अल्पभूधारकाने सुपीक मातीत जपला सेंद्रिय शेतीचा गोडवा

समशेरपूर (ता. अकोले, जि. नगर) येथील शेख कुटुंबाने आपल्या केवळ साडेतीन एकर क्षेत्राचा पुरेपूर वापर करीत सेंद्रिय व बहुविध पीक पद्धती आकारास आणली आहे. हिरवळीची खते व शेणखताचा भरपूर वापर करून त्यांनी जमीन सुपीक केली आहे. त्यात पिकवलेले सीताफळ, शेवगा व अन्य मालाला अवीट गोडी येऊन बाजारपेठेत चांगली मागणी असते.
सीताफळाची गुणवत्ता दाखवताना युसूफ शेख
सीताफळाची गुणवत्ता दाखवताना युसूफ शेख

समशेरपूर (ता. अकोले, जि. नगर) येथील शेख कुटुंबाने आपल्या केवळ साडेतीन एकर क्षेत्राचा पुरेपूर वापर करीत सेंद्रिय व बहुविध पीक पद्धती आकारास आणली आहे. हिरवळीची खते व शेणखताचा भरपूर वापर करून त्यांनी जमीन सुपीक केली आहे. त्यात पिकवलेले सीताफळ, शेवगा व अन्य मालाला अवीट गोडी येऊन बाजारपेठेत चांगली मागणी असते.          समशेरपूर (ता. अकोले, जि. नगर) येथील युसूफ पीरमोहम्मद आणि शाहीन या शेख दांपत्याची केवळ साडेतीन एकर शेती आहे. युसूफ यांनी एमएबीएड पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर १९९७ मध्ये मुंबई- कल्याण जवळील खाजगी विनाअनुदानित शाळेत सहा महिने शिक्षकाची नोकरी केली. मात्र शेती, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि आई-वडील यांच्यासाठी गावी परत जाण्याचा निर्णय घेतला. गावची शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने व तीही साडेतीन एकरच असल्याने त्यावर गुजराण करणे खूप कठीण जायचे. सीताफळाने दिली चालना दरम्यान बायफ संस्था अन्य आंतरराष्ट्रीय संस्थांच्या माध्यमाने समशेरपूर परिसरात ग्रामीण विकास प्रकल्प राबवीत होती. यावेळी युसूफ यांची भेट प्रकल्प समन्वयक अनिल बोराडे व प्रक्षेत्र अधिकारी नारायण जाध, प्रदीप खोशे, जितीन साठे यांच्याशी झाली. त्यातून कमी पाण्यात येणाऱ्या व कमी खर्चाच्या सीताफळ लागवडीला चालना मिळाली. त्यानुसार १३ बाय १३ फूट अंतरावर व दोन बाय दोन फूट आकाराचे खड्डे खणून बाळानगर वाणाच्या रोपांची लागवडही केली. याच पिकातून मग पुढे विविध पिकांच्या प्रयोगांना दिशा मिळाली. अशी आहे प्रगतिशील शेती सीताफळ

  • प्रत्येकी २० गुंठ्यात नवी व जुनी मिळून एक एकर सीताफळ, त्यात विविध वाण
  • सध्याच्या १३१ झाडांमध्ये नव्याने १५० झाडांची भर
  • संपूर्ण बागेची सेंद्रिय पद्धतीने जोपासना
  • दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये हलकी छाटणी करतात. त्याचा उपयोग फळधारणा चांगली होण्यास व फळांचा दर्जा उत्तम राहण्यासाठी होतो.
  • दरवर्षी आंबिया आणि मृग बहार.
  • प्रति झाड ५० ते ६० किलो उत्पादन मिळते.
  • सीताफळांना मागणी शेख सांगतात की सेंद्रिय पध्दतीने व सुपीक मातीतून पिकवलेल्या आपल्या सीताफळांना व्यापाऱ्यांकडून चांगली मागणी असते. क्रेटमधून फळे नाशिक, मुंबई, सुरत आदी ठिकाणी पाठवण्यात येतात. प्रति क्रेटमध्ये अठरा किलो फळ बसते. किलोला ५० रुपयांपासून ते १२० रुपयांपर्यंत दर मिळतो. वर्षाला अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न या पिकातून मिळते. देशी कोकणी शेवगा कमी असलेल्या जागेचा पुरेपूर वापर करताना बांधावर सभोवती कोकणी शेवग्याची २५ झाडे लावली आहेत. हा देशी शेवगा स्वादाला अत्यंत गोड असून तो आखूड आहे. वारारोधक म्हणूनही त्याचा वापर केला जातो. प्रति झाड ५० किलोपर्यंत उत्पादन मिळते. तर किलोला ३० ते ३५ रुपये दर मिळतो. व्यापाऱ्यांना विक्री करण्याबरोबर आठवडे बाजारात हातविक्री करून त्यापासून वर्षाकाठी पंधरा ते वीस हजार रुपये मिळतात. दुग्ध व्यवसायाची जोड सहा गायी असून प्रतिदिन ५० ते ६० लीटरपर्यंत दूध संकलन विक्री होते. आजूबाजूच्या शेतकऱ्यांची सोय व्हावी यासाठी शेख यांनी पुढाकार घेऊन खाजगी डेअरीसाठी दूध संकलन केंद्रही सुरू केले आहे. दररोज एकहजार ते दीड हजार लीटर दूध संकलित करून थंड केले जाते. पुढे ते विक्रीस मोठ्या शीतकरण केंद्राकडे पाठवले जाते. या व्यवसायातून दररोज सुमारे पाचशे ते सातशे रुपये कमाई होते. तोंडलीची शेती शेतीत बहुविध पीक पद्धती अमलात आणताना तोंडली पिकाच्या २३० झाडांची लागवड २० गुंठ्यात केली आहे. त्यापासून गेल्या हंगामात ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. आठवड्यात दोन तोडणी होतात. प्रति तोडणी १५० किलो उत्पादन मिळते. मुंबईला पाठवण्यासह स्वतःही विक्री केली जाते. त्यास किलोला १५ ते २५ रुपये दर मिळतो. शेख यांच्या शेतीची वैशिष्ट्ये

  • घरच्या सहा संकरित गायी. वर्षाला पाच- सहा ट्रेलर शेणखत उपलब्ध. त्यासह गांडूळ खताचे दोन बेडस
  • शिवाय निंबोळी पेंड यांचा भरपूर वापर
  • सीताफळात मे महिन्याच्या अखेरीस प्रति झाड सुमारे ५० किलो पूर्ण कुजलेले शेणखत रिंगण पद्धतीने देतात. त्यामुळे भरपूर फुले आणि फळे लागतात हा अनुभव.
  • सुमारे दहा वर्षांपासून रासायनिक खत व कीडनाशक यांचा जराही वापर नाही.
  • सीताफळ किंवा अन्य क्षेत्रात द्विदल पिकांची पेरणी. यात मूग, वाटाणा, भुईमूग यासारखी बेवड होणारी पिके यशस्वीरीत्या घेतात. त्याद्वारे नत्र स्थिरीकरण होण्यास मदत होते.
  • एकाड एक वर्षाने पावसाळ्यात ताग किंवा हिरवळीच्या खतांचा वापर. त्यातून जमीन भुसभुशीत केली जाते.
  • वालघेवडा, गहू, कांदा, चारा, लसूण आदी पिकेही घरगुती वापरासाठी
  • मुबलक फळधारणा होण्यासाठी शेताच्या आजूबाजूला बसलेले मधमाश्यांचे मोहोळ कधीही काढण्यात येत नाही. कोणास काढूही दिले जात नाही. मधमाश्यांना संरक्षण देऊन परागीभवनाची क्रिया नैसर्गिक पद्धतीने होण्यास मदत करतात. त्यामुळे तुलनेने जास्त फळधारणा होण्यास मदत होते असा अनुभव.
  • संपूर्ण शेतात ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब. जमीन हलकी आणि मुरमाड असल्याने ठिबकद्वारे
  • कमी पाण्यावरही सीताफळ बाग जगवणे शक्‍य होते.
  • अन्य शेतकऱ्यांना प्रेरणादायी असे नियोजन
  • बायफ संस्थेचे पदाधिकारी गिरीश सोहनी यांची शेताला भेट व प्रसंशा
  • संपर्क- युसूफ पीरमोहम्मद शेख- ९९७५७७४२१६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com