ऑयस्टर मशरूम निर्मितीसह तयार केले मार्केट

संकेत सोळंके यांनी मशरूम निर्मिती व्यवसाय सुरू केला आहे.
संकेत सोळंके यांनी मशरूम निर्मिती व्यवसाय सुरू केला आहे.

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील अभियंता असलेल्या संकेत सोळंके या युवकाने ‘ऑयस्टर मशरूम’ (धिंगरी अळिंबी) निर्मिती सुरू केली आहे. ‘कमी गुंतवणूक व मजूर बळात ‘इनडोअर’ पद्धतीने हा व्‍यवसाय करणे शक्य असल्याचे संकेत म्हणतो. मशरूमला आपल्या भागात मागणी व मार्केट तयार करण्याचा त्याचा प्रयत्न स्तुत्य ठरत आहे.   अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुका प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी ओळखला जातो. मूर्तिजापूर येथील संकेत श्रीकृष्ण सोळंके याने पुणे येथून संगणक अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्याचे संपूर्ण कुटुंब सुशिक्षित आहे. संकेतच्या आई आरोग्य खात्यातून विस्तार अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाल्या आहेत. वडील निवृत्त माध्यमिक शिक्षक आहेत. पत्नीचेही बीएसस्सीपर्यंत शिक्षण झाले आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी कृषी क्षेत्राशी थेट निगडित नसली तरी शेतीत उल्लेखनीय काहीतरी करण्याची संकेतची धडपड होती. मशरूम व्यवसायाची निवड संकेतने पुणे व नागपूर असा एकूण तीन वर्षे नोकरीचा अनुभव घेतला. घरची तीन ते चार एकर शेती आहे. आपल्या शिक्षणाचा उपयोग करून घरची शेतीच ‘डेव्हलप’ करावी असे त्याने ठरवले. नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर पहिले काही दिवस शेतीचा बारकाईने अभ्यास केला. कोरडवाहू शेतीत तूर, सोयाबीन, ज्वारी अशी पिके घेतली जायची. दोन वर्षे म्हणावे तसे उत्पादन आले नाही. पहिल्या वर्षी कोरडा तर दुसऱ्या वर्षी ओला दुष्काळ अनुभवला. शेतीला पूरक व्यवसाय असेल तरच तो फायदेशीर ठरू शकते या विचाराला चालना मिळाली. तसा शोध सुरू झाला. त्यातून मशरूम (अळिंबी) व्यवसाय आदर्श वाटला. या व्यवसायावर हवामानाचा परिणाम फारसा होत नाही. कमी जागेत, कमी पाण्यावर, कमी गुंतवणुकीत तो सुरू करणे शक्य होते. व्यवसायाची पूर्वतयारी सर्व बाजूंनी विचार करून व्यवसायाची निवड केल्यानंतर काही मशरूम निर्मिती प्रकल्पांना भेटी दिल्या. प्रशिक्षणासाठी दुर्गापूर (जि. अमरावती) येथील कृषी विज्ञान केंद्र गाठले. येथे एकदिवसीय प्रशिक्षण घेतले. त्याचबरोबर पंतप्रधान कौशल विकास योजनेंतर्गत प्रशिक्षणाबद्दल माहिती मिळाली. सुमारे ४५ दिवसांच्या या प्रशिक्षणात भारतासह अन्य देशांमध्ये उत्पादित केल्या जाणाऱ्या मशरूम्सची ओळख, माहिती, उत्पादन व उत्पादनपश्चात प्रक्रियांचा अभ्यास केला. आता अनुभवसंपन्न झालेला संकेत हा बचत गट, शेतकरी आत्महत्या केलेल्या कुटुंबांतील महिलांना या व्यवसायाचे प्रशिक्षण देतो. प्रकल्प उभारणी व व्यवसाय वैशिष्ट्ये

  • आज संकेत यांच्या मशरूम निर्मिती प्रकल्पाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. पहिल्या वर्षी उत्पादकता वाढवण्यासाठी विविध प्रयोग केले. कमी वेळात जास्त उत्पादन घेण्यासाठी आवश्‍यक घटकांची
  • माहिती लेखी स्वरूपात जमा केली.
  • प्रति बॅच ५० किलो बियाण्याची (स्पॉन) असते. ती दोन महिने चालते.
  • केव्हीके, दुर्गापूर येथून स्पॉन घेण्यात येते.
  • यात सुरुवातीच्या १० ते २० दिवसांचा काळ (इनक्युबेशन पिरियड) अत्यंत महत्त्वाचा असतो. याच काळात रोग वा अन्य संसर्गाची शक्यता जास्त असते.
  • या अनुषंगाने इनक्युबेशन रूम तयार केली. आपल्या अभियांत्रिकीतील ज्ञानाचा उपयोग करून
  • स्वयंचलित (ऑटोमेशन) यंत्रणा उभारली. यात तापमान २४ पेक्षा जास्त झाले तर फॉगर्स आपोआप सुरू होतात. आर्द्रता ७० ते ९० टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याचे ही यंत्रणा करते.
  •  बेडसचे स्थलांतर सुमारे २० दिवसांनंतर बेड पांढरे झाल्यानंतर ते पुरेसा सूर्यप्रकाश व खेळत्या हवेच्या खोलीत स्थलांतरित केले जातात. काही दिवसात त्यावर कोंब दिसू लागतात. मग दोन ते तीन दिवसांत मशरूम काढणीसाठी तयार होतात. अशा प्रकारे पुढील एक महिन्याच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने मशरूम काढणी होते.   उत्पादन, विक्री

  • प्रति १० बेडसाठी खर्च सुमारे ६०० रुपयांपर्यंत येतो.
  • दिवसाला सरासरी ८ ते १० किलो उत्पादन.
  • प्रति बॅच ताजे मशरूम ४०० ते ४५० किलो तर सुकवलेले ४० ते ५० किलो मिळते.
  • दररोज ८ ते १० किलो प्रमाणात ताज्या मशरूमची विक्री २०० रुपये प्रति किलो दराने भाजीपाला व्यावसायिकांना होते.
  • उर्वरित मशरूम कडक उन्हात सुकवून हवाबंद पॅकिंग करून ठेवण्यात येते. असे मशरूम ६ ते ८ महिने टिकू शकते असे संकेत सांगतात. त्याची विक्री प्रक्रिया व्यावसायिकांना किलोला ५०० रुपये ते त्यापुढील दरांत होते.
  • मासिक उत्पन्न- खर्च वजा जाता सुमारे ३० हजार रुपये.
  • प्रति बॅच खर्च- सुमारे सात हजार रुपये.
  • विक्री- मूर्तिजापूर, अकोला व अमरावती
  • हा व्यवसाय ऑगस्ट ते मार्च- एप्रिल या कालावधीत चालतो. उन्हाळा वा पावसाळा मिळून चार महिने तो बंद ठेवावा लागतो.
  • मार्केटिंगसाठी प्रयत्न पुणे- मुंबईप्रमाणे मशरूमला अकोला शहरात अद्याप सहज मार्केट तयार झालेले नाही. त्यामुळे संकेत यांना ते विकसित करण्यासाठी प्रयास घ्यावे लागले. त्यातील पोषणमूल्यांबाबत पटवून देण्यास सुरुवात केली. मशरूमची आठवडी बाजारात विक्री सुरू केली. यासाठी मूर्तिजापूर येथील भाजी विक्रेत्यांची मदत घेतली. हॉटेलमध्ये जाऊन त्याचे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न केला. बचत गट व महिलांच्या विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांना हाताशी धरून प्रबोधन सुरू केले. शाळा, कॉलेजमधे जाऊन शिक्षक व विद्यार्थ्यांना मशरूम उद्योगाची ओळख व औद्योगिक सहलींचे आयोजन करण्यात आले. कृषी विभागातर्फे शेतकरी भेटींचे आयोजन करण्यात आले. प्रयोगशाळा सुरू करण्याचा मानस मशरूमचे उत्पादन घेतल्यानंतर त्या बेडवर गांडूळखत निर्मिती प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे. लवकरच बँक व कृषी विभागाच्या साहाय्याने नवीन उत्पादन केंद्रासोबत बीजनिर्मिती प्रयोगशाळा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरून मशरूम व्यावसायिकांना ताजे व किफायतशीर दरात मशरूम बीज (स्पॉन) उपलब्ध होईल. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा दौरा घेतला. त्यात संकेत यांच्या प्रकल्पाला भेट देण्यात आली. अधिकाऱ्यांनी हा व्यवसाय फायदेशीर असल्याचे जाणून घेतानाच सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. प्रबोधनाची गरज संकेत म्हणतो की, सर्वात उत्तम आहारामध्ये मशरूमचा समावेश होतो. त्यात विविध पोषक घटक आहेत. त्याविषयी अधिक प्रबोधन करण्याची गरज आहे. सुकवलेल्या मशरूमलाही चांगली मागणी आहे. संकेत श्रीकृष्ण सोळंके- ७८८७४४७६१६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com