मिळून साऱ्या जणी, सांभाळू कंपनी 

सभासद महिलांना थेट बांधावर मार्गदर्शन
सभासद महिलांना थेट बांधावर मार्गदर्शन

 अवर्षणग्रस्त ८० गावांतील १२ हजार महिला ४० हजारहून अधिक शेळ्यांचे व्यावसायिक पालन करतात... एवढेच नाही तर ‘मिळून साऱ्या जणींनी’, आपली कंपनी पण स्थापन केली आहे. प्रोत्साहन आणि पाठबळ मिळाल्यामुळे या सर्व महिलांनी रोजगाराच्या संधी स्वत:च निर्माण केल्या... विश्‍वास नाही बसत ना? नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा अवर्षणग्रस्त तालुका. पाण्याची टंचाई असल्याने पुरुषांच्या तुलनेत महिलांना रोजगाराच्या संधी कमीच. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून महिलांना कोणता रोजगार देता येईल व त्यातून त्यांची आर्थिक प्रगती होऊ शकेल याबाबत तालुक्यातील युवामित्र संस्थेने सर्वेक्षण केले. या महिलांचे अर्थकारण हे शेळीच्या अवतीभवती फिरत असल्याची बाब समोर आली. हाच धागा पकडून २०१५-१६ वर्षी युवामित्र संस्थेने शेळीपालन व्यवसायासंबंधी काम हाती  घेतले. यातूनच महिला उपजीविका कार्यक्रमाला संघटित आणि व्यावसायिक स्वरूप दिले. पुढे या संघटनात्मक कार्यातून सावित्रीबाई फुले महिला शेळीपालक उत्पादक कंपनी नावारूपास आली. आजमितीस तालुक्यातील ८० गावांमधील गरजू व होतकरू १२ हजार महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देण्यात महिलांच्या या कंपनीला यश आले. 

सिन्नर तालुक्यात पारंपरिक शेळीपालनात महिला पारंगत होत्या. त्यांना व्यावसायिक शेळीपालनाची जोड देणे आवश्‍यक होते. याकरिता महिलांना प्रशिक्षण दिले. मात्र, व्यवसायवाढीसाठी आर्थिक मदतीशिवाय पर्याय नव्हता. एस. टी. पारेख फाउंडेशन, बजाज अलायन्झ यांसारख्या कंपन्यांचा सीएसआर फंड मिळविला. या मिळालेल्या रकमेतून गरजू महिलांना बिनव्याजी कर्जाचा पुरवठा केला गेला. आर्थिक पाठबळ मिळाल्याने या कामाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले. एकवेळी आपल्या गावातून दुसऱ्या गावात रोजी रोटीसाठी जाणाऱ्या महिला आता कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून दोन पैसे अधिकच्या कमवू लागल्या आहेत. 

पूर्वी शेळीविक्री व्यवहारात फसवणूक होत असे. आता महिलाच पुढे येऊन व्यवहार करतात. आर्थिक सक्षमतेसह बाजारपेठेत त्यांनी स्वतंत्र पत निर्माण केली आहे. ८० गावांमध्ये शेतकरी उत्पादक कंपनीचा विस्तार झाला आहे. प्रत्येक गावांत ८० ते १०० महिला सभासद आहेत. एका गावातील सभासदांचे प्रत्येकी ५ महिलांचे संयुक्त सहभागी समूह बनवून दिले आहेत. यासाठी प्रत्येक महिलेने १००० रुपये भाग भांडवल व १०० रुपये सभासद फी भरली. प्रत्येक महिला सभासदाने आर्थिक शिस्त जपली आहे. संस्थेने २० हजार रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज सभासदांना वितरित केले. मिळालेल्या आर्थिक मदतीतून गेल्या तीन वर्षांत महिला सभासदांनी अनेक व्यावसायिक टप्पे पार केले आहेत. शेळीपालनाबाबत व्यावसायिक दृष्टिकोन रुजविला. त्यामुळे तालुक्यात दूध संकलनासह यशस्वी शेळी दुग्धप्रक्रिया उद्योग उभा राहण्यासाठी चालना मिळाली आहे. तालुक्यातील ४० हजारहून अधिक शेळ्यांचे पालन होत असून, हा व्यवहार मोठ्या प्रमाणावर विस्तारला आहे. पारंपरिक शेळीपालनातील शेळ्यांचा मृत्युदर कमी झाला आहे. काटेकोर नियोजनातून महिलांच्या सरासरी वार्षिक उत्पादनात ३० टक्के वाढ झाली. शेळ्यांची विक्री वजनावर सुरू झाल्याने महिलांना अधिक परतावा मिळू लागला आहे. विमा संरक्षण मिळाल्याने शेळी मृत्यूनंतर आर्थिक नुकसानीत घट झाली आहे. म्हणूनच महिलांसाठी ग्रामीण भागात रोजगाराची शाश्वत संधी निर्माण करून देणारे शेळीपालनाचे हे यशस्वी मॉडेल ठरत आहे.  - मनीषा पोटे, संचालिका, सावित्रीबाई फुले महिला शेळीपालक उत्पादक कंपनी 

पूर्वी कामाला जाण्यासाठी पहाटे उठून दुसऱ्या गावी जायचो. मुलांना सोबत न्यावे लागत असल्याने अनेक अडचणी यायच्या. आता सावित्रीबाई शेळी उत्पादक कंपनीने बिनव्याजी कर्ज दिले. त्याची वेळेवर फेड केली. एक शेळी होती आता दहा शेळ्या आहेत. त्यामुळे घरच्या घरी हा व्यवसाय करून दोन पैसे चांगले मिळत आहेत.  - अर्चना अरुण कासार, शेळीपालक व सभासद, सावित्रीबाई फुले महिला शेळीपालक उत्पादक कंपनी गावनिहाय कामाच्या  समन्वयासाठी ‘पशुसखी गाव पातळीवर व्यावसायिक समन्वय व व्यवस्थापनासाठी ‘पशुसखी’ ही अभिनव संकल्पना राबविली. प्रत्येक गावात या सखींच्या माध्यमातून शेळ्यांची देखभाल व प्रथमोपचार, उत्पादकांच्या नोंदी, दूधसंकलन व पुरवठा तसेच गावनिहाय कंपनीशी संबंधित सर्व कामे पार पाडली जातात.  मिळणाऱ्या सुविधा  पशुवैद्यकीय सेवा, शेळ्यांना विमा सुविधा, संगमनेरी व उस्मानाबादी शेळीच्या जाती विकसित करण्यासाठी जातिवंत बोकडवितरण, व्यावसायिक शेळीपालन प्रशिक्षण. बँक कर्ज संदर्भात मार्गदर्शन, चारा पिके उत्पादन मार्गदर्शन, वजनावर आधारित शेळीविक्री, शेळीपालन व्यवसायासाठी आवश्यक निविष्ठांची योग्य दरात विक्री या सुविधा कंपनीच्या माध्यमातून मिळू लागल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com