सिंचनाची गंगा अवतरली बांधावर

सिंचनाची गंगा अवतरली बांधावर
सिंचनाची गंगा अवतरली बांधावर

यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसानंतर नोव्हेंबरमध्ये खळाळत्या ओढ्यांवर सुमारे पाचहजार वनराई बंधारे बांधण्याचे काम तडीस नेले. त्याच प्रेरणेतून पुसद तालुक्यातील वेणी खुर्द गावातील शेतकऱ्यांनीही एकीचे बळ दाखवत वाहत्या ओढ्यावर आठ बंधारे बांधले. रब्बी व उन्हाळी पिकांसाठी पाण्याची शाश्‍वती निर्माण करीत सिंचनाची गंगा बांधावर आणली आहे.

यंदाच्या ऑक्टोबरमध्ये अवकाळी पावसाने खरीप पिकांचे नुकसान झाले. त्याच वेळी नदी, नाले, ओहोळ वाहते झाले. हीच बाब हेरून नाले-ओढ्यांवर श्रमदान व लोकसहभागातून वनराई बंधारे उभारण्याची संकल्पना यवतमाळचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी अंमलात आणण्याचे ठरवले.  पुसदपासून सात किलोमीटरवरील वेणी खुर्द गावातून ओढा वाहतो. त्यावर कृषी विभागाने वनराई बंधारा बांधला. त्यात गावकऱ्यांनीही सहभाग घेतला. पाणीटंचाईने पोळलेल्या गावकऱ्यांना बंधाऱ्यातील पाणीसाठा पाहून दिलासा मिळाला. बंधाऱ्याची उपयुक्तता लक्षात घेऊन गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कृषी प्रगती, सिद्धेश्वर, भाऊराव व युवा शेतकऱ्यांचा महादेव अशा पाच पुरुष शेतकरी बचत गटांनी पुढाकार घेतला. स्वखर्चाने पोकलेन यंत्राचा वापर करत वाहत्या ओढ्यावर कमी वेळेत आठ बंधारे उभारण्यात त्यांनी यश मिळवले. दोन महिला ग्रामसंघ, जिल्हा परिषद शाळांनाही बंधारे उभारण्यात हातभार लावला. सिंचनाची झाली सोय खळाळत्या प्रवाहाने सर्व बंधारे तुडुंब भरल्याने वेणी शिवारातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू उमटले. शिवारातील प्रत्येक विहिरीची पाणी पातळी वाढली असल्याने रब्बी तसेच उन्हाळी भुईमुगाचे पीक साधण्याचे नियोजन काहींनी केले आहे. हरभरा, गहू, मोहरी, ओवा, जवस आदींची लागवड काहींनी केली आहे. हळदीला तुषार सिंचनाने तर गव्हाला दांडपाणी दिले जात आहे. पल्लवित झाल्या आशा अमोल भोने यांनी संत्र्यात मिरचीचे आंतरपीक घेतले आहे. त्यांना चांगल्या आर्थिक लाभाची अपेक्षा आहे. गेल्यावर्षी पाणीटंचाईमुळे त्यांना गहू, हरभरा व उन्हाळी पिके घेता आली नव्हती. रवींद्र पुंड यांची तुती पाण्याअभावी सुकली होती. यंदा त्यांनी पुन्हा रेशीम शेती करण्याचा निश्चय केला आहे. गेल्या काही वर्षांत पुरेशा पावसाअभावी वेणीतील शेतकऱ्यांना भाजीपाला व रब्बी पिकांमध्ये मोठे नुकसान सहन करावे लागले. यंदा मात्र आशादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. वेणी गावात सुमारे ८० एकर भाजीपाला व त्यातही ४५ एकरांत मिरची घेण्यात येते. मल्चिंग व ड्रीपसारखे तंत्रज्ञान वापरले जाते. सर्वांचा हातभार जंगल, नदी, नाले, ओढे अशी नैसर्गिक संपदा मिळालेल्या यवतमाळ जिल्ह्यात नोव्हेंबरमध्ये वाहत्या ओढ्यांवर एकूण पाचहजार १८ वनराई बंधारे उभारले. यामध्ये जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. प्रशांत नाईक, तालुका कृषी अधिकारी समाधान धुळधुळे, कृषी सहायक एस. के. राठोड, सरपंच सुनिता चिपडे यांनी हातभार लावला. शासकीय यंत्रणा, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संघटना, बचत गट व ग्रामस्थांमुळेच ही मोहीम फत्ते झाली.   प्रतिक्रिया विहीर व बोअरवेलची पातळी वाढली. त्या आधारे हरभरा तीन एकर, गहू दोन एकर तर मोहरी-ओवा-जवस प्रत्येकी एक एकर अशी लागवड केली आहे. त्यापासून समाधानकारक उत्पन्न अपेक्षित आहे. काही दिवस बंद अवस्थेत असलेली रेशीम शेती पुन्हा सुरू करणार आहे. - रवींद्र पुंड, वेणी खुर्द ९७६७१७१०६६  . एक एकरात मिरची व १५ गुंठ्यांत टोमॅटो आहे. आत्तापर्यंत अडीच लाख रुपये हाती आले आहेत. - सुभाष खोंड, वेणी खुर्द विहिरीला मुबलक पाणी उपलब्ध झाल्यामुळे सोयाबीनच्या काढणीनंतर एक एकरात गहू घेतला. हळदीलाही पाण्याचा लाभ होत आहे. वेणीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार असून यंदा टँकरची आवश्यकता पडणार नाही. प्रमोद चिपडे, कृषी मित्र, वेणी खुर्द संपर्क ७७४४०७७२११ संत्र्याची सुमारे २०० झाडे आहेत. गेल्या वर्षी बाग वाचविण्यासाठी टँकरने पाणी द्यावे लागले. यंदा बंधाऱ्यामुळे विहिरीला वीस फूट पाणी असून उपसा अजिबात होत नाही. त्यामुळे टॅंकरची गरज उरली नाही. झालेल्या जलसंधारणामुळे आशा पल्लवित झाली आहे. - अमोल बाबुराव भोने, वेणी खुर्द   वेणीत पाणलोट योजनेचा लाभ यंदा दिसून येतो. वेणीच्या ओढ्यावर सिमेंट बंधारा आहे. खालील भागात कोल्हापुरी बंधारा शासनाने मंजूर केल्यास शेतकऱ्यांना कायमस्वरूपी लाभ होईल. - संदीप संजय भोने सचिव, एकात्मिक पाणलोट समिती, वेणी वेणी येथील शेतकरी बचत गटांनी बंधारे बांधण्यासाठी घेतलेला पुढाकार अन्य शेतकऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात वनराई बंधाऱ्यातून जलसंवर्धन व जलजागरण झाले ही आनंदाची बाब आहे. जलसंधारणातूनच समृद्धी नांदू शकेल या नव्या विश्वासाची पेरणी वेणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. - अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी तालुका निहाय उभारलेले बंधारे असे. कळंब-३१७, महागाव- २९३, आर्णी- २६२, पुसद- ४२३, दारव्हा- २८७, दिग्रस- २२१, वणी- ३०७, केळापूर- ३५८, नेर- २४४, बाभुळगाव- १९१, घाटंजी- २६७, यवतमाळ - ३३१, झरी-जामणी-३००, राळेगाव-३४२, मारेगाव- ५७१, उमरखेड- ३०४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com