कचरा निर्मूलनासाठी गाव आले एकत्र

ड्रममधील ओला कचरा टाकताना कविता ओव्हाळ. तसेच अोल्या कचऱ्यावर वाढलेले शेवगा व वांग्याचे राेप.
ड्रममधील ओला कचरा टाकताना कविता ओव्हाळ. तसेच अोल्या कचऱ्यावर वाढलेले शेवगा व वांग्याचे राेप.

नववर्ष २०१८ विशेष...   ------------------------------------------------------

तीन वर्षांपूर्वी मुळशी (जि. पुणे) तालुक्यातील चार गावांमध्ये सामूहिक कचरा निर्मूलनाची चळवळ सुरू झालीय. त्याचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणजेच अंबडवेट हे गाव. सध्या ग्रामीण भागातही ओला, सुका कचऱ्याचा प्रश्न गंभीर होतोय. कचऱ्यामुळे गाव बकाल दिसतं, आरोग्याचा प्रश्नही गंभीर होतो. मात्र गावकऱ्यांनीच कचरा निर्मूलन करायचं ठरविलं, तर स्वच्छ गाव साकार होऊ शकते. 

अंबडवेट हे सामान्य गाव. मात्र भविष्यातील कचऱ्याची समस्या वेळीच ओळखून गावकरी एकत्र आले. ग्रामपंचायतीनेही साथ दिली. प्रत्येक घराने ओला व सुका कचरा निर्मूलनासाठी सामूहिक प्रयत्न सुरु केले. पुणे येथील नो हाऊ फाउंडेशन-इनोरा या संस्थेने मार्गदर्शन केलं. प्रत्येक घरासमोर कंपोस्टर प्लांटर ड्रम असून त्यामध्ये वांगे, मिरची, टोमॅटो रोपांना फळंही लगडलेली दिसतात.  या उपक्रमाबाबत नो हाऊ फाउंडेशन-इनोराचे विजय भालेकर म्हणाले की, आम्ही गावकरी आणि ग्रामपंचायत सदस्यांना एकत्र केले. ओला व सुका कचऱ्यामुळे अस्वच्छता, उकिरड्यांमुळे आरोग्यावरील परिणामांची माहिती पटवून दिली. प्रत्येक कुटुंबाला ओला कचरा जिरवण्यासाठी कंपोस्टर प्लांटर ड्रम दिला. त्यामध्ये पालापाचोळा, ओला कचरा, गांडूळ कल्चर भरण्यास गावकऱ्यांनी सुरवात केली. कचरा कुजण्यासाठी लागणाऱ्या डी कंपोस्टरचा खर्च  ग्रामपंचायत करते. गावकरी प्लॅस्टिक पिशव्या, बाटल्या, इतर साहित्य गोळा करून ठेवतात. दर पंधरा दिवसांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हा प्लॅस्टिक कचरा गोळा करून जी.डी.एन्व्हार्नमेंट प्रा.लि. कंपनीला इंधननिर्मितीसाठी देतो.  येत्या काळात हा उपक्रम ग्रामपंचायतीला हस्तांतरीत करणार आहोत. हा उपक्रम पाहून परिसरातील गावे कचरा निर्मूलनासाठी पुढे येताहेत. गावकरी आले एकत्र :    इनोराच्या संचालिका मंजूश्री तडवळकर म्हणाल्या की, गावांमध्ये ओला, सुका कचरा व्यवस्थापनासाठी आम्ही कमिन्स इंडिया लिमिटेड आणि सुदर्शन केमिकल्स कंपनीच्या सहकार्याने मुळशी तालुक्यातील चार गावे आणि वाड्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या सहकार्याने तीन वर्षांपासून ओला, सुका कचरा व्यवस्थापनाबाबत जागृती केली. ओला कचरा जिरवण्यासाठी कंपोस्टर प्लांटर ड्रम व सेंद्रिय घटक कुजविणारे संवर्धक तसेच प्रशिक्षण दिले. परिणामी ओल्या कचऱ्याचे गांडूळ खतात रूपांतर झाले.  गाव स्वच्छतेला मिळाली चालना :  या उपक्रमाबाबत बोलताना अंबाबाई सेंद्रिय शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष प्रताप ढमाले म्हणाले की ३  वर्षांपूर्वी अंबडवेट गाव, वाड्या मिळून ३७८ कंपोस्टर प्लांटर ड्रम बसविले. दररोज घरटी एक ते दीड किलो ओला कचरा जिरवला जातो. ड्रममध्ये टोमॅटो, वांगे, मिरची, शेवगा आदींची रोपेही लावली. ड्रममध्ये तयार झालेले खत परसबागेसाठी वापरले जाते. कचरा ,प्लॅस्टिक पिशव्या, इतर साहित्य घराघरात गोळा केल्याने प्लॅस्टिक समस्येवर मात करता आली. गावस्वच्छतेला चालना ,आरोग्याबाबत जागृती झाली. घराजवळ ८५ टक्के ओला कचरा जिरविता आला. 

जिरविला ओला कचरा : 

  • अंबडवेट गाव आणि बारा वाड्या : ३७८ ड्रम
  • कोंढावळे, कळमशेत गाव आणि चार वाड्या : २२६ ड्रम
  • कासारआंबोली आणि चार वाड्या ः ६०० ड्रम
  • दररोज जिरतो १,२०४ किलो ओला कचरा. दरमहा एक हजार किलो प्लॅस्टिक प्रक्रियेसाठी जमा.
  • घरीच जिरवितो ओला कचरा  अंबडवेटमधील कविता ओव्हाळ म्हणाल्या की, गावातील महिला गेल्या तीन वर्षांपासून ड्रममध्ये दररोज एक किलो ओला कचरा जिरवित आहेत. यामुळे रस्त्याच्या कडेचे उकिरडे संपले. घर, गावाचा परिसर स्वच्छ झाला. डास, माश्यांचा प्रादुर्भाव होत नाही. या ड्रममध्ये वांगी, टोमॅटोची रोपे लावल्यामुळे काही प्रमाणात भाजीपाला मिळतो. ड्रममध्ये गांडुळे असल्याने ओला कचरा जिरत राहातो. दुर्गंधी येत नाही. लहान मुलांनाही स्वच्छतेचे महत्त्व पटले आहे. वसंतवाडीमधील रोहिणी शिंदे म्हणाल्या की, रोज एक किलो कचरा या ड्रममध्ये जिरतो. दरवर्षी चाळीस किलो गांडूळ खत तयार होते. हे खत परसबागेसाठी वापरतो.  संपर्क : प्रताप ढमाले, ९६८९०२७८१८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com