ढगाळ हवामानासह धुके, थंडीच्या प्रमाणात वाढ होईल

आठवड्याचे हवामान
आठवड्याचे हवामान

महाराष्ट्रासह संपूर्ण भारतावर हवामान बदलाचा प्रभाव जाणवत असून थंडीची तीव्रता अद्यापही वाढताना दिसत नाही. हिंदी महासागरावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन वादळी वारे नैऋत्य दिशेकडून २३ डिसेंबर रोजी प्रवेश करून रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांच्या भागातून पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, विदर्भाकडे मोठ्या प्रमाणावर ढग आणतील व ढगाळ वातावरण तयार करतील.

२४ डिसेंबर रोजी विदर्भ भागावरही ढगाळ वातावरण राहील. त्यातूनच अल्पशा पावसाची शक्‍यता या भागात निर्माण होणे शक्‍य आहे. सकाळी काही भागांत धुक्‍याच्या प्रमाणात वाढ होईल. महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब संपूर्ण आठवडाभर राहील. त्यामुळे थंडीचे प्रमाण चांगले राहील. ही स्थिती २७ डिसेंबरपर्यंत कायम राहील. कोकणात किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस, उत्तर महाराष्ट्रात १७ ते १८ अंश सेल्सिअस, मराठवाड्यात १५ ते १८ अंश सेल्सिअस; विदर्भात १३ ते १६ अंश सेल्सिअस तर पश्‍चिम महाराष्ट्रात १६ ते १९ अंश सेल्सिअस राहील. 

उत्तर भारत ः काश्‍मीर भागात बर्फवृष्टी सुरूच राहील. दिल्ली, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश भागांवर हवामान ढगाळ राहून २३ ते २५ डिसेंबर व त्यापुढील काळात अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. संपूर्ण उत्तर भारतातील भागात थंडीचे प्रमाण अधिक राहील. हवेचा दाब १०१६ ते १०१८ हेप्टापास्कल इतका अधिक राहील. तापमान घसरेल. 

दक्षिण भारत ः दक्षिण भारतावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहण्यामुळे कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा भागांत थंडीचे प्रमाण चांगले राहील. तथापि आठवडाअखेर केरळ व तमिळनाडू भागात पावसाची शक्‍यता राहील. 

कोकण  रायगड व ठाणे जिल्ह्यांत कमाल तापमान घसरेल व ते ३१ अंश सेल्सिअस राहील. तर रत्नागिरी जिल्ह्यात ते ३४ अंश सेल्सिअस राहील व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. याउलट सिंधुदुर्ग जिल्ह्यात व रत्नागिरी जिल्ह्यांत किमान तापमानात घसरण होईल व ते २० ते २१ अंश सेल्सिअस राहील. मात्र, रायगड व ठाणे जिल्ह्यांत ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. हिंदी महासागराकडून अरबी समुद्राच्या उत्तर दिशेने वादळी वारे व ढग वाहत येऊन रत्नागिरी जिल्ह्यातून ही सर्व ढगांची दाटी प्रवेश करेल व तेथून पुढे पुणे, नाशिक, नगर या जिल्ह्यांत २३ डिसेंबर रोजी प्रवेश करतील व अल्पशा पावसाची शक्‍यता निर्माण करतील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६४ ते ८० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३८ ते ४० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ५ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. 

उत्तर महाराष्ट्र  धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत किमाल तापमानात घसरण होईल व ते २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. जळगाव व नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक व नंदूरबार जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील; तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ते १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४९ ते ५६ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३२ ते ३५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ७ किलोमीटर राहील. या आठवड्यात दिनांक २३ व २४ डिसेंबर रोजी पावसाची शक्‍यता आहे. 

मराठवाडा  जालना, बीड व औरंगाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान घसरेल व ते २९ अंश सेल्सिअस राहील. लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील; तर उस्मानाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. तर औरंगाबाद जिल्ह्यात ते १६ अंश सेल्सिअस राहील. उर्वरित सर्वच नांदेड, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ६८ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ३७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १२ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील. वातावरण ढगाळ राहून अल्पशा पावसाची शक्‍यता निर्माण करेल. 

पश्‍चिम विदर्भ   बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत कमाल तापमानात घसरण होऊन ते २६ अंश सेल्सिअस राहील. तर अमरावती जिल्ह्यात ते २७ अंश सेल्सिअस राहील आणि वाशीम जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमानातही घसरण होऊन अमरावती जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस राहील. तर बुलडाणा, वाशीम व अकोला जिल्ह्यांत ते १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७५ ते ८० टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५५ टक्के राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. 

मध्य विदर्भ  नागपूर जिल्ह्यात कमाल तापमानात घसरण होऊन ते २६ अंश सेल्सिअस राहील तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ते २७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमानात घसरण होईल व यवतमाळ जिल्ह्यात ते १४ अंश सेल्सिअस राहील तर वर्धा न नागपूर जिल्ह्यांत ते १५ ते १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत ७५ टक्के राहील; तर वर्धा जिल्ह्यात ७८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ५० टक्के राहील तर नागपूर जिल्ह्यात ५५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा यवतमाळ जिल्ह्यात आग्नेयेकडून वर्धा जिल्ह्यात पूर्वेकडून तर नागपूर जिल्ह्यात ईशान्येकडून राहील.  पूर्व विदर्भ  चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस राहील तर गडचिरोली जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत किमान तापमान १३ ते १४ अंश सेल्सिअस राहील तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आद्रता ८० ते ८५ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून भंडारा जिल्ह्यात ईशान्येकडून तर गोंदिया जिल्ह्यात पूर्वेकडून राहील. 

दक्षिण - पश्‍चिम महाराष्ट्र  सातारा जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, कोल्हापूर, पुणे, नगर या जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस तर सांगली जिल्ह्यात ३२ अंश व सोलापूर जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. नगर व सातारा जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस, पुणे जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस, सांगली जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस व कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आद्रता पुणे व नगर जिल्ह्यांत ५५ ते ५८ टक्के राहील. तर कोल्हापूर जिल्ह्यात ७५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३६ ते ३८ टक्के राहील. सोलापूर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १२ किलोमीटर राहील तर उर्वरित जिल्ह्यात ४ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने आग्नेयेकडून व कोल्हापूर जिल्ह्यात ईशान्येकडून राहील.  कृषी सल्ला ः 

  • उघड्यावर साठवलेले धान्य ताडपत्रीने झाकून ठेवावे. २३ ते २५ डिसेंबर दरम्यान हवामान बदल जाणवतील. 
  • ऊस पिकाला गरजेनुसार पाणी द्यावे. 
  •  हरभरा पिकाला फुले येण्याच्या अवस्थेत व घाटे भरण्याच्या अवस्थेत पाणी द्यावे. 
  • रब्बी हंगामात लागवड केलेल्या ऊस पिकात कांदा, फ्लॉवर, कोबी, झेंडू ही आंतरपिके घ्यावीत. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com