देशी गोसंगोपन, गांडूळखतासह दूध विक्रीतून सक्षम अर्थकारण

किडींना रोखण्यासाठी शेताच्या कडेने या पद्धतीने जाळी लावण्यात येते.
किडींना रोखण्यासाठी शेताच्या कडेने या पद्धतीने जाळी लावण्यात येते.

सातारा जिल्ह्यातील कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) येथील दादासाहेब व युवराज या चव्हाण बंधूंनी देशी गाय संगोपन, त्याद्वारे दूध विक्री, जोडीला शेणखतापासून दर्जेदार गांडूळखताचे उत्पादन व विक्री या पद्धतीने शेतीचे अर्थकारण फुलवले आहे. ऊस व भाजीपाला पीक पद्धती व त्यात या सेंद्रिय निविष्ठांचा वापर करीत आपल्या जमिनीची सुपीकता व उत्पादनही वाढविले आहे.   सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्यात अनेक गावे कृष्णा व कोयना नद्याकाठांवर वसली आहेत. साहजिकच सर्वाधिक बागायत शेती केली जाते. तालुक्यातील सह्याद्री कारखान्यांच्या दक्षिणेला कोपर्डे हवेली हे गाव आहे. गावातून कृष्णा नदी वाहत असल्याने सिंचनक्षमता भक्कम आहे. त्याच जोरावर ऊस, टोमॅटो तसेच हंगामनिहाय पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. चव्हाण बंधूंची प्रयोगशील शेती गावातील दादासाहेब वसंतराव चव्हाण हे एमए शिक्षण झालेले प्रगतिशील शेतकरी आहेत. लहान बंधू युवराज यांच्यासह ते शेती करतात. सर्वात लहान बंधू दत्तात्रय बॅंकेत कार्यरत आहेत. चव्हाण कुटुंबीयांची साडेपाच एकर बागायत शेती आहे. ऊस व टोमॅटो ही त्यांची दोन मुख्य पिके आहेत. सोबतीला ते वांगी व अन्य भाजीपाला घेतात. वडील वसंतराव यांच्या मार्गदर्शानाखाली दोन्ही बंधू शेतीत आठ- दहा वर्षांपासून अनुभवी झाले. दोन महिन्यांपूर्वी वडिलांचे निधन झाले. आता सारी जबाबदारी दोघे बंधूच सांभाळतात. वडिलांना देशी गायीचा पहिल्यापासून लळा होता. ते पूरक म्हणून दुग्ध व्यवसाय करायचे. त्या वेळी मुऱ्हा म्हशी होत्या. तीस ते चाळीस लिटर दूध प्रति दिन मिळायचे. त्यानंतर शेतीला देशी गायींची असणारी गरज ओळळून एक गाय आणली. देशी गोसंगोपन- ठळक वैशिष्ट्ये

  • सद्यस्थितीत म्हशींचे संगोपन थांबवून केवळ देशी गायींची देशभाल केली जाते.
  • देशी गायींची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवत नेली. त्या प्रमाणात गोठ्याचाही विस्तार केला. सध्या दोन गोठे असून त्यांचे आकारमान ७० बाय ४० फूट लांबी- रुंदीचे आहे.
  • सध्या लहान मोठ्या मिळून सुमारे १६ खिलार गायी गोठ्यात आहेत. वडिलांचा गोसंगोपनाचा वारसा मुलांनी पुढे चालवत त्यात वाढही केली आहे.
  • दररोज सुमारे सात ते आठ लिटर दूध संकलित होते. त्यातील निम्म्या दुधाची विक्री ७० रुपये प्रति लिटर दराने केली जाते. दुधाचे रतीब असून ग्राहक घरी येऊन दूध घेऊन जातात.
  • गोमूत्रापासून जीवामृत, दशपर्णी अर्कही तयार केला जातो. त्यातून निविष्ठा खर्चात बचत झाली आहे.
  • गांडूळ निर्मिती व व्यवसाय उपलब्ध शेणाचा वापर स्वतःच्या शेतात सुरू झाला. त्यातून जमिनीची सुपीकता वाढण्याबरोबरच उत्पादनातही दमदार वाढ होऊ लागली. त्यातूनच मग गांडूळखत निर्मिती करण्याचा व त्याचा व्यवसाय करून उत्पन्न वाढवण्याचा विचार पुढे आला. अभ्यास, सर्वेक्षण व वडिलांच्या मार्गदर्शानाखाली युनिट सुरूही झाले. आवश्‍यक सर्व माहिती घेऊन सुरुवातीस पाच बेड तयार करण्यात आले. शेतकऱ्यांपर्यंत खताची गुणवत्ता व त्याचे महत्त्व पोचविण्यात येऊ लागले. हळूहूळू खताला मागणी येऊ लागली. आजच्या घडीचे उत्पादन व उत्पन्न टप्प्याटप्प्याने बेडची संख्या वाढवत ती आज १६ पर्यंत पोचली आहे. सुमारे साडेतीन महिन्याच्या प्रति बॅचमध्ये प्रति बेड एक टन गांडूळखत उत्पादन होते. वर्षभरात सुमारे दोन वेळा तरी उत्पादन होते. वर्षाला एकूण सुमारे ३० ते ३२ टनांपर्यत खत उपलब्ध होते. त्यातील ५० टक्के खताची विक्री होते. त्याचा १५ रुपये प्रति किलो असा दर ठेवला आहे. याबरोबरच व्हर्मिवॅाश प्रति लिटर २०० रुपये व गांडूळ कल्चर ३०० रुपये प्रति किलो दराने विक्री होते. हे अतिरिक्त उत्पन्न मिळते. भागातील आले तसेच ऊस उत्पादकांकडून खताला अधिक मागणी असल्याचे दादासाहेबांनी सांगितले. समाधानकारक उत्पादन चव्हाण यांच्याकडे दोन एकर ऊस आहे. टोमॅटोचा प्लॅाट यंदाही दमदार आहे. तीस गुंठे नवी टोमॅटो लागवड केली आहे. त्याच्या बांधणीचे काम सुरू आहे. टोमॅटोनंतर त्या क्षेत्रात काकडीची लागवड केली जाते. किडींना रोखण्यासाठी शेताच्या बाजूंनी जाळ्या बांधल्या आहेत. उसाचे एकरी ८० ते ९० टन उत्पादन मिळते. टोमॅटोचे दोन हंगामात उत्पादन होते. दीड एकरांत त्याचे ३० ते ४० टन उत्पादन मिळते. भाजीपाला पिकांची विक्री मुंबईला करण्यात येते. तीन भावांचे एकत्रित कुटुंब तीनही चव्हाण बंधूंचा परिवार आज एकत्र राहतो. घरात सुमारे १२ सदस्य आहेत. एकीने काम केल्याने श्रमांची विभागणी होऊन कोणा एकावर कामाचा ताण येत नाही. सर्व कामे सुलभ होण्यास मदत होते. शेती यशस्वी होण्यामागे एकोपा हे महत्त्वाचे कारण ठरले आहे. गांडूळखत निर्मिती- ठळक बाबी

  • गोठ्यातून शेणखत काढल्यावर योग्य ठिकाणी अधिकाधिक सुकण्यास ठेवण्यात येते.
  • बेडमध्ये गारावा टिकून राहावा यासाठी शेण भरल्यापासून पहिले तीन दिवस पाणी शिंपडले जाते.
  • सात ते आठ दिवसानंतर बेडमध्ये दोन ते तीन किलो गांडुळे सोडली जातात.
  • उन्हाळ्यात गारव्यासाठी फॉगर्सचा वापर होतो.
  • अधूनमधून गूळ व बेसनचे पाणी दिल्याने जीवाणूच्या संख्येत वाढ होते.
  • खत काढण्याआधी दोन ते तीन दिवस पाणी बंद केले जाते. यामुळे खत कोरडे राहाते.
  • २५ किलोच्या प्लॅस्टिक कोटेड बॅगेत भरून विक्री होते.
  • मदत वडिलांच्या मार्गदर्शनामुळे शेतीत खूप बदल झाला आहे. काही माहिन्यांपूर्वी वडिलांचे निधन झाले आहे. सध्या मी आणि युवराज गाडूंळखत व्यवसाय वाढ करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अजून १६ बेड तयार करणार आहे. त्याचे कामे सुरू केले आहे. गांडूळखतामुळे पूरक व्यवसायाबरोबर शेतीच्या उत्पादनात भरीव वाढ झाली असल्याचे दादासाहेब सांगतात. संपर्क ः दादासाहेब चव्हाण- ७३८७१२५२५२  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com