मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धी

जवळपास एक परसपेक्षा जास्त पाणी असलेल्या काजळा तलावात मामांसह मासेमारी करताना सुरेश गव्हाणे.
जवळपास एक परसपेक्षा जास्त पाणी असलेल्या काजळा तलावात मामांसह मासेमारी करताना सुरेश गव्हाणे.

गणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं. पण हातावर हात धरून न बसता कुटुंबाच्या पारंपरिक मत्स्य व्यवसायालाच करिअर म्हणून निवडलं. अकरा वर्षांच्या या व्यवसायातील अनुभवातून सव्वा एकर क्षेत्र पावणेपाच एकरांवर नेले. घर उभं राहिलं. स्थापन केलेल्या मत्स्य संस्थेद्वारे सात कुटुंबाच्या चरितार्थाची सोय झाली. मोसंबीची सहाशे झाडे उभी राहिली. शहापूर (जि. जालना) येथील सुरेश गोकुळ गव्हाणे यांची ही वाटचाल सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.   जालना जिल्ह्यात अंबड तालुक्‍यातील शहापूर येथील सुरेश गव्हाणे यांनी गणित विषयातील पदवी आणि शिक्षणशास्त्राची पदविका २००७ मध्ये पूर्ण केली. त्यानंतर नोकरीसाठी प्रयत्न केले. पण ती मिळविणे शक्‍य झाले नाही. नोकरी मिळाली नाही म्हणून हातावर हात धरून न बसता सुरेश यांनी पारंपरिक मच्छीमारीच्या व्यवसायाला आपलंसं केलं. भोलेबाबा मच्छीमारी संस्था मर्यादित, बोधलापुरी ही संस्था स्थापन केली. जवळपास सात कुटुंबे व पस्तीस लोकांचा सहभाग असलेल्या या संस्थेच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकण्याचे काम सुरू केले. मच्छीमारी व्यवसायातील ठळक बाबी

  • स्थापन केलेल्या संस्थेच्या माध्यमातून तलावांचे ठेके मिळवत सुरेश मच्छीमारी करतात.
  • साधारणपणे प्रत्येक वर्षी मे मध्ये ठेका भरणे, जूनमध्ये तलावात पाणी आलं की त्यात बीज सोडणे. त्यानंतर चार ते पाच महिन्यांनी साधारणतः ऑक्‍टोबर, नोव्हेंबरमध्ये मच्छीमारी असा हा दिनक्रम सुरू असतो.
  • ​सन २००७ मध्ये सिद्धेश्वर पिंपळगावचा त्यानंतर काजळ्याचा तलाव ठेक्‍याने घेतला.
  • उपशावर बंदी असल्याने काजळा येथील तलावात पाणी उपलब्ध राहते
  • सिद्धेश्वर पिंपळगावच्या तलावात सरासरी १० ते १५ लाख मत्स्यबीज तर काजळा तलावात सोडले जाते दीड ते दोन लाख मत्स्यबीज
  • अंबडच्या बाजारात होते मत्स्यविक्री
  • बारा महिने सुरू असते मत्स्यपालन
  • आजवर तीन वेळा व्यवसायावर परिणाम झाला
  • सिद्धेश्वर तलावात यंदा पाणीच नसल्याने मत्स्यबीज टाकता आले नाही.
  • अनेक छोटे-मोठे तलावही आजवरच्या काळात पाणीच राहत नसल्याने सोडून देण्याची वेळ.
  • पाणी असलेल्या तलावाचा ठेका मिळविण्यासाठी केला जातो प्रयत्न
  • अशा आहेत मच्छीमारीच्या वेळा

  • दररोज सकाळी आठ वाजता पाण्यात उतरावे लागते.
  • दुपारी १२ वाजताच्या सुमारास माल बाहेर काढला जातो.
  • त्यानंतर अंबडच्या बाजारात मासे नेले जातात.
  • हंगामात दररोज तीन ते चार क्विंटल माल मिळतो. शिवाय अन्य वेळी हाताखाली विक्रीसाठी ४० ते ५० किलो माल.
  • राहू, मृगल, कटला, सायप्रनस, मरळ आदी प्रकारचे मासे.
  • माशांना १५० ते १६० रुपये प्रतिकिलो मिळतो थेटविक्रीचा दर. ठोकमध्ये हाच दर ९० ते १०० रु.
  • व्यवसायाचे अर्थकारण सुरेश मच्छीमारी संस्थेकडून छोट्या मोठ्या तलावाचा ठेका घेण्यासाठी मिळणाऱ्या संधीनुसार प्रयत्न करतात. यंदा सिद्धेश्वर पिंपळगावच्या तलावात पाणीच नाही. त्यामुळे त्या तलावातून उत्पादन व उत्पन्न मिळाले नाही. परंतु दरवर्षी याच तलावातून साधारण चार ते पाच लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं. शिवाय बदनापूर तालुक्‍यात असलेल्या काजळा तलावात कायमस्वरूपी पाणी असते. या तलावातून पाणी उपशाला बंदी आहे. शिवाय पावसाळ्यात दोन तीन चांगले पाऊस झाले तर या तलावाला पाणी येते. बंदी असल्याने ते उपसले जात नाही. त्यामुळे बाराही महिने या तलावात मच्छीमारीला वाव असतो. या काजळा तलावातून मत्स्यबीज व अन्य खर्च वगळता जवळपास एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. दरवर्षी मत्स्यबीजांवर दीड ते पावणेदोन लाख रुपये खर्च करावा लागतो. शिवाय गरजेनुसार जाळ्यांवरही दरवर्षी जवळपास २० हजार रुपये खर्च करावे लागतात असे सुरेश सांगतात. शेतीचाही विकास सुरेश यांनी मत्स्यव्यवसाय सुरू केला त्या वेळी त्यांच्याकडे सव्वा एकर शेती होती. ती आता याच व्यवसायातील उत्पन्नाच्या जोरावर जवळपास पावणेपाच एकरांवर पोचली आहे. या शेतात जवळपास आठ वर्षांपूर्वी मोसंबीची ३०० झाडे लावली होती. अलीकडील चार वर्षांपूर्वी आणखी ३०० झाडांची भर घालण्यात आली आहे. पहिल्या मोसंबीपासून गेल्या तीन वर्षांपासून जवळपास दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न दरवर्षी मिळत असल्याचे सुरेश सांगतात. वडील, मोठे भाऊ यांच्या मदतीने सुरेशही शेती पाहतात. मत्स्यव्यवसायातून चांगलं घरही उभं राहिलं. मत्स्य संस्थेच्या आधारे सुमारे सात कुटुंबाना रोजगार मिळाला. तीन भाऊ, आई-वडील असे सगळ्यांचे भले मोठे एकत्रित कुटुंब आहे. आपल्या अन्य पारंपरिक व्यवसायातील उत्पन्नातूनही कुटुंबाच्या अर्थकारणाला हातभार लावला जातो आहे.   सुरेश गव्हाणे- ९८३४१२११९३, ९९६०८०६५६७ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com