मधमाशीपालनासह मधाचा ‘बिलिव्ह हनी’ ब्रॅंड 

मार्केटिंगची पद्धत आपल्याकडे मिळणाऱ्या विविध प्रकारांतील मधाचे आयुर्वेदिक गुणधर्म ग्राहकांना पटवून देण्याचे काम अनंत करतात. मधाची गुणवत्ताही पटवून देण्यात येते. त्यामुळेच चांगली मागणी येण्यास मदत मिळत असल्याचे अनंत सांगतात.
अनंत कुलकर्णी यांचे मधमाशीपालन
अनंत कुलकर्णी यांचे मधमाशीपालन

गणित विषयातून बीएस्सीची पदवी घेतलेल्या जालना येथील अनंत कुलकर्णी या पंचवीस वर्षीय तरुणाने मधमाशीपालन उद्योगात आश्‍वासक वाटचाल सुरू केली आहे. सध्या २२५ मधपेट्या त्याच्याकडे असून महाराष्ट्रासह अन्य राज्यांतही त्यांचे स्थलांतर तो व्यवसायाच्या मागणीनुसार करतो. 'बिलिव्ह हनी' हा मधाचा ब्रॅंड तयार करून थेट विक्रीसह ‘ऑनलाइन’ व ‘होम डिलिव्हरी’ स्वरूपातही विक्रीचे स्वरूप देत व्यवसायवृद्धी साधली आहे.  मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील पिंपरी गवळी (ता. मोताळा) येथील किशोर कुलकर्णी कुटुंब अनेक वर्षांपासून जालना येथे स्थायिक झाले आहे. गावाकडील १४ एकर शेती बटईने दिली आहे. किशोर यांचा मुलगा अनंत याने गणित विषयात बीएस्सीची पदवी घेतली. शेतीचीच आवड असल्याने त्याने याच विषयात पुढील करियर करायचे ठरवले.  मधमाशीपालनाचा शोध  मित्रांसमवेत राजस्थानातील कोटा येथे पर्यटनानिमित्त फिरत असताना आनंदच्या दृष्टीस मधमाशांच्या पेट्या पडल्या. कुतूहल म्हणून त्याविषयी माहिती जाणून घेतली. परागीभवन व मध अशा दोन्ही अंगांनी शेतकऱ्यांसाठी हा उद्योग फायदेशीर होऊ शकतो असे त्याच्या लक्षात आले. आपल्याही परागीभवन क्रियेअभावी पीक उत्पादनात फटका बसल्याचे त्याच्या लक्षात आले. अधिक अभ्यास केल्यानंतर हाच उद्योग आपण निवडावा या विचारापर्यंत तो आला.  प्रशिक्षण, प्रॅक्टीकलही  विचारांना मूर्त रूप देण्यासाठी अनंतने मधुमक्षिकापालनाविषयी माहिती संकलित करणे सुरू केले. आपल्या हवामानाला अनुकूल मधमाशांच्या जाती यांचा अभ्यास केला. त्यानंतर ॲपिस मेलिफेरा या युरोपियन मधमाशांची निवड केली. पुणे येथील केंद्रिय मधमाशी संशोधन प्रशिक्षण संस्थेतून (सीबीआरटीआय) पाच दिवसांचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर राजस्थानातील एका मधमाशीपालकाकडे काही दिवस राहून त्यातील ‘प्रॅक्टीकल’ शिक्षण घेतले.  सुरवातीचा अनुभव  अनंतने २०१५ मध्ये दीड लाख रुपयांची गुंतवणूक करून ३० मधुमक्षिका पेट्यांपासून उद्योगाला सुरवात केली. प्रशिक्षण घेतले असले तरी प्रत्यक्ष अनुभव नसल्याने केवळ १५ पेट्यांमध्येच मधमाशा शिल्लक राहिल्याचा अनुभव आला. त्यानंतर मात्र व्यवस्थापनातील त्रुटी व कमी पडत असलेले ज्ञान यात सुधारणा केली. सातत्य, चिकाटीतून अनुभवही जमेत येत गेला.  व्यवसायावर पकड  अनंतने चार वर्षांच्या काळात व्यवसायावर पकड मिळविली आहे. या व्यवसायातील सर्वात महत्त्वाचे काम असते ते म्हणजे मधमाशांसाठी पराग गोळा करण्याचे. त्यासाठी विविध पिकांच्या शोधात मधपेट्यांचे स्थलांतर करावे लागते. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश व राजस्थानात त्यासाठी नित्यनेमाने जाण्याचे परिश्रम अनंत यांनी केले. आता व्यवसायाचा विस्तार झाल्याने ही जबाबदारी आपल्या कर्मचाऱ्यांकडे देऊन अनंत मार्केटिंग, विक्री यात व्यस्त असतात.  अनंत यांचा मधमाशीपालन व्यवसाय 

  • मधमाशीपेट्या भाडेतत्त्वावर देतात. मधविक्री करतात. पेट्यांची विक्रीही करतात. 
  • सद्यस्थितीत २२५ मधपेट्या 
  • प्रति पेटीत साधारणत: ७ ते ९ हजार मधमाशा 
  • दर आठ दिवसांनी पेटीची होते तपासणी, पराग, राणीमाशी अंडी देते की नाही आदी बाबींची होते यात तपासणी. 
  • मकरंद येत नसल्यास साखर पाक देण्याची सोय 
  • मुंग्या, किडींपासून संरक्षणासाठी प्रतिबंधात्मक उपाय 
  • डाळिंब बागेत ठेवलेल्या पेटीपासून १४०० रुपये प्रति महिना भाडेशुल्क 
  •  चार व्यक्तींना कायमस्वरूपी रोजगार 
  • मधपेट्यांच्या वाहतुकीसाठी घेतले वाहन 
  • मधपेट्यांची ठिकाणे- जून ते ऑगस्ट महाराष्ट्र, 
  • ऑक्‍टोबर ते फेब्रुवारी- मार्च- राजस्थान, मध्य प्रदेश (पिके - ओवा, तुळशी, धने, मोहरी, सुबाभूळ आदी. 
  • मधाविषयी 

  • प्रति बॉक्‍समधून वर्षभरात २५ किलोपर्यंत मध मिळतो. 
  • मधाचा दर- ३०० ते ८०० रुपये प्रति किलो 
  • यात प्रकार- तुळशी, ओवा, मोहरी, सूर्यफूल, सुबाभूळ मध आदी. 
  • कोणतीही प्रक्रिया न केलेला, नैसर्गिक चव अखंड ठेवलेला मध 
  •  मार्केटिंग व्यवस्था  १) वेबसाईट  सुरवातीला मधाचा होलसेल पुरवठा करण्याचे प्रयत्न केले. आता pure and raw honey.com या वेबसाईटची (संकेतस्थळ) निर्मिती करून मार्केटिंगची संधी तयार केली आहे . ॲमेझोन या प्रसिद्ध ऑनलाईन सेवेतील व्यापारी कंपनीकडे नोंदणीकरण केले आहे.  २) होम डिलिव्हरी  खासगी कुरियर कंपनीची मदत घेऊन मधाची घरपोच सेवा अर्थात ‘होम डिलिव्हरी’ची सोय केली आहे.  ३) घरून थेट विक्री करण्यात येते. 

  • विक्री - वार्षिक 
  • मध - १०० किलोपर्यंत 
  • मधपेट्या - १५० पर्यंत. चारहजार रुपये प्रति पेटी दर. (मधमाशांच्या वसाहतीसह) 
  • मधपेट्यांच्या भाडेशुल्कातून कमाई  राज्यातील सुमारे ४०० ते ५०० शेतकरी अनंत यांच्या संपर्कात आहेत. औरंगाबाद, जालना, नगर, पुणे, सोलापूर, सांगली, नाशिक आदी जिल्ह्यांतील डाळिंब उत्पादक अनंतकडून मधपेट्या भाडेतत्त्वावर घेतात. सुमारे २०० ते २५० पेट्यांच्या या व्यवहारातून वर्षाला किमान चार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.  प्रतिक्रिया  तीन वर्षांपासून अनंत यांच्याकडून मधमाशांची पेटी घेतो. त्यांच्याकडून मधमाशांच्या जीवनशैलीविषयीही माहिती मिळाली. डाळिंबाच्या बागेत मधपेट्या ठेवण्यास सुरवात केल्यापासून परागीभवन सोपे झाले. त्यातून उत्पादनात २० ते २५ टक्के वाढ झाली.  -कचरूसिंग सांडूसिंग गोलवाल  हसनाबादवाडी, जि. औरंगाबाद.   संपर्क- अनंत कुलकर्णी - ९४२२२४२२४०   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com