प्रयोगशीलता, कष्टातून उभारले शेतीचे वैभव

भरिताच्या वांग्याची गुणवत्ता दाखवताना डावीकडून शरद व मोठे बंधू जगदीश
भरिताच्या वांग्याची गुणवत्ता दाखवताना डावीकडून शरद व मोठे बंधू जगदीश

नाशिक जिल्ह्यातील चिंचावड (ता. मालेगाव) येथील गांगुर्डे परिवाराने विविध भाजीपाला, फळपिके व जोडीला शेडनेट शेती अशी उत्तम सांगड घातली आहे. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली दोघा बंधूंनी तंत्रज्ञान, प्रयोगशीलता व कष्टाच्या माध्यमातून अर्थकारण उंचावत शेतीत वैभव निर्माण केले आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील चिंचावड येथील जिभाऊ गांगुर्डे यांची वडिलोपार्जित चार एकर शेती होती. कांदा याच पिकावर एकेकाळी शेतीचे अर्थकारण अवलंबून होते. काळाप्रमाणे बदल करीत १९९१ मध्ये डाळिंब लागवड केली. त्यात यशस्वीही झाले. मात्र तेलकट डाग रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान झाले. मग हवामान, बाजारपेठेतील मागणी या अभ्यासातून त्यांनी विचारपूर्वक काही पिके निवडली. शेतीत प्रयोगशीलता रुजायला सुरुवात झाली. आज जिभाऊ यांची जगदीश व शरद ही मुले शेतीची जबाबदारी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ सांभाळत आहेत. जलसिंचन व्यवस्था उभारली गांगुर्डे यांचे मालेगाव तालुक्यात चिंचावड व देवळा तालुक्यात निंबोळा येथे दोन ठिकाणी क्षेत्र आहे. उन्हाळ्यात चिंचावड येथे पाणीटंचाई भासते. यावर मात करीत गिरणा नदीवरून पाच किलोमीटर अंतरावरून पाणी आणले. त्यातून सिंचनाची वर्षभर सोय केली. पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर करण्यासाठी इनलाईन पद्धतीचे ठिबक सर्व क्षेत्रात केले. पीक अवशेषांचा मल्चिंग म्हणून वापर करूनही पाण्याचे बाष्पीभवन टाळण्यात येते. प्रयोगशील भावंडांची जोडी जगदीश व शरद यांनी प्रयोगशील भावंडांची जोडी म्हणून ओळख मिळविली आहे. अभ्यास, अनुभवी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, सातत्याने उत्कृष्ट शेतांची पाहणी करून त्यांनी शेतीचा व्यासंग वाढवला आहे. शेतीकामांच्या जबाबदाऱ्या दोघांनी वाटून घेतल्या आहेत. एखाद्या व्यवसायाप्रमाणे ते शेतीचे व्यवस्थापन करतात. त्यामुळे कामांत सुसूत्रता तयार झाली आहे. शेती व्यवस्थापनातील ठळक बाबी 

  • हंगामनिहाय वार्षिक शेती नियोजन आराखडा
  • रासायनिक खतांपेक्षा शेणखताचा अधिक वापर
  • कीड-रोग नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांचा मर्यादित वापर
  • विविध शेती तंत्रज्ञान अभ्यास व प्रशिक्षणात सहभाग
  • शेतीतील गुंतवणूक, उत्पादन व उत्पन्न यांच्या स्वतंत्र वहीत नोंदी
  • शेतमाल हाताळणी व प्रतवारी या दोन कामांवर विशेष भर. त्यामुळे बाजारात व्यापाऱ्यांकडून आग्रही मागणी. अन्य मालाच्या तुलनेत दरही अधिक मिळतो. 
  • तज्ज्ञ, कृषी विभागातील अधिकारी यांच्या कायम संपर्कात.
  • एखादे तंत्रज्ञान पाहिल्यानंतर त्याचा बारकाईने अभ्यास
  • अपडेट राहण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर
  • शेतीचा ताळेबंद दरवर्षी मिळणारा नफा, उत्पन्नात होणारे चढउतार, भांडवल यांचा विचार करून अर्थनियोजन करण्यात येते. त्यादृष्टीने मशागतीपासून ते विक्री होईपर्यंत तसेच निविष्ठांचा वापर, त्यावरील खर्च, वाहतूक, पीक उत्पादन आदी सर्व नोंदी ठेवण्यात येतात. संरक्षित शेतीचा वापर  तीन एकरांत २०१४ मध्ये शेडनेट उभारले. यात ढोबळी मिरची हे मुख्य पीक घेण्यात येते. त्याच्या एकूण ३० हजार रोपांचे व्यवस्थापन करण्यात येते. शेडनेटमध्ये मिरचीची गुणवत्ता चांगली मिळून चांगल्या दरात त्याचे रूपांतर होते. यंदा शेडनेटचे रूफ बाजूला करून त्यात कोबीही घेतला. त्याचे एकरी ३० टनांपर्यंत उत्पादन मिळाले. सक्षम विक्री व्यवस्था रासायनिक पद्धतीचा वापर कमी व जैविक पद्धतीचा वापर अधिक असल्याने मालाची गुणवत्ता, आकार, रंग व चव वेगळी असते. त्यांची ‘रेसिड्यू फ्री’ द्राक्षे युरोप, रशिया, बांगला देश येथे निर्यात होतात. डाळिंबही कोलकता, वाराणसी, वाशी, सुरत, दिल्ली या प्रमुख बाजारपेठांत व्यापाऱ्यांमार्फत पाठविण्यात येते. भाजीपाल्यांसाठी सुरत, नाशिक, वाशी या मुख्य व मालेगावही बाजारपेठ आहे. पीकपद्धती व उत्पादन

  • देशी रवय्या वांगी- (लागवड मे)- एकरी २० टन
  • भरिताचे वांगे (लागवड जून) एकरी ३० टन
  • ढोबळी मिरची- शेडनेट- ३ एकर- (लागवड जानेवारी- काढणी ऑगस्टमध्ये) एकरी २५ टन
  • डाळिंब - (१० एकर) भगवा, आरक्ता- एकरी ५ टन
  • द्राक्ष - (सुमारे १० एकर) क्लोन, थॉमसन (अर्ली छाटणी- जुलैमध्ये)- एकरी ५ ते १० टन
  • या व्यतिरिक्त टोमॅटो (२ एकर), कोबी, फ्लॉवर, काकडी आदी पिकेही घेतात.
  • प्रातिनिधिक दर (प्रति किलोचे)

  • आगाप द्राक्षांना किलोला ८०, ९० ते १०० रुपयांपर्यंत दर मिळतात. डाळिंबाला मध्यंतरी दर कमी होते.
  • मागील दोन वर्षांपासून ते ६० रुपयांपर्यंत मिळतात. ढोबळीला २०, ३० ते ४० रुपयांपासून दर मिळतात.
  • भरताच्या वांग्याला १० रुपयांपासून ते २५ ते ३० रुपये तर देशी रवैय्या वांग्याला ४० ते ५० रुपये दर मिळतात. बहुतांशी वेळा व्यापारीच जागेवर येऊन माल घेऊन जातात.
  • शेतीश्रमातून उभारले वैभव  गांगुर्डे यांची वडिलोपार्जित चार एकर शेती होती. त्यांनी कष्टाला प्रयोगशीलतेची जोड दिली. मिळालेल्या शेती उत्पन्नातून पै पैची बचत करीत शेतीचा विस्तार २८ एकरांपर्यंत केला. या माध्यमातून सिंचनाची सोय, यांत्रिकीकरण, शेडनेट उभारले आहे. यासह टुमदार बंगला व स्वत:चे वाहन घेऊन शेतीत वैभव उभे केले आहे. संपर्क - शरद गांगुर्डे - ९९७५७५०६३१ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com