सचिन टोंगेंच्या पोल्ट्रीला करार शेतीचा आधार

सचिन टोंगे याने नोकरीच्या मागे न लागता शेतीतच करिअर करण्याचा निर्णय घेतला. भावासोबत १८ एकर शेतीचे व्यवस्थापन सांभाळताना १८ लाख रुपयांची गुतंवणूक करीत पोल्ट्री व्यवसाय उभारला.
तेजापूर (ता. वणी, जि. यवतमाळ) येथील उच्चशिक्षित सचिन टोंगे यांचा पोल्ट्री व्यवसाय
तेजापूर (ता. वणी, जि. यवतमाळ) येथील उच्चशिक्षित सचिन टोंगे यांचा पोल्ट्री व्यवसाय

 शिक्षणानंतर नोकरी नाही म्हणून हातावर हात धरून बसणाऱ्या काही युवकांसमोर तेजापूर (ता. वणी, जि. यवतमाळ) येथील उच्चशिक्षित सचिन टोंगे या युवकाने आदर्श निर्माण केला आहे. सचिनने नोकरीच्या मागे न लागता शेतीतच करिअर करण्याचा निर्णय घेतला. भावासोबत १८ एकर शेतीचे व्यवस्थापन सांभाळताना १८ लाख रुपयांची गुतंवणूक करीत पोल्ट्री व्यवसाय उभारला. पाच हजार पक्ष्यांचे संगोपन आज तो करतो आहे. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात सचिनची ही वाटचाल निश्‍चितच प्रेरणावाटेसमान आहे.  यतवमाळ जिल्ह्यात तेजापूर (ता. वणी) येथील सचिन गजानन टोंगे यांच्या कुटुंबाची सुमारे १८ एकर शेती आहे. या शेतीत चार एकरांवर हळद तर उर्वरित क्षेत्रावर सोयाबीन, कपाशी यांसारखी पिके घेतली जातात. हळद लागवडीत गेल्या तीन वर्षांपासून सातत्य आहे. वणी तालुक्‍यात आणि त्यातही विशेषतः तेजापूर परिसरात सेलम हळदीचे लागवड क्षेत्र चांगले अाहे. अनेक वर्षांपासून शेतकरी यात सातत्य राखून असल्याचे सचीन सांगतात. रुंद वरंबा सरी पद्धतीने हळदीची लागवड होते. हळदीची बाजारपेठ या भागात नसल्याने सातारा, सांगली परिसरांतील बाजारामध्ये हळद विक्रीसाठी नेण्यावर इथल्या शेतकऱ्यांचा भर राहतो. गावातील शेतकरी एकत्रितपणे सांगलीला हळद पाठवितात. त्यामुळे वाहतुकीवरील खर्चात बचत होते, असा अनुभव आहे. सचिन यांचा मोठा भाऊ संदीप हा शेतीचे व्यवस्थापन सांभाळतो. पूर्वी ही जबाबदारी वडील गजानन यांच्याकडे होती. आता शेती व पूरक व्यवसायाची सूत्रे नव्या पिढीकडे आली आहेत. वडिलांचे मार्गदर्शन दोन्ही भावांना होत राहते.  

गायींच्या संगोपनातून पूरक उत्पन्न  पूरक व्यवसायाला चालना देताना सचीन यांनी ११ गावरान गायींचे संगोपन केले आहे. दर वर्षी गोऱ्हे वाढवून बैलजोडी विकण्यावर भर राहतो. त्यातून सुमारे ८० ते ९० हजार रुपयांचे पूरक उत्पन्न मिळते. या व्यतिरिक्त शेणखत वर्षाला पाच ते सहा ट्रॉली उपलब्ध होते. त्याचा वापर शेतीत होतो. घरच्या शेतीतदेखील बैलांचा वापर होतो. मात्र यांत्रिकीकरणाचा पर्यायदेखील अवलंबिण्यात आला आहे. शेती आणि पोल्ट्रीच्या व्यवस्थापनात कृषी विभागाच्या ‘आत्मा’चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक धम्मपाल बनसोड, तसेच कृषी सहायक विशाल फुलमाळी यांचे मार्गदर्शन मिळते.  सचिन यांची शेतीतील वाटचाल  सचिन यांनी संगीत विषयात पदवीपर्यंत शिक्षण केले आहे. ते उत्तम तबलावादक आहेत. त्यांनी संगणक विषयातील अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. सुमारे १८ महिने खासगी कंपनीमार्फत कंत्राटी पद्धतीवर त्यांनी शासकीय कार्यालयात चार वर्षे नोकरी केली. मात्र घरचीच शेती अधिक खुणावत होती. त्यातच काहीतरी वेगळे करण्याच्या आत्मविश्‍वासातून पोल्ट्री व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला.   

व्यवसायाची उभारणी  पोल्ट्रीसाठी ३० फूट रुंद व २१० फूट लांबीचे शेड उभारले आहे. त्यासाठी सुमारे १८ लाख रुपयांचा खर्च आला. शेडची पाच हजार पक्ष्यांची क्षमता आहे. शेडच्या तीनही बाजूंनी जाळी तर एका बाजूने भिंत आहे. शेडला जाळी लावण्यामागे पक्ष्यांना खेळती हवा मिळावी आणि सूर्यप्रकाश मिळावा हे कारण आहे. जाळीच्या खालील बाजूस एक फुटाची भिंत घेतली आहे. सुरवातीला मुकुटबन (जि. यवतमाळ) येथील एका राष्ट्रीय बॅंकेच्या शाखेत त्यांनी कर्जासाठी खेटे घातले. परंतु बॅंक व्यवस्थापनाकडून नोटाबंदी आणि इतर कारणे सांगत कर्ज देण्यास नकार देण्यात आला. मात्र या नकारामुळे खचून न जाता अन्य पर्यायांतून पैशांची उभारणी करण्याचा निर्णय घेतला. नोकरीद्वारे गाठीशी असलेला पैसा, त्यासोबतच घरचे दागिने गहाण ठेवत व मित्रमंडळींकडून याप्रकारे पैसा उभारला. 

अभ्यासातून जाणले बारकावे व्यवसाय उभारण्यापूर्वी नागपूरच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात पोल्ट्रीशी संबंधित पाच दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले. राहुल विधाते (धानोली, चंद्रपूर) यांचा सुमारे १२ हजार पक्ष्यांचा पोल्ट्री फार्म आहे. त्यांच्या फार्मला भेट दिली. त्यांच्याकडे सुमारे ४२ दिवस प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतले. आपण व्यवसाय सुरू करू शकतो असा आत्मविश्‍वास निर्माण झाल्यानंतरच शेडच्या बांधकामाला सुरवात केल्याचे सचिन सांगतात.   पक्ष्यांचे व्यवस्थापन सात, चौदा आणि एकविसाव्या दिवशी पक्ष्यांचे लसीकरण करावे लागते. यावरील खर्चाचा काही हिस्सा करार केलेल्या कंपनीकडून उचलला जातो. शेडच्या वरील बाजूस पाण्याचा टॅंक आहे. त्यातून पाइपलाइन करीत शेडपर्यंत पाण्याची सोय स्वयंचलित पद्धतीने करण्यात आली आहे.  शेडच्या उभारणीवर मोठा खर्च झाला आहे. त्यावरील कर्जाची भरपाई करावी लागणार असल्याने तूर्तास आणखी काही वर्षे कंपनीसोबतच करार करून पक्ष्यांचे व्यवस्थापन केले जाईल. त्यानंतर पर्यावरणपूरक व सुधारित तंत्रयुक्त शेड (कूलिंग पॅड व फीड ऑटोमेशन यंत्रणेद्वारा देण्याची पद्धत) उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्या माध्यमातून साडेआठ हजारांपर्यंत पक्ष्यांचे संगोपन करण्याचा मानस आहे.   करार शेतीद्वारे पक्षी संगोपन  राजनांदगाव (छत्तीसगड) येथील एका कंपनीशी करार करण्यात आला आहे. कंपनीकडून पिलांचा पुरवठा, तसेच पक्ष्यांना लागणारे खाद्य पुरविले जाते. साधारण ४२ दिवसांची एक बॅच असते. तेवढ्या दिवसांनंतर पक्ष्यांचे (ब्राॅयलर) वजन सरासरी दोन किलोपर्यंत झाल्यानंतर कंपनीकडूनच पक्षी घेतले जातात. पक्षी संगोपनासाठी किलोमागे सहा रुपये याप्रमाणे कंपनीकडून पैसे दिले जातात. त्यानुसार दोन किलो वजनाच्या पक्ष्यांमागे १२ रुपये मिळतात. एक बॅच सुमारे पाच हजार पक्ष्यांची असते. गेल्या वर्षभरात चार बॅचचे उत्पादन झाले आहेत. नुकतीच पाचवी बॅचही पूर्ण झाली आहे. व्यवस्थापना दरम्यान पक्ष्यांच्या मरतुकीचे प्रमाणही कमी म्हणजे चार ते पाच टक्‍केच राहते.    : सचिन टोंगे,  ९७६५३०६६६४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com