संतोष खरोडकर (डावीकडे) यांना लिंबू पिकात डॉ. गजानन तुपकर यांचे मार्गदर्शन लाभते.
संतोष खरोडकर (डावीकडे) यांना लिंबू पिकात डॉ. गजानन तुपकर यांचे मार्गदर्शन लाभते.

उत्कृष्ठ नियोजनातून शेती केली आर्थिक दृष्ट्या सक्षम

अकोला जिल्ह्यातील डोंगरगाव येथील संतोष उत्तमराव खरोडकर यांचा दिवस पहाटे चार वाजता सुरू होतो. तो रात्री दहा वाजता संपतो. लिंबू, पपई, भाजीपाला, हंगामी पिके यांची शेती, थेट ग्राहकांसह व्यापाऱ्यांनाही विक्री, पीठगिरणी, ट्रॅक्टर व्यवसाय, मक्याने शेती आदी विविध कामांमध्ये खरोडकर कुटुंब कायम व्यस्त असते. याच एकत्रित प्रयत्नांमधून कधीकाळी मोलमजुरी करणारे हे कुटुंब शेतीत स्वयंपूर्ण झाले आहेच. शिवाय कुटुंबाचा आर्थिक कणा अत्यंत मजबूत केला आहे.  डोंगरगाव (ता. जि. अकोला) येथे प्रमोद, संतोष आणि दिलीप असे खरोडकर बंधूंचे कुटूंब आहे. एकत्रित कुटुंबाची एकूण नऊ एकर शेती आहे. यासोबत ते इतरांची ३० एकर शेती मक्त्याने करतात. स्वतःच्या शेतात प्रामुख्याने फळबाग व भाजीपाला शेती केली जाते. तर मक्त्याच्या शेतीत खरीप, रब्बीची पिके घेतली जातात. पीक पद्धती, कामांच्या जबाबदाऱ्या यांचे नेटके नियोजन त्यांनी बसवले आहे.  शेतीची कार्य पद्धती 

  • दोन भाऊ शेतीचे व्यवस्थापन पाहतात. 
  • ट्रॅक्टर भाडेतत्त्वावर देण्याचा व्यवसाय एक भाऊ पाहतो. 
  • सध्याचे मुख्य पीक- लिंबू. यात सहा वर्षे वयाची व अन्य अलीकडील वर्षांतील आहेत. 
  • मागील वर्षापासून पपईचे पीक घेण्यात येते. 
  • सुमारे तीन एकरांत भाजीपाला- यात बरबटी, पालक, चवळी, वांगे अशी पिके आठ- 
  • बिगर हंगामात पिके घेतल्यास दर चांगले मिळतात हा अनुभव 
  • सिंचनातून बदलले अर्थकारण  खरोडकर यांची शेती मासा गाव शिवारात आहे. पूर्वी हा भाग संपूर्णतः कोरडवाहू होता. पावसाच्या पाण्यावर शेती व्हायची. जेमतेम उत्पन्नामुळे कुटुंबातील सदस्य मोलमजुरीला जायचे. त्यात संतोष यांचाही वाटाही होता. काही वर्षांपूर्वी पुढाकार घेत मासा गावाला लागून असलेल्या शेतात या कुटुंबाने बोअरवेल घेतले. त्याला चांगले पाणी लागले आणि सिंचनाची सोय झाली. असा प्रयत्न या भागात क्वचितच कुणी केला असेल. पारंपरिक पिके घेत असतानाच फळबागांवर लक्ष अधिक केंद्रित केले. यातून शेतीतील उत्पन्नात मोठी वाढ झाल्याचे खरोडकर सांगतात. आता मोलमजुरीला जाण्याची गरज राहिलेली नाही. आमच्याकडेच मजुरांना रोजगार मिळतो, असे ते म्हणतात.  लिंबू झाले मुख्य पीक  खरोडकर यांची तीन एकरांत लिंबूबाग आहे. सहा वर्षांची, चार वर्षांची व अगदी अलीकडील अशी विविध टप्प्यांत लागवड आहे. लिंबू बागेत कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ डॉ. गजानन तुपकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्याद्वारे हस्त बहाराचे नियोजन केले. संतोष सांगतात की या बहारातील फळे उन्हाळ्यात येत असल्याने त्यांना दर चांगले मिळतात. सध्या सुमारे ५० झाडांपासून उत्पादन घेणे सुरू आहे. या काळात किलोला ४० रुपयांपासून ते ६० रुपयांपर्यंत दर मिळतो. आत्तापर्यंत सुमारे २५ हजार रुपयांचे उत्पन्न हाती आले आहे.  लिंबाचे अर्थकारण  संतोष म्हणाले की वर्षभरात लिंबाचे तीन बहर असतात. मुख्य बहारात पंधरा ते वीस गुंठ्यांत सुमारे ६० हजार रुपयांचे उत्पन्न व ४० हजार रुपयांचा नफा मिळू शकतो. अन्य दोन बहारांत मिळून ३० हजार रुपये हाती पडतात. अशा रीतीने तेवढ्या क्षेत्रात ७० हजार रुपये उत्पन्न मिळते. या पिकाची देखभालही फार नसते. त्यामुळे अन्य पिकांपेक्षा हे फळ निश्‍चित परवडते. पुढील वर्षापासून सुमारे १२५ झाडे उत्पन्न देण्यास सुरवात करतील. त्या वेळी उत्पन्नाचे प्रमाण अजून वाढेल. एक जुने झाड सुमारे ८०० रुपये ते एक हजार रुपये देऊ शकते.  पपई आश्‍वासक  मागील वर्षी अडीच एकरांत पपई लागवड केली होती. प्रतिझाडापासून सुमारे ७० ते ८० किलोपर्यंत फळ मिळाले आहे. सुरवातीला ११ रुपये, तर सध्या सरासरी दर चार ते पाच रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे. एकरांत सुमारे ८०० झाडे, प्रतिझाड ७० किलो फळ व किलोला चार रूपये दर गृहीत धरले तरी सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचे एकूण उत्पन्न मिळते. डाळिंब किंवा अन्य नगदी फळांच्या तुलनेत या पिकाचा देखभाल खर्च कमी असल्याने हे पीक सध्या तरी आश्‍वासक असल्याचे संतोष म्हणाले.  थेट विक्री  संतोष आपल्या मित्राची पिक अप व्हॅन भाडेतत्त्वावर घेऊन विविध बाजारात जातात. तेथे लिंबू व पपईची थेट विक्री करतात. तीच गोष्ट भाजीपाल्याची. थेट ग्राहकांना विक्री केल्याने मालाला सुमारे दीडपट ते दुप्पट दर मिळतो. मध्यस्थांची दलाली, व्यापाऱ्यांकडून कमी भावात खरेदी करण्यासारखे प्रकार यामुळे टाळणे शक्य होऊन नफ्यात वाढ होते.  खर्च कमी करण्याची धडपड  शेतीत अधिक उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांचा भडीमार करीत नसल्याचे संतोष सांगतात. शेणखत, निंबोळी अर्क, गोमूत्र आदींचा वापर होतो. त्यामुळे खर्च मर्यादित ठेवला आहे. पिकाला हवे तेवढेच पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन, तुषारचा वापर केला जातो.  पूरक व्यवसायांची जोड  खरोडकर यांचे १० ते १२ सदस्यांचे कुटुंब आहे. शेतीसह सुतारकाम, पीठगिरणी असे व्यवसायही त्यांनी सुरू ठेवले आहेत. त्यातून दरमहा विशिष्ट उत्पन्न मिळते. पहाटे चार वाजता सुरू झालेला संतोष यांचा दिवस रात्री ११ वाजता संपतो. अहोरात्र कष्ट, अभ्यासूपणा, व्यावसायिक हुशारी, विक्रीचे कौशल्य आदी गुणांच्या जोरावर या कुटुंबाने शेतीत उल्लेखनीय प्रगती केली आहे हे निश्‍चित.  संपर्क- र्संतोष उत्तमराव खरोडकर-९६३७३५१११०  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com