गव्हाच्या काडाचा भुसा करण्यासाठी भुसा कंबाइन यंत्र

भुसा कंबाइन (ट्रॉली मागे)
भुसा कंबाइन (ट्रॉली मागे)

राहिलेल्या काडापासून भुसा मिळवण्यासाठी भुसा कंबाइन हे यंत्र उपयुक्त ठरते. भुसा कंबाइन हे ट्रॅक्टरचलित यंत्र असून, कंबाइन हार्वेस्टिंगनंतर शेतात राहिलेला उभा काड आणि हार्वेस्टरने टाकलेला काड या दोन्हीचे रूपांतर भुशात करते आणि ब्लोअरच्या साहाय्याने ट्रॉलीमध्ये वाहून नेते.   गव्हाची कापणी ही मार्च (शेवट) किंवा एप्रिल (मध्य) मध्ये येते आणि ती तीन प्रकारे केली जाते. पहिला प्रकार म्हणजे महिला कामगार लावून विळ्याच्या साहाय्याने, दुसरे म्हणजे कापणी यंत्राचा (रिपर) वापर करून आणि तिसरे म्हणजे कंबाइन हार्वेस्टर (कापणी-मळणी एकत्र) वापरून. हवामान बदलामुळे आणि कंबाइन हार्वेस्टरच्या उपलब्धतेमुळे तिसऱ्या पद्धतीचा वापर वाढलेला दिसून येत आहे. तसेच, लहान आकारचे कंबाइन हार्वेस्टरदेखील उपलब्ध होत असल्याने लहान शेतातदेखील कापणी व मळणी एकाच वेळी करणे सोपे झाले आहे. कंबाइन हार्वेस्टरच्या वापरामुळे वेळेची आणि पैशाची बचत तर होतेच त्याचबरोबर पिकाचे नुकसानही कमी होते. आजकाल बहुपीक मळणी यंत्र बाजारात उपलब्ध असल्याने असे मळणी यंत्र खरेदी करण्यावरदेखील शेतकऱ्याचा भर आहे. गव्हाच्या मळणीसाठी यंत्राचा वापर केल्याने जनावरांसाठी उपयुक्त असा गव्हाचा भुसा मिळतो, पण कंबाइन हार्वेस्टरच्या वापरामुळे गव्हाचा भुसा हा मिळत नाही. गव्हाचा भुसा हा जनावरांसाठी एक उत्तम पर्यायी चारा म्हणून वापरला जातो. कंबाइन हार्वेस्टर चालवल्यानंतर राहिलेला गव्हाचा काड जाळला जातो किंवा जमिनीत गाडला जातो. भुसा कंबाइन हे पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश इ. भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरले जाते. भुसा कंबाइन

  • या यंत्राला स्ट्रॉ रिपर किंवा स्ट्रॉ कंबाइन असेही म्हटले जाते, कारण या यंत्राद्वारेसुद्धा कंबाइन हार्वेस्टरसारखे काम केले जाते.
  • भुसा कंबाइन हे ट्रॅक्टरच्या पाठीमागे जोडले जाते आणि पीटीओद्वारे पावर देऊन चालवले जाते.
  • हे यंत्र गव्हाच्या कंबाइन हार्वेस्टिंगनंतर शेतात शिल्लक राहिलेल्या गव्हाच्या काडावर चालवले जाते.
  • कंबाइन हार्वेस्टरमध्ये गव्हाची कापणी जमिनीपासून २०-३० सें.मी. वर केली जाते. कापणी करण्याची उंची गव्हाच्या उंचीवर अवलंबून असते.
  • काडाची कापणी करणे, कापलेला आणि शेतातला काड गोळा करणे आणि तो मळणी ड्रममध्ये वाहून नेणे, त्याची मळणी करून भुसा बनवणे आणि तो भुसा ब्लोवरच्या साहाय्याने ट्राॅलीमध्ये वाहून नेणे, अशी पाच कामे एकत्रित केली जातात.
  • या काडामध्ये कंबाइन हार्वेस्टरने सोडलेल्या गव्हाच्या ओंब्यादेखील येतात आणि त्याचीही मळणी होते. त्यासाठी यात एक चाळणी दिलेली आहे, ती चाळणी गव्हाचे दाणे वेगळे करते.
  • या यंत्राला चालवण्याचा खर्च या गोळा केलेल्या गव्हातदेखील निघतो. सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर हे यंत्र म्हणजे चालते-फिरते कटर बार जोडलेले एक मळणी यंत्रच आहे. भुसा कंबाइनचे प्रकार आणि भाग
  • भुसा कंबाइन हे दोन प्रकारांत उपलब्ध आहेत. पहिल्या प्रकारात भुसा कंबाइनच्या मागे भुसा साठवण्यासाठी मोठी ट्रॉली लावली जाते आणि दुसऱ्या प्रकारात त्या भुसा कंबाइनच्या वरच छोटीशी डम्पिंग ट्रॉली फीट केलेली असते.
  • पहिल्या प्रकारचे भुसा कंबाइन मोठ्या आणि लांब पट्टा असलेल्या शेतीसाठी, तर दुसऱ्या प्रकारचे भुसा कंबाइन लहान क्षेत्रासाठी उपयुक्त ठरते. - या यंत्रामध्ये कटर बार, रील, ऑगर, काड वाहक, मळणी ड्रम, मळणी सिलिंडर, चाळणी, ट्रे, हवा फेकणारा पंखा (ब्लोवर) आणि तयार झालेला भुसा फेकण्यासाठी पाईप इ. चा समावेश असतो.
  • कार्यपद्धती

  • भुसा कंबाइनमध्ये वर नमूद केल्याप्रमाणे पाच कामे एकाच वेळेस चालतात. त्यासाठी भुसा कंबाइनमध्ये काड कापण्यासाठी कटर बार आणि तो आत ओढण्यासाठी एक आडवे रील त्या कटरबार वर बसविलेले असते.
  • ऑगर फीट केलेले असते ते दोन्ही बाजूने काड एकत्र करत असते आणि मळणी ड्रममध्ये पाठवत असते.
  • मळणी सिलिंडरवर छोटे छोटे दातेरी ब्लेड बसविलेले असतात. तसेच, सिलिंडरच्या खाली लगोलग एक वक्राकार जाळी (ड्रम) असते.
  • सिलिंडर आणि जाळी मिळून काडाचे रूपांतर भुश्यात करत असतात. या ड्रमच्या खाली काही अंतरावर चाळणी व त्याखाली ट्रे फीट केलेला असतो.
  • चाळणीद्वारे गव्हाचे दाणे वेगळे करून ते ट्रेमध्ये गोळा केले जातात.
  • सगळ्यात शेवटी हवा फेकणारा पंखा (ब्लोवर) फीट केलेला असतो. या ब्लोवरच्या साहाय्याने मळणीनंतर तयार झालेला भुसा ट्राॅलीमध्ये वाहून नेला जातो.
  • ब्लोवरचा पाइप हा ट्रॉलीमध्ये सोडलेला असतो. ट्रॉली ही बारीक जाळीची बनलेली असल्याने भुश्यातील धूळ निघून जाण्यास मदत होते.
  • यंत्राची तपशीलवार माहिती

  • शक्तीचा स्त्रोत - ३५ व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीचा ट्रॅक्टर (पीटीओ)
  • यंत्राचा आकारमान (अंदाजे) मी. - ३.४ x २.५ x २.१
  • कटरबार लांबी (अंदाजे), मी.- २.१
  • सरासरी कट करण्याची रुंदी, मी. - १.८-१.९
  • काडाची कट करण्याची उंची (जमिनीपासून), सें.मी - ५-७ (एवढ्या उंचीचा काड शेतात शिल्लक राहतो)
  • क्षेत्रीय क्षमता, एकर/तास - १
  • सरासरी भुसा वसुली, टक्के - ६८-७०
  • इंधन (डिझेल), लि/तास - ६-७
  • चालवण्याची गती, कि.मी./तास - २.४-२.९
  • मशीन वजन, कि. ग्रा (अंदाजे) - १८००-२०००
  • संपर्क ः आशिष धिमते, ९५१८९०१०२७ (कृषी वैज्ञानिक, कृषी यंत्रे व शक्ती अभियांत्रिकी, केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था, हैदराबाद) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com