वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत मिळवली ओळख, मैद्याच्या ऐवजी ज्वारी, नाचणीचा आकर्षक केक 

मनिषाताईंनी तयार केलेले आकर्षक केक
मनिषाताईंनी तयार केलेले आकर्षक केक

औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी वैशिष्ट्यपूर्ण प्रकियायुक्त (मूल्यवर्धित) पदार्थांच्या निर्मितीत आपली वेगळी ओळख तयार केली आहे. मैद्याच्या ऐवजी ज्वारी, गव्हाच्या पिठापासून केक, शेवयाचे पाच प्रकार, सुमारे २२ प्रकारचे पापड अशी विविधता त्यांनी जपली आहे. मागणी जास्त मात्र पुरवठा कमी असलेला हा व्यवसाय आता विस्तारण्याकडे मनीषाताईंची वाटचाल सुरू झाली आहे.  औरंगाबाद येथे राहणाऱ्या सौ. मनीषा संतोष चव्हाण अनेक वर्षांपासून अन्न प्रक्रिया उद्योगात कार्यरत आहेत. त्यांचे पती बॅंकेत नोकरी करतात. लग्न झाल्यानंतर आपणही स्वतंत्र उद्योग सुरू करावा असे त्यांना वाटायचे. दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. बाजारात त्यांना छोटे दळण यंत्र पाहण्यास मिळाले. त्याची अधिक चौकशी करून त्याची खरेदीही केली. त्यावर डाळी भरडणे, पीठ दळण्याचा उद्योग सुरू केला. हळूहळू त्यात जम बसू लागला. मग खारीक, खोबरे, मिरची, मसाला कांडप यंत्र यांची खरेदी केली. व्यवसाय वाढू लागला तसे अन्य पदार्थ निर्मितीचे पर्याय समोर येऊ लागले. त्यातून सुमारे नऊ वर्षांच्या काळात त्यांनी स्वतःचे खाद्य प्रक्रिया कौशल्य व कसब वापरून वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांची निर्मिती करण्यात यश मिळवले. औरंगाबाद शहरात त्यांच्या विविध पदार्थांना भरपूर मागणी असून, पुरवठा करण्यात आपणच कमी पडत असल्याचे मनीषाताईंनी सांगितले.  मनीषाताईंचा प्रक्रिया उद्योग- दृष्टिक्षेपात 

  • आपल्या घरीच होते सर्व उत्पादन 
  • उत्पादने- पापडाचे सुमारे २२ प्रकार 
  • यात उडीद, मुगाबरोबरच गहू, मका, सोयाबीन, पुदिना, काशीफळ, दुधी भोपळा, पालक, कोथिंबीर, लसूण. करडई, बीट, शेवग्याच्या पानांचे पापड अशी विविधता 
  • शेवया- पाच प्रकार- हुलगा, मिक्स डाळी, गहू आदींपासून 
  • मसाले- सुमारे ३३ प्रकारचे मसाले बनविण्याची क्षमता. मात्र खानदेशी व कांदा मसाला प्रामुख्याने 
  • सुमारे सहा ते सात महिला कामगार १० वर्षांपासून कार्यरत 
  • सहा विविध मशिनरी. उदा. शेवया यंत्र, गहू चीक यंत्र, ग्राइंडर, पापड निर्मिती यंत्र आदी. 
  • विक्री 

  • प्रति दिन पापड ३० किलो, तर शेवया ७०-८० किलो प्रमाणात अशी विक्री होते. 
  • जास्त ‘ऑर्डर’ मिळाल्यास उत्पादन वाढवावे लागते. थेट ग्राहकांव्यतिरिक्त स्थानिक विक्रेते देखील मनीषाताईंकडून विविध उत्पादने घेऊन जातात. त्यावर स्वतःचे लेबल लावून देखील विकतात. 
  • मनीषाताई विविध प्रदर्शनांमधूनही विक्री करतात. या वेळी तीन दिवसांमध्ये सुमारे ७० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत देखील उत्पन्न मिळू शकते. 
  • वर्षाला सुमारे साडेतीन लाख रुपयांहून अधिक उलाढाल होते. 
  • आजपर्यंत बहतांश विक्री माऊथ पब्लिसिटीवरच झाल्याचे मनीषाताई सांगतात. शहरात अन्यत्र शक्यतो न मिळणारे ‘हटके’ पदार्थ तयार करण्यावर भर तसेच उत्पादनांचा उत्कृष्ट दर्जा ही आपली वैशिष्ट्ये असल्याचे त्या सांगतात. 
  • उत्पादनांसाठी ‘फूड सेफ्टी’ क्षेत्रातील संस्थेचा परवाना घेतल्याने ग्राहकांमध्ये विश्‍वास निर्माण करणे सोपे झाले. 
  • येत्या काळात उत्पादनांची मागणी, अपरी जागा हे प्रश्‍न लक्षात घेता दोन हजार चौरस फूट आकाराची जागा खरेदी केली आहे. काळानुसार नव्या क्षमतेच्या यंत्रांचीही खरेदी केली जाणार असल्याचे मनीषाताई सांगतात. 
  • मैदाविहरित पौष्टिक केक  वाढदिवस, लग्नसमारंभ आदींच्या निमित्ताने केक हा अविभाज्य घटक झाला आहे. केककडे आहारतज्ज्ञ जंकफूड म्हणून पाहतात. यात मैद्याचा मुख्य वापर केला जातो. अंड्यांचाही वापर होतो. मात्र मनीषाताईंनी या केकला पौष्टिक, आरोग्यवर्धक अशा केकची निर्मिती केली आहे. यात त्यांनी मैद्याऐवजी ज्वारी, नाचणी, गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे. हा केक खाल्यानंतर तो मैद्याचा आहे की ज्वारीच्या पिठाचा आहे हे अजिबात ओळखू येत नाही. या केकना शहरातून चांगली मागणी असल्याचे मनीषाताई सांगतात. प्रति किलो ५०० रुपयांप्रमाणे त्याची विक्री होते. विशेष म्हणजे त्यात अंड्यांचा वापर त्या करीत नाहीत. त्या सांगतात, की अंडीयुक्त केकमध्ये मार्जीन जास्त असते. या मागचे कारण म्हणजे उत्पादन खर्च कमी असतो. मैद्यात अंडी मिसळली की केक जास्त फुलतो. स्पंजप्रमाणे तो मऊ दिसतो.  केकचे व्यावसायिक प्रशिक्षण  मनीषाताईंनी औरंगाबाद येथील तारांकित हॉटेलमध्ये केक तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले आहे.  सुरवातीच्या काळात मैद्यापासून केक बनविण्याचा एक वर्ष व्यवसाय केल्यानंतर त्यांचा संपर्क औरंगाबाद  येथील कृषी विज्ञान केंद्राशी आला. केंद्रातील या विषयातील तज्ज्ञ दीप्ती पाडगावकर यांनी  त्यांना आरोग्यास पोषक अशा ज्वारी व नाचणीच्या पिठापासून केक बनविण्याचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर आजगायत त्याच पद्धतीने निर्मिती केली जाते. ओळखू येत नाही.  केकचे विविध प्रकार  चॉकलेट, पायनॅपल, मँगो, बटर स्कॉच, व्हॅनीला आदी ८ ते ९ प्रकारचे केक मनीषाताईं बनवितात. केकवरील सजावटही त्या उत्कृष्ट करतात. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे बार्बी डॉल, मिकी माउस, डोरेमॉन आदींच्या आकारातील हे केक अत्यंत आकर्षक दिसतात.  अर्थात, काही केकमध्ये मैद्याचा वापर काही प्रमाणात करावा लागतो असेही त्यांनी सांगितले. 

    प्रतिक्रिया  मैद्याचा केक वा तत्सम परार्थ खाल्ल्याने शरीर आजारांचे माहेरघर बनते. त्याचे प्रतिकूल परिणाम  टाळण्यासाठीच आम्ही आरोग्यदायी अशा ज्वारी, नाचणीच्या पिठापासून केक तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.  -दीप्ती पाटगावकर  कार्यक्रम समन्वयक, के.व्ही.के. औरंगाबाद  माझ्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त मी मनीषाताईंकडून ज्वारीच्या पिठापासून तयार  केलेला केक नेला. तो अत्यंत रुचकर होता. हुबेहूब मैद्यासारखाच तो वाटत होता. माझे  सासू सासरे केक खात नाहीत. परंतु हा केक ज्वारीच्या पिठापासून तयार केला आहे असे  सांगितल्यानंतर त्यांनीही तो आवडीने खाल्ला.  -अनिता जिंतूरकर, ग्राहक  संपर्क : सौ. मनीषा चव्हाण – ९६५७६३२८९१  दीप्ती पाटगावकर – ९४०४९८८७७०  (लेखक औरंगाबाद येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com