‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन ओलिताखाली 

पावसाळ्यात केवळ भात घ्यायचो. आता विविध भाजीपाला पिके घेत आहोत. स्थानिक बाजारपेठ मिळत असल्याने शेती सुकर झाली आहे. -संतोष भडवळकर- ९६५७९६६४५२ राजवाडी
राजवाडीतील शिवकालीन बंधारा ओसंडून वाहताना.
राजवाडीतील शिवकालीन बंधारा ओसंडून वाहताना.

पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष हे दृश्य कोकणात पहायला मिळते. काही ठिकाणी नद्या, बंधाऱ्यांतील पाणी शेतापर्यंत आणण्याची आर्थिक क्षमता अल्पभूधारक शेतकऱ्यांत नसते. अशा वेळी रत्नागिरी जिल्ह्यातील राजवाडी, धामणी, चिखली या तीन गावांत पाणी योजना प्रकल्प यशस्वी राबविण्यात आला. संघटित ताकद, श्रमदान व आर्थिक आधार यांच्या आधारे तिन्ही गावांतील मिळून शंभर एकर जमीन बारमाही ओलिताखाली आली. शेतकऱ्यांना विविध पिके घेणे शक्य झाले. आर्थिक सक्षम होण्याकडे त्यांची वाटचाल झाली.    पारंपरिक पद्धतीने भातशेती आणि उर्वरित आठ महिने मोलमजुरी असा कोकणातील वर्षानुवर्षाचा रिवाज राजवाडी, धामणी, चिखली गावांतही (ता. संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी) होताच. अन्य पिकं घ्यायची  तर आर्थिक पाठबळ आणि मार्गदर्शन आवश्यक होतं. राजवाडीच्या पेम (पिपल्स एम्पॉविरंग मूव्हमेंट) संस्थेचे अध्यक्ष सतीश कामत यांनी ही जबाबदारी स्वीकारली. होतकरू तरुण संतोष भडवळकर, सुहास ऊर्फ बंड्या लिंगायत यांच्यासह मनोहर सुर्वे, गणेश सुर्वे, नंदकुमार मांजरेकर, सुरेश भडवळकर, विलास राऊत, सीताराम बाईत यांच्या पाठीशी ते ठाम उभे राहिले. सरकारी अनुदानात अडकून पडण्यापेक्षा स्वयंस्फूर्ती आणि खासगी आर्थिक सहकार्याच्या जोरावर प्रकल्प राबवण्याचे ठरले.  असे खेळले शेतात पाणी 

  • दोन किलोमीटरवरील शिवकालीन योजनेच्या बंधाऱ्यावरून पाणी ‘लिफ्ट’ करण्याचे ठरले. 
  • त्यासाठी राजवाडीतील २५ शेतकरी एकत्र. सन २०१४ मध्ये कृषिरत्न पुरुष बचत गटाची स्थापना. 
  • पहिल्या टप्प्यात पाणी योजनेसाठी साडेचार लाख रुपयांपैकी शेतकऱ्यांकडून २५ टक्के रक्कम उभारणी. 
  • उर्वरित निधी बासुरी फाउंडेशनच्या माध्यमातून. 
  • श्रमदानातून अडीच किलोमीटरवरून पाइपलाइन करून पाणी शेतापर्यंत. पंधरा अश्वशक्तीचा पंप बंधाऱ्यावर. 
  • पिण्याच्या पाण्याच्या विहिरीची पातळीही वाढली. 
  • दुसऱ्या टप्प्यात राजवाडी-ब्राह्मणवाडीत पाऊण किलोमीटर अंतरावरील उपनदीवरून पाणलोटमधून अकरा लाख रुपये खर्च करून बंधारा. त्यासाठी पावणेदोन लाख रुपये खर्च. इथेही राजवाडी पॅटर्नच. 
  • शेती बारमाही ओलिताखाली 

  • दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विद्यमान संशोधक संचालक डॉ. पराग हळदणकर यांची राडवाडीत कार्यशाळा. सुमारे ६५ शेतकरी उपस्थित. 
  • प्रकल्पाद्वारे कुणाची एकर भर तर कुणाची पाच ते दहा गुंठे जमीन अशी राजवाडी, ब्राह्मणवाडी मिळून सुमारे ६५ एकर जमीन बारमाही ओलिताखाली. 
  • चवळी, पावटा, कुळीथ, मूग, लाल माठ, मुळा, भेंडी, गवार, वांगी, पडवळ, भोपळा, दुधी, कलिंगड अशी शिवारात विविधता. संतोष भडवळकर, सुहास लिंगायत, गंगाराम भडवळकर हे शेतकरी यात आघाडीवर. 
  • स्थानिक बाजारपेठ  कृषिरत्न, कृषी विकास पुरुष बचत गटाला कडवई, रत्नागिरी बाजारपेठ मिळाली. संस्थेचे सतीश कामत यांनी शहरातील राजवाडी भाजी गट तयार केला. त्याद्वारे आठवड्यातून तीन वेळा रत्नागिरी शहरात तीन केंद्रांवर विक्री व्यवस्था उभारली. अ‍ॅपच्या माध्यमातून भाज्यांची मागणी नोंदविण्याचा उपक्रम राबविला.  हंगामात दहा हजार रुपयांपासून ते अगदी ५० हजार, ७५ हजारांपर्यंतचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळाले.  शेततळ्याचा आधार 

  • पाण्याची शाश्‍वती व बारमाही उत्पादनाला चालना मिळाल्यावर राजवाडीत नवजीवन पुरुष गटाची स्थापना. त्याद्वारे दहा लाख खर्चून गेल्या वर्षी ३५ लाख लिटर पाणीसाठवण क्षमतेचे शेततळे. 
  • गेल्या वर्षीच्या पावसात ते काठोकाठ भरले. त्यात मत्स्यपालनही केले.   
  • ओलिताखाली आलेले क्षेत्र 
  • -राजवाडी- ६५ शेतकरी- ६० एकर 
  • -धामणी- २५ शेतकरी- २५ एकर 
  • -चिखली- १८ शेतकरी- २० एकर 
  • धामणी, चिखलीतही प्रयोग यशस्वी  पाणी योजनेचा राजवाडी पॅटर्न शेजारच्या धामणी गावानेही अवलंबला. प्रकाश भागोजी रांजणे, अमोल लोध, शांताराम बडद, प्रकाश बसवणकर, हरिश्‍चंद्र बडद यांच्या नेतृत्त्वाखाली श्रीगणेश शेतकरी उत्पादक गटाने पावले उचलली. ‘पेम’चेच मार्गदर्शन लाभले. सहा एकरांत तीन वर्षांत एकूण दीडशे टन केळीचे उत्पादन यशस्वी घेतले. रत्नागिरी, सावर्डे, चिपळूण येथे विक्री झाली. प्रकल्पांतर्गत दहा लाख रुपयांपैकी अडीच लाख रुपये अनुदान तर साडेसात लाख रुपये बीनव्याजी कर्ज ‘बासुरी’तर्फे मिळाले. केळीतील उत्पन्नातून हे कर्ज श्रीगणेश बचत गटाने फेडलेदेखील. ‘बासुरी’ने ‘सीएसआर’अंतर्गत तीनही गावांत सुमारे २० लाख रुपयांचे पाठबळ दिले.  प्रयोगांना चालना 

  • नदीपासून तीन किलोमीटरवरील डोंगरात श्रमदानाने पाइपलाइन. त्याद्वारे गेल्या वर्षी भातशेतीनंतर डिसेंबरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर कुळीथ. त्याचे दोनशे किलो उत्पादन. 
  • गटातर्फे आता गीर व अन्य देशी गायींचे पालन. दुधाचे उत्पादन. 
  • याच संकल्पनेचे जवळच्या चिखली गावात अनुकरण. तिथेही साडेचार लाख रुपये खर्चाची पाणीयोजना. 
  • तुकड्याची शेती जोडण्याचे प्रयत्न  कोकणात तुकड्या-तुकड्याची शेती. त्यामुळे सर्वांना एकत्र आणायचे मोठे आव्हान होते. धामणीतील प्रकाश रांजणे यांनी प्रत्येक शेतकऱ्याकडे जाऊन करार शेती व त्याचे कायदेशीर महत्त्व पटवून दिले.  काही शेतमालक मुंबईत वास्तव्याला असलेले. त्यासाठी रांजणे यांनी मुंबई गाठली. त्यातून प्रयत्नांना यश आले व केळीचे उत्पादन घेण्यात श्रीगणेशा बचत गट यशस्वी झाला. 

    प्रतिक्रिया  राजवाडी-ब्राह्मणवाडीतील शेतकऱ्यांच्या वीस एकरांपर्यंत पाणी नेण्यात आले. तिथे बारमाही शेतीला व बहुवीध पीक पद्धतीला चालना मिळाली आहे.  -सुहास ऊर्फ बंड्या लिंगायत  ९०२२५८२३८९  राजवाडी येथील पाणी व्यवस्थापन व भाजीपाला प्रयोग अभ्यासला. त्याच धर्तीवर धामणीत काम केले. त्यातून ३१ एकर जमीन ओलिताखाली आली.  -प्रकाश रांजणे- ९८६०३७७४१४  धामणी   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com