दारोकार भावंडाचा कुक्कुटपालन व्यवसायातील आदर्श

दारोकार बंधू वर्षातून पक्ष्यांच्या साधारणपणे ६ बॅच घेतात.
दारोकार बंधू वर्षातून पक्ष्यांच्या साधारणपणे ६ बॅच घेतात.

छोटीशी सुरवातदेखील मोठ्या परिवर्तनाची नांदी ठरू शकते, हा विश्‍वास रुजविण्यात बडनेरा (ता. जि. अमरावती) येथील दारोकार भावंड यशस्वी झाले आहेत. कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्याकरिता १५०० पक्ष्यांपासून कुक्कुटपालन व्यवसायाची सुरवात करणाऱ्या दारोकार यांच्याकडील पक्ष्यांची संख्या आज १५ हजार ५०० पक्ष्यांवर पोचली आहे. त्यावरूनच त्यांचे या व्यवसायातील सातत्य आणि चिकाटी लक्षात आल्याशिवाय राहत नाही.   बडनेरा (ता. जि. अमरावती) येथील दारोकार कुटुंबाची सुमारे चार एकर शेती. शेतीमध्ये भाजीपाला पिके घेण्यावर त्यांचा भर असतो. शेतीला पूरक व्यवसायाची जोड म्हणून दारोकार कुटुंबातील अाशिष अाणि पंकज या उच्चशिक्षित तरुण भावंडांनी नंतर कुक्कुटपालनामध्ये अधिक लक्ष घातले. अार्थिक स्थैर्य मिळावे म्हणून त्यांनी सुरू केलेल्या या कुक्कुटपालन व्यवसायात अाज त्यांनी मोठी मजली मारली अाहे. आशिष दारोकार यांचे वडील मोहनराव यांचा वीटभट्टीचा व्यवसाय, तर मोहनराव यांचे वडील सूर्यभान हे कुटुंबीयांची शेती सांभाळत होते. शेतीमध्ये पारंपरिक पिके घेतली जात असत. दरम्यान सूर्यभान यांच्या निधनानंतर शेतीची सूत्रे आशिष यांच्याकडे अाली. आशिषने पारंपरिक पिकांऐवजी भाजीपाला पिके घेण्याचा निर्णय घेतला. बाजारातील मागणी आणि हंगाम लक्षात घेऊन भाजीपाला लागवडीचे नियोजन केले. लग्नसराई तसेच धार्मिक उत्सवात वांग्याची भाजी करण्याला प्राधान्य राहते, त्यामुळे मार्केट लक्षात घेत वांग्याची लागवड केली अाहे. सध्या त्यांच्याकडे एक एकर वांगी अाणि एक एकर चवळीची लागवड अाहे. याशिवाय इतर क्षेत्रावर कारली, तूर, मूग अाणि कोंथिबीर अशी पिके घेतली जातात. कुक्कुटपालनामध्ये रोवले पाय २००५ साली शेतीला पूरक व्यवसायाची जोड असावी म्हणून अाशिष यांनी कुक्कुटपालन व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. आशिष याने कृषी डिप्लोमा केला आहे. त्यातील माहिती आणि प्रात्याक्षिक अनुभवाच्या आधारे त्यांना हा व्यवसाय करणे अवघड नव्हते. व्यवसायात चुलतभाऊ पंकजची मदत घेत दोघांनी मिळून सुरवातीला १५०० पक्ष्यांपासून सुरवात केली. पुणे येथील एका पुरवठादारांकडून पक्ष्यांची खरेदी केली जायची. ब्रॉयलर आणि गावरान पक्ष्यांच्या दोन-दोन बॅच त्या वेळी घेतल्या जात होत्या. २०१४-१५ पर्यंत अशाप्रकारे ब्रॉयलर आणि गावरान पक्ष्यांची विक्री होत होती. मार्केटिंगमधील टप्पे सुरवातीला मांसल पक्ष्यांची विक्री करणाऱ्या बडनेऱ्यातील स्थानिकांना विक्री केली जायची. त्यांच्या माध्यमातूनच या क्षेत्रातील व्यापारी व वितरकांची माहिती कळाली. फोनवरून संपर्क साधून व्यापऱ्यांना मागणीनुसार पक्ष्याचा पुरवठा केला जाऊ लागला. मागणीनुसार हळूहळू पक्ष्यांच्या संख्येमध्ये वाढ केली. टप्प्याटप्प्याने व्यवसायामध्ये वाढ केल्यामुळे २००७ मध्ये गावरान कोंबड्यांचा अमरावती जिल्ह्यातील सर्वांत मोठा फार्म म्हणून व्यवसायाने परिसरात लौकिक मिळविला होता. स्थानिक बाजारात सुरवातीला स्वतः विक्री केली, त्यानंतर व्यापाऱ्यांच्या माध्यमातून पक्ष्यांची विक्री केली जात असे. २०१६ साली नोटबंदीमुळे मोठ्या अार्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागले. त्या वेळी अामच्याकडे मोठ्या संख्येने पक्षी तयार होते. परंतु मार्केट नव्हते तेव्हा अाम्हाला पक्षी खरेदी करणाऱ्या कंपनीची माहिती मिळाली. तेव्हापासून अातापर्यंत कंपनीलाच पक्ष्यांची विक्री केली जाते. आता नागपूर येथील एका कंपनीतर्फे एक दिवसाचे पक्षी पुरविले जातात. करार पद्धतीत कंपनीकडून एक दिवसाचे पक्षी, पक्षांचे खाद्य तसेच लसीकरणाकरीता लागणाऱ्या औषधांचा पुरवठा होतो. केवळ पक्ष्यांचे व्यवस्थापन करावे लागते. दारोकार यांच्या कुक्कुटपालनाची वैशिष्ट्ये

  • सुमारे १२ हजार चौरस फूट अाणि साडेसात हजार चौरस फूट अाकाराच्या दोन शेडची उभारणी.
  • शेडवर सुमारे ५५ लाख रु. खर्च.
  • शेडच्या उभारणीसाठी चांगल्या प्रतीचे लोखंडी पाइप आणि जाळीचा वापर त्यामुळे खर्चात वाढ.
  • शेडमध्ये थंडावा राहण्यासाठी शेडभोवती वृक्षारोपण. दोन शेडच्यामध्ये दुहेरी हेतूसाठी लिंबाच्या झाडांची लागवड.
  • फार्मच्या व्यवस्थापनाकरिता दोन मजूर कुटुंबीयांची बारा हजार रुपये महिना मजुरीवर कायमस्वरूपी नियुक्‍ती.
  • पाण्यासाठी शेतातील दोन विहिरी आणि एका बोअरवेलची सोय.
  • उन्हाळ्यात घ्यावी लागते विशेष काळजी विदर्भात उन्हाची तीव्रता अधिक राहते; त्यामुळे या काळात पक्ष्यांचे संगोपन करणे अधिक कठीण जाते त्यामुळे सध्या १५ हजार ५०० पक्षी अाहेत. इतरवेळी सुमारे १९ हजार पक्ष्यांचे संगोपन केले जाते. गारवा राहण्यासाठी शेडच्या वरील बाजूस स्प्रिंकलर लावले आहेत. दुपारी ११ ते सायंकाळी पाच या वेळात ते सुरू ठेवले जातात. शेडच्या जाळीला शेड नेट तसेच बारदाना लावला अाहे. हिवाळ्यात शेडमधील तापमान उबदार राहण्यासाठी बल्ब आणि हीटरचा वापर केला जातो. अर्थकारण

  • कंपनीकडून एक दिवसाचे पक्षी, खाद्य अाणि अाैषधांचा पुरवठा.
  • मजुरी अाणि विजेचा खर्च स्वतः करावा लागतो.
  • दर चाळीस दिवसांनी सरासरी २२०० ग्रॅम वजनाचे पक्षी कंपनीद्वारे खरेदी केले जातात.
  • कंपनीकडून प्रतिकिलो पक्ष्यासाठी साडेसात ते आठ रुपये दर.
  • वर्षातून ६ बॅच. एका बॅचमध्ये साधारणपणे १० ते ११ हजार पक्षी, उन्हाळ्यात ९ हजार.
  • प्रत्येक बॅचमधून साधारणपणे एक ते दीड लाख रु. मिळतात.
  • उचलला मजुराच्या मुलींच्या शिक्षणाचा खर्च कुक्कुटपालन व्यवसायाचे दैनंदिन व्यवस्थापन करण्यासाठी दोन मजूर कुटुंबाची नियुक्‍ती करण्यात अाली आहे. या मजुराच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च दारोकार यांच्याद्वारे केला जातो. अशा प्रकारे त्यांनी मजूर आणि मालकामधील संबंध वृद्धिंगत करण्यासोबतच एक नवा सामाजिक संदेशही दिला आहे. संपर्क ः आशिष दारोकार, ९४२१६०१३८१ पंकज दारोकार, ९८९०८८१६५०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com