दर्जेदार वांगी उत्पादनात मानेंचा हातखंडा

वांग्याची प्रतवारी
वांग्याची प्रतवारी

कसबे डिग्रज (ता. मिरज, जि. सांगली) येथील युवा शेतकरी केदार पांडूरंग माने हे गेल्या सहा वर्षांपासून किमान अर्धा ते दीड एकरावर वांगी लागवड करतात. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन योग्य जातीची निवड, काटेकोर पीक व्यवस्थापनातून दर्जेदार वांगी उत्पादनात त्यांनी सातत्य राखले आहे. सांगली-इस्लामपूर राज्य मार्गालगतचे कसबे डिग्रज हे गाव. हळद, ऊस ही या पट्ट्यातील प्रमुख पिके. या भागात पाणी आणि रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेती क्षारपड झाली. त्यामुळे ऊस उत्पादन एकरी ५० ते ६० टनांवर आले. याच गावातील केदार पांडूरंग माने हे युवा शेतकरी. एम. ए. राज्यशास्त्र विषयात शिक्षण पूर्ण केल्यानंतर केदार माने यांनी नोकरीच्या मागे न लागता घरच्या शेती नियोजनात लक्ष देण्यास सुरुवात केली.

माने कुटुंबीयांची मुळची चार एकर शेती. त्यात हंगामी पिकांसह ऊस लागवड असायची. केदार यांचे वडील पांडुरंग माने यांनी चांगल्या प्रकारे शेती करून घर उभे केले. सध्या त्यांच्याकडे आठ जनावरे आहेत. माने यांनी टप्प्याटप्प्याने साखर कारखान्याच्या ऊस वाहतुकीसाठी सहा ट्रॅक्टर घेतले. ऊस वाहतुकीतून आलेल्या रकमेतून टप्प्याटप्प्याने कसबे डिग्रज आणि बेडग या दोन गावात मिळून २० एकरापर्यंत शेती वाढविली.

शेती नियोजनाबाबत केदार माने म्हणाले की, कसबे डिग्रज येथील शेतीमध्ये उपसा सिंचन योजनेचे पाणी आहे. तर बेडग येथील शेतीमध्ये विहीर आणि कूपनलिका आहे. येथे ठिबक सिंचन केले आहे. आमचे एकत्र कुटुंब आहे. वडील पाडुरंग आणि आई रुक्मिणी, बंधू कृष्णा त्यांच्या पत्नी सौ. वर्षाराणी, मी आणि माझी पत्नी श्रृतिका आणि मुले असे एकत्र रहातो. शेतीची जबाबदारी मी पाहतो, तर ट्रॅक्टर आणि आर्थिक व्यवहार बंधू पहातात. शेती नियोजनात सर्व कुटुंबाचा सहभाग असतो. जमिनीची केली सुधारणा ः पीक व्यवस्थापनाबाबत केदार माने म्हणाले की, आमची जमीन क्षारपड असल्याने पहिल्यांदा ऊस उत्पादन कमी मिळायचे. जमीन सुधारणेसाठी गावातील ३३ शेतकऱ्यांच्या बरोबरीने २००१ मध्ये भूमिगत सछिद्र निचरा प्रणाली केली. त्यामुळे क्षारपड जमीन लागवडीखाली आली. एकरी ऊस उत्पादन ७० ते ७५ टनांवर पोचले. ऊस हे सोळा, सतरा महिन्यांचे पीक. याचे टप्प्याटप्प्याने पैसे मिळतात. आमची सरासरी अकरा एकर ऊस लागवड असते. त्यामुळे घरातील भांडवल शेतीत वापरले जायचे. शेतीतील पैसा शेती नियोजनात वापरला तर निव्वळ नफा अधिक मिळेल या हेतूने पर्यायी पिकाबाबत घरच्यांशी चर्चा केली. माझे मित्र चंदू सूर्यवंशी यांनी बाजारपेठेतील मागणीचा विचार करून वांगी लागवडीचा सल्ला दिला. त्यानुसार नियोजन सुरू केले. वांगी लागवडीचे घेतले धडे ः वांगी लागवडीबाबत माने म्हणाले की, मी २०१३ मध्ये वांगी लागवडीचे नियोजन केले. परंतु या पिकाचा पक्का अभ्यास नव्हता. आमच्या भागात मल्लिक इंगळे ही व्यक्ती शेतात काम करणारी. त्यांचा वांगी पिकाचा चांगला अभ्यास होता. त्याच्याशी वांगी पिकाबाबत चर्चा केली. मी इंगळे यांना वर्षभर वांगी शेती करण्यास दिली. त्यामध्ये पीक व्यवस्थापनाचा खर्च केला. उत्पादनाच्या २५ टक्के वाटा हा इंगळे यांना दिला. यातून एक वर्ष वांगी शेतीचा अभ्यास झाला. त्यानंतर पुढील वर्षी मी स्वतः वांगी लागवडीस सुरुवात केली. माझे बंधू कृष्णा हे कृषी पदवीधर असल्याने पिकासाठी खते, कीडनाशकांच्या वापराबाबत योग्य मार्गदर्शन मिळत गेले. त्यातून वांगी उत्पादन आणि दर्जाही सुधारला. त्यामुळे दरवर्षी किमान एक एकारावर वांगी लागवडीत आम्ही सातत्य ठेवले आहे.   वांगी लागवडीचे नियोजन ः वांगी लागवडीबाबत माने म्हणाले की, मी जमीन मशागतीपासून ते विक्रीपर्यंतचा दररोजचा हिशेब ठेवतो. त्यामुळे खर्च कोठे वाढला ते कळते, त्यानुसार पुढील वर्षी सुधारणा करतो. ताळेबंद मांडल्याने पिकाचा नफा-तोटा समजतो. या अभ्यासातून नफा वाढवण्याचा आमचा प्रयत्न असतो. मी दरवर्षी साधारणपणे ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात २० गुंठे ते ५५ गुंठे क्षेत्रावर वांगी लागवड करतो. जमिनीची चांगली मशागत करून ज्या ठिकाणी पाट पाण्याची सोय आहे तेथे ४.५ ते ५ फुटांची सरी पाडून तीन फुटांवर रोप लागवड करतो.

ठिबक सिंचनाची सोय असलेल्या शेतीमध्ये सहा फुटांवर लॅटरल आणि तीन फुटांवर रोप लागवड केली जाते. जर ऊस तुटून गेल्यावर जमीन उपलब्ध झाली तर मार्चमध्येदेखील २० गुंठ्यांवर लागवड करतो. पीक वाढीच्या टप्प्यानुसार खताची मात्रा दिली जाते. ठिबक सिंचनातून विद्राव्य खतांचा शिफारशीनुसारच वापर केला जातो. वातावरणाचा अंदाज घेत शिफारशीत कीडनाशकांची फवारणी केली जाते. जमीन सुपीकतेवर मी भर दिला आहे. काटेकोर व्यवस्थापनामुळे वांग्याचा दर्जा चांगला राहतो.

साधारणपणे लागवडीनंतर साठ दिवसांनी चांगल्या प्रकारे उत्पादन सुरू होते. सरासरी सात ते आठ महिने उत्पादन घेतले जाते. ७५ दिवसांनी दररोज तोडा सुरू होतो. दररोज वीस गुंठ्यांतून १५० ते २०० किलो वांगी उत्पादन निघते. माझ्या शेतात उत्पादित होणारे वांगे हे मध्यम आकाराचे, हिरवट आणि चमकदार असल्याने बाजारपेठेत चांगली मागणी आहे. उत्तम दर्जा असल्याने व्यापारी शेतात येऊन वांगी खरेदी करतात.

मी वांगी तोडून देतो. व्यापारी शेतात प्रतवारी आणि वजन करून जागेवर पैसे देतात. त्यामुळे कमिशन, पॅकिंग आणि वाहतूक खर्चात बचत होते. एकरी सरासरी अडीच ते तीन लाख खर्च येतो. मला आजपर्यंत लहान वांग्यास प्रति किलो सरासरी १० ते ६५ रुपये आणि मोठ्या वांग्यास ५ ते ३० रुपयांपर्यंत जागेवर दर मिळाला आहे. दर्जेदार वांगी असल्याने बाजारपेठेपेक्षा सरासरी पाच रुपये अधिकचा दर मला मिळतोच.   ऑगस्ट - सप्टेंबरमधील लागवडीचे फायदे ः

  • अनुकूल हवामानामुळे रोपांची चांगली वाढ.
  • वाफसा पद्धतीने पाणी नियोजन.
  • फुटवा, रोपाची उंची वाढण्यास मदत.
  • कीड,रोगाचा प्रादुर्भाव कमी,२५ टक्के खर्चात बचत.
  • कमीत कमी ८ ते ९ महिने वांगी उत्पादनाचे नियोजन.
  • बाजारपेठेत सरासरी चांगला दर मिळण्याची शक्यता.
  • संपर्क ः केदार माने, ९४२१२२५६५२ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com