पुदिनायुक्त ताक विक्रीतून शोधला उत्पन्नाचा नवा मार्ग

पुदिनायुक्त ताकाचा आस्वाद घेताना ग्राहक. सेंद्रिय उत्पादन असल्याने विजय गुंजाळ यांच्या शेवग्याच्या शेंगाना चांगली मागणी आहे.
पुदिनायुक्त ताकाचा आस्वाद घेताना ग्राहक. सेंद्रिय उत्पादन असल्याने विजय गुंजाळ यांच्या शेवग्याच्या शेंगाना चांगली मागणी आहे.

संगमनेर (जि. नगर) येथील विजय एकनाथ गुंजाळ यांनी गेल्या सहा वर्षांपासून पुदिनायुक्त ताक (मठ्ठा) विक्रीतून उत्पन्नाचा नवीन मार्ग शोधला. केवळ एक एकर शेती असताना सेंद्रिय पद्धतीने शेवगा लागवडीमध्ये पुदिन्याचे आंतर पीक घेण्याची पीकपद्धती यशस्वी केली. अल्पभूधारक विजय यांनी ताक विक्री आणि शेवगा लागवडीतून परिसरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. संगमनेर (जि. नगर) येथील राजेश, विजय आणि अजित गुंजाळ हे तिघे भाऊ. विजय बारावी शिकलेले. तिघात मिळून एक एकर शेती. क्षेत्र कमी असल्याने वडील मजुरी करायचे. तिघा भावांनी वेगवेगळ्या मार्गाने रोजगार शोधण्याचा प्रयत्न केला. मोठे भाऊ राजेश हे नगरपालिकेत कार्यालयीन निरीक्षक आहेत. दुसरे विजय असून तिसरे अजित हे भाजीपाला खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. विजय यांनी २००७ ते २००९ या काळात कंपोस्ट खत तयार करून ते विक्री करण्याचे काम केले. मात्र त्यात फारसा जम बसला नसल्याने त्यांनी २०१२ मध्ये येथील खासगी दूध संघाकडून दूध, ताक विक्री व अन्य उत्पादनाच्या वितरणाचे काम घेतले. तेव्हापासून त्यांनी संगमनेर रस्त्यावर ताक विक्री करण्याचे दुकान सुरू केले. तेथेच प्रयोग म्हणून त्यांनी पुदिनायुक्त ताक विकायचा निर्णय घेतला, विक्री सुरू केली आणि लोकही प्रतिसाद देऊ लागले. आज संगमनेरला येणारा प्रत्येक व्यक्ती हमखास नगर रस्त्यावरील स्पेशल पुदिनायुक्त ताकाचा आस्वाद घेतोच. त्यामुळे त्यांची सर्वदूर ओळख निर्माण झाली आहे. पुदिनायुक्त ताकाचे महत्त्व अधिक विजय गुंजाळ हे या भागात पुदिनायुक्त ताक विक्री करणारे एकमेव आहेत. या रस्त्यावरुन जाणारा प्रत्येकजण शक्‍यतो पुदिनायुक्त ताकाचा आस्वाद घेऊन जातो. काही लोक जाता- जाता घरी पार्सलही घेऊन जातात. डोकेदुखी, त्वचा विकार, पोट साफ राहण्यासाठी, चांगले पचन होण्यासाठी वजनासंबंधी समस्यांवर हे पुदिनायुक्त ताक गुणकारी आहे. त्यामुळे लोकांची ताकाला पसंती असते असे, विजय सांगतात. ताक विक्रीचे अर्थकारण प्रतिलिटर २० रु. प्रमाणे ताक खरेदी केले जाते. त्यामध्ये पुदिना रस, काळे मिठ मिसळून १० रु. ग्लासप्रमाणे विक्री केली जाते. पार्सल असेल तर बॉटलमध्ये विक्री केली जाते. सुरवातीला साधारण पाच ते दहा लिटर ताकाची विक्री व्हायची, त्यात टप्प्याटप्प्याने वाढ झाली. आता दर दिवसाला साधारण शंभर ते दीडशे लिटर ताकाची गुंजाळ विक्री करतात. उन्हाळ्यात या ताकाला अधिक मागणी असते. बारमाही पुदिनायुक्त ताकाची विक्री सुरू असली तरी उन्हाळ्यात मागणी अधिक असते. उन्हाळ्यात साधारण तीनशे लिटरपर्यंत विक्री होते. एक लिटर ताकामागे साधारण ७ ते ८ रु. फायदा मिळतो. ताकनिर्मिती ते विक्रीपर्यंत विजय यांना कुटुंबातील सदस्यांची मदत होते. पुदिन्याचा रस काढण्यासाठी मशीनचा वापर ताकात वापरण्यासाठी सुरवातीला ज्युसरमधून पुदिन्याचा रस काढाला जायचा. ताकाच्या मागणीत वाढ झाल्यानंतर पाच वर्षांपूर्वी ज्यूस काढण्यासाठी २७ हजार रुपयांचे मशीन विकत घेतले. दररोज साधारण तीन ते चार किलो पुदिन्याचा रस ताकासाठी लागतो. शेवगा लागवडीमध्ये पुदिन्याचे आंतरपीक विजय यांनी एक एकर शेतीच्या जोरावर कुटुंब सावरले आहे. संगमनेर शहरालगत असलेली एकरभर शेती तिघा भावांची एकत्रित असली तरी शेतीचे व्यवस्थापन विजय हेच पाहतात. तीन वर्षांपूर्वी शेवग्याच्या कोइमतूर - २ या वाणाची बारा बाय दहा फूट अंतरावर लागवड केली आहे. दोन वर्षांपासून उत्पादन मिळायला सुर०वात झाली. शेवग्याची दररोज तोडणी केली जाते. शेवगा लागवडीमध्ये पुदिन्याची लागवड केली आहे. शेंगाची तोडणी, पुदिन्याची काढणी आणि अन्य मशागतीची कामे घरचे सदस्यच करतात त्यामुळे मजुरीवरील खर्च वाचतो. पतसंस्थेचे कर्ज काढून विंधनविहीर घेऊन पाण्याची व्यवस्था केली आहे. संपूर्ण शेवग्याच्या झाडाला ठिंबक सिंचनाने पाणी दिले जाते. रासायनिक खतांएेवजी झाडांना गोमूत्र, गूळ, गाईचे शेण यांच्यापासून तयार केलेली स्लरी दिली जाते. त्यामुळे शेंगांची संख्या वाढली आहे, असे विजय गुंजाळ यांनी सांगितले.   मुंबई मार्केटला शेवग्याची विक्री गुंजाळ कुटुंब दररोज शेवग्याच्या शेंगाची तोडणी करतात. पहिल्यावर्षी प्रती झाड दहा ते पंधरा किलो उत्पादन मिळाले आणि प्रती किलोसाठी १५ रु. दर मिळाला. दुसऱ्या वर्षी प्रती झाड ३० किलो उत्पादन मिळाले आणि किलोसाठी ७० रु. दर मिळाला. तर तिसऱ्या वर्षी म्हणजे यंदा प्रती झाड ५० किलो पर्यंत उत्पादन मिळाले आणि किलोसाठी सरासरी पन्नास रु. दर मिळाला. शेंगाची तोडणी केल्यानंतर पन्नास किलोचे पॉकिंग करून माल मुंबईला पाठवला जातो. सेंद्रिय उत्पादन असल्याची खात्री पटल्याने शेवग्याच्या शेंगाना मागणीही चांगली आहे. गुंजाळ यांच्याकडून शिकण्यासारखे

  • कमी क्षेत्र असून अधिक उत्पादनासाठी सतत प्रयत्नशील.
  • पुदिनायुक्त ताक विक्रीतून वेगळेपण दाखवत नावलौकिक मिळवला.
  • कमी पाण्यात सेंद्रिय पद्धतीने शेवग्याचे उत्पादन.
  • कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने मजुरीच्या खर्चात बचत.
  • गोमूत्र, शेणखत यासाठी एका देशी गाईचे संगोपन.
  • भविष्यात स्वतःच्या ब्रॅंडने ताकाची विक्री करण्याचे नियोजन.
  • कमी क्षेत्र असल्याची अनेकांना खंत असते. त्यात पाणी नाही, दुष्काळामुळे अनेकांना अडचणीला सामोरे जावे लागते. एकरभर क्षेत्रातून प्रयत्न आणि कष्टातून मी प्रगती साधण्याचा प्रयत्न केला. पुदिनायुक्त ताक विक्रीची सर्वप्रथम या भागात सुरवात केली. आजे हे ताक लोकप्रिय झाले आहे. विजय गुंजाळ, ७५८८६९३४७७  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com