ग्रामपंचायतीची प्रशस्त इमारत.
ग्रामपंचायतीची प्रशस्त इमारत.

ग्रामपरिवर्तनाची दिशा दाखविणारे शेंदोळा खुर्द

जन्म, मृत्यू, विवाहनोंदणी प्रमाणपत्र हवे असेल; तर गावात एक झाड लावा, नियमित कर भरणाऱ्यांना मोफत शुद्ध पाणी आणि पीठगिरणीची सोय, व्यसनमुक्‍तीला प्रोत्साहन मिळावे, याकरिता बक्षीस योजना, सामूहिक भाऊबीज, अशा अनेक उपक्रमांच्या बळावर विदर्भातील शेंदोळा खुर्द (ता. तिवसा, जि. अमरावती) या  गावाने परिवर्तनाची नवी दिशा दाखविली आहे. ग्रामविकासाच्या बरोबरीने शेतीविकासासाठी नवी दिशा गावाने पकडली आहे.

शेंदोळा खुर्द (जि. अमरावती) हे गाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी असलेल्या मोझरीपासून अवघ्या तीन किलोमीटरवर आहे. त्यामुळे ग्रामस्वच्छता अभियानात हे गाव पुढारलेले आहे. शासकीय नोकरीतून सेवानिवृत्त व्यक्‍ती स्वच्छता अभियानात उत्साहाने सहभागी होतात. दर गुरुवारी हे अभियान न चुकता राबविले जाते. ज्येष्ठाच्या सहभागातून राबविल्या जाणाऱ्या या अभियानात गावातील युवादेखील सहभागी होतात. गावातील प्रत्येक घरातील एक व्यक्‍ती शासकीय नोकरीमध्ये आहे. सामाजिक एकोप्याचा आदर्श या गावाने घालून दिला आहे.

कर भरणाऱ्यांना विविध सवलती

नियमित कर भरणाऱ्या ग्रामस्थांना ग्रामपंचायतस्तरावरून विविध सवलती दिल्या जातात. त्यामध्ये मोफत पीठगिरणीच्या सुविधेचा समावेश आहे. ग्रामपंचायत मालकीच्या बाजारगाळ्यांमध्ये पीठगिरणी आहे. कर भरणाऱ्या नागरिकांना आर. ओ.चे शुद्ध पाणी निःशुल्क पुरविले जाते. त्याकरिता एटीएम कार्ड वितरित करण्यात आले आहे. कर थकविणाऱ्या ग्रामस्थांसाठी पाच रुपयांत वीस लिटर आर. ओ. शुद्ध पाणी पुरविले जाते. साडेतीन लाख रुपयांत ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. गावात एखाद्याकडे कौटुंबिक सोहळा असेल, तर अशावेळी ग्रामपंचायतीकडून प्रति वीस लिटर पाणी अवघ्या दहा रुपयांत पुरविले जाते.

प्लॅस्टिकनिर्मूलनाची अभिनव संकल्पना 

प्लॅस्टिक गोळा करणाऱ्या व्यक्‍तीला बक्षीस देण्याचा अभिनव उपक्रम ग्रामपंचायतीने राबविला आहे. तीन महिन्यांतून एकदा अशा व्यक्‍तीला गावातील ज्येष्ठ व्यक्‍तीच्या हस्ते रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येते. एकदा वापरात येणाऱ्या प्लॅस्टिकची विल्हेवाट लावण्याचा उद्देश यामागे आहे. घनकचरा व्यवस्थापनाचा सुमारे २० लाख रुपयांचा प्रकल्प येत्या जानेवारीअखेरपर्यंत कार्यान्वित होणार असल्याची माहिती सरपंच शरद वानखडे यांनी दिली. गावातील ओल्या कचऱ्यापासून खत तयार करून ते शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. प्लॅस्टिकची विल्हेवाट गावस्तरावर लावण्यासाठीदेखील हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. गावातील कचरासंकलनाकरिता घंटागाडी गावात फिरते. 

जलपुनर्भरणाच्या उद्देशाने गावातील काही नागरिकांकडे शोषखड्डे तसेच वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पही राबविण्यात आला आहे. प्लॅस्टिक ड्रमचे दोन भाग करून त्याला लोखंडी साखळी लावून त्याचा उपयोग कचराकुंडी म्हणून करण्यात आला आहे. असा प्रकारे अवघ्या एक हजार रुपयांत कचराकुंडी तयार करण्यात येते. या माध्यमातून गावातील नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता वाढण्यास मदत झाली आहे. 

गावात सार्वजनिक बेसिन

सार्वजनिक बेसिन हा अनोखा पर्याय ग्रामपंचायतीने दिला आहे. गावात मोक्‍याच्या सहा ठिकाणी सार्वजनिक बेसिन बसविलेले आहेत. ज्या ठिकाणी हे बेसिन लावले; त्यालगत घर असलेल्या व्यक्‍तीने याकरिता पाणी आणि पाइपलाइनसाठीचा खर्च केला आहे. त्यामुळे चांगल्या उपक्रमांना लोकांचादेखील कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता प्रतिसाद मिळतो, हे या गावाने कृतीतून सिद्ध केले आहे. शेतात गेल्यानंतर परतणाऱ्या मजुरांना या ठिकाणी हात धुण्यास पाणी मिळते. अस्वच्छ हाताच्या माध्यमातूनच रोगराई पसरते. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये हात धुण्याविषयी जागरूकता वाढविण्याचा प्रयत्नदेखील ग्रामपंचायतने अभिनवरीत्या केला आहे.

भूमिगत गटार योजना

गावातील संपूर्ण सांडपाणी भूमिगत गटार योजनेच्या माध्यमातून एका ठिकाणी संकलित केले जाते. त्या ठिकाणी पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी २४ लाख रुपयांची यंत्रणा बसविण्यात आली आहे. शुद्ध केलेले पाणी शिवारातील शेतीला देण्याचे नियोजन आहे. या वर्षी पाण्याची उपलब्धता अधिक असल्याने सध्या वीट व्यावसायिक तसेच बांधकामाकरिता या पाण्याचा उपयोग केला जातो. 

वस्ती झाली प्रकाशमान

गावातील एक वस्ती गेल्या अनेक वर्षांपासून अंधारात होती. या वस्तीमध्ये वीज पोचविण्यासाठी १९ डांब रोवून त्यावर पथदिवे लावण्यात आले. या माध्यमातून काहींना वैयक्‍तिक वीजजोडणी घेणे शक्‍य झाले. गावाचा विजेचा प्रश्‍न सोडविण्यासोबतच पुरवठा योग्य दाबाने होण्यासाठी १०० केव्हीचा ट्रॉन्सफॉर्मर नव्याने बसविण्यात आला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून गावात ५४ घरकुले मंजूर असून, त्यातील ३३ पूर्णत्वास गेली आहेत.

सामूहिक दिवाळी फराळ 

गेल्या अनेक वर्षांपासून सामूहिक भाऊबीज ही संकल्पना गावाने राबविली आहे. घरोघरी जात दिवाळी फराळ संकलित केला जातो. गावातील एका ठिकाणी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याकरिता इतर भागांतून व्याख्यात्यांना निमंत्रित केले जाते. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांना दिवाळी फराळाचे वितरण होते.

दीक्षाभूमीवर अनुयायांची सेवा

दीक्षाभूमीवर जाणाऱ्यांना शेंदोळा ग्रामस्थांच्या वतीने वैद्यकीय सुविधा पुरविण्यावर भर दिला जातो. याच कार्यक्रमात गावातील गुणवंत विद्यार्थी, आदर्श पुरस्कारप्राप्त व्यक्‍तींचादेखील गौरव केला जातो. व्यसनमुक्‍त झालेल्या व्यक्‍तीला पाच हजारांची रक्कम देऊन गौरविले जाते. त्यातून इतरांना प्रेरणा मिळावी, असा उद्देश आहे. त्याकरिता संबंधित व्यक्‍तीवर वर्षभर पाळत ठेवली जाते. खात्रीअंतीच त्या व्यक्‍तीची पुरस्काराकरिता निवड करण्यात येते.

अंगणवाडीचे सुशोभीकरण 

गावामध्ये चार अंगणवाड्या आहेत. अंगणवाड्यांमध्ये लहान मुलांकरिता विविध प्रकारचे खेळण्याचे साहित्य आहे. चारही अंगणवाड्या डिजिटल असून, यापुढील काळात कॉन्व्हेंटच्या धर्तीवर त्या ठिकाणी इंग्रजी शिकविण्याची सोय करण्याचे नियोजन झाले आहे. शालेय विद्यार्थांसाठी पुस्तके या ठिकाणी ठेवली जाणार आहेत. सध्या अंगणवाडीत साउंड सिस्टीम, टीव्ही, भांडी असे साहित्य आहे. 

विविध शिबिरांवर भर 

प्रत्येक ग्रामस्थाचे आधार कार्ड, बॅंक खाते असावे, याकरिता गावस्तरावर शिबिर घेण्यात आले. गरजेनुसार आरोग्य शिबिर, डोळे तपासणी, एचआयव्ही तपासणी तसेच जनावरांच्या तपासणीसाठीदेखील शिबिर घेतले जाते. नियमानुसार जनावरांचे लसीकरण दरवर्षी केले जाते. 

आयएसओ ग्रामपंचायत 

पाच वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीची प्रशस्त इमारत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मोझरी विकास आराखड्यातून उभारण्यात आली आहे. ग्रामपंचायतीला आय. एस. ओ. प्रमाणपत्रदेखील मिळाले आहे. ग्रामपंचायत इमारतीमध्ये डिजिटल लायब्ररीची सुविधा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या गावातील मुलांसाठी फायद्याची ठरली आहे. ग्रामपंचायतमध्ये व्यायामाकरिता प्रशस्त व्यायामशाळा आहे. ग्रामपंचायत इमारतीमध्ये प्रशस्त हॉल आहे. गावातील छोट्या-मोठ्या आयोजनासाठी तो भाडेतत्त्वावर देण्यात येतो.  

दोन एकराचा बागबगिचा ग्रामपंचायतीच्या इमारतीलगत लहान मुले आणि गावकऱ्यांसाठी दोन एकरावर सुशोभित बाग तयार करण्यात आली आहे. या बागेत विविध फुलझाडे, लॉन असून मुलांकरिता खेळण्याचे साहित्य तसेच ओपन जिमची सुविधा आहे. 

संपूर्ण गावात सीसीटीव्ही 

गावच्या सुरक्षेवर भर देण्याच्या उद्देशाने १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्याकिरता नियंत्रण कक्ष ग्रामपंचायत तसेच आर. ओ. प्लॅट असलेल्या इमारतीत आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी ही यंत्रणा बसविल्यानंतर गावात एकही चोरीचा प्रकार घडला नाही, असे सरपंच शरद वानखडे सांगतात. 

शेतीमध्येही नवी दिशा 

गावात मोठ्या क्षेत्रावर सोयाबीन, कपाशी या पिकांची लागवड असते. या पिकांच्या उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांचे सामूहिक प्रयत्न सुरू असतात. सुधारित तंत्रज्ञानाच्या वापराकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे. शेतकरी व्यावसायिक पिकाकडे वळू लागले आहेत. गेल्या काही वर्षांत संत्रा आणि हळद लागवडीच्या क्षेत्रात टप्प्याटप्प्याने वाढ होऊ लागली आहे.

शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा 

ग्रामविकासाला दिशा देण्यासाठी पाटोदा, हिवरेबाजार, राळेगणसिद्धी या गावांना ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी भेटी दिलेल्या आहेत. त्यासोबतच राज्यात आयोजित होणाऱ्या कृषी प्रदर्शनालादेखील गावातील शेतकरी आवर्जून भेटी देतात. या आदर्श गावातील काही संकल्पना शेंदोळा गावात राबविण्यात आल्या आहेत. 

दाखला हवा, तर झाड लावा 

गावातील कोणत्याही व्यक्‍तीला जन्म, मृत्यू किंवा विवाहनोंदणीचे प्रमाणपत्र हवे असेल तर त्याकरिता तुमची अडवणूक होईल. परंतु, ती पैशासाठी नाही तर तुम्हाला त्या दाखल्याच्या बदल्यात एक झाड लावण्यासाठी. गावात कोणत्याही दस्तासाठी झाड लावण्याची अट आहे. त्या झाडाचे संरक्षण ग्रामपंचायतीमार्फत केले जाते. गावात आजवर सुमारे १७५ वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. पर्यावरणपूरक हा उपक्रम इतरही गावांसाठी निश्‍चितच प्रेरणादायी आहे. 

बचत गटाची कृषी अवजारे बॅंक

गावात स्वयंसह्यता समूहांचे मोठे जाळे विणण्यात आले आहे. पुरुष व महिलांच्या या गटांच्या माध्यमातून विविध उद्योग उभारल्याची माहिती सरपंच शरद वानखडे यांनी दिली. भारतरत्न ग्रामसंघ महिला समूहाच्या माध्यमातून कृषी अवजारे बॅंकेचे व्यवस्थापन होते. महाराष्ट्र ग्रामजीवनोन्नती अभियानातून दोन लाख रुपयांचा निधी याकरिता गटाला मिळाला आहे. फवारणी पंपाकरिता १०० ते १५० रुपये, रिकाम्या ड्रमसाठी २० रुपये, ग्रासकटरसाठी २०० रुपये प्रतिदिवस याप्रमाणे भाडे आकारले जाते.

गावात स्वयंसह्यता समूहांचे मोठे जाळे विणण्यात आले आहे. पुरुष व महिलांच्या या गटांच्या माध्यमातून विविध उद्योग उभारल्याची माहिती सरपंच शरद वानखडे यांनी दिली. भारतरत्न ग्रामसंघ महिला समूहाच्या माध्यमातून कृषी अवजारे बॅंकेचे व्यवस्थापन होते. महाराष्ट्र ग्रामजीवनोन्नती अभियानातून दोन लाख रुपयांचा निधी याकरिता गटाला मिळाला आहे. फवारणी पंपाकरिता १०० ते १५० रुपये, रिकाम्या ड्रमसाठी २० रुपये, ग्रासकटरसाठी २०० रुपये प्रतिदिवस याप्रमाणे भाडे आकारले जाते. शरद वानखडे (सरपंच), ८२७५९२५८३४ पूजा खडसे, ९५७९८१९१७० ​(ग्रामपरिवर्तक, महाराष्ट्र ग्राम)

गावातील स्वच्छ रस्ते आणि कडेने वृक्षारोपण.

ग्रामस्थांसाठी पीठगिरणीची सोय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com