प्रतिकूलतेवर मात करीत बटण मशरूमचा व्यवसाय

बटण मशरूमचे पॅकींग सुरू असताना
बटण मशरूमचे पॅकींग सुरू असताना

स्पर्धा परीक्षेतून हुलकावणी, त्यानंतर केळी रायपनिंग चेंबर व्यवसायात नुकसान, अशी संकटे आली. मात्र खचून न जाता मोठ्या हिमतीने तोंड देत पुणे जिल्ह्यातील आंधळगाव येथील आदिकराव बाबासाहेब कुसेकर यांनी बटन मशरूम निर्मिती सुरू करून कृषी उद्योगातील वेगळ्या वाटेची निवड केली आहे.  अत्याधुनिक तंत्रज्ञान, सर्व सुविधांनी युक्त या प्रकल्पातून महिन्याला सुमारे ४० टन मशरूमची निर्मिती होत आहे. ‘डायटर’ या ब्रॅंडद्वारे राज्यात व परराज्यात त्याला मार्केट देण्यास ते यशस्वी झाले आहेत.  पुणे जिल्ह्यातील शिरूर हा अवर्षणग्रस्त तालुका आहे. तालुक्यातील आंधळगाव येथील आदिक बाबासाहेब कुसेकर यांनी बीएस्सी (केमिस्ट्री) व एमएस्सीची (डिफेन्स ॲण्ड स्ट्रॅटेजिक) पदवी घेतली आहे. त्यांना खरे तर पोलिस दलात जायचे होते, त्यासाठीची स्पर्धा परीक्षा ते उत्तीर्ण झाले. मात्र पेपरफुटी व परीक्षा रद्द होण्याचे निर्णय यामुळे संधीपासून वंचित राहावे लागले. अखेर संयुक्त कुटुंबाची ४७ एकर शेती ते सांभाळू लागले. द्राक्ष, डाळिंब, कलिंगड, पपई, खरबूज, केळी, उसाचे उत्पादन सुरू केले. सर्व क्षेत्र ठिबकखाली आणले. सन २०१० मध्ये ३० ते ४० एकर क्षेत्र केळीखाली आणले. दरम्यान, ठिबक सिंचन साहित्य पुरविण्याचा व्यवसाय सुरू केला. शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून परिसरात केळीचे क्षेत्र वाढविले.  रायपनिंग चेंबर व्यवसायात अपयश  न्हावरा, शिरूर परिसरातील केळीचे क्षेत्र पाहता एक कोटी रुपये खर्च करून रायपनिंग चेंबर सुरू केले. सन २०१४ पर्यंत व्यवसाय चांगला सुरू होता. दरम्यानच्या काळात परिसरात छोटे रायपनिंग चेंबर्स सुरू झाले.  यातील स्पर्धेचा सामना करावा लागला. अखेर चेंबर बंद करणे भाग पडले. त्या वेळी सुमारे ५० लाख रुपयांचे मोठे नुकसान सोसावे लागले.  बटन मशरूम उद्योगाची वाट  पाठोपाठ आलेल्या संकटांमुळे आदिक निराश झाले, मात्र खचून गेले नाहीत. नव्या उमेदीने शेतीतील पूरक उद्योगांचा शोध सुरू केला. त्यातूनच रायपनिंग चेंबरसाठी वापरलेल्या यंत्रणेचा वापर बटन मशरूम निर्मितीसाठी करण्याचा शोध लागला. व्यवसायाचा सर्व बाजूंनी अभ्यास केला. त्यानंतर त्यात उतरण्याचे ठरवले. रायपनिंग चेंबरमध्ये आवश्यक बदल केले. कच्चा माल राजगुरुनगर येथून आणण्यास सुरवात केली. दररोज १०० ते १५० किलो उत्पादन सुरू झाले. अनुभव वाढत गेला तसा व्यवसाय वाढविण्याचा निर्णय घेतला. वडील बाबासाहेब, आई सौ. सुमनबाई यांनी सातत्याने प्रोत्साहन दिले, तर पत्नी सौ. अर्चना यांनी खांद्याला खांदा लावून साथ दिली. प्रकाश कुतवळ यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.  गुंतवणूक  प्रकल्पासाठी मोठी गुंतवणूक अपेक्षित होती. आंध्रा बॅंकेने प्रकल्पासाठी २०१७ मध्ये चार कोटी ७५ लाखांचे कर्ज दिले. यातून २८ हजार स्वेअर फूट क्षेत्रावर २१ शीतगृहे (कोल्ड स्टोअरेजेस) उभारली. सध्या प्रकल्पासाठी एकूण आठ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.  आदिक यांचा व्यवसाय दृष्टिक्षेपात 

  • अ) मशरूम उत्पादन - ठळक प्रक्रिया टप्पे 
  • बेड तयार करण्यासाठी बगॅस, कोंबडी खत, जिप्सम 
  • त्यास ८० अंशांपर्यंत उष्णता 
  • सुमारे ५० ते ५५ अंशाला स्टरलायझेशन केले जाते 
  • त्यानंतर मशरूमचे बीज (स्पॉन) कंपोस्टमध्ये मिसळले जाते 
  • त्यानंतर ते प्लॅस्टिक बॅगेत भरून शीतगृहात आणले जाते 
  • यापर्यंतच्या प्रक्रियेला स्पॉन रन म्हणतात 
  • नियंत्रित तपामानात मशरूमची वाढ सुरू 
  • स्पॉनिंगनंतर केस रनचा टप्पा. यात बॅगेचे तोंड उघडून त्यावर कोकोपीट आणि जिप्सम, पोयटा मातीचा थर (केसिंग) दिला जातो. 
  • दोन्ही टप्प्यांसाठी तापमान - २५ ते १८ अंश से. 
  • त्यानंतर मशरूमचे फ्रूट फॉर्मेशन - तापमान १५ ते १८ अंश से. 
  • पुरेशी वाढ झाल्यानंतर मशरूमची काढणी 
  • दरम्यानच्या काळात आवश्यकतेनुसार स्प्रिंकलरने पाणी 
  • ब) क्षमता 

  • प्रति शीतगृहात प्रति दहा किलो बॅग्स (बेडस) ठेवण्याची क्षमता 
  • प्रति बॅच सव्वा ते दीड महिन्याची 
  • प्रति बेडमधून तीन वेळा मशरूमची काढणी होऊ शकते. 
  • प्रति बॅगमधून सुमारे २ किलो मशरूम मिळतात. 
  • त्यानंतर दर तिसऱ्या दिवशी शीतगृह रिकामे होऊन नवे बेड ठेवले जातात. 
  • क) उत्पादन 

  • सध्या २१ पैकी १४ शीतगृहांमधून उत्पादन 
  • पूर्वी दररोज ५०० ते ६०० किलो मशरूम उत्पादन व्हायचे. त्यात वाढ होऊन ते प्रति महिना २० ते २५ टनांपर्यंत वाढले. 
  • सध्याचे उत्पादन - ४० ते कमाल ५० टन प्रति महिना 
  • प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर दरमहा ९० ते १०० टनांपर्यंत उत्पादन मिळेल. 
  • ड) पॅकिंग 

  • ताज्या मशरूमचे २०० ग्रॅम वजनाच्या पनेटमध्ये पॅकिंग होते. 
  • बॉक्स १२ किलोचा असतो, त्यात ६० पनेट्‍स ठेवण्यात येतात. 
  • दूरच्या अंतरासाठी मशरूमची प्रत खालावू नये यासाठी बॉक्समध्ये सहा आइस पॅक्स ठेवण्यात येतात. 
  • ब्रॅंडिंग व मार्केटिंग 

  • ‘डायटर’ नावाने ब्रँड तयार केला आहे. 
  • बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, मुंबई, पुणे अशा ठिकाणी सहा वितरक नेमले आहेत. 
  • मोठ्या कंटेनरच्या माध्यमातून मालाची पाठवणी. 
  • तयार माल चार दिवस चांगल्या स्थितीत राहतो. 
  • प्रति किलो मशरूमला दर - १३० रुपये 
  • खर्च वजा जाता १५ ते २० टक्के नफा 
  • प्रकल्पासाठी दरमहा खर्च (रु.) 

  •  ११० मजुरांसाठी १० लाख 
  • वीजबिल - ६ ते ७ लाख 
  • कच्चा माल - ८ ते १० लाख 
  • पॅकिंग ५ लाख रुपये 
  • वाहतूक ५ लाख रुपये 
  • प्रकल्पातील यंत्रणा  कोल्ड रूम, एअर हॅंडलिंग यंत्रणा, १०० अश्वशक्तीचे काँप्रेसर, पॅकेजिंग यंत्र, आइस पॅक तयार करण्याचे यंत्र, कंपोस्ट निर्मितीतील ब्लोअर्स, जनरेटर संच, माल पोचविण्यासाठी वाहन आदी.  पुढील उद्दिष्ट - स्पॉन लॅबची उभारणी, मशरूम पावडर बनविणे, परदेशांत निर्यात  संपर्क - सुनील जाधव - ९६८९०१०१४६  जनसंपर्क प्रमुख

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com