फूलशेतीतून मिळवले वर्षभर मार्केट

फुलशेतीमध्ये रमलेले राऊत दांपत्य.
फुलशेतीमध्ये रमलेले राऊत दांपत्य.

अर्धापूर (जि. नांदेड) येथील अर्जून ग्यानोजी राऊत यांनी फूलशेतीतून आर्थिक प्रगती केली आहे. वर्षभर फुलांच्या उत्पादनाचे गणित त्यांनी बसविले याचबरोबरीने हार, स्टेज डेकोरेशनचाही व्यवसाय करतात. फूलशेतीच्याबरोबरीने भाजीपाल्याच्या आंतरपिकातून नफा वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. एके काळी गुराखी असलेले अर्जून ग्यानोजी राऊत यांनी अर्धापूर (जि. नांदेड) गावातील बाजारपेठेची गरज ओळखून वीस वर्षांपासून फूलशेतीला सुरवात केली. फूलशेतीतून राऊत यांनी एक एकरावरून साडेतीन एकरावर शेती नेली. अर्धापूरमध्ये मुख्य रस्त्यावर कापड दुकान आणि घरही बांधले. बाराही महिने त्यांच्या शेतात रंगीबेरंगी फुलांचा बहर असतो.

अर्जून राऊत यांना चार भाऊ. न कळत्या वयातच आईचे निधन झाल्याने वडिलांनी सांभाळ केला. घरची एक एकर शेती. वडील आणि पाच भाऊ गावातील शेतकऱ्यांची जनावरे सांभाळायचे. यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. नंतर सर्व भाऊ सालगडी म्हणून काम करू लागले. या मिळकतीतून वडिलांनी तीन एकर शेती घेतली. त्यामुळे सर्वांनी सालगडी म्हणून नोकरी सोडली. शेतीमध्ये विहीर खोदून केळी लागवड केली. केळी लागवड आणि भागीदारीच्या शेतीमधून त्यांनी आणखी तीन एकर शेती घेतली. भावांमध्ये शेतीच्या वाटण्या झाल्यामुळे अर्जून राऊत यांना एक एकर शेती आणि पन्नास हजार रुपये मिळाले. पन्नास हजारांतून त्यांनी पिठाची गिरणी घेतली. बाजारपेठेत फुलांची मागणी लक्षात घेऊन गुलाब, शेवंती, मोगरा, गॅलार्डिया लागवडीस सुरवात केली.

फूलशेतीबाबत अर्जून राऊत म्हणाले की, आमच्या भागात केळी, ऊस, हळद लागवड मोठ्या प्रमाणात आहे. परंतु मी फूलशेतीला सुरवात केली. पिठाची गिरणी चालवून मी आणि माझी पत्नी द्रोपदाबाई दोघेही फुलांची लागवड ते विक्रीचे नियोजन पाहू लागलो. व्यापाऱ्यांना फुले विकण्यापेक्षा हार, गजरे तयार करून नफा वाढविला. या व्यवसायातून एक एकराची शेती साडेतीन एकरवर नेली. फूल आणि हारांच्या विक्रीसाठी अर्धापूर गावातील मुख्य रस्त्यावर जागा खरेदी केली. त्यासाठी राहते घर व गिरणी विकली. नवीन जागेत पुढच्या बाजूला दुकान आणि मागे घर असे बांधकाम केले. फुलांच्या विक्रीबरोबरीने तयार कापडांच्या विक्रीचे दुकान सुरू केले. सध्या कापड दुकानाच्यापुढे फुले, हाराची विक्री सुरू असते.

राऊत पती पत्नी स्वतः शेतीमध्ये राबतात. त्यामुळे मजुरांची गरज भासत नाही. सकाळी ५ ते ७ आणि दुपारी ४ ते ८ हे दोघे जण शेतावर असतात. मधल्या काळात फुलांचा स्टॉल आणि कापड दुकान सांभाळतात. दुकानासाठी राऊत यांची मुलगी शिक्षण सांभाळून मदत करते. शेती मशागतीसाठी राऊत यांनी कृषी विभागाकडून अनुदानावर पॉवर टिलर खरेदी केला आहे. राऊत यांच्याकडे सध्या एक गीर गाय आहे. दररोज पाच लिटर दुधाची थेट ग्राहकांना विक्री केली जाते. त्यातून दिवसाला दोनशे रुपयांचे उत्पन्न मिळते.   आंतरपीक पद्धतीवर भर ः पीक नियोजनाबाबत अर्जून राऊत म्हणाले की, साडेतीन एकरांमध्ये दोन कूपनलिका आहेत. संपूर्ण शेतीला ठिबक सिंचन केले आहे. साडेतीन एकरांपैकी बाराही महिने पावणे दोन एकरावर फूलशेती असते. वर्षभर हार निर्मितीसाठी फुलांची गरज लक्षात घेऊन या क्षेत्रामध्ये कागडा, निशिगंध, देशी गुलाब, पिवळी शेवंती, पांढरी शेवंती, लीली, गॅलार्डिया, झेंडू, मोगरा लागवड आहे. दरवर्षी एक एकरावर ऊस आणि एक एकर कापूस लागवड असते.

  • ऊस शेती ः एक एकरावर आडसाली ऊस लागवड. को-८६०३२ जातीचे एकरी ४० टन उत्पादन. उसामध्ये टोमॅटो, मिरचीचे आंतरपीक. टोमॅटो, मिरचीची दुकानातून ग्राहकांना थेट विक्रीतून सत्तर हजारांचे उत्पन्न.
  • कापूस लागवड ः  बीटी कपाशीचे एकरी १२ ते १४ क्विंटल उत्पादन. कापूस काढणीनंतर अर्ध्या एकरावर कारले आणि अर्धा एकर गॅलार्डिया लागवडीचे नियोजन.
  • कारले लागवड : दिवाळी नंतर एक एकर कापसाची वेचणी संपते. त्यातील वीस गुंठे क्षेत्रातील कापसाच्या पऱ्हाट्या कापून तेथेच सरळ ओळीत टाकल्या जातात. त्याच्या बाजूला कारल्याचे बी टोकले जाते. कारल्याच्या वेल तोडलेल्या पऱ्हाटीवर पसरवला जातो. कारले विक्रीतून ५० हजारांचे उत्पन्न. कारले उत्पादन जून महिन्यापर्यंत चालते. कारल्याच्या शेवटच्या टप्प्यात कारल्याच्या ओळीच्याकडेने गॅलार्डियाची लागवड.
  • गॅलार्डिया लागवड : कापूस वेचणीनंतर दिवाळीनंतर २० गुंठे क्षेत्रावर गॅलार्डिया लागवड. जून पर्यंत गॅलार्डियाच्या फुलांचे उत्पादन. गॅलार्डियाचे उत्पादन संपत असताना त्याच ओळीत कारल्याच्या बियांची टोकण. कारल्याचे वेल वाळलेल्या गॅलार्डियाच्या झाडांवर सोडले जातात. कारले दिवाळीपर्यंत चालते. त्यापासून ५० हजार रुपयांचे उत्पन्न. कापूस पऱ्हाट्या आणि गॅलार्डियाच्या वाळलेल्या झाडांमुळे कारल्यासाठी ताटी करावी लागत नाही. हा खर्च वाचतो. दररोज दुकानातून ग्राहकांना कारल्याची विक्री केली जाते.
  • झेंडू लागवड : पावसाळ्यात दहा गुंठ्यांवर झेंडू लागवड. सध्या झेंडूमध्ये कोबीचे आंतरपीक..
  • मिश्र फूल शेती ः अर्जून राऊत यांनी वर्षभर हारासाठी फुलांची मागणी लक्षात घेऊन एक एकर क्षेत्रावर पिवळी शेवंती, पांढरी शेवंती, निशिगंध, लीली आणि गुलाबाची मिश्र फुलशेती केली आहे. याबाबत राऊत म्हणाले की, चार सऱ्या पिवळी शेवंती आणि सात सऱ्या पांढऱ्या शेवंतीची लागवड केली आहे. तीन सऱ्या कागडा, चार सऱ्या मोगरा आणि एक सरी लीली लागवड आहे. याच क्षेत्रात आठ फूट बाय चार फुटांवर गुलाब रोपांची लागवड आहे. गुलाबाच्या छाटणीचे नियोजन बसवून वर्षभर फुलांचे उत्पादन मिळते. पांढऱ्या शेवंतीचे एप्रिल ते जून, आॅगस्ट ते आॅक्टोबर आणि डिसेंबर ते फेब्रुवारी तर पिवळ्या शेवंतीचे नोव्हेंबर ते जानेवारी उत्पादन मिळते. शेवंतीची फुले एेन हंगामात १५० ते २०० रुपये किलो या दराने विकली जातात. पावसाळ्यात लिली आणि झेंडूचे उत्पादन मिळते.   सेंद्रिय खतांचा वापर ः

  • जमिनीची सुपीकता आणि फुलांच्या दर्जेदार उत्पादनासाठी सेंद्रीय खत वापरावर भर. तसेच जैविक किडनाशकांचा वापर.
  • गीर गाईच्या शेणापासून खत निर्मिती. ठराविक दिवसांनी गोमूत्र ठिबक सिंचनातून ऊस, भाजीपाला आणि फूल लागवडीला दिले जाते.
  • मधमाशीपालन ः

  • फुलशेतीमुळे साडेतीन एकरांत दहा मधमाश्यांच्या पेट्या. मधमाशीपालनासाठी खादी ग्रामोद्योगाकडून सहा दिवसांचे प्रशिक्षण.
  • मधमाशीपालनामुळे फुलांच्या उत्पादनात वाढ तसेच मधाचेही उत्पादन.
  • स्टेज सजावटीतून उत्पन्न : लग्न समारंभाच्या छोट्या स्टेजसाठी २ ते ३ हजार तर मोठ्या स्टेजसाठी १० ते १२ हजार रुपये राऊत यांना मिळतात. वर्षभरात १० ते १२ स्टेज सजावटीचे काम मिळते. लग्न समारंभासाठी गजरे, हार व वेण्याच्याही त्यांच्याकडे चांगली मागणी असते. विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका योजना : शाळा, कॉलेजातील मुलांसाठी राऊत कमवा व शिका योजना राबवतात. गरीब घरातील चार मुले सकाळ-संध्याकाळ हार तयार करून शाळा, कॉलेज करतात. दहा रुपयाला विकल्या जाणाऱ्या हाराला एक रुपया आणि ३० रुपये विकल्या जाणाऱ्या हाराला तीन रुपये मजुरी मुलांना दिली जाते. त्यामुळे मुलांना दिवसाला शंभर रुपये मजुरी मिळते.   संपर्क : अर्जून राऊत, ९४२३०८४७६६ (लेखक नांदेड येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com