अल्पभूधारक शेतकऱ्याची सुरण कंदाची प्रयोगशील शेती

या हंगामात सुरणाचे पीक असे वाढले होते.
या हंगामात सुरणाचे पीक असे वाढले होते.

वाडेगाव (ता. बाळापूर, जि. अकोला) येथील रामेश्‍वर शंकर सोनटक्के या अल्पभूधारक शेतकऱ्याने सुरण कंदाची लागवड करीत शेतीत प्रयोगशीलता जपली आहे. कंद लागवडीत आंतरपिके घेत मूळ पिकाचा खर्चसुद्धा कमी करण्यात यश मिळवले. दोन गुंठ्यापासून अर्ध्या एकरापर्यंत सुरण कंदाची लागवड वाढवित ३० क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन घेण्यात ते यशस्वी झाले आहेत.   बाळापूर तालुक्यातील वाडेगाव हे लिंबू पिकासाठी व बाजारपेठेसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. मागील काही वर्षांत पाण्याच्या कमतरतेमुळे येथील शेतकरी विविध पिकांचे प्रयोग करू लागले आहेत. येथील रामेश्वर सोनटक्के यांची स्वतःची आणि ठेक्याने घेतलेली अशी विभागून एकूण अडीच एकर शेती आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतात. भाजीपाला पिकासोबतच ते गेल्या तीन वर्षापासून सुरण कंदाचे उत्पादन घेत आहेत. सुरुवातीला सुरण कंदाची दोन गुंठ्यामध्ये लागवड केली. सुरण कमी पाण्यात येत असल्यामुळे लागवडीचे क्षेत्र वाढवित नेले. आगामी काळात कोरडवाहू क्षेत्रावर सुरणकंदाची लागवड करण्याचे त्यांचे नियोजन आहे. सुरण कंद लागवडीला सुरुवात सुरण हे जमिनीत येणारे कंदवर्गीय पीक आहे. या भागात कंद पिकाची शेती फारशी केली जात नसल्याने ते शेतकऱ्यांमध्ये तितकेसे परिचित नाही. रामेश्‍वर सोनटक्के यांनी उत्सुकतेतून तीन वर्षापूर्वी या कंद पिकाची लागवड सुरू केली. गावातील चार-पाच शेतकऱ्यांनी मिळून तेलंगना राज्यातून एका शेतकऱ्याकडील सुरणकंदाचे बेणे आणले. प्रत्येकाने थोड्या थोड्या क्षेत्रावर या कंदांची लागवड केली. सोनटक्के यांनी चार गुंठे क्षेत्रावर सुरणाची लागवड केली. दुसऱ्या वर्षी सहा गुंठ्यात आणि या हंगामात अर्ध्या एकरात लागवड केली होती. दरवर्षी घरचे बेणे ते वाढवत गेले. त्याचीच पुढील हंगामात लागवड केली. या हंगामातील अर्ध्या एकरातील लागवडीतून त्यांना ३० क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन झाले आहे. यातील अर्धे बेणे ठेवत उर्वरित कंदाची विक्री सुरू केली आहे. गावरान व गुजरात कृषी विद्यापीठाने विकसित केलेले ‘गजेंद्र’ हे सुरण कंदाचे वाण त्यांनी लागवडीसाठी निवडले आहे. अडीच एकर शेतीचे नियोजन सोनटक्के यांची वाडेगावाला लागून अर्धा एकर शेती आहे. या ठिकाणी त्यांनी नातेवाइकाची पाऊण एकर शेती ठेक्याने घेतली. असे मिळून सव्वा एकरात सुरण कंद व भाजीपाल्याची शेती ते करतात. त्यांची उर्वरीत दीड एकर शेती ही कोरडवाहू प्रकारची आहे. या क्षेत्रात ते सोयाबीन आणि तुरीचे पीक घेतात. गावाशेजारच्या शेतात ते भाजीपाला पिके घेतात. यामध्ये पालक, दोडकी, फ्लॉवर, कोबीची लागवड करून स्वतः विक्री करतात व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. सुरण कंदात आंतरपिकाची लागवड सुरण कंदाची बेडवर लागवड केली जाते. कंद लागवडीत पालक, आंबट चुका, कोथिंबीर, मूळा, बीट इ. अंतरपिकांची लागवड केली जाते. यावर्षी सुरण कंदाची एप्रिल महिन्यात लागवड केली आहे. त्यानंतर लगेच पालक व इतर भाजीपाल्याची लागवड केली. हा भाजीपाला मे महिन्यात विक्रीसाठी आला. या काळात पालेभाज्याची आवक कमी राहत असल्याने भाजीपाल्याला चांगला दर मिळाला. यंदा अर्ध्या एकरातील सुरण कंदात पालक, बीट, गवार हा भाजीपाला घेत सुमारे ५० हजार रुपयांची विक्री केल्याचे त्यांनी सांगितले. कमी खर्चाचे पीक या कंदवर्गीय पिकाला फारसा खर्च येत नसल्याचे ते म्हणाले. एप्रिल ते जून या महिन्यादरम्यान कंदाची लागवड केली जाते. सोनटक्के हे एप्रिल महिन्यात सुरण कंदाची लागवड करतात. लागवडीसोबतच खताची मात्रा दिली जाते. अत्यंत कमी पाण्यात हे पीक येते. आठ महिन्यात कंद काढणीसाठी तयार होतात. कमी पाणी, कमी खते आणि कीड व्यवस्थापनाचा खर्च कमी येत असल्यामुळे खर्चही कमी होतो. अर्ध्या एकरात ३० ते ३५ क्विंटल सुरण कंदाचे उत्पादन मिळाले आहे. बाजारपेठेत दर कायम सुरण कंदाला वर्षभर बाजारात प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये दर मिळत असतो. मागील तीन वर्षात हा दर टिकून असल्याचे सोनटक्के यांनी सांगितले. व्यापारी सुद्धा ठोक पद्धतीने खरेदी करण्यासाठी पुढाकार घेतात. मोठी शहरे, प्रामुख्याने दक्षिण भारत आणि गुजरातमध्ये सुरण कंदाचा खाद्यपदार्थात वापर केला जातो. या कंदात विविध पोषक घटक असल्याने आपल्या भागातही आता ग्राहक निर्माण होऊ लागल्याचे ते म्हणाले. विविध मान्यवरांच्या भेटी या भागातील शेतकरी सहसा सुरण कंदाची लागवड करत नाहीत. त्यामुळे उत्सुकतेपोटी विविध ठिकाणचे शेतकरी शेतीला भेट देऊन माहिती घेतात. वाडेगाव येथील कृषी माहिती तंत्रज्ञान मंडळाचे केशवराव सरप, कृषी विभागाचे अधिकारी, कृषी संशोधन केंद्रातील तज्ज्ञांनी वेळोवेळी भेटी देऊन पाहणी केली. कंद लागवडीसाठी पाठबळाची गरज सुरण कंद हे आपल्या भागातील नवीन पीक आहे. कमी पाण्यातही घेता येईल, एवढी त्याची क्षमता आहे. या पिकाचा अधिकाधिक क्षेत्रावर विस्तार होण्यासाठी शासनाच्या पाठबळाची गरज असल्याचे सोनटक्के म्हणाले. गेल्या दोन वर्षापासून ते यासाठी शासन, लोकप्रतिनिधींना सातत्याने निवेदने देत आहेत. या पिकाचा समावेश शासनाच्या विविध योजनांमध्ये केला तर अनेक शेतकरी लागवडीसाठी पुढे येतील. त्यातून व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कच्चा माल मिळून बाजारपेठ तयार होऊ शकते. जनजागृतीतून सुरणकंद खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला तर त्याचा फायदा होईल. दरवर्षी पाऊस कमी होत असून हवामान बदलामुळे खरीप, रब्बी अशा दोन्ही हंगामातील पिकांचे सातत्याने नुकसान होत असते. अशा परिस्थितीत हे कंदवर्गीय पीक पर्यायी पीक म्हणून फायदेशीर ठरेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. गावरान व संशोधित सुरण कंदाची वैशिष्ट्ये

  • गावरान जातीचा सुरण कंद चवीला तुरट लागतो.
  • गुजरात विद्यापीठाने संशोधित केलेला कंद तुरट लागत नाही.
  • गावरान कंद तीन ते चार किलो वजनाचा मिळतो.
  • संशोधित कंदाचे वजन तीन ते सात किलोपर्यंत असते.
  • उत्पादन अधिक मिळण्यासाठी संशोधित वाण फायदेशीर.
  • कमी पाण्यात येणारे पीक.
  • एकरी उत्पादन - ६० ते ८० क्विंटल.
  • मिळणारा दर - २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल.
  •  संपर्क ः रामेश्‍वर सोनटक्के ः ९५०३६२६१८१ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com