agriculture story in marathi, water management, multiple farming, savargaon, sangamner, nagar | Agrowon

सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमया
संदीप नवले
सोमवार, 22 एप्रिल 2019

पूर्वी गावात भीषण पाणीटंचाई जाणवे. गावकऱ्यांनी एकत्र येऊन पाइपलाइनद्वारे पाणी आणले. त्याचे समान वाटप केले. आता गावातील शेती सक्षम झाली आहे. गावाने पाणी व्यवस्थापनाचा आदर्श उभा केला आहे. 
-नेहाबाई दशरथ गाडे 
सरपंच 
संपर्क- ९८६०२२८९७२ 

संगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ येथील शेतकऱ्यांनी सुमारे २७ गट स्थापन करून प्रवरा नदीचे पाणी पाइपलाइन्सद्वारे आपल्या गावापर्यंत आणले. एकमेकांमध्ये सुसंवाद घडवून पाण्याचे समान वाटप केले. उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब शेततळी, ठिबक, मल्चिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग आदींच्या माध्यमातून उपयोगात आणला. एकेकाळी तीव्र पाणीटंचाई सोसणाऱ्या या गावात शेतमालाची शंभर कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होऊ लागली आहे. गावातील कुटुंबे सुखी-समाधानी झाली आहेत. 

नगर जिल्ह्यातील संगमनेर हा सधन तालुका आहे. प्रवरा नदी वाहत असल्याने उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्यातील दक्षिणेकडील भाग मात्र डोंगराळ असल्याने पावसाचे प्रमाण कमी आहे. दक्षिण भागात शेतीचे क्षेत्र कमी असून, ग्रामस्थांना दर वर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. दहा ते पंधरा वर्षांपूर्वी चंदनापुरी, सावरगाव येथील बहुतांशी लोक नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित झाले. 

पाणीटंचाईचे गाव 
तालुक्याच्या दक्षिणेकडील यापैकीच एक गाव म्हणजे सावरगाव तळ. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिमेस डोंगरपायथ्याला हे गाव वसले आहे. सुमारे पाच हजार लोकसंख्या, क्षेत्र एक हजार ७१० हेक्टर पैकी शेतीखालील क्षेत्र ८२६ हेक्टर आहे. पावसाची सरासरी ४५० मिलिमीटर असली, तरी प्रत्यक्षात अत्यंत कमी पाऊस पडतो. पाणीटंचाई पाचवीलाच पुजलेली होती. पावसाच्या पाण्यावरच खरीप पिके, गहू, हरभरा, कांदा, बाजरी शेतकरी घ्यायचे. 

पाण्यासाठी गटाची संकल्पना 
अकोले तालुक्यातील रतनगड येथे उगम पावणारी प्रवरा नदी नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम येथे गोदावरीला येऊन मिळते. त्यामुळे नदीला पाच-सहा महिने पाणी असते. अन्य कालावधीत नदीला भंडारदरा धरणातून पाणी सोडल्यानंतर हंगामी पाणी येते. सावरगाव तळ गावाचा पाण्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी गावातील हरिश्‍चंद्र फापळे यांनी गटाच्या माध्यमातून प्रवरा नदीवरून पाणी आणण्याची संकल्पना गावकऱ्यांसमोर मांडली. नामदेव थिटमे, कारभारी फापाळे, विलास येंधे, एकनाथ गाडे, नानासाहेब गाडे, अण्णासाहेब गाडे आदी त्यांना सामील होऊन गट तयार झाला. 

पाण्यासाठी संघर्ष 
प्रवरा नदी गावाजवळून सुमारे आठ किलोमीटरवर वाहते. एवढ्या लांबून गावात पाणी आणायचे, तर एकट्या दुकट्या शेतकऱ्याला अशक्य होते. पावसाळ्यात ज्यांच्या शेतात पिके उभी आहेत ते पाइपलाइन 
नेण्याच्या दृष्टीने त्वरित होकार देतील का, अशी शंका होती. आव्हान मोठे होते. मात्र, जिद्दही कायम होती. मग उन्हाळ्यात पाइपलाइन्स बसवण्याचा विचार पुढे आला. त्यासाठीही शेतकऱ्यांना त्यासाठी राजी करणे सोपे नव्हते. 

आर्थिक जुळवाजुळव 
सर्वांत मोठी अडचण होती पैशांची. शेतीतील उत्पन्न, घरातील दागदागिने, सोने तारण ठेवणे, सोसायटी, पतसंस्था, बँकांकडून कर्ज, अशी आर्थिक जुळवाजुळव सुरू झाली. सुमारे तीस लाख रुपयांची रक्कम उभी करण्यास गटाला यश आले. पाणी गावच्या शिवारापर्यंत आले. त्याचे समान वाटप हा आता सर्वांत महत्त्वाचा भाग होता. तरीही उपलब्ध पाण्याचे नियोजन करून शेतकरी पिके घेऊ लागले. शेतकऱ्यांचा अजून एक गट पाणीवाटपाच्या अनुषंगाने कार्यरत झाला. 

एकीचे बळ वाढले 
तालुक्याचे आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडून त्याविषयी मार्गदर्शन मिळाले. त्यानुसार दिंडोरी (जि. नाशिक) तालुक्यातील राशे गावातील समान पाणीवाटपाच्या योजनेची पाहणी गटाने केली. प्रत्यक्ष अभ्यास झाल्यानंतर गावातील पुढील कामांना चालना मिळाली. पाइपलाइन्सद्वारे आणलेल्या पाण्याद्वारे गावशिवारातील शेती बहरू लागली. परिसरातील शेतकऱ्यांचा उत्साह व संख्या वाढू लागली, तसे मदतीचे हात वाढू लागले. गटांचा विस्तार झाला. 

सत्तावीस गट झाले कार्यरत 
आज गावात २८२ शेतकऱ्यांचे सुमारे २७ गट आहेत. प्रतिगटात चार ते पाच, तर काही गटांत १० ते १२ शेतकरी आहेत. आतापर्यंत या शेतकऱ्यांनी सुमारे १३ ते १५ कोटी रुपयांचा खर्च पाणी आणण्यासाठी केला आहे. प्रतिगटाने आणलेल्या पाइपलाइन्सच्या माध्यमातून सुमारे वीस एकर शेतीला पाणी दिले जाते. 
सावरगाव ते प्रवरा नदी या प्रवासात निमज, झोळे अशा दोन गावांचे दोन डोंगर लागतात. त्यामुळे पाणी उचलणे अवघड होते. त्यावर उपाय म्हणून नदीजवळ १०० ते २०० फूट अंतरावर दोन ठिकाणी इलेक्ट्रीक मोटर्सचा वापर केला. त्यासाठी नदीवर सुमारे दहा ते पंधरा फूट आकाराची विहीर तयार केली. 
जेव्हा ‘रोटेशन’ असेल त्या कालावधीत पाणी उचलता येते. 

समान पाणीवाटप 
शेतकऱ्यांकडे अर्धा गुंठ्यात सिमेंटच्या गोल टाक्या उभ्यारल्या आहेत. गावात सुमारे २७ टाक्या आहेत. त्यात नदीवरून आणलेले पाणी सोडण्यात येते. टाकीच्या बाहेरील बाजूस चेंबरची विभागणी करून पाच ते सहा पाइपलाइनद्वारे शेतकऱ्यांना पाण्याचे समान वाटप होते. प्रतिचेंबरमध्ये गटाचे सभासद असलेल्या आठ ते दहा शेतकऱ्यांच्या पाइप्स बसवल्या आहेत. शेतकरी गरजेनुसार पाणी शेततळ्यात, विहिरीत सोडतात. 

विहिरींचे पुनर्भरण 
पावसाच्या प्रत्येक थेंबाचा योग्य वापर करण्याचे धोरण गावातील शेतकऱ्यांनी स्वीकारले. बहुतांशी शेतकऱ्यांच्या घराजवळ विहिरी आहेत. अनेकांनी घराच्या छतावर ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ यंत्रणा उभारली. त्याद्वारे हे पाणी शेततळे, विहिरी यात सोडण्यात येते. गावातील ८० टक्के शेतकरी या पद्धतीद्वारे विहिरींचे पुनर्भरण करतात. 

शिवार नटले पिकांनी 
गहू, बाजरी, मूग, कांदा, भाजीपाला, चारा अशा पिकांना पूर्वी पाटपाण्याने पाणी दिले जायचे. आता शिवारात डाळिंब, टोमॅटो, वांगी अशी पिके दिसू लागली. मध्यंतरी सुमारे साडेतीनशे एकरांपर्यंत डाळिंबाची लागवड होती. त्यातून उत्पन्नही चांगले मिळायचे. चार-पाच वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. मोठे नुकसान झाले. तरीही पुन्हा उभारी घेऊन नव्याने डाळिंबाच्या लागवडीतून शेतकरी उत्पादन घेऊ लागले आहेत. 

ठिबक, शेततळे व मल्चिंग 

  • पाण्याचा काटेकोर वापर करण्यासाठी ९० ते १०० टक्के शेतकऱ्यांकडून ठिबकचा अवलंब 
  •  कृषी विभागाकडूनही मोठ्या प्रमाणात अनुदान 
  • गावाने घालून दिलेला आदर्श सर्वांसाठीच दिशादायक 
  • १५ बाय १५ मीटर ते ३० बाय ३० मीटर अशा आकारांची शेततळी 
  • त्यांची संख्या सुमारे ४०० ते ४५० 
  • त्यामाध्यमातून सुमारे १०० ते ५०० कोटी लिटर पाण्याची साठवणूक 
  • पावसाळ्यात शेततळी पाण्याने भरतात. उन्हाळ्यात त्यांचा मुख्य वापर 
  • पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून प्लॅस्टिक मल्चिंगचा वापर 
  • पीक अवशेष, पाचट, गवत यांचेही जैविक मल्चिंग 

शेतीतील उलाढाल वाढली 
डाळिंब, पपई, सीताफळ द्राक्षे, कांदा, वांगे, टोमॅटो, गहू, हरभरा अशा पिकांतून गावातील मार्केट उलाढाल वाढली आहे. पुणे, नाशिक, संगमनेर बाजारपेठा इथल्या शेतकऱ्यांना भावताहेत. शेतीच्या माध्यमातून सुमारे १०० ते १५० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होत असावी, असा जाणकारांचा अंदाज आहे. 

उत्पन्नात भरीव वाढ 
फळबाग, भाजीपाला शेतीत सुधारित तंत्राचा वापर होतो. डाळिंबाचे एकरी १० टन वा त्यापुढे, कांद्याचे १० ते टन, कलिंगडाचे ३० टनांपर्यंत उत्पादन सावरगावचे शेतकरी घेतात. पूर्वी पाण्याची बिकट परिस्थिती असताना पारंपरिक पिकाचे प्रतिएकरी उत्पादन चार-पाच क्विंटलच असायचे. वार्षिक उत्पन्न ४० हजार रुपयांपर्यंतच कसेबसे जायचे. आता उत्पन्नात दुप्पट ते तिपटीने वाढ झाली आहे. 

उंचावला स्तर 
कौटुंबिक जीवनमानाचा स्तर उंचावला आहे. गावातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेताहेत. शेतकरी टुमदार बंगले बांधू लागले आहेत. पूर्वी चार ते पाच ट्रॅक्टर्स दिसायचे. आता ही संख्या शंभर, दीडशेपर्यंत पोचली आहे. दोनचाकी, चारचाकी वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना शेती विकत घेणे, अन्य व्यवसायांमध्ये गुंतवणूक करणे शक्य झाले आहे. दुग्धव्यवसाय वाढीस लागून उत्पनात वाढ झाली आहे. 

सुसंवाद वाढला 
शाश्‍वत पाणी मिळण्यास सुरुवात झाल्यापासून प्रयोग करण्यासाठी शेतकऱ्यांत निरोगी स्पर्धा सुरू झाली. या वाटचालीत एकमेकांतील सुसंवाद वाढीस लागला. गावाचे सामाजिक स्वास्थ सुधारले. राजकीय मतभेद कमी झाले. एकमेकांना सहकार्य करण्याची भूमिका वाढीस लागली. 

सामाजिक उपक्रमात सहभाग 
लोकसहभागातूनच सिमेंट नालाबांध, खोल समतल चर, माती नाला बांध, वनराई बंधारे, नाला बांध बंदिस्ती, पाझर तलाव, पाणी फाउंडेशन, बचत गट, वाचनालय उभारणी, रस्ते दुरुस्तीकरण, वृक्षारोपण, असे सामाजिक उपक्रम पार पडले. त्यामुळे गाव पाण्याबाबत स्वयंपूर्ण झाले. 

शेतकरी प्रतिक्रिया 
माझी ४० एकर शेती आहे. त्यात द्राक्षे, डाळिंब, सीताफळ आहे. दीड कोटी लिटर क्षमतेची तीन शेततळी आहेत. प्रवरा नदीवरून पाणी आणण्यासाठी नऊ वर्षांपूर्वी पाइपलाइन उभारली. पाण्याचा योग्य संचय व अपव्यय टाळण्यासाठी शेततळे, ठिबक, पाचटाचे मल्चिंग आदींचा वापर करतो. आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो आहे. 
संपर्क- अरुण फापळे 
८७८८२०००३१ 

आम्ही तिघा मित्रांमध्ये पाइपलाइन उभारून पाणी आणले. त्यासाठी सुमारे ७५ लाख रुपयांचा खर्च केला. तीन शेततळी असून, १३ एकर शेती त्याआधारे करतो. आर्थिक स्तर उंचावल्याने कुटुंब समाधानी आहे. 
-कारभारी गाडे 
संपर्क ९९६०१२१५०९ 

पन्नास एकरांत कांदा, वांगी, टोमॅटो, डाळिंब अशी पिके घेतो. पाण्याचे योग्य व्यवस्थापन करतो. आज उत्पन्नात तिपटीने वाढ झाली आहे. आम्ही चारही बंधूंनी स्वतंत्र टुमदार घरे उभारली आहेत. 
-पोपट यशवंत नेहे 
संपर्क- ७७५६०२१६७३ 

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
शेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...
‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...
आले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...
क्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...
पूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...
राज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...
‘दावणीची दौलत’ चाऱ्याअभावी खचली; दक्षिण...कोल्हापूर/ सांगली : बारमाही पाण्याने भरलेल्या...
विदर्भ, कोकणात पावसाची शक्यतापुणे : पावसाने उघडीप दिल्याने राज्याच्या तापमानात...
पूरग्रस्त भागात जनावरांना न्यूमोनिया, ...पुणे : सततचा पाऊस आणि पुराच्या पाण्यात भिजल्याने...
पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील...मुंबई : पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील नुकसानावर...
अण्वस्त्रांविषयी वाचाळता कशासाठी? अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या (नो फर्स्ट...
कृषी परिवर्तनाची नांदीनरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या...
कृषी ‘एमएस्सी’ प्रवेशात भेदभाव नको:...पुणे  : गुणवत्ता यादीत असूनही पदव्युत्तर (...
जमीन मोजणीच्या नोटिसा झाल्या डिजिटल पुणे : राज्यातील तलाठी कार्यालयांकडील जमीन...
सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यात...सांगली ः जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत...
महापुराच्या पाण्याने कृष्णा-कोयनेचा...कऱ्हाड, जि. सातारा : कृष्णा-कोयना नद्यांना...
पन्नास हजारांवर पशुधन डोळ्यांदेखत गेले...कोल्हापूर/सांगली : शेतकऱ्यांच्या ...
सांगली : पूरबाधीत सहकारी सोसायट्यांना ‘...सांगली ः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने राज्यात...
कृत्रिम पावसाच्या नुसत्याच अवकाशात...सोलापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना...