Agriculture success story in marathi, Garmshivar story of Kalewadi village, Dist. Pune | Agrowon

काळेवाडी झाली दर्जेदार फळांची वाडी
संदीप नवले
गुरुवार, 17 जानेवारी 2019

काही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील काळेवाडी हे दुष्काळी गाव म्हणून ओळखले जायचे. मात्र, आता प्रयोगशील शेतकऱ्यांचे प्रयत्न आणि योग्य पाणी नियोजनातून हे गाव फळबागेसाठी ओळखले जाऊ लागले आहे. गावशिवार सीताफळ, अंजीर, पेरू, डाळिंब फळबागांनी बहरले आहे. फळांच्या विक्रीतून गावामध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होऊ लागली आहे.

काही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील काळेवाडी हे दुष्काळी गाव म्हणून ओळखले जायचे. मात्र, आता प्रयोगशील शेतकऱ्यांचे प्रयत्न आणि योग्य पाणी नियोजनातून हे गाव फळबागेसाठी ओळखले जाऊ लागले आहे. गावशिवार सीताफळ, अंजीर, पेरू, डाळिंब फळबागांनी बहरले आहे. फळांच्या विक्रीतून गावामध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होऊ लागली आहे.

जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे काळेवाडी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील शेतकऱ्यांनी हेरले आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी एकत्र आले. गावची लोकसंख्या सुमारे बाराशेच्या जवळपास आहे. शेतीवरच बहुतांश कुटुंबांची गुजराण होते. गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र सुमारे ७६६ हेक्टर आहे. त्यापैकी सुमारे ४१६ हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य, तर ३५४ हेक्टर डोंगराळ आहे.
गावशिवारात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. तरीदेखील काटेकोर पाणी व्यवस्थापनावर शेतकऱ्यांनी फळबागा जगविल्या आहेत. शेती विकासासाठी गावातील तरुणांनी पुढाकार घेतला. गावातील सागर काळे, आदिनाथ काळे, अमित काळे, अशोक काळे, उमेश झेंडे, अमोल काळे, राजेंद्र जाधव, शिवाजी काळे या तरुणांनी पुढाकार घेऊन कृषी विभाग आणि आत्माच्या माध्यमातून जलसंधारण, फळबाग लागवड, शेततळे, पॉलिहाऊस, सेंद्रिय शेती, शेतकरी गट, थेट विक्रीच्या योजना गावात राबविण्यासाठी पुढाकार घेतला. प्रयोगशील शेतकऱ्यांना विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, तालुका कृषी अधिकारी अंकुश बर्डे, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश जाधव, कृषी सहायक अनिल पाटील यांचे चांगले सहकार्य लाभले आहे.

काळेवाडी झाले फळबागेचे गाव
गावात कमी पाऊसमान असल्याने शेतकरी फळपिकांच्याकडे वळले. शेतकऱ्यांनी कमी पाणी लागणाऱ्या सीताफळाची निवड केल्यामुळे हळूहळू क्षेत्र वाढत गेले. सध्या गावशिवारात सीताफळाची सुमारे १४० हेक्टरवर लागवड आहे. दर वर्षी या गावातील शेतकरी सीताफळाचे चांगले उत्पादन घेतात. त्यामुळे बाजारपेठेत काळेवाडीची सीताफळे हा ब्रॅन्ड तयार झाला. परंतु, मागील काही वर्षांपासून पाणीटंचाई आणि बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांनी फळपिकांच्या लागवडीत बदल केला. पुणे शहर तीस किलोमीटरवर असल्याने ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी अंजीर, पेरू, डाळिंब लागवडीवर भर दिला. गावात सध्या अंजीर १८ हेक्टर, पेरू ९ हेक्टर आणि डाळिंबाची ८ हेक्टरवर लागवड झाली आहे. सर्व फळबागा ठिबक सिंचनावर आहेत.

फळबागेतून चार कोटींची उलाढाल
काळेवाडीत सुमारे १७० हेक्टरवर विविध फळपिकांची लागवड आहे. या फळपिकांचे टप्प्याटप्प्याने शेतकरी उत्पादन घेतात. उत्पादित फळांची थेट विक्री केली जाते. काही शेतकरी पुणे, मुंबई येथील व्यापाऱ्यांना फळांची विक्री करतात. दर वर्षी फळबागेच्या माध्यमातून गावात चार कोटी रुपयांची उलाढाल होते. त्याचा विनियोग शेती, तसेच कुटुंबाच्या प्रगतीसाठी गावकऱ्यांनी केला आहे.

कमी पाण्यावर पीक नियोजन

 • गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला. गावातील ज्येष्ठ मंडळीनीही पाठिंबा दिला. त्यामुळे बघता बघता दुष्काळावर मात करण्यासाठी गाव एकत्र झाले. यातून पहिल्यादा गाव तलावात पुरंदर उपशाचे पाणी आणल्याने पाण्याचा काही प्रमाणात प्रश्न मिटला आहे.
 • पावसाचे प्रमाण कमी असल्याने कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांच्या लागवडीवर शेतकऱ्यांचा भर आहे. पावसाळ्यात भाजीपाला, कांदा लागवड असते. त्याचबरोबरीने फळबागेची जोड शेतकऱ्यांनी दिली आहे.
 • शेतकऱ्यांनी एकत्रित येत फळबागांना सूक्ष्म सिंचनाचा अवलंब केला आहे. गावात ८० टक्के फळबागांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले जाते.

गावात राबविले जाणारे उपक्रम 

 • शेतकऱ्यासांठी कार्यशाळा,
 • प्रशिक्षण वर्ग.
 • ग्रामस्वच्छता
 • वृक्षरोपण व वृक्षसंवर्धन
 • आरोग्यविषयी जनजागृती 

शेततळ्यातून दुष्काळावर मात
गेल्या सहा वर्षांपासून पाणीटंचाई
वाढल्याने फळबागेच्या उत्पादनावर परिणाम होऊ लागला. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे आणि वैयक्तिक शेततळे या दोन्ही योजनांचा लाभ घेतला आहे. मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत शंभरहून अधिक शेततळी झाली आहेत. याचबरोबरीने ४२ शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्यांना अस्तरीकरण केले आहेत. ही सर्व शेततळी पावसाळ्यात पाणी उपलब्ध झाल्यानंतर भरून ठेवली जातात. पुढे उन्हाळ्यात गरजेनुसार पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे पाणीटंचाईच्या काळात फळबागा जगविण्यासाठी चांगली मदत झाली आहे.

प्रक्रिया उद्योगाकडे वाटचाल
गेल्या पाच वर्षांपासून गावातील तरुण शेतकरी रोहित जगदाळे, रवी काळे, रेवणनाथ जाधव, रामदास काळे, अशोक कुंभार, पृथ्वीराज ढुमे हे प्रक्रिया उद्योगाकडे वळले आहेत. सध्या प्रक्रिया उद्योगामध्ये सीताफळ पल्प उत्पादन घेतले जाते. या व्यवसायाच्या माध्यमातून गावातील सुमारे २५० तरुण, तसेच महिलांना रोजगारांची चांगली संधी मिळाली आहे.

पाण्यासाठी पुढाकार
गावातून पुरंदर उपसा जलसिंचनाची पाइप गेली आहे. परंतु, गावाच्या पूर्व परिसरातील मल्हारगड परिसर पुरंदर उपसा जलसिंचनाच्या योजनेपासून वंचित होता. गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन ही योजना गाव परिसरात पोचविण्यासाठी भारत फोर्ज कंपनीचा सामाजिक बांधिलकी विभाग व लोकसहभागातून साधारणपणे चार हजार फूट लांबीची पाइपलाइनकरून मल्हारगड तलावात पाणी सोडले आहे. त्यामुळे गावातील सुमारे शंभर हेक्टर क्षेत्र बारामही ओलिताखाली येण्यास मदत झाली. या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक सबलीकरण होऊ लागले आहे. येत्या काळात गावकऱ्यांनी आणखी पाच हजार फूट पाइपलाइन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

चित्रांच्या माध्यमातून जनजागृती
गावामध्ये जनजागृती करण्यासाठी विविध प्रकारचे संदेश देण्यासाठी बोलक्या भिंती रंगविल्या आहेत. यामध्ये पाणी अडवा-पाणी जिरवा, मुली शिकवा- मुली वाचवा, झाडे वाचवा- झाडे जगवा, प्लॅस्टिकबंदी, स्वच्छता अभियान, स्मार्ट ग्राम काळेवाडी, पाण्याचा जपून वापर, करा मातीचे परीक्षण- वाढेल शेतीचे उत्पादन असे विविध संदेश चित्राच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.

संरक्षित शेतीचा अवलंब
बदलत्या हवामानात शाश्वत पीक उत्पादनासाठी शेतकरी संरक्षित शेतीकडे वळले आहेत. गावात कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांनी १४ पॉलिहाऊस, दोन शेडनेट हाऊसची उभारणी केली आहे. यामध्ये जरबेरा, कार्नेशन या फुलपिकांची लागवड केली आहे. फुलांची विक्री पुणे मार्केटमध्ये होते. त्यामुळे शेतकऱ्यांना संरक्षित शेतीच्या माध्यमातून शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत तयार झाला. गावात दोन पॅक हाऊसचीही उभारणी झाल्याने शेतकऱ्यांना फायदा होत आहे.

शेतकरी गटाची उभारणी
गावात विविध योजना राबविण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपूर्वी आत्माअंतर्गत श्रीराम शेतकरी गटाची स्थापना करण्यात आली. यामध्ये वीस शेतकऱ्यांचा सहभाग आहे. अमित काळे या गटाचे अध्यक्ष आहेत. गटाच्या माध्यमातून दोन महिन्यांपूर्वी गावातील जमिनीची गुणवत्ता तपासण्यासाठी माती परीक्षण कीट घेण्यात आले. या कीटमुळे गावामध्ये माती परीक्षणाची सोय झाली आहे. येत्या काळात गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला चालना देण्यात येणार आहे. त्यासाठी आत्मा व कृषी विभागाच्या माध्यमातून अनुदान मिळणार आहे.

जलसंधारण, वनीकरणावर भर

 • गावकऱ्यांनी जलसंधारणाच्या कामावर भर दिला आहे. भारत फोर्ज कंपनीने आर्थिक साहाय्य करून गावात ओढे- नाले खोलीकरण, रूंदीकरण केले. यासाठी लोकसहभागावर भर दिला.
 • जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत चार सिंमेट बंधारे झाल्यामुळे कोट्यवधी लिटर पाणी जमिनीत मुरण्यास मदत झाली. परिणामी दर वर्षी वाढत असलेली पाणीटंचाई कमी होत आहे.
 • गेल्या दोन वर्षांपासून गावात विविध झाडांची लागवड केली जात आहे. सध्या ही झाडे चांगल्या स्थितीत आहे. झाडे जगविण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे.

फळबागेतून वाढविला नफा
माझ्याकडे एकूण पाच एकर शेती आहे. पाण्याची थोडीफार सोय आहे. शेतात अंजीर, सीताफळ, चिकू अशी सुमारे नऊशे झाडे आहेत. फळझाडांना ठिबक सिंचनाचा अवलंब केला आहे. त्यामुळे कमी पाण्यात चांगले उत्पादन घेता येते. याशिवाय २७ गुंठ्यावर पॉलिहाऊसची उभारणी केली आहे. त्यामुळे शाश्वत उत्पन्न मिळते.
- लक्ष्मण काळे, शेतकरी.

शेततळे, पॉलिहाउस शेती
माझी नऊ एकर शेती आहे. यात पेरू, अंजीर, सीताफळ अशी सुमारे सहाशे झाडे आहेत. दर वर्षी पाणीटंचाई भासत असल्याने ठिबक सिंचनाचा अवलंब केला आहे. याशिवाय शेततळे व पॉलिहाऊसची उभारणी केली आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळते.
- चिंतामण झेंडे, शेतकरी

फळबागा फायदेशीर
पाण्याची उपलब्धता कमी असल्याने फळबागा जगविण्यासाठी शेततळे केले आहे. शेततळे पावसाळ्यात भरून ठेवले जाते. पाणीटंचाई काळात संरक्षित पाणी वापरतो. त्यामुळे सीताफळ, अंजीर, पेरू या फळबागातून चांगले उत्पन्न मिळते.
- शंकर काळे, शेतकरी

सीताफळ प्रक्रियेवर भर
माझ्याकडे सव्वादोन एकरावर सीताफळ लागवड आहे. सीताफळावर प्रक्रिया करून दर वर्षी पल्प विक्री करतो. त्यामुळे मजुरांना रोजगार उपलब्ध झाला असून, मलाही चांगले उत्पन्न मिळते. गावात पल्प निर्मिती उद्योग वाढतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळू लागले आहेत.
पृथ्वीराज ढुमे, ९८५०१४६३४७
शेतकरी

उभारणार मॉडेल गाव
शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक शेती करण्याची गरज आहे. आम्ही एकत्र येऊन श्रीराम गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी विकसित केलेले ‘मॉडेल गाव' उभारत आहोत.
सागर काळे,९७६५५२८४५५
(सदस्य, काळेवाडी ग्रामपंचायत)

गटशेतीला चालना
शेती आणि गावाचा विकास करण्यासाठी तरुणांनी एकत्र येऊन गट स्थापन केला आहे. या गटात वीस शेतकरी आहेत. गटाच्या माध्यमातून आम्ही पुरंदर उपसा सिंचन, सेंद्रिय शेती, शेतमालाची थेट विक्री, रसायन अवशेषमुक्त शेतमाल उत्पादन, असे विविध उपक्रम राबवीत आहेत. याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे.
अमित काळे,९९२१७५४५१०
(अध्यक्ष, श्रीराम शेतकरी गट)

 

फोटो गॅलरी

इतर ग्रामविकास
विना कंत्राट, विना अनुदान  शिवार रस्ते...नाशिक जिल्ह्यात कोळवण नदीच्या काठी वसलेल्या...
कन्या वन समृद्धी योजनाशेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली, तर तिच्या...
लोकसहभागातून कुरण विकासाची गरजगवताळ कुरणे मृदा-जल संवर्धनासाठी गरजेची आहेत,...
मांडा जलसंधारणाच्या कामाचे गणितमागच्या भागात आपण नागरी आणि ग्रामीण भागातील...
बहुवीध पीक पद्धतीतून चांडोलीच्या...चांडोली खुर्द (जि. पुणे) हे गाव १९८५ पर्यंत...
ग्रामविकासाचा आदर्श झालेले वडगाव पांडे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
मोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची...शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने...
काटेकोर जलव्यवस्थापनाद्वारे खेडी खुर्द...खेडी खुर्द (ता. जि. जळगाव) येथील शेतकऱ्यांनी...
जीविधेची जाणीव करून देणारी आनंदशाळाशिक्षण गुणवत्तापूर्ण बनण्यासाठी शिक्षण...
योग्य पद्धतीने करा कूपनलिका पुनर्भरणमागच्या भागात आपण विहीर आणि कूपनलिका यांमधील फरक...
गटशेतीच्या सुलभ व्यवस्थापनासाठीशेतकरी गट स्थापन होऊन गटशेतीस सुरवात करताना पुढील...
गोष्ट तलावांचा श्वास मोकळा करण्याची...तलावांमध्ये बेशरम वनस्पतीचा पसारा वाढला तर आवश्यक...
भाजीपाला पिकातून कळवंडे झाले...रत्नागिरी जिल्ह्यातील कळवंडे (ता. चिपळूण) गाव...
कोरडवाहूमध्ये कमी खर्चात उत्पादनासह...अवर्षण स्थितीमध्ये सर्वांत अधिक फटका हा कोरडवाहू...
विहीर अन्‌ कूपनलिका नेमकी कोठे खोदावी?आपल्या जागेमध्ये विहीर करायची की कूपनलिका करायची...
गटशेतीतील जबाबदाऱ्यांचे वाटपशेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने शेती...
सुधारित शेती, ग्रामविकासाच्या...लहान (ता.अर्धापूर, जि. नांदेड) गावातील...
भूमिगत बंधारा वाढवेल विहिरींची पाणी...सध्या अनेक गावांमध्ये विहिरीचे पाणी लवकर...
गटशेती : काळाची गरजशेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने शेती...