थंडी, आर्द्रतेमध्ये भुरीचा धोका वाढण्याची शक्यता

कॅनॉपीमध्ये पानाच्या मागे राहिलेल्या घडावर बुरशीनाशक न पोहोचल्यामुळे भुरी वाढते.
कॅनॉपीमध्ये पानाच्या मागे राहिलेल्या घडावर बुरशीनाशक न पोहोचल्यामुळे भुरी वाढते.

सर्व द्राक्ष विभागांमध्ये येत्या सात-आठ दिवसांमध्ये थंडीची लाट कायम रहाणार आहे. बऱ्याच ठिकाणी रात्रीचे तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी अधिक प्रमाणात राहील. सांगली, सोलापूरच्या बऱ्याच भागांमध्ये वातावरण आठवडाभर अधूनमधून ढगाळ होण्याची शक्यता आहे. 

  • पुणे विभागातील काही भाग, सांगली व सोलापूरच्या काही भागांमध्ये २४ आणि २५ तारखेला एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
  • नाशिक भागामध्ये रविवार, सोमवारपासून वातावरण ढगाळ होण्याची शक्यता आहे. ज्या भागामध्ये वातावरण निरभ्र राहते, त्या भागामध्ये रात्रीचे तापमान जास्त कमी होण्याची शक्यता असते. तर ढगाळ वातावरण रात्रीच्या वेळी राहिल्यास रात्रीच्या तापमानामध्ये २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असते. 
  • सर्वसाधारणपणे ढगाळ वातावरण, सकाळी वाढणारी आर्द्रता व दुपारचे २५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढणारे तापमान या घटकांमुळे भुरीचा धोका जास्त वाढतो. भुरीचे नियंत्रण योग्य न झाल्यास जास्त कॅनोपी असलेल्या बागांमध्ये किंवा कॅनोपीमध्ये लपलेल्या घडांवर भुरी वेगाने बीजाणू तयार करते. भुरीचा प्रसार वेगाने होऊ शकतो.
  • बागेमध्ये कॅनोपी विरळ केल्याने त्यामागे लपून राहिलेले घड कॅनोपीच्या बाहेर येतील, त्यामुळे घडावर फवारणी योग्य पद्धतीने होईल. 
  • बहुतांशी बागा फळछाटणीच्या ६० ते ६५ दिवसांच्या पुढे आहेत, या परिस्थितीमध्ये भुरीच्या नियंत्रणासाठी सल्फर (८० डब्ल्यूजी) दीड ते दोन ग्रॅम प्रतिलिटर प्रमाणात फवारण्याकडे प्राधान्य द्यावे. 
  • ज्या बागांमध्ये आंतरप्रवाही बुरशीनाशके वापरलेली नाहीत व फक्त सल्फर वापरलेले आहे, अशा बागांमध्ये भुरीच्या जैविक नियंत्रणासाठी उपयुक्त असलेली अॅिम्पलोमायसिस ही बुरशी किंवा ट्रायकोडर्मा फवारणीद्वारे वापरणे शक्य आहे. विशेषतः ज्या ठिकाणी धुके पडते व जास्त आर्द्रता राहते अशा बागांमध्ये थंडीच्या दिवसात अॅिम्पलोमायसिस ५ ते १० मिलि प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारल्यास भुरीचे चांगले नियंत्रण होऊ शकते. 
  •  बागेच्या बाहेरील भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची तणे वाढलेली असल्यास आणि त्यावर भुरी वाढलेली असल्यास अशा तणांवरही अॅिम्पलोमायसिस फवारावे. अशा तणांवर वाढलेल्या भुरीवर अॅिम्पलोमायसिस बुरशी वेगाने वाढते. अॅिम्पलोमायसिसचे बीजाणू मोठ्या प्रमाणात तयार होऊन, ते हवेद्वारे जवळपासच्या बागेमध्ये पोचतात. परिणामी भुरीच्या नियंत्रणास मदत होते. बागेमध्ये फवारलेल्या अॅिम्पलोमायसिसपेक्षा बागेजवळच्या तणांवर वाढलेले अॅम्पिलोमायसिस बुरशीचे बिजाणू कार्यक्षम असतात. 
  • वाढत्या थंडीचा परिणाम

  • थंडीच्या दिवसात अचानक जास्त थंडी वाढल्यास मण्यात पाणी भरण्याच्या जवळपास असलेल्या बागांमध्ये जास्त पाणी दिल्यास मण्याचे क्रॅकिंग होऊ शकते.
  • थंडीमुळे पानातून होणाऱ्या बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला असतो. अशावेळी जास्त पाणी दिल्यास ते मण्याकडे जाऊन त्याचे क्रॅकिंग होते. यासाठी विशेष करून सिंचनासाठीच्या पाण्याच्या प्रमाणाकडे विशेष लक्ष द्यावे. प्रमाणातच पाणी दिले जाईल, याची खात्री करावी. 
  • पहाटेचे तापमान काही वेळासाठी चार अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास उकड्यासारख्या विकृती घडामध्ये येऊ शकतात. 
  • हलक्या जमिनी किंवा माळरानावरील बागांमध्ये पहाटे तापमान अचानक कमी होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर सकाळी पडणारे प्रखर ऊन मण्यांचे तापमान जास्त प्रमाणात वाढवू शकते. रात्री व दुपारच्या वातावरणातील फरकामुळे मणी पिवळे पडणे व उकड्यासारख्या विकृती वाढणे जास्त प्रमाणात दिसते. उकड्यासारखी लक्षणे भर थंडीमध्ये दिसत नाहीत. ते थंडी संपल्यानंतर दिसू लागतात. म्हणून जिथे थंडीला सुरवात झाली आहे, तिथे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. 
  • प्रतिबंधात्मक उपाययोजना

  • पोटॅशिअम कमतरता होऊ न देण्यासाठी मोनो पोटॅशिअम फॉस्फेट (०-५२-३४) किंवा एसओपी (०-०-५०) दोन ते तीन ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावे. ज्या बागांमध्ये पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फरस अॅसिड फवारलेले आहे, तिथे याची गरज भासणार नाही. कारण त्यामध्ये ३४ टक्क्यांपर्यंत पोटॅश असते. पोटॅशिअम कमतरता असलेल्या बागेमध्ये भुरीचा प्रादुर्भाव जास्त होतो. 
  • ज्या बागांमध्ये मणी बऱ्यापैकी वाढत आहे, अशा बागेमध्ये कायटोसॅन २ ते ३ मिलि प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावे. कायटोसॅनमुळे भुरीचा प्रादुर्भाव होत नाही. सल्फर वापरलेले असल्यास कायटोसॅनमुळे बुरशीनाशकांइतकेच चांगले निष्कर्ष मिळतात. कायटोसॅनने क्रॅकिंग होत नाही. तसेच थंडीपासूनही संरक्षण होते. कायटोसॅन फवारलेल्या मण्यामध्ये अॅिम्पलोमायसिस व ट्रायकोडर्मा या जैविक नियंत्रणासाठीच्या बुरशी जास्त चांगले कार्य करतात. 
  • जास्त थंडी किंवा त्यापाठोपाठ येणारे उबदार तापमान या दोन्हीपासून सिलिकॉन झाडाला संरक्षण देते. कमी तापमानामध्ये चांगल्या रीतीने काम करण्याची शक्ती देते. सर्वसाधारपणे सिलिकॉन झाडांमध्ये कमी असते. सॅलिसिलीक अॅसिड असलेले फॉर्म्युलेशन शिफारशीत मात्रेमध्ये फवारणीसाठी वापरल्यास झाडाला त्वरित सिलिकॉन मिळते. झाडांची थंडीसाठी प्रतिकारशक्ती वाढते. परिणामी उकड्यासारख्या विकृती सहजासहजी होणार नाहीत.
  • ०२० -२६९५६००१ (संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com