जिद्द, चिकाटीतून जीवनात फुलविले रंग

पाॅलिहाऊससाठी सर्वात मोठा प्रश्न होता भांडवलाचा. पॉलिहाऊस उभारणीपासून ते रोपे आणली, लागवड, माती बदलणे हा सगळा खर्च होता २५ लाख रुपयांचा. मग बॅंकांशी संपर्क साधणे सुरू केले.
काढणी झाल्यानंतर बकेटमध्ये भरून ठेवलेला जरबेरा.
काढणी झाल्यानंतर बकेटमध्ये भरून ठेवलेला जरबेरा.

जिद्द, चिकाटी व वेगळी वाट शोधण्याची वृत्ती असेल तर स्वतःची अोळख तयार करता येते. तामलवाडी (जि. उस्मानाबाद) येथील ज्ञानेश्‍वर जगताप हा उच्चशिक्षित युवक वीस गुंठ्यांतील पॉलिहाउसमध्ये जरबेराचे चांगले उत्पादन घेत आहे. हैदराबादचे मार्केट मिळवले आहे. अनेकदा संघर्ष केला, पण त्यावर मात करीत आर्थिक व आत्मिकदृष्ट्या समाधानी होण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होत आहे.  सोलापूर-तुळजापूर महामार्गावर तामलवाडी (जि. उस्मानाबाद) येथे ज्ञानेश्‍वर जगताप यांची सात एकर शेती आहे. जमीन म्हणाल तर दगडगोट्याच्या माळरानाची. वडील बाळासाहेब देखील शेतकरीच. पण गहू, ज्वारी, तूर या पारंपरिक पिकांपुढे शेती कधी गेलीच नाही. महेश हे ज्ञानेश्वर यांचे मोठे बंधू स्थानिक खासगी कंपनीत कामाला आहेत. त्यामुळे शेतीची मुख्य जबाबदारी ज्ञानेश्‍वरच पाहतात. 

स्वतःची वाट स्वतःच तयार केली    ज्ञानेश्‍वर एम.एस्सी. बी.एड. आहेत. हुकमी पदवी हाती आल्यानंतर नोकरीसाठी त्यांनी भटकंती केली. पण नोकरीसाठी उलटे त्यांनाच पैशांची मागणी होऊ झाली. नोकरीची शाश्‍वती नाही ती नाहीच. या अनिश्चित वातावरणातूनच त्यांच्यातील शेतकरी तरुण जागा झाला. उपाय नसल्याने दोन वर्षे एका संस्थेत शिक्षकाचा अनुभव घेतला. पण मनाचे शेतीकडेच कल दिला. ती करायची ठरली तरी बागायती नव्हती. पण आपली वाट आपणच तयार करायची या ध्येयाने झपाटून ज्ञानेश्‍वर यांनी शेतीत सुधारणा करायच्या ठरवल्या. 

प्रगत शेतीतील वाटचाल   अखेर सगळा होमवर्क करून २०१४ च्या दरम्यान ज्ञानेश्वर शेतीत उतरले. सोयाबीन, मूग, उडीद अशी पारंपरिक पिके शेतीत होती. त्यातून उत्पन्नावर मर्यादा होत्या. गावातील मित्र सचिन जाधव पॉलिहाउसमध्ये जरबेरा शेती करीत होते. त्यांचे मार्गदर्शन मिळाले. सात एकरांपैकी वीस गुंठ्यांत हा प्रयोग करायचे ठरवले. कृषी विभागाकडे अनुदानासाठी प्रस्तावही दिला. 

भांडवल उभारणी  पाॅलिहाऊससाठी सर्वात मोठा प्रश्न होता भांडवलाचा. पॉलिहाऊस उभारणीपासून ते रोपे आणली, लागवड, माती बदलणे हा सगळा खर्च होता २५ लाख रुपयांचा. मग बॅंकांशी संपर्क साधणे सुरू केले. बॅंक आॅफ महाराष्ट्राच्या शाखेकडे प्रस्ताव दिला. सुमारे तीन महिने मंजुरीसाठी प्रतिक्षा करावी लागली. आपल्या हायटेक शेतीबाबत बॅंकेला विश्वास देण्यात ज्ञानेश्वर यशस्वी झाले. सुमारे १८ लाखांचे कर्ज मंजूर झाले.    स्वतःचेही पैसे गुंतवले  समस्या अजून सुटली नव्हती. सात ते आठ लाख रुपयांची अजून गरज होती. मग स्वतःकडील पैसे गुंतवले. कृषी विभागाचे अनुदान अद्याप मिळायचे आहे. बॅंकेचा हप्ता जातोय. पण शेतीतून अधिकाधिक फायदा मिळवून उत्पन्न वाढवण्याचे ज्ञानेश्वर यांचे प्रयत्न सुरू आहेत.   

संघर्षानेच झाली प्रयोगाला सुरवात ज्ञानेश्वर म्हणाले की, जरबेरा लागवडीच्या पहिल्याच वर्षी दुष्काळाला सामोरे जावे लागले. बोअर घेतले. मात्र पाणी काही लागले नाही. त्यासाठी केलेला खर्च वाया गेला. दुसरे बोअर घ्यायचे तरी पाणी लागेल याची शाश्वती नव्हती. त्याऐवजी मे ते जून या काळात टॅंकरने पाणी दिले. तिथे खर्च करून रोपे जगवली. आज दोन विहिरी व एक बोअर आहे. ठिबकची सोयही केलेली आहे.  जरबेराची शेती  आज पॉलिहाउसमधील जरबेराची शेती सुरू करून ज्ञानेश्वर यांना सुमारे दीड वर्षे झाली आहेत. या शेतीसाठी अनुकूल माती आणून बेड बांधून घेतले. झिगझॅग पद्धतीने लागवड आहे. अहमदाबाद येथून प्रति रोप ३० रुपयांप्रमाणे रोपे आणली. सध्या अर्ध्या एकरात १२ हजार ते साडेबारा हजार रोपांचे संगोपन होत आहे. ज्ञानेश्‍वर यांच्यासाठी पॉलिहाऊस ते जरबेरा लागवड हे सगळंच नवीन आणि आव्हानात्मक होतं, तितकंच खर्चिकही. पण जिद्द व चिकाटी काही सोडली नाही. सर्व धावपळ केली. मित्र सचिन जाधव व अन्य तज्ज्ञांकडून प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन घेतले. खतांचे प्रत्येक आठवड्याचे वेळापत्रक (शेड्यूल) तयार केले.  

 उत्पादन 

  • सध्या एक दिवसाआड तोडणी, प्रत्येक दिवशी पंधराशे फुले गृहीत धरली तर महिन्याला ४० ते ४५ हजारांच्या संख्येपर्यंत फुलांचे उत्पादन
  • वर्षभर उत्पादन सुरू राहते. हवामानानुसार त्यात चढउतार
  • मार्केट  एप्रिल, मे तसेच नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत जरबेराला चांगला दर मिळतो. प्रामुख्याने लग्नसराईच्या हंगामात दर चांगले मिळतात. या काळात कमाल दर प्रति फूल ८ ते ९ रुपयांवरही गेले होते. मात्र नोटाबंदीनंतर हेच दर या काळात चार रुपयांपर्यंत आले होते. वर्षभरात दीड ते दोन रुपये हा सरासरी दर मिळतो तो साडेतीन रुपयांपर्यंतही पोचतो.  हैदराबाद आश्वासक मार्केट  उस्मानाबाद जिल्ह्यात पॉलिहाउसमध्ये जरबेरा घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तुळजापूर, उस्मानाबाद या तालुक्‍यात त्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. सर्व शेतकऱ्यांची मिळून एक दिवसाआड जरबेरा फुलांनी गाडी भरून हैदराबादला जाते. ज्ञानेश्‍वर हेदेखील त्याच पद्धतीने माल पाठवतात. सुमारे ४० फुलांचे बंडल असते. एका बंडलमध्ये १० फुले असतात.  चिकाटी सोडणार नाही ! जिद्द व चिकाटी असेल तर तुम्ही सर्व संकटांना पार करून पुढे जाऊ शकता, असे ज्ञानेश्वर म्हणाले. आमच्या गावात तीन पॉलिहाऊस होती. त्यातील दोन आज सुरू आहेत. साधारण साडेतीन वर्षांनी पुन्हा नव्याने खर्च करावा लागतो. आपले पॉलिहाऊस कोणत्याही परिस्थितीत बंद पडणार नाही या दृष्टीने पुढील काळात नियोजन करणार असल्याचेही ज्ञानेश्वर यांनी सांगितले.   : ज्ञानेश्‍वर जगताप, ९९७५८०१६६८.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com