agriculture story in marathi,village development, Surdi village of Solapur Dist. has done successfully water conservation works with the unity of villagers & solved the problem of water scarcity. | Agrowon

पाण्याच्या स्वंयपूर्णतेकडे सुर्डीची यशस्वी वाटचाल !
सुदर्शन सुतार
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

गावाचे ‘वॅाटर बजेट’
कामांच्या निमित्ताने गावचे ‘वॅाटर बजेट’ मांडले गेले. त्यात दरवर्षी गावाला ६९४. ६१ कोटी लिटर पाणी उपलब्ध होत असल्याचे लक्षात आले. प्रत्यक्षात पाण्याची गरज ९९२.०९ कोटी लिटर असून, साधारण २९७. ४८ कोटी लिटर तूट असल्याचे लक्षात आले. त्यानुसार गावातील नव्या आणि जुन्या जलस्रोतांवर लोकसहभाग व यंत्रांच्या साह्याने काम सुरू झाले.
 

गावरस्ते, स्वच्छता, शोषखड्डे, वृक्षारोपण, आरोग्यपत्रिकेसह विविध कामांत आघाडी घेत एकेकाळी दुष्काळ सोसणाऱ्या सुर्डी गावाने (जि. सोलापूर) पाण्याबाबत स्वयंपूर्ण होण्याकडे मजल मारली आहे. यंदा पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत या गावाने राज्यात पहिला क्रमांक मिळवला. जुन्या व नव्या स्रोतांच्या माध्यमातून एकावेळेस जवळपास ३० कोटी लिटर पाणी साठू शकेल एवढी क्षमता गावाने तयार केली आहे. एकीच्या बळावर मिळवलेले यश अन्य गावांसाठी निश्‍चित प्रेरणा देणारे ठरले आहे.
 
सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यातील सुर्डी हे वैराग-माढा महामार्गावरील ऐतिहासिक गाव आहे. गावच्या मध्यभागी साधारण १७ व्या शतकातील निंबाळकर संस्थानिकांचा वाडा पाहायला मिळतो. चार रुबाबदार बुरुजांसह सात पिढ्यांची कहाणी हा वाडा उराशी बाळगून आहे. शिवाय १२ व्या शतकातील विरगळही इथे पाहायला मिळते. गावातील शूरवीरांचा इतिहास या माध्यमातून अद्याप जीवंत असल्याचे दिसते.

सुर्डी गाव दृष्टिक्षेपात

  • गावचे क्षेत्रफळ २४०० हेक्टर. लोकसंख्या ३३३७.
  • सर्वाधिक ८१० हेक्टर रब्बीचे क्षेत्र.
  • सर्वाधिक कांदा, भाजीपाला पिके.
  • पावसावर शेतीचे ठरते मुख्य भवितव्य

दुष्काळ हटविण्यासाठी पुढाकार
सर्वसाधारणपणे कमी पाऊसमान झाला की दुष्काळ हमखास ठरलेला. दर एक-दोन वर्षांतून पिण्याच्या पाण्याचा टँकर आणि जनावरांच्या पाण्याची आबाळ ठरलेली. ही परिस्थिती बदलण्यासाठी गावची प्रमुख मंडळी एकत्र आली. यात सरपंच सौ. सुजाता डोईफोडे, उपसरपंच अण्णासाहेब शेळके, विनायक डोईफोडे, मधुकर डोईफोडे, मोहन शेळके, महावीर शेळके, दाजी शेळके, संतोष शेळके, प्रमोद शेळके, अभिनंदन शेळके, बालाजी शेळके, अनिल शेळके, सना शेख, मुमताज मुलाणी, सुशिला कसबे, ग्रामसेवक पांडुरंग कागदे, काकासाहेब राखुंडे आदींचा समावेश होता. पाणी फाउंडेशन संस्थेनेही मदतीचा मोठा हात दिला.

पाणीप्रश्‍नाला प्राधान्य
गावातील रस्ते, वीज, स्वच्छता या कामांसाठी ग्रामपंचायतीचा पहिल्यापासूनच सक्रिय सहभाग आहे. बहुतेक सर्व रस्ते सिमेंटचे आहेत. स्वच्छता आहे. विजेची सोय आहे. केवळ पाण्यासाठीच वणवण होती. त्यामुळे गावकऱ्यांनी आणि ग्रामपंचायतीने पाण्याच्या कामाला प्राधान्य दिले. त्यादृष्टीने एकीची मोट बांधण्याचे काम सुरू झाले. काम मोठे होते. आर्थिकदृष्ट्या आवाक्याबाहेरील होते. सुरवातीला गावकऱ्यांना जल अभियानात सहभागी करून घेताना काही अडचणी आल्या. मात्र प्रबोधन, जागृती याद्वारे त्यावर मात करण्यात यश मिळाले. खास ग्रामसभा घेऊन गावकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. काही निर्णयही घेण्यात आले.

प्रत्येकाची मदत ठरली मोलाची
गावकऱ्यांनी नफ्यातील १० टक्के हिस्सा कामांना दिला. पाण्याचा नियंत्रित वापर करताना ठिबक-तुषार संचाचा वापर, वृक्षलागवड, चराईबंदी, कुऱ्हाडबंदीसारखे निर्णय घेण्यात आले. अनेक कुटुंबांनी घरातील काही शिल्लक रक्कम वापरून, वाढदिवस आदींवरील खर्च टाळून आपापल्या परीने मदत केली. त्यातून तब्बल ६० लाख रुपये वर्गणी जमा झाली.

पाणीवापरात काटकसर
गावात पूर्वी ठिबक, तुषार सिंचनाखालील क्षेत्र नगण्य होते. गेल्या सहा महिन्यांत मात्र त्याचा वापर अधिक वाढला आहे. शिवाय मल्चिंग, बायोमास या माध्यमातून ४३७.१९ हेक्टरवर संरक्षित पाण्याचा वापर होऊ लागला आहे.

८०४ शेतकऱ्यांकडे जमीन आरोग्यपत्रिका
जमिनीच्या आरोग्याकडेही शेतकऱ्यांनी लक्ष दिले आहे. त्यातूनच गावातील १५७० खातेदार शेतकऱ्यांपैकी ८०४ शेतकऱ्यांनी आरोग्य पत्रिका तयार करून घेतली आहे. रब्बी हंगामासह फळबागा व भाजीपाला क्षेत्रासाठी त्याचा उपयोग होणार आहे. तसेच जमिनीचा प्रकार, त्यातील उपलब्ध घटकांची माहिती त्याद्वारे मिळत आहे.

स्वच्छता आणि शोषखड्डे
प्रमुख रस्त्यावरींल स्वच्छतेसह घरांतील सांडपाणी रस्त्यावर सोडले जाऊ नये यासाठी शोषखड्डे घेण्यात आले. त्याचा उपयोग आरोग्यासाठी झाला. दुर्गंधीही दूर झाली. सुमारे ७५७ कुटुंबांपैकी ६०७ कुटुंबांनी शोषखड्डे घेतले आहेत.

झाडांची लागवड
पर्यावरणाची काळजी घेताना वृक्षलागवडीवर भर दिला असून, विविध प्रकारच्या १९०० पर्यंत झाडांची लागवड झाली आहे. महत्त्वाचे रस्ते तसेच घरांसमोर लागवड झालेल्या या झाडांची जोपासनाही सुरू आहे.

तीस कोटी लिटरची साठवणक्षमता
गावच्या उत्तरेला माथ्यावर कामे झाली. लोकसहभागातून १३ पाझर तलाव, ११ सिमेंट नाला बंधारा आणि २४ मातीनाला बांधांची दुरुस्ती झाली. कंपार्टमेंट बंडिंग, मातीनाला बांध, सीसीटी, कंटूर पद्धतीची खोदाईची कामे, विहिर पुनर्भरण, एलबीएस, गॅबियन पद्धतीच्या कामांचा समावेश राहिला. सुमारे १८ लाख ७० घनमीटर खोदाई झाली. यंत्राच्या साह्याने दोन कोटी ५२ लाख ८०२ घनमीटर काम झाले. यातून पाऊस झाल्यास एकाचवेळी ३० कोटी लीटर पाणी साठू शकेल एवढी क्षमता तयार झाली.

राज्यस्तरीय ७५ लाखांचे बक्षीस
मोठ्या क्षमतेने आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने झालेल्या कामांचे तब्बल ७५ लाख रुपयांचे बक्षीस गावाला पाणी फाउंडेशनतर्फे मिळाले. राज्य शासन आणखी ७५ लाख रुपये देणार आहे. त्यातून दीड कोटी रुपये गावाला मिळतील. त्यातून पुन्हा पाण्याच्या कामांवरच भर देण्यात येईल. हा पुरस्कार म्हणजे कष्टाला मिळालेली दाद, ऊर्जा आणि प्रेरणाही आहे अशी गावकऱ्यांची भावना आहे.

प्रतिक्रिया 
रस्ते, वीज, पाणी यांच्याबरोबर आम्ही गावच्या पाणीप्रश्‍नावर मार्ग काढला. यामध्ये सर्वाधिक लोकसहभाग महत्त्वाचा ठरला.
-सौ. सुजाता डोईफोडे
सरपंच, सुर्डी

गावकऱ्यांच्या एकीचे फळच मिळाले. यापुढेही पाण्यावरच काम करणार आहोत.
-अण्णासाहेब शेळके,
उपसरपंच

 
गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळ सहन केला. पाण्याबाबत जागरूकता होती. मार्ग मिळाला
आणि ग्रामस्थांच्या सहभागातून तेही काम यशस्वी झाल्याचे समाधान वाटते.
-मधुकर डोईफोडे, ग्रामस्थ, सुर्डी

पाण्याबाबत स्वयंपूर्ण होत आहोत. यापुढेही आणखी जोमाने काम सुरू ठेवू.
-विनायक डोईफोडे, ग्रामस्थ
 
संपर्क- मधुकर डोईफोडे- ९८५०७३०२०९

फोटो गॅलरी

इतर ग्रामविकास
पर्यावरण संवर्धन, लोक शिक्षणामध्ये ‘...अकोला, वाशीम जिल्ह्यांतील सुमारे तीस...
ग्रामपरिवर्तनाची दिशा दाखविणारे शेंदोळा...जन्म, मृत्यू, विवाहनोंदणी प्रमाणपत्र हवे असेल; तर...
शेती, शिक्षण अन ग्रामविकासामध्ये...समानता, स्वातंत्र्य आणि सहानुभूतीमुळेच व्यक्तीचा...
गाव तसे छोटे, कामांतून झाले मोठेपूर्णा नदीच्या खोऱ्यात सर्वत्र खारपाणपट्टा...
पाण्याच्या स्वंयपूर्णतेकडे सुर्डीची...गावरस्ते, स्वच्छता, शोषखड्डे, वृक्षारोपण,...
आदर्श वनसंवर्धनातून ग्रामविकास साधलेले...वनसंपत्तीचे संवर्धन, वनविकासासह शेतीतही दिशादर्शक...
ग्रामीण भागातील सांडपाण्याचे व्यवस्थापन शहर वा गाव कोणतंही असो, सांडपाणी व्यवस्थापनाचे...
लोकसहभागातून दुष्काळी पिंपरी बनले आदर्श...पुणे-नगर सीमेलगत पारनेर तालुक्यात सुपे गावापासून...
स्वच्छता, जल व्यवस्थापनात राज्यात आदर्श...नांदेड जिल्ह्यातील शेळगाव गौरी (ता. नायगाव)...
आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या जोरावर कडदे...पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील कडदे येथील...
तीर्थपुरी गावाची होतेय मोसंबी पिकात ओळखतीर्थपुरी (ता. घनसावंगी, जि. जालना) भागातील...
पाणीवापर कार्यक्षमतेसाठी शहरांचे आरेखन...शेती, सिंचन आणि ग्रामीण भागातील पाणी वापराच्या...
शेती, आरोग्य विकास अन् पर्यावरण...नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी लोकांचे आरोग्य आणि...
‘शेती तिथे रस्ता’ उपक्रमासह...सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका म्हणून...
पिंपळगावकरांनी भाजीपाला शेतीतून साधली... बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य...
ग्रामविकास, शिक्षण अन् शेतीतील दिशान्तरआर्थिक दुर्बल, भूमिहीन व अल्पभूधारक शेतकरी,...
गुलाबी बोंड अळीला रोखण्यासाठी एकात्मिक...गुलाबी बोंड अळ्यांना खाण्यासाठी व पतंगाना अंडी...
पोषणमूल्ययुक्त आहारासाठी पाचशे... बालकांना सकस, पोषणमूल्ययुक्त आहार उपलब्ध...
वनाधिकार कायद्याआधारे ग्रामसभांचे शाश्‍...‘खोज’ संस्थेच्या मार्गदर्शनात अमरावती जिल्ह्यातील...
संशोधक शेतकऱ्याने बनविला जीवामृत फिल्टर...नाशिक जिल्ह्यातील पिंपरी सय्यद येथील प्रयोगशील...