दुधाणे सेंद्रिय पद्धतीने स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतात.
दुधाणे सेंद्रिय पद्धतीने स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतात.

डोंगरावर फुलविले एकात्मिक शेतीचे आदर्श मॉडेल

खिंगर (ता. महाबळेश्‍वर, जि. सातारा) गावातील राजेंद्र दुधाणे यांनी एकात्मिक शेतीचे आदर्श मॉडेल उभे केले आहे. शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत त्यांनी उत्पन्नाचे स्राेत वाढविले. कुटुंबाच्या मदतीने शेतमालाची थेट विक्री करत त्यांनी शेती फायदेशीर केली. येत्या काळात त्यांचा शेतातच कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्याचा विचार अाहे.     सातारा जिल्ह्यातील पाचगणी शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर खिंगर हे गाव. येथील शेतकऱ्यांचे स्ट्रॉबेरी हे प्रमुख पीक. येथील दुधाणे कुटुंबाची दहा एकर शेती अाहे. दुधाणे यांचे तीन भावांचे एकत्र कुटुंब असून यामध्ये राजेंद्र हे थोरले अाहेत. ते शेतातील कामांची जबाबदारी पाहतात, तर दोन नंबरचे सुनील वीज मंडळात नोकरीला आहेत, तर तीन नंबरचे अनिल शेतमालाची ग्राहकांना थेट विक्री करण्यासाठी उभारलेल्या स्टॉलचे काम पाहतात. दहावी शिक्षण झाल्यावर राजेंद्र यांनी वडिलांच्या बरोबरीने शेती करण्यास सुरवात केली. या काळात भात, बटाटा, नाचणी, रताळी आदी पिके घेतली जात होती. १९९२ मध्ये स्ट्राॅबेरीची माहिती मिळाल्यावर पहिल्यांदाच सात गुंठे क्षेत्रावर लागवड केली. यातून चांगले पैसे मिळाल्याने शेतीतील उत्साह वाढल्याने टप्प्याटप्प्याने क्षेत्रात वाढ करत नेली. शेतीच्या उत्पादनातून त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांना चांगले शिक्षण देणे शक्‍य झाले आहे. दुधाणे यांना बोरगाव येथील कृषी विज्ञान केंद्रातील भूषण यादगीरवार यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळते.  शेतजमिनीची खरेदी  दुधाणे कुटुंबीयांनी एकी, कष्ट अाणि शेतीच्या उत्पादनातून वडीलोपार्जीत साडेतीन एकर शेती वाढवत नेऊन दहा एकर पर्यंत नेली. डोंगराळ जमीनीचे सपाटीकरण करून त्याचे प्लॉट पाडले अाहेत. सध्या शेतात दीड एकर स्ट्राॅबेरी, अर्धा एकर रासबेरी, अर्धा एकर गुजबेरी व मलबेरीची १५ झाडे आहेत. इतर क्षेत्रात भाजीपाला व हंगामनिहाय पिके घेतली जातात.  स्ट्राॅबेरी शेतीला देशी, विदेशी भाज्यांची जोड  स्ट्राॅबेरी पिकांबरोबर दुधाणे यांनी विदेशी व देशी भाज्या घेण्यास सुरवात केली. विदेशी भाज्यामध्ये बोक्रोली, आइसबर्ग, लालकोबी, झुकिनी (हिरवी व पिवळी), लाल मुळा, नवलकोल, चेरीटोमॅटो (लाल व पिवळे) तसेच भारतीय हिरवी मिरची, फ्लॉवर, दोडका, दुधी, वांगी, कारली, भोपळा, गाजर यांसारख्या भाज्या दहा ते २० गुंठे क्षेत्रावर केल्या जातात.  चांगल्या दरासाठी शेतमालाची  स्टॉलवर थेट विक्री  अधिक फायद्यासाठी राजेंद्र यांनी शेतमालाची थेट विक्री करण्याचा निर्णय घेतला. पाचगणी येथे स्टॉलमध्ये भाऊ अनिल भाज्यांची विक्री करू लागले. पर्यटनाचे ठिकाण असल्यामुळे ६० ते ७० टक्के शेतमालाची विक्री स्टॉलवरच होते. यामुळे बाजारभावापेक्षा अधिक दर मिळतो. शिल्लक भाजीपाल्याची हॉटेल व्यावसायिकांना मागणीनूसार विक्री केली जाते.   एकात्मिक शेतीकडे वाटचाल  पशुपालन आणि कुक्कुटपालन  सेंद्रिय शेतीचे महत्त्व लक्षात अाल्याने अाणि उत्तम प्रतीचे शेणखत उपलब्ध होण्यासाठी गाई, म्हशीचे संगोपन सुरू केले. मशागतीच्या कामासाठी दोन बैलांचेही संगोपन केले जाते. सध्या दुधाणे यांच्याकडे दोन बैल, दोन गाई व दोन म्हशी आहेत. घराच्या बाजूलाच छोटसे शेड तयार करून त्यामध्ये शेळीपालन केले जाते. सध्या दुधाणे यांच्याकडे लहान-मोठ्या मिळून २५ स्थानिक जातीच्या शेळ्या आहेत. उरलेल्या भाजीपाल्याचा वापर शेळ्यांसाठी चारा म्हणून केला जातो. अंडी अाणि मांसासाठी २५ ते ३० कोंबड्याचे मुक्त संचार पद्धतीने संगोपन केले जाते.   मत्स्यपालन  संरक्षित पाण्यासाठी दुधाणे यांनी ४५ लाख लिटर क्षमतेचे शेततळे बांधले आहे. या शेततळ्यात रोहू, कटला या प्रजातीचे मत्स्यबीज सोडून मत्सपालनाला सुरवात केली. पूर्ण वाढ झाल्यानंतर १००० ते १२०० ग्रॅम वजनाचे मासे मिळतात. तळ्याच्या पाण्यामध्ये बदकही सोडण्यात आले आहेत. शेततळ्याच्या कडेला ड्रॅगन फ्रूट व व्हट्रीग्रो पद्धतीने स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे.  स्ट्रॉबेरी रोपनिर्मितीसाठी पॉलिहाउस  स्ट्रॉबेरीची रोपे अाणण्यासाठी दुधाणे यांना वाई येथे जावे लागत असल्याने मोठा खर्च होत होता आणि वेळही वाया जात होता. रोपनिर्मितीसाठी त्यांनी पाच गुंठ्यांवर पॉलिहाउसची उभारणी केली आहे. पॉलिहाउसमुळे रोपांच्या खर्चात बचत झाली आहे. भाजीपाल्याची रोपे तयार करण्यासाठी सध्या दहा गुंठे क्षेत्रावर नवीन पॉलिहाउस उभारणीचे काम सुरू आहे.  सेंद्रिय शेतीकडे आगेकूच राजेंद्र यांनी चार वर्षापूर्वी कोल्हापूर येथील कण्हेरी मठामध्ये सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण घेतल्यापासून सेंद्रिय शेतीवर भर दिला जात अाहे. त्यासाठी शेतीमध्ये विविध प्रयोग केले जात अाहेत. किडीच्या बंदोबस्तासाठी सापळे, जैविक कीडनाशकांचा वापर केला जातो.   एकात्मिक शेतीची वैशिष्ट्ये

  • खर्च वजा जाता दुधाणे यांना ५० टक्के नफा मिळतो. हातविक्री केल्यामुळे जास्त फायदा होतो. 
  • पाच ते दहा गुंठे क्षेत्रावर तसेच आंतरपीक म्हणूनही भाजीपाला केला जातो. 
  • जनावरांच्या चाऱ्यासाठी अॅझोला निर्मिती.  
  • सापळे, अाच्छादन, ठिबक सिंचनासोबतच सेंद्रिय खतांचा वापर.
  • शेतामध्ये पाच मधमाश्यांच्या पेट्या.
  •  संपकर् ः राजेंद्र दुधाणे, ९४०३५४७८०६ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com