नफा ना तोटा स्वरुपात त्यांनी हे काम केले.  मोफत यंत्रणा दिली  सन २०१७ मध्ये गावातील शेतकरी व व्यावसायिक युवराज दत्तात्रय पाटील यांनी आपले पोकलेन यंत्र नाला खोलीकरण, केचपेट या कामांसाठी दिले. त्याला लागणारे इंधन, चालकाची मजुरी हा सर्व खर्च ला. यंदाही नदीत वाळूचे बंधारे घालण्यासह केचपेटच्या कामांसाठी अनिल यांनी आपली सारी यंत्रणा मोफत दिली. फक्त ग्रामस्थांनी इंधनावर खर्च करावा लागला. सुसरी व सुखनाई नदीवर प्रत्येकी सात केचपेट तयार केले आहेत. तीस बाय १० बाय चार मीटर खोल असा केचपेट आहे. सात केचपेटमध्ये नऊ हजार कोटी लिटर पाणी मागील वर्षी जिरल्याचा ताळेबंद अभियंता अनिल व ग्रामस्थांनी पडलेल्या पावसानुसार तयार केला.  शेतीत समृध्दी  गावात मागील दोन वर्षांत सुमारे २५ लाख रुपये लोकसहभागातून संकलित करून पाणी जिरविण्यासंबंधीची कामे घेतली. या कामांचा परिणाम मागील वर्षी व यंदाही दिसला. कूपनलिकांचे पाणी आज टिकून आहे. सर्व कामांत गावातील युवक, ज्येष्ठांचा सहभाग राहीला. गावात सुमारे सहा लाख केळी झाडांची दरवर्षी लागवड केली जाते. पपईची २५० हेक्‍टरवर, कापसाची २०० हेक्‍टरवर तर हरभऱ्याची २०० हेक्‍टरपर्यंत लागवड असते. केळी, हरभरा, कापूस, पपई ही सर्व पिके ठिबकवर घेण्यात येतात.  केळीची यशस्वी शेती  सुमारे ८० टक्के केळीची लागवड शिवारात सात बाय पाच फूट, उंच गादीवाफा पद्धतीने केली जाते. मे हा लागवड हंगाम असतो. केळीची २२ ते २४ किलो प्रतिघडपर्यंत रास मिळते. उतीसंवर्धित रोपांची लागवड अधिक असते. दर्जेदार उत्पादनामुळे केळी निर्यातीला संधी प्राप्त झाली आहे. पंधरा शेतकऱ्यांचा गट निर्यातीसाठी एकत्र आला आहे. खाजगी कंपनीच्या मदतीने आखातात मार्च महिन्यात निर्यात होते. परिसरातील खेड, रायखेड, सुलतानपूर येथील शेतकरीही या गटाशी जुळले आहेत. केळीला मागील वर्षी सरासरी ११ रुपये प्रति किलो दर मिळाला. पपईची शेतीही उत्तम असते. त्याच्या मार्केटिंगसाठी गावातील सात शेतकरी काम करतात. शेतकऱ्यांकडून कुठलेही कमिशन घेतले जात नाही. दिल्ली येथील व्यापाऱ्यांना दिवाळीनंतर पपई पुरवली जाते. व्यापारी थेट गावात येऊन खरेदी करतात. पपईला मागील वर्षी १५ रुपये प्रति किलोपासूनचे दर मिळाले.  पाण्यासाठी मदत  पाण्याअभावी काही वर्षांपूर्वी काही शेतकऱ्यांची केळी जळून गेली. उभ्या पिकावर नांगर फिरवावा लागला होता. या नुकसानीमुळे गावातील शेतकऱ्यांना पाण्याचे महत्त्व अधिक वाटते. त्यामुळे ज्या ज्या वेळी गावात कुठल्या शेतकऱ्याला पाण्याची आवश्‍यकता असते त्याला पाणी उपलब्ध करून द्यायला सर्व तयार असतात. एखाद्या शेतकऱ्याचा पंप जळाला, त्याच्या केळी किंवा पपईला पाण्याची तातडीने गरज आहे, तर दुसरा शेतकरी त्याला त्वरीत मोफत पाणी उपलब्ध करून देतो.  जलमंदीर संकल्पना  लोकसहभागातून जलसंधारणाचे काम किती महत्त्वाचे आहे, हे पटवून देण्यासाठी गावातील युवा शेतकऱ्यांचा गट गावोगावी जाऊन जनजागृती करतो. आमचे जलमंदिर ही संकल्पना हा गट सांगतो. शहादा, नंदुरबार तालुक्‍यातील जलसंकटाला तोंड देत असलेल्या ३५ गावांमध्ये या गटाने जनजागृती केली आहे. ब्राह्मणपुरी जलमंदिर गट म्हणून ही मंडळी काम करते. मंदिराचे जसे महत्त्व असते तसे पाण्याचेही आहे. पाण्याची पूजा करा, पाण्याला देव मानून काम करा. जलमंदिर गावात उभारा, म्हणजेच गावात जलसंधारणाची कामे करा असे हे सदस्य गावोगावी जाऊन सांगतात.  शेतरस्त्यांची कामे  शेतरस्त्यांबाबतही गावात मोठे काम झाले असून लोकसहभागातून सुमारे ३२ किलोमीटर एवढ्या अंतरातील रस्ते वाळू, मुरूम, माती टाकून तयार केले. सन १९९९ पासून शेतरस्त्यांबाबत काम केले जात आहे. यामुळे केळीची शेती वाढली. वाहतूक सुकर झाली. रासायनिक खते गावातच प्रचलित दरात उपलब्ध व्हावीत यासाठी बागायतदार सहकारी संघ अनेक वर्षे कार्यरत अाहे. प्रकाश पाटील हे संघाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. केळी, कापूस, पपईच्या हंगामात प्रतिदिन २०० ते २५० गोण्या खतांची आवश्‍यकता असते. त्या आणण्यासाठी शहादा शहरात जावे लागे. त्यावर २० रुपये प्रतिगोणी वाहतूक खर्च लागायचा. हा खर्च गावातच सहकारी संघाचे खत विक्री केंद्र सुरू झाल्याने वाचला आहे. गावात मागील तीन पंचवार्षिक ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. सोसायट्या, ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध पार पडाव्यात यासाठी सर्वच एकत्र काम करतात.  प्रतिक्रिया जी यंत्रणा माझ्याकडे आहे ती गावात जलसंधारणाच्या कामासाठी दिली. गावातील केळी, पपई, कापसाची शेती चांगली होण्यासाठी तसेच पाण्याचे संकट भेडसावू नये या दृष्टीने काम सुरू आहे.  - अनिल नरोत्तम पाटील, अभियंता तथा शेतकरी, ब्राह्मणपुरी, ता.शहादा  संपर्कः- अनिल पाटील -८२७५०६९५९०  अंशुमन पाटील -९७६३६१२४९६ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com